समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय २३ वा

अनु, द्रुह्यु, तुर्वसु व यदुवंशाचे वर्णन -

श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्‌)

अनू ययातिच्या पुत्रा सभानर परोक्ष नी ।
चक्षू, सभानरा त्याच्या सृंजया जनमेजयो ॥१॥
तयाचा तो महाशील याचा पुत्र महामना ।
महामनास दो पुत्र उशीनर तितिक्षु तो ॥२॥
शिबी वनो शमी दक्षो उशीनरास चार हे ।
शिबीला सुविरो मद्र वृषादर्भ असे पहा ॥३॥
तितिक्षूला रुशद्रथो त्याच्या हेमास सूतपा ।
सुतपाला बळी नामे पुत्र तो जाहला असे ॥४॥
दीर्घतमा मुने षष्ठ बळीच्या पत्‍नि पासुनी ।
अंग वंग कलिंगो नी सुह्य पुंडू नि अंध्र हे ॥
आपुले वीर्य स्थापोनी जन्मिले पुत्र हे असे ॥५॥
या लोकांनीच पूर्वेला स्वनामे देश स्थापिले ।
अंगपुत्र खनपान तयाचा तो दिवीरथ ॥६॥
दिविरथा धर्मरथो चित्ररथ तयास तो ।
रोमपाद तया नाम सखा दशरथास हा ॥७॥
शांता कन्या दशरथे याच्या ओटीत घातली ।
ऋष्यश्रृंगास पत्‍नीही ज्यां जन्म हरिणी मुळे ॥८॥
आवर्षण बहू काळ राज्यीं त्या रोमपादच्या ।
तेंव्हाचि गणिके त्यांना गान नृत्ये अलिंगुनी ॥
नेले मोहुनि त्या राज्यी तात्काल वृष्टि जाहली ॥९॥
यांनीच करिता यज्ञ दश्‌रथा पुत्र लाभले ।
रोमपादा चतुरंग पृथुलाक्ष तयास तो ॥१०॥
बृहद्रथो बृहत्कर्मा बृहद्‌भानू तया असे ।
बृहद्रथा बृहन्मना तयाचा तो जयद्रथो ॥११॥
संभूती पत्‍नी ती त्याची विजयो गर्भि तो हिच्या ।
क्रमे धृति धृतव्रतो सत्कर्माचा अधीरथ ॥१२॥
अधिरथा न संतान जाता गंगातिरा तया ।
वाहता बाळ पेटारी कर्ण तो दिसला असे ॥१३॥
अधिरथे तया पुत्र मानिले हे असे पहा ।
बृषसेन असा झाला ययाती पुत्र द्रह्युला ॥१४॥
आरब्धाशीच गांधार गांधरा धर्म जाहला ।
धर्माचा धृत नी त्याच्या दुर्मनासी प्रचेत तो ॥१५॥
शतपुत्र यया झाले म्लेंच्छांचे उत्तराधिप ।
ययातीसी तुर्वसू हा त्याच्या वन्हीस भर्ग तो ॥
भर्गाच्या भानुमान्‌ याला त्रिभानू याजला पुढे ॥१६॥
करंधमा मरुत्‌पुत्र निसंतान असाचि तो ।
तयाने पुरुवंशीचा दुष्यंत पुत्र मानिला ॥१७॥
दुष्यंत राज्य इच्छोनी आपुल्या वंशि पातला ।
ययातिच्या यदू यांचा वंश मी वर्णितो पुढे ॥१८॥
महाराजा यदूवंश पवित्र पापनाशक ।
ऐके जो वंशविस्तार पाप मुक्तचि तो पहा ॥१९॥
भगवंत परब्रह्म या वंशी कृष्ण जाहले ।
यदूचे जे सहस्रजित्‌ क्रोष्टा नल तसा रिपु ॥२०॥
सहस्त्रजीता शतजित तयाला तीन पुत्र ते ।
वेणूहयो महाहयो हैहयो तिसरा पहा ॥२१॥
हैहया धर्म नी त्याच्या नेत्राच्या कुंतिला पुढे ।
सोहंजीचा महिष्मान्‌ तो तयाला भद्रसेन हा ॥२२॥
दुर्मदो धनको दोघे भद्रसेना, नि त्या धनो ।
कृतवीर्य कृतवर्मा नी कृतौजा नी कृताग्नि तो ॥२३॥
अर्जुना कृतवीर्याचा सम्राट सप्तद्वीपि जो ।
दत्तात्रयास शिष्यो हा सिद्धीप्राप्त असाहि तो ॥२४॥
संसारी कुणि ना सम्राट यज्ञ दान तपो नि ते ।
योगशास्त्र यशो यांनी तुळा याची करी कधी ॥२५॥
वर्षे सहस्र पंच्यांशी सहस्त्रार्जुन भोगिता ।
न क्षीण जाहला देहे धनाचा नच नाश तो ॥
अन्यांचे धनही जाता त्याच्या त्या स्मरणे मिळे ॥२६॥
हजारो पुत्र त्यासी पै जिवंत पाच राहिले ।
जयध्वजो शूरसेनो वृषभो मधु ऊर्जितो ॥
अन्य ते पर्शुरामाच्या क्रोधाने जळते पहा ॥२७॥
जयध्वजा तालजंघो तयाला शतपुत्र ते ।
और्वीक ऋषिच्या तेजे सगरे मारिले तयां ॥२८॥
वीतहोत्र तयातील तयाचा मधु पुत्र तो ।
मधूला शत पुत्रो नी वृष्णी सर्वात थोरची ॥२९॥
माधवो मधुच्या नामे वार्ष्णेय वृष्णिच्या मुळे ।
यदुचा यादवो वंश त्रिनामे जाहला असे ॥
यदूचा क्रोष्टुको पुत्र तयाला तो वृजीनवान्‌ ॥३०॥
तयाच्या श्वाहिसी झाला रुशेकू नी पुढे तसा ।
चित्ररथा शशिबिंदू भोगैश्वर्यी नि योगि जो ॥३१॥
चौदा रत्‍नांस स्वामी जो चक्रवर्ती अजेयची ।
दहाहजार पत्‍न्या त्या प्रत्येकीं लक्ष संतती ॥
संतान शतकोटी ते जाहले याजला पहा ॥३२॥
पृथुश्रवा नि ते पाच श्रेष्ठ सर्वात हा पहा ।
पृथूचा चर्म हा पुत्र धर्माचा उशना पहा ॥३३॥
शताश्वमेधि हा होता तयाचा रुचको पुढे ।
रुचका पाच जे पुत्र नावे त्यांची अशी पहा ॥३४॥
पुरूजित्‌ रूक्म रुक्मेषु पृथू नी ज्यामघो पहा ।
ज्यामघा पत्‍नि ती शैब्या हिला संतान ते नसे ॥
पत्‍नीचे भय मानोनी न वरी नवरी दुजी ॥३५॥
एकदा शत्रुच्या गेही भोजकन्या लुटोनिया ।
रथात आणिता शैब्या पाहोनी बोलली असे ॥३६॥
कपट्या मम जागी ही बैसली कोण रे अशी ।
ज्यामघो वदला तेंव्हा सून ही आपुली पहा ॥
हासुनी बोलली शैब्या आपुल्या पतिला असे ॥३७॥
मी तो हो जन्मवांझोटी सवती नच त्या कुणी ।
मग ही सून ती कैसी ? ऐकता नृप बोलला ॥
राणी होईल तो पुत्र त्याचीच पत्‍नि ही पहा ॥३८॥
पितरे विश्वदेवांनी राजाला अनुमोदिले ।
शैब्याला पुत्र तो झाला गुणी रूपी विदर्भ तो ॥
शैब्याची साध्वि ती सून भोज्या तेणे वरीयली ॥३९॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेविसावा अध्याय हा ॥ ९ ॥ २३ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP