समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २ रा

भगवंताचा गर्भात प्रवेश, देवतांकडून गर्भाची स्तुती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
स्वये बलिष्ट तोकंस जरासंध सहाय्य त्या ।
प्रलंब बक चाणूर तृणावर्त अघासुर ॥ १ ॥
मुष्टिकारिष्ट असुरो केशी द्वीवीद पूतना ।
बाण भौमासुरो धेनुक् कितेक दैत्यराज ते ।
सहाय्य घेउनी योजी नष्टिण्या यदुवंश तो ॥ २ ॥
भितीने सर्व ते लोक कुरु पांचाल केकयी ।
शाल्वो विदर्भ निषधी विदेहदेशि पातले ॥ ३ ॥
मनात नसुनी कांही सेवा तत्पर दाविती ।
एकेक करुनी कंसे मारिता देवकी हिचे ॥ ४ ॥
सातव्या गर्भि ते शेष देवकीगर्भि राहिले ।
देवकी हर्षली चित्ती भयाने दाटली तशी ॥ ५ ॥
विश्वात्मा भगवंताने पाहिले यदुवंश तो ।
मलाचि मानितो स्वामी कंसाने त्रासिले तया ।
वदले योगमायेला आदेश दिधला असा ॥ ६ ॥
वज्री जा देवि कल्याणी तिथे गोप नि गाई ते ।
गोकुळी नंदबाबाच्या पत्‍न्या वसुदेवच्या ।
गुप्त वेषे तिथे होत कंसभेणे अशा पहा ॥ ७ ॥
देवकी गर्भि तो शेष अंश माझा स्थितो असे ।
काढुनी तेथुनी त्याला रोहिणी पोटि ठेव तू ॥ ८ ॥
कल्याणी बल ज्ञानाने अंशे मी देवकी हिचा ।
होईल पुत्र नी तू त्या यशोदा गर्भि जन्म घे ॥ ९ ॥
जे जे मागती लोक समर्थ वरदाचि हो ।
धूप दीप नि नैवेद्ये पूजितील तुला जन ॥ १० ॥
अनेक स्थान ते तेथे देतील नाम ही अशी ।
दुर्गा नी भद्रकाली नी विजया वैष्णवी तशी ॥ ११ ॥
कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्यका असे ।
माया नारायणी शानी शारदा अंबिकाहि ते ॥ १२ ॥
गर्भी रोहिणिच्या जाता शेषा संकर्षणो असे ।
पडले नाम त्य अतैसे लोकरंजक राम नी ।
बलभद्र कुणी त्याला बल पाहोनि बोलती ॥ १३ ॥
जी आज्ञा ! वदली माया करोनी ती परिक्रमा ।
पृथ्वीशी पातली आणि वदे देव तसे करी ॥ १४ ॥
देवकी गर्भ हा जाता जठरी रोहिणी हिच्या ।
वदले लोक ते दुःखे देवकीगर्भ नष्टला ॥ १५ ॥
विशात्मा जरि तो विष्णू तरी ते भक्त रक्षिण्या ।
वसुदेवमना मध्ये कलांच्या सह जन्मला ॥ १६ ॥
विद्यमान् असुनी झाला व्यक्त अव्यक्त रूपि तो ।
भगवत्‌ज्योत घेवोनि तेजस्वी वसुदेव ते ।
तेजाळले रवी ऐसे लोकांचे नेत्र फाकती ।
बल वाणी प्रभावाला कोणीही झाकू ना शके ॥ १७ ॥
( इंद्रवज्रा )
तो विश्व कल्याण नि ज्योति अंशो
     त्या देवकीने जठरी धरीला ।
प्राचे जशी तो शशि घेइ पोटी
     तै देवकीने धरिला हरी तो ॥ १८ ॥
ती देवकी त्याहि जगन्निवासा ।
     निवास झाली घटिं दीप तैशी ।
विद्याप्रकाशा खळ झाकिती तै
     कोणास नाही गमला तदा तो ॥ १९ ॥
विराजला तो हरि गर्भि तेंव्हा
     पवित्र हास्ये उजळोनि गेले ।
कारागृहो ते तनुतेज योगे
     पाहोनि कंसो वदला मनात ।
हे प्राण माझे हरि तो हराया
     गर्भात आला तयि तेज ऐसे ॥ २० ॥
मी कोणता तो करणे उपाय
     न मारितो वीर कुणीहि स्त्रीला ।
गर्भीण ही तो भगिनीच आहे
     नष्टेल कीर्ती मम आयु श्रीही ॥ २१ ॥
मेल्यापरी हे अति क्रोधि जीणे ।
     शिव्याच देती मरताहि लोक ।
देहाभिमानी असती तयांना
     त्या घोर नर्कात अवश्य जाणे ॥ २२ ॥
( अनुष्टुप् )
जरी मारू शके कंस परी निवृत्ति जाहली ।
बघे तो वाट विष्णूची जन्मण्या वैर बांधुनी ॥ २३ ॥
झोपी जागा पिता खाता उठता बैसताहि तो ।
लागला चिंतनी कृष्णी सर्वत्र कृष्ण पाही तो ॥ २४ ॥
बंदिशळेत ते आले ब्रह्मा नी शिव नारद ।
ऋषीही पातता त्याची स्तुति ती गा‍उ लागले ॥ २५ ॥
( इंद्रवज्रा )
सत्यव्रता सत्यपरं त्रिसत्या
     जे सत्य भासे तयिं सत्य तूची ।
सत्यस्वरूप समदर्शि सत्या
     आम्ही तुझ्या रे चरणासि आलो ॥ २६ ॥
अक्षेय वृक्षो तव ही प्रकृती
     फळे ययाची सुख दुःख दोन ।
बुंधे तयाचे तिन्हि त्या गुणांचे
     त्याची रसो ती पुरुषार्थ चारी ।
ज्ञानेंद्रिये ते मन भाव पाची
     स्वभाव याचा तिन्हि त्या अवस्था ।
त्या सात धातू तयिं साल आहे
     कोकाड त्याचे नवु द्वार ऐसे ।
ते प्राण त्याचे दशपर्ण थोर
     संसारवृक्षा वरि पक्षी दोन ॥ २७ ॥
विस्तार त्याचा तुचि ऐकला की
     तू रक्षिसी नी लय ही करीशी ।
मायापटाने नच जाणवे ते
     ते तत्त्वज्ञानी रुप ते पहाती ॥ २८ ॥
ज्ञानस्वरूपा हित साधण्याला
     अनेक रूपे धरिसी लिलेने ।
ते रूप संता सुख देइ शुद्ध
     तसाचि दुष्टां भय दंड देसी ॥ २९ ॥
हे पंकजाक्षा जन वेगळे ते
     आश्रेय घेती मना लावुनीया ।
भवात जाती सहजी तरून
     ही नाव संते नित घेतलीसे ॥ ३० ॥
तेजस्वरूपा ! तव भक्त सारे
     साधे हितैषी अति प्रेमि होति ।
तरावयाला भवसागरात
     तुझ्या पदाची मग नाव घेती ॥ ३१ ॥
हे पंकजाक्षा ! नच भाव ऐसे
     भ्रमिष्ट मुक्तो वदती स्वताला ।
जरी तपाने अन साधनांनी
     चढोनि गेला तरि तो पडे की ॥ ३२ ॥
जे भक्त प्रीती धरितात पायी
     न ज्ञानियांच्या परिभेय त्यांना ।
शूरांशिरी ते पद ठेवुनीया
     ते चालती त्यां तुचि रक्षितोसी ॥ ३३ ॥
कल्याणदाता सकळास तू तो
     तू सत्व शुद्धो शुभ दिव्यरूपा ।
त्यां दाविसी जे भजती तपाने
     ना आश्रयो तो भजतील कैसे ॥ ३४ ॥
तू जन्मदाता सकलो जिवांसी
     विशुद्धसत्वीं निजरूप तूझे ।
अज्ञान येणे मग भेदभावो
     होईल कैसे अपरोक्ष ज्ञान ।
हे विश्व सारे गुण रूप तूझे
     अंदाज घेते मन फक्त त्याचे ।
साक्षात रूपा नच ते बघो की
     होता कृपा ती मग सर्व शक्य ॥ ३५ ॥
अंदाज घेती श्रुति सर्व रूपा
     न दृश्य त्यांना परि साक्षि होसी ।
ते वर्णिण्याही न पुरेच वाणी
     योगेचि संता गमसी मनात ॥ ३६ ॥
जे हे तुझे मंगल नाम गाती
     जे ऐकती नी स्मरतात चित्ती ।
चित्तात ध्याती चरणारविंदा
     त्यांना पुन्हा ना भवसागरो हा ॥ ३७ ॥
तू नाशिसी दुःख तुझ्याऽवतारे
     तो नष्टला रे भुमिभार सारा ।
धन्यो ! प्रभो भाग्यचि आमुचे ते
     धराहि धन्या पद ठेविता हो ॥ ३८ ॥
असंभवा तो तुज जन्म कैसा
     अंदाज ना ये गमते लिला ती ।
तुला न स्पर्शी मुळि भेद कैसा
     आरोप सारे स्थितिचे तुला की ॥ ३९ ॥
मत्स्यो हयग्रीव नि कच्छ हंस
     वराह सिंहो अन पर्शुराम ।
तो वामनो राम हि कैक वेळा
     होवोनि केली तिन्हि लोक रक्षा ।
या वेळिही तू करि भार नष्ट
     पदी नमीतो यदुनंदनारे ॥ ४० ॥
माते तुझे भाग्यचि थोर पाही
     तो ज्ञान अंशे हरि गर्भि राही ।
नकोच भीती अणुमात्र कंसी
     रक्षील पुत्रो यदुवंश सारा ॥ ४१ ॥
श्रीसुखदेव सांगतात -
ब्रह्मादि स्तविता ऐसे अनिश्चित रुपास त्या ।
शंकरा सह ते सर्व स्वर्गात पातले पुन्हा ॥ ४२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP