समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १९ वा
ययातिचा गृहत्याग -
श्रीशुकदेव सांगतात - (अनुष्टुप्)
परीक्षिता ययातीने स्त्रियांचा भोग भोगिता ।
स्मरला तो अधःपात गाथा पत्नीस बोलला ॥१॥
एक गाथा प्रिये सत्य साधू ते चिंतिती मनीं ।
घरात गुंतला त्याचे कल्याण नच हो कधी ॥२॥
वनात बकरा एक प्रिय वस्तूस धुंडिता ।
दैवाने पाहिले त्याने बकरी ती कुपामधे ॥३॥
कामूक बकरा योजी बकरी काढण्या तदा ।
शिंगांनी खोदुनी भूमी केला रस्ता तिला पहा ॥४॥
निघाली सुंदरी शेळी अजप्रेमास इच्छिले ।
धष्ट पुष्ट असा प्रीय दुजी शेळी बघे तदा ॥५॥
ती ही त्या पडली प्रेमीं एकटा बकरा पुढे ।
अनेक भोगि तो शेळ्या वनात मस्तवाल तो ॥६॥
कूपा मधोनि जी आली पाही ती प्रीय आपुला ।
विहारे अन्य शेळ्यांशी तदा ती न सहे मुळी ॥७॥
कामी हा नच विश्वासू मित्ररूपात शत्रु हा ।
कळपी पातली तेंव्हा दुःखिता सोडुनी पती ॥८॥
मेंऽमेंऽऽ करीत कामी तो गेला पाठीसि एकदा ।
परंतु नच ते गाणे ऐकिले प्रियपत्निने ॥९॥
द्विजस्वामी तिचा होता अजाचे अंड कापिले ।
जोडिले परती त्याने कैक विद्या अशा तया ॥१०॥
या परी जुटता अंड पुन्हा तो कूपवालिसी ।
बहूत भोगुनी भोग आजही तृप्त तो नसे ॥११॥
प्रिये ! ऐशी दशा तुझ्या प्रेमात दीन मी ।
गुंतलो मोह-मायेने मुकलो आत्मरूप ते ॥१२॥
पृथ्वीचे सर्व ते धान्य सुवर्ण पशु नी स्त्रिया ।
न करी त्या नरा तृप्त कामे जर्जर जो असा ॥१३॥
वासना शांत ना होती भोग भोगात त्या कधी ।
तुपाने भडके अग्नी भोगाने वासना तशा ॥१४॥
न घडो प्राणिमात्रांचा राग द्वेष असा कधी ।
समदर्शी तदा होतो तया आनंदि विश्व हे ॥१५॥
दुःखाचा उद्गमो तृष्णा मूर्ख त्यागी न ती कधी ।
वृद्धत्वी पालवी येते हितैषी त्यागि सत्वरी ॥१६॥
माता बहीण कन्येला खेटोनी नच ते बसो ।
बलवान् इंद्रिये ऐशी ज्ञानीही बिघडे तदा ॥१७॥
भोगी मी विषयो त्याला सहस्त्र वर्ष जाहले ।
तरीही लालसा वाढे क्षणाने पुढती-पुढे ॥१८॥
म्हणोनी त्यागितो तृष्णा हरिशी चित्त अर्पितो ।
शीतोष्ण सुख-दुःखादी त्यजिता मुक्त हिंडतो ॥१९॥
स्वर्ग - मृत्यू असे दोन्ही असत्य मानुनी मनी ।
न चिंती इच्छि ना भोग रहस्य ज्ञानि जाणती ॥२०॥
बोलता पत्निला ऐसे तारूण्य पुरुला दिले ।
न लागो वासनी चित्त म्हणोनी योजिले असे ॥२१॥
तुर्वसू यदु द्रुह्योनी चवथा अनु याजला ।
चारी त्या दिशिचे राज्य देवोनी टाकिले पुन्हा ॥२२॥
पुरूला सर्वसंपत्ती सार्वभौमासि ठेविले ।
बंधू स्वाधीन देवोनी वनात नृप पातला ॥२३॥
पंख येता त्यजी पक्षी सहजी खोप आपुले ।
क्षणात निघला तैसा ययाती सर्व त्यागुनी ॥२४॥
(इंद्रवज्रा)
वनात जाता त्यजि सर्व इच्छा
आत्मानुभावे त्यजि लिंगदेह ।
विशुद्धरूपी हरि वासुदेवीं
लावोनि चित्ता गति पावला तो ॥२५॥
(अनुष्टुप्)
गाथा ती ऐकिली तेंव्हा देवयानीस वाटले ।
निवृत्ती बोधिती माते हासोनी बोलली तदा ॥२६॥
संबंधी स्वजनो यांचे तुटणे जोडणे जसे ।
ठेल्याशी थांबती लोक क्षणीक सर्व हे असे ॥२७॥
समजोनि असे सारे आसक्ती देवयानि त्या ।
त्यागिता भगवान् कृष्णीं पावली देह त्यागुनी ॥२८॥
(तिने भगवंतास नमस्कार करून म्हटले)
नमो तुला भगवते वासुदेवास आश्रया ।
शक्तिमान् सर्वभूतात्म्या शांत तत्वा नमो नमो ॥२९॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणिसावा अध्याय हा ॥ ९ ॥ १९ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|