समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय २२ वा

पांचाळ, कौरव आणि मगधदेशीय राजवंशाचे वर्णन -

श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्‌)

दिवोदासास मित्रेयु याजला चार पुत्र ते ।
सुदास च्यवनो आणि सहदेव नि सोमको ॥
सोमका शत ते पुत्र जंतु सर्वात थोरला ॥१॥
पृष तो सान सर्वात तयाच्या द्रुपदास ती ।
द्रौपदी आणि तो पुत्र धृष्टद्युम्न असा पहा ॥२॥
धृष्टकेतू तया पुत्र पांचाल वंश हा असा ।
अजमीढा दुजा पुत्र संवरण असे पहा ॥३॥
तपती सूर्यकन्या जी वरिली याजने पुढे ।
हिच्या गर्भी कुरू झाला स्वामी जो कुरूक्षेत्रिचा ॥
परीक्षित्‌ सुधनू जन्हू निषधाश्व तयास हे ॥४॥
सुधन्याचा सुहोत्रो नी तयाच्या च्यवनो यया ।
कृती हा जाहला याला तो उपरीचरोवसु ॥
बृहद्रथादि ते कैक पुत्र याला पुढे पहा ॥५॥
मत्सो कुशांबो बृहद्रथ्‌ प्रत्यग्र चेदि आदि ते ।
चेदी या देशिचे झाले राजे ते पुढती तसे ॥६॥
बृहद्रथा कुशाग्रो नी तयाच्या ऋषभास तो ।
सत्यहिता पुष्पवान तयाला जहु जाहला ॥
दुसर्‍या पत्‍निचा गर्भ दोन भागात जन्मला ॥७॥
मातेने फेकिले भाग जरा राक्षसि खेळता ।
जोडिता जन्मला बाळ जरासंध पहा असा ॥८॥
जरासंध सहदेवो तया सोमपि जाहला ।
श्रुतश्रवा तयाचा नी निःसंतान परीक्षित ॥
जन्हूला पुत्र तो झाला सुरथो नाम त्याजला ॥९॥
सुरथाचा विदुरथो तयाचा सार्वभौम तो ।
तयाच्या जयसेनाच्या राधिका अयुतोसुत ॥१०॥
अयुता क्रोधनो त्याच्या देवातिथिस ऋष्य तो ।
ऋष्याला दिलिपो झाला दिलिपाचा प्रतीप हा ॥११॥
देवापि शंतनू आणि बाल्हीक प्रतिप्या तिघे ।
देवापि पितृराज्याला सोडोनी वनि पातला ॥१२॥
म्हणोनी शंतनू झाला राजा पूर्व महाभिष ।
या जन्मी स्पर्शि ज्याला तो वृद्ध तरुण होतसे ॥१३॥
परंशांति मिळे याला म्हणोनी नाम शंतनु ।
बारावर्षेहि इंद्राने राज्यीं पाऊस ना दिला ॥१४॥
तुम्ही तो सोडुनी बंधू राज्य पत्‍नी स्विकारिली ।
आणावे शीघ्रची त्याला राष्ट्राची उन्नती तयीं ॥१५॥
द्विज ते वदता ऐसे देवापी वनि प्रार्थिला ।
मंत्री त्या अश्मराताने विप्र ते पाठवोनिया ॥१६॥
विचलित तया केले तो निंदी गृह्य आश्रमा ।
निंदिता जाहली वृष्टी देवापी योगि जाहला ॥१७॥
अंती या कलियूगाच्या नष्टेल चंद्रवंश तो ।
सत्ययूगी पुन्हा स्थापी चंद्रवंश पुन्हाहि हा ॥१८॥
भूरिश्रवा शलो भूरी सोमदत्तास पुत्र हे ।
शंतनू कडुनी गर्भी गंगेला भीष्म जाहले ॥
भगवद्‌भक्त नी ज्ञानी धर्माचे जे शिरोमणी ॥१९॥
जगात सर्व वीरांच्या अग्रणी वीर तो असे ।
अन्यांची गोष्ट ती काय मुष्ठियुद्ध करोनिया ॥
गुरू परशुरामाला केले संतुष्ट ते यये ॥२०॥
उपरीचर्‌वसू वीर्ये मत्स्यकन्याचि जन्मली ।
पाळिली दाश राजाने शंतनू पासुनी हिला ॥
विचित्रवीर्य नी झाला तो चित्रांगद पुत्र की ।
गंधर्वे मारिला पुत्र चित्रांगद नि तो पुढे ॥२१॥
हिच्याच पासुनी आणि त्या पाराशर पासुनी ।
कलावतार भगवान्‌ कृष्णद्वैपायनो असे ॥
पिता ते व्यासजी माझे वेदांचे रक्षिते पहा ॥२२॥
शिकलो त्यां कडोनी मी हे जे गुह्य पुराणही ।
पैलादि शिष्य ते त्यांना न हे त्यांनी मुळी दिले ॥
जाणीला अधिकारी मी पुत्र ना पाहिले मला ॥२३॥
अंबिका अंबलीका या काशिराजास पुत्रि दो ।
विचित्रवीर्ये वरिल्या अती कामेचि पीडिला ॥
राजयक्ष्मा तया झाला मेला त्यातच तो पुढे ॥२४॥
माता सत्यवती आज्ञे आपुल्या बंधु पत्‍निला ।
व्यासांनी निर्मिले पुत्र धृतराष्ट्र नि पंडु तो ।
तयांची तिसरी दासी हिला विदुर जाहले ॥२५॥
परीक्षित्‌ ! धृतराष्ट्राला गांधारी पोटि जाहले ।
शतपुत्र तयी थोर दुर्योधन नि दुःशला ॥२६॥
पांडूची पत्‍नि ती कुंती शापे पंडू न संग घे ।
धर्म वायू नि इंद्राने युधिष्ठिर नि भीम नी ॥
अर्जुना निर्मिले तेंव्हा तिघेही ते महारथी ॥२७॥
पांडूची दुसरी माद्री अश्विनी कुमरे तिला ।
नकुलो सहदेवो हे पाचांनी पाच ते पुढे ॥
निर्मिले द्रौपदी गर्भी पाच काका तुझे पहा ॥२८॥
युधिष्ठिरा प्रतिविंध्य भीमाचा श्रुतसेन तो ।
अर्जुना श्रुतकीर्ती नी नकुला तो शतानिक ॥
सहदेवा श्रुतकर्मा या शिवाय दुजे असे ॥२९॥
पौरवी पासुनी धर्मा देवको जाहला असे ।
हिडिंब भीमसेनाचा घटोत्कच महाबळी ॥३०॥
काली नी भीमसेनाने सर्वगत्‌ निर्मिला दुजा ।
विजया - सहदेवांना सुहोत्र जाहला पहा ॥३१॥
करेणुमति नकुला नरमित्रहि जाहला ।
उलुपी अर्जुना पोटी बभ्रुवाहन भूप तो ॥३२॥
सुभद्रा पार्थ या दोघा जन्मला तो तुझा पिता ।
अभिमन्यू उत्तरागर्भी जन्म झाला तुझा नृपा ॥३३॥
नष्टला कुरूवंशो नी जळलास तदाचि तू ।
द्विजब्रह्मास्त्रि श्रीकृष्णे तुला वाचविले तदा ॥३४॥
परीक्षिता तुझे पुत्र भीम नी जनमेजय ।
उग्रसेन श्रुतसेनो वीर हे बैसले पुढे ॥३५॥
तक्षके दंशिता मृत्यू तुझा होईल तेधवा ।
जनमेजय क्रोधोनी यज्ञात सर्प जाळि हा ॥३६॥
कावशेष तुरो होता अश्वमेधी पुरोहित ।
जिंकील पृथिवी सर्व यज्ञाने विष्णु हा भजे ॥३७॥
याचा पुत्र शतानीक करील वेद प्राप्त ते ।
याज्ञवल्क्या कडोनीया अस्त्रविद्या कृपा कडे ॥
शौनका कडुनी ज्ञान घेता तो प्रभुशी मिळे ॥३८॥
सहस्त्रानिक ह्यां पुत्र तयाचा अश्वमेधज ।
तयाचा आसिमोकृष्ण नेमिचक्र तया पुढे ॥३९॥
सुखे कौशांबि राहील हस्तिनापुर वाहता ।
त्याच्या चित्ररथा पुत्र कवीरथ तया पुढे ॥४०॥
वृष्टिमंतो सुषेणो नी सुनिथो नी नृचक्षु तो ।
सुखीनल परिप्लाव मेधावी सुनयास तो ॥४१॥
मेधावीचा नृपंजेयो नृपंजेयास दूर्व तो ।
होईल तिमि त्या दूर्वा तयाचा तो बृहद्रथ ॥४२॥
बृहद्रथा सुदासो नी तयाला तो शतानिक ।
तयाच्या दुर्मनो याला वहीनरचि पुत्र तो ॥४३॥
वहिनरा दंडपाणी त्याच्या निमिस क्षेमक ।
द्विज क्षत्रीय हे वंश वर्णिले विश्व वंद्य ते ॥४४॥
क्षेमासवे पुढे वंश संपेल कलियूगिची ॥४५॥
जरासंधा सहदेवो मार्जारी हा तया सुत ।
श्रुतश्रवा तयाचा नी नरामित्रोऽयुतायुसी ॥४६॥
नरामित्रा सुनक्षत्रो बृहत्‌सेन तयास नी ।
तयाच्या कर्मजित्‌ याच्या सृतंजयास विप्र तो ॥४७॥
विप्राच्या शुचिला क्षेम सुव्रतो क्षेम पुत्र नी ।
सुव्रता धर्मसूत्रो नी तयाचा शम नी पुढे ॥
द्युमत्‌सेनास सुमती पुढती सुबलो पहा ॥४८ ॥
सुबला सनिथो त्याच्या सत्यजीतास विश्वजित्‌ ।
बृहद्रथ्‌वंश हा ऐसा हजारवर्ष काळची ॥४९॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाविसावा अध्याय हा ॥ ९ ॥ २२ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP