समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय २१ वा
भरतवंशाचे वर्णन, राजा रंतिदेवाची कथा -
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
मन्यू हा भारद्वाजाचा तयाला पाच पुत्र ते ।
बृहत्क्षत्र महावीर्य नर गर्ग जयो असे ॥१॥
नराचा संकृती याला गुरू नी रंतिदेव हे ।
यश ते रंतिदेवाचे त्रिलोकी सांगती जन ॥२॥
दैवाला मानुनी थोर उद्योग नच हा करी ।
मिळता दान तो वाटी संपत्ती सर्व संपली ॥
धैर्याने राहि हा त्यागी सकुटुंब सदुःखि तो ॥३॥
एकदा जलही नाही मिळाले प्राशिण्या तया ।
दिनी एकोणचाळिस्व्या खीरसामग्रि लाभली ॥४॥
संकटी मूल-बाळे ती भुकेने थर्रर कांपली ।
जेवणा बसता तेथे एक ब्राह्मण पातला ॥५॥
सर्वात देव हा पाही ब्राह्मणा भोजनो दिले ।
आदरे जेवला विप्र गेला तो निघुनी पुढे ॥६॥
उरले रंतिदेवो ती वाटण्या बैसला तदा ।
शूद्र तो अतिथी येता तयाही भाग तो दिला ॥७॥
शूद्र हा जेवुनी जाता कुत्र्याला घेवुनी कुणी ।
अतिथी पातला तेथे भुकेले आम्हि हो वदे ॥८॥
रंतिदेवे अती श्रद्ध्ये दिधले उर्वरीत ते ।
भगवद्रूप त्या पाही तयांना नमिले असे ॥९॥
राहिले फक्त ते एका माणसा पुरते जळ ।
इच्छिता वाटुनी प्याया कोणी चांडाळ पातला ॥
वदला अति मी नीच पिण्याला जल द्याव् मला ॥१०॥
कारूण्यपूर्ण त्या शब्दे कष्टला रंतिदेव तो ।
दया ती दाटली आणि अमृतमय बोलला ॥११॥
(इंद्रवज्रा)
ती सिद्धिपूर्ती गति इच्छि ना मी
न इच्छि भोगा मग काय सांगू ।
सार्या जिवांते वसुनीच आत्मा
मी इच्छितो दुःखचि भोगणे ते ॥१२॥
हा दीन प्राणी जल पीउ इच्छी
देता जलाते जगला तयाने ।
शैथिल्या ग्लानी दिनता नि शोक
ती भूक गेली सुखि आज झालो ॥१३॥
(अनुष्टुप्)
रंतिदेव असे बोले चांडाळा जळही दिले ।
स्वयं तृष्णी असोनीया पहा हे धैर्य केवढे ॥१४॥
परीक्षित् अतिथी वेषे मायारूप हरी रची ।
परीक्षा पूर्ण होताची तिन्ही देवहि ठाकले ॥१५॥
नमस्कार तये केला मागण्या नच इच्छि तो ।
वासुदेवमयी त्याचे सारे चित्तचि जाहले ॥१६॥
हरिवीण न तो इच्छी पूर्ण चित्त तयात ते ।
लाविता मोह तो सर्व स्वप्नवत् भासु लागला ॥१७॥
रंतिदेवानुयायी ते संगे योगीच जाहले ।
आश्रीत भगवंताचे सर्व भक्तचि जाहले ॥१८॥
गर्ग हा मन्युचा पुत्र त्याच्या शीनीस गार्ग्य तो ।
पुढे तो ब्राह्मणो झाला महावीर्यासि पुत्र जो ॥
दुरितक्षय् यया तीन कवी त्रय्यारूणी तसा ॥१९॥
पुष्करारूणि हे विप्र जाहले पुढती तिघे ।
बृहत्क्षत्रासि हस्ती तो रचिता हस्तिनापुरा ॥२०॥
अजमीढ द्विमीढोनी पुरूमिढ्पुत्र हस्तिचे ।
अजमीढाचिये कांही प्रियमेधादि ते द्विज ॥२१॥
आणि एक बृहदिषू बृहद्धनु तयास तो ।
त्याचिया त्या बृहत्कायां जाहला तो जयद्रथ ॥२२॥
जयद्रथाचा विषदो तयाचा सेनजित् यया ।
रूचिराश्व दृढहनू काश्य वत्स असेचि चौ ॥२३॥
पार हा रूचिराश्वाचा पाराचा पृथुसेन नी ।
नीप तो त्याजला पुत्र शत ती जाहली पहा ॥२४॥
शुक-छाया यया पुत्री कृतीला नीप हा वरी ।
ब्रह्मदत्त तया पुत्र योगी मोठाचि तो असे ॥
सरस्वती कुशी मध्ये विष्वक्सेन तयास तो ॥२५॥
जैगीषव्य उपदेशे रची हा योगशास्त्र ते ।
विष्वक्सेना उदक्स्वनो तया भल्लाद जाहला ॥२६॥
यविनरो द्विमीढाचा तयाच्या कृतिमान् यया ।
सत्यधृती पुढे तैसा सुपार्श्व दृढ नेमिला ॥२७॥
सुपार्श्वा सुमती याला सन्नीतीमान् तया पुढे ।
कृतिका जन्मला येणे योगविद्याहि घेतली ॥
प्राच्यसाम अशा नामे संहिता रचिल्या सहा ॥२८॥
कृतीचा नीप नी त्याचा उग्रायूधासि क्षेम्य तो ।
क्षेम्याच्या सुविरो याला रिपुंजय पुढे पहा ॥२९॥
रिपुंजया बहुरथो पुरूमीढा न पुत्र ते ।
अजमीढा दुजी पत्नी नलिनी हिजला निलो ॥३०॥
नीलाच्या शांति याचा तो सुशांतीस पुरूज तो ।
पुरूजा अर्कनी त्याचा भर्म्याश्व यास पाच ते ॥३१॥
मुद्गलो नी यविनरो कांपिल्यो नी बृहदिषू ।
पाचवा संजयो पुत्र भर्म्याश्व वदला कि हे ॥३२॥
’पांचालम्’ शूर हे राजे पांचाळ नाव जाहले ।
मौद्गल्यो मुद्गलो गोत्र द्विजांचे जाहले पुढे ॥३३॥
मुद्गला जोडपे झाले अहल्या पुत्रि नी तसा ।
दिवोदास असा पुत्र अहल्या गौतमा दिली ॥३४॥
गौतमाच्या शतानंदा सत्यधृति निपूण हा ।
धनुर्विद्येत त्याला तो शरद्वान् पुत्र जाहला ॥
पाहता उर्वशी याने सांडले वीर्य मूंजिसी ॥३५॥
सुलक्षणी असे तेणे पुत्र पुत्री हि जन्मले ।
शिकार करण्या जाता शंतनू नृप पाहि ते ॥
मुलगा तो कृपाचार्य मुलगी कृपि जाहली ।
द्रोणाचार्यास पत्नी ही कृपी पुढति जाहली ॥३६॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकविसावा अध्याय हा ॥ ९ ॥ २१ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|