[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्री शुकदेव सांगतात -
आता शुभगुणी वेळ आली नक्षत्र रोहिणी ।
आकाशी ग्रह नक्षत्र तारे सौम्यचि ते पहा ॥ १ ॥
दिशा प्रसन्न नी सर्व तारांगणहि स्वच्छ ते ।
धरेची नगरे गावे खाने मंगल जाहले ॥ २ ॥
नद्यांचे जल ते स्वच्छ रात्री ही कंज डुल्लती ।
फुली लखडले वृक्ष गाती पक्षी नि भृंगही ॥ ३ ॥
पवित्र शीतलो वायू मंद गंधीत मोद ते ।
द्विजांची अग्निहोत्रे ती आपोआपचि पेटली ॥ ४ ॥
असुरे पीडिले साधू ते चित्ती हर्ष पावले ।
येताचि जन्मवेळा ती दुंदुभीस्वर्गि वाजल्या ॥ ५ ॥
गंधर्वे किन्नरे सिद्धे मांगल्यस्तुति गायिली ।
फेरात अप्सरांच्याही विद्याधारिणि नाचल्या ॥ ६ ॥
पुष्पवर्षाव केला तो आनंदे ऋषि दैवती ।
समुद्रातटि ते मेघ निवांत गर्जु लागले ॥ ७ ॥
अवतार निशीवेळ चौदिशां तम दाटला ।
सोडवी जन्ममृत्यू ते त्याचीच जन्मवेळ ही ।
जीवांचा जीव तो विष्णु देवरूपिणि देवकी ।
गर्भात जन्मला कृष्ण उदेला पूर्णचंद्र जै ॥ ८ ॥
( इंद्रवज्रा )
अद्भूत बाळा वसुदेव पाही
विशाल नेत्रे जणु पद्मची ते ।
हाती गदा शंख नि पद्म चक्र
श्रीचिन्ह स्वर्णी अतिचांग रेखा ॥ ९ ॥
गळ्यात शोभा तशि कौस्तुभाची ।
पीतांबराने बहु श्याम शोभे ।
वैडुर्य टोपीं कुरुळेच केस
सूर्या परी ते चमकून आले ।
ती बाजुबंदो अन कंकणे ती
अपूर्व शोभे तनु बाळकाची ॥ १० ॥
जै तो पिताश्री हरि बाळ पाही
आश्चर्य नेत्री अन मोद दाटे ।
श्रीकृष्ण जन्मोत्सवि श्रीपिता तो
सहस्र गायी द्विजदान इच्छी ॥ ११ ॥
श्रीकृष्णकांती सुतिका घरात
ती दाटता ते स्थिर बुद्धि केली ।
पिता कराला जुळवोनि डोके
झुकूनि बोले स्तुति बाळकाची ॥ १२ ॥
( अनुष्टुप् )
श्रीवसुदेव म्हणाले -
जाणितो तुजला साक्षात् पुरुषा प्रकृती परा ।
केवलानुभवानंद स्वरुपा बुद्धि जाणिते ॥ १३ ॥
सर्गपूर्व गुणे सृष्टी निर्मिसी स्वय प्रकृती ।
प्रवीष्ट नसता तीत प्रविष्ट गमतोस की ॥ १४ ॥
प्रकृती विकृती भावे शकि राही स्वतंत्र ती ।
सोळा विकार बांधोनी निर्मिसी सृष्टि जेधवा ॥ १५ ॥
भाससी त्याच रूपात परी तू नव्हशी तसा ।
वस्तू त्या जन्मण्या पूर्वी तुझा अंश तयात तो ॥ १६ ॥
( इंद्रवज्रा )
बुद्धी कडोनी गुण लक्ष्यिणे ती
इंद्रीय द्वारे विषयास जाणो ।
तयात होता तरि ही कळेना
तू अंतरात्मा तुज अंग नाही ॥ १७ ॥
तुझ्या विना सत्यहि अज्ञ राही
ना वाग्विलासा विण सिद्ध कांही ।
मनातली ती नच वस्तु सिद्ध ।
बाधीत जे ते नच सत्य होते ॥ १८ ॥
गुणक्रियांच्या विरहीत तू तो
तरीहि सृष्टि तव हेत होते ।
विसंगती ही नच कांहि तूते
सर्वागुणांचा तुचि आश्रयो की ॥ १९ ॥
त्रैलोक्यरक्षा करिसी हरी तू
माया गुणे शुक्ल वर्णासि घेता ।
उत्पत्ति साठी रज वर्ण लाल
संहारण्या कृष्ण वर्णासि घेसी ॥ २० ॥
स्वामी तसा सर्व शक्तीस तूची
रक्षावया सृष्टिच जन्मलासी ।
कोट्यावधी राक्षस भूप झाले
सेनापती ते असुनी मुळात ॥ २१ ॥
देवाधिदेवा अति दुष्ट कंस
मारीयले ते तव बंधु सर्व ।
तवावतारो कळता तयाला
येईल आता करि खड्ग घेता ॥ २२ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
देवकी पाहता पुत्र सर्व लक्षणयुक्त तो ।
कंसाचे भय ते वाटे हरीची स्तुति गायिली ॥ २३ ॥
( शालिनी )
देवकी म्हणाली -
देवे केले वर्णनाते तुझ्या की
ब्रह्मज्योती शुद्ध सत्वो रुपाचे ।
सत्ताधीशा निष्क्रिया गूण सत्वा
तू तो साक्षात् विष्णु अध्यात्मदीप ॥ २४ ॥
नष्टो लोको द्वीपरार्धात जेंव्हा
श्रेष्ठोभूते लीन होती तुझ्यात ।
तेंव्हा तुची शेष राही म्हणोनी
शेषो ऐसे नामहि श्रेष्ठ झाले ॥ २५ ॥
या सृष्टीचा साह्य तू एकमात्र
क्षणो-वर्षो सर्व काळात तूची ।
लीला सार्या जीवसृष्टीत तूची
क्षेमोधामा शक्तिमंता नमस्ते ॥ २६ ॥
हा तो जीवो कालव्यालेचि भीतो
त्या भीतीने राहतो फीरतो तो ।
भाग्यानेही आज केली कृपा तू
झोपी गेले मृत्यु तोही पळाला ॥ २७ ॥
कंसे भक्ता त्रासिले की बहूत
रक्षी भक्ता ध्यान रूपा पुरूषा ।
दिव्यो तेजा देहगर्व्या समोर
ऐसे ना तू रूप दावी समक्ष ॥ २८ ॥
( अनुष्टुप् )
न व्हावे माहिती कंसा माझ्याने जन्म हा तुझा ।
तुटेल हृदयो माझे तुझ्या रक्षार्थ श्रीहरी ॥ २९ ॥
अलौकिक तुझे रूप शंख चक्रादि आयुधे ।
चतुर्भुज असे रूप लपवी कमलाकरा ॥ ३० ॥
( इंद्रवज्रा )
हे विश्वसारे लिन घेसि आत
आकाश राही तनु आत जैसे ।
गर्भात आला पुरुषोत्तमा तू
अद्भूतलीला सगळ्या तुझ्या या ॥ ३१ ॥
( अनुष्टुप् )
श्री भगवान् म्हणाले -
पूर्वसर्गात तुम्ही ते पृश्नी नी सुतपा असे ।
पूर्व जन्मता ते होते सुतपा तै प्रजापती ॥ ३२ ॥
आज्ञापिता तुम्हा ब्रह्मे प्रजा निर्मियण्या तुम्ही ।
इंद्रिये रोधुनी तेंव्हा उत्कृष्ट तप साधिले ॥ ३३ ॥
द्वयांनी वायु वर्षा नी घाम थंडी नि उष्णता ।
इत्यादी त्रास साहोनी योगाने धुतले मन ॥ ३४ ॥
भक्षोनी वाळली पाने हवा पीऊनि राहिले ।
शांतचित्त करोनीया इष्ट्यर्थ पूजिले मला ॥ ३५ ॥
माझ्यात चित्त लावोनी घोर ते तप साधिता ।
लोटले देवतांचे तै हजार वर्षही पहा ॥ ३६ ॥
तेंव्हा प्रसन्न झालो मी तुम्हा दोघासि देवि गे ।
तपे श्रद्धे नि भक्तीने अखंड भजले मला ॥ ३७ ॥
वरदाणी तदा मी तै या रूपे ठाकता पुढे ।
पुत्र हो आमुच्या पोटी तुम्ही तो वदले असे ॥ ३८ ॥
संबंध नव्हता तेंव्हा दोघांचा विषयी तसा ।
संतान नव्हते तेणे मोहे मोक्ष न घेतला ॥ ३९ ॥
देताचि वर तो तैसा तेथुनी गुप्त जाहलो ।
लाभता वर इच्छीत विषयीं लागले तुम्ही ॥ ४० ॥
गुणी तो दुसरा जीव माझ्या सम न कोणि तो ।
म्हणोनी पृश्निच्या पोटी पृश्निगर्भचि जाहले ॥ ४१ ॥
तुम्ही त्या पुढच्या जन्मी अदिती कश्यपो मुनी ।
तदा उपेंद्र मी झालो बटूचे रूप वामन ॥ ४२ ॥
तिसर्या जन्मि या रूपे तुमचा पुत्र जाहलो ।
माझी सदैव होते ती वाणी सत्य अशी पहा ॥ ४३ ॥
द्यावया पूर्व स्मृतीते रूप मी दाविले असे ।
मनुष्य शरीरे माझे स्वरूप नकळे कुणा ॥ ४४ ॥
पुत्र नी ब्रह्म हा भाव नित्य माझ्यात ठेविणे ।
वात्सल्य चिंतना द्वारे लाभेल मोक्ष तो तुम्हा ॥ ४५ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
बोलता भगवान् ऐसे राहिले गप्प ते पुन्हा ।
समक्ष माय बापाच्या शिशूरूपहि जाहले ॥ ४६ ॥
( इंद्रवज्रा )
तदा पित्याने हरिप्रेरणेने
इच्छीयले त्या सुतिका घराच्या ।
बाहेर बाळा उचलोनि नेण्या
नी त्याच वेळी अवतारली ती ।
माया यशोदाउदरात जी की
या श्रीहरीच्या परिची विदेही ॥ ४७ ॥
त्या योगमाये मग सर्व लोक
निद्रीत झाले अन बंदिशाळा- ।
-द्वारे तसे ती उघडोनि आली
जशा तसे ती कुलुपे असोनी ॥ ४८ ॥
कृष्णास घेवोनि पिता निघाले
तो द्वार आले उघडोनि सर्व ।
गर्जूनि आले ढग ते नभात
त्या पावसी छत्रहि शेष झाला ॥ ४९ ॥
त्या पावसाने यमुना जळाला
फेसे तरंगे बहु पूर आला ।
ते भोवरे आणि भयान लाटा
फाकून गेल्या हरि जाय तेंव्हा ॥ ५० ॥
गेले द्वयो ते जधि गोकुळात
निद्रीत होते तइ सर्व लोक ।
पुत्रा यशोदाकुशि ठेविले नी
पुत्रीस घेता मग ते निघाले ।
ती पुत्री माया मग दावि लीला
बंदिस्त झाली मग सर्व दारे ॥ ५१ ॥
( अनुष्टुप् )
बंदिशाळेत येताची पुत्री ती देवकी पुढे ।
ठेविता पडल्या बेड्या पहिल्यापरि त्या जशा ॥ ५२ ॥
अचेत योगमायेने यशोदा नच जाणि की ।
पुत्र वा पुत्रि ती झाली नंदालाही तसेचि ते ॥ ५३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥