समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १८ वा
ययातिचरित्र -
श्रीशुकदेव सांगतात - (अनुष्टुप्)
श्रीशुकदेव सांगतात- (अनुष्टुप्)
यति ययाति संयाती आयती वियती कृती ।
नहुषा संतती ऐसी सहा जै इंद्रियेचि ती ॥१॥
न स्विकारी यती राज्य पिता देई परी तसा ।
जाणी तो परिणामाला आत्मरुप न तै मिळे ॥२॥
नहुषे इच्छिली जेंव्हा शची ही इंद्रपत्नि तै ।
शापे अजगरो होता ययाती राज्यि बैसला ॥३॥
चौदिशी चार बंधूंना नेमोनी राज्य हा करी ।
दैत्यराज वृषपर्वा शर्मिष्ठा पुत्रि याचि नी ॥
शुक्राची देवयानी ही दोघी पत्न्या ययातिला ॥४॥
राजा परीक्षिताने विचारिले -
शुक्राचार्य द्विजो आणि ययाती क्षत्रियो तसा ।
प्रतिलोम कसा झाला क्षत्रिया द्विजपुत्रि ती ॥५॥
श्रीशुकदेव सांगतात -
मानिनी राजकन्या ही शर्मिष्ठा गुरुपुत्रि ती ।
देवयानी सवे गेली उद्यानी फिरण्या जधी ॥६॥
उद्यानी भार पुष्पांचा सरोवर तसेचि ते ।
कमळीं गुंजती भृंग जणू गाते सरोवर ॥७॥
पातता तेथ या कन्या वस्त्र ठेवोनिया तिरी ।
पोहल्या क्रीडल्या तेथ जळ फेकोनि सुंदर ॥८॥
सती-शंकर त्या वेळी जाताना पाहुनी मुली ।
संकोचल्या त्वरे आल्या बाहेरी वस्त्र घेतल्या ॥९॥
शर्मिष्ठे घाइ माजी त्या नेसली देवयानिचे ।
पाहता देवयानी ती क्रोधोनी वदली तिला ॥१०॥
पहा दासी कसे वागे नैवेद्य कुत्रि भक्षि तै ।
नेसली मम ही वस्त्रे राम राम कसे पहा ॥११॥
ब्राह्मणे निर्मिली सृष्टी तपाने आपुल्या तसे ।
हरिचे मुखरूपी ते हृदयी ध्याति ज्योतिला ॥१२॥
दाबिला जग कल्याणा जेणे वैदिक मार्ग हा ।
इंद्रादी देव ही ज्यांचे पायांना नित सेविती ॥
त्या सर्व ब्राह्मणा माजी भृगुवंशचि श्रेष्ठ तो ॥१३॥
ते सर्व आमुचे शिष्य शूद्रांनी वेद वाचणे ।
तशीही नेसली पाहा वस्त्र माझेचि घेउनी ॥१४॥
देवयानी अशा देता शिव्या शर्मिष्ठि क्रोधली ।
जखमी नागिणी ऐसी ओठ चावोनी बोलली ॥१५॥
भिक्षुके बोलशी काय कळते का तुझे तुला ।
कुत्रीच्या परी कां येशी तुकड्याला आमुच्या घरा ॥१६॥
शर्मिष्ठा वदुनी ऐसे आपुले वस्त्र घेवुनी ।
कूपात देवयानीला ढकली क्रोधुनी पहा ॥१७॥
योगायोगे तिथे राजा ययाती पातला असे ।
जलार्थ पाहता कूपीं दिसे ती देवयानिची ॥१८॥
वस्त्रहीन अशी होती दुपट्टा दिधली तिला ।
दयेने हात देवोनी बाहेर काढिले असे ॥१९॥
प्रेमाने देवयानी ती राजाला वदली असे ।
धरिला हात माझा तू कोणी ना धरणे पुन्हा ॥२०॥
पडणे विहिरी माजी तुचि बाहेर काढणे ।
इच्छा ही भगवंताची कोणाचा ना प्रयत्न हा ॥२१॥
कचां मी दिधला शाप पूर्वी नी तोहि दे मला ।
न वरी द्विज तो कोणी तुला, हा योगची पहा ॥२२॥
शास्त्र विरुद्ध ते लग्न परी दैवेचि बक्षिसी ।
दिधली, बसली चित्त राजाने गोष्ट मानिली ॥२३॥
जाता राजा पुन्हा आली रडता देवयानी ती ।
पित्यासी वदली सारे शर्मिष्ठा वागली जशी ॥२४॥
शर्मिष्ठी बोल ते सर्व शुक्राचार्यास लागले ।
निंदिली भिक्षुकी गेले सकन्या त्या पुरातुनी ॥२५॥
समजे वृषपर्व्याला शापा - शत्रूसि भीउनी ।
धावला गुरुपाशी नी रस्त्यात विनवी पहा ॥२६॥
भगवान् गुरुचा क्रोध क्षणात संताप वदे ।
राजा मी पुत्रि ना सोडी ही म्हणे ऐक तू तसे ॥२७॥
राजाने मानिता बोले देवयानी पित्यास की ।
देताल तुम्हि ज्या गेही शर्मिष्ठा तेथ दासि हो ॥२८॥
जाणोनी कुळ आपत्ती शर्मिष्ठ्ये मानिले असे ।
हजार मैत्रिणी घेता सेवेत पातली पहा ॥२९॥
राजाला दिधली पुत्री आणीक शुक्र बोलले ।
शर्मिष्ठा दासि ही न्यावी न ध्यावी सेजि ती कधी ॥३०॥
देवयानी पुत्रवती पाहता ऋतुकालि त्या ।
एकांती गाठुनी राजा इच्छिला सहवास तो ॥३१॥
सुधर्म प्रार्थना ऐशी राजाने मानिली असे ।
प्रारब्ध मानिले थोर होईल होय ते पुढे ॥३२॥
यदू तुर्वसु हे दोघे देवयानीस पुत्र ते ।
द्रुह्यू अनू पुरू तीन शर्मिष्ठीपुत्र हे तिघे ॥३३॥
कळता पतिच्या वीर्ये शर्मिष्ठा गर्भ धारिली ।
क्रोधली देवयानी नी पित्याच्या घरी पातली ॥३४॥
ययाती बोलला गोड विनवी पाय चेपुनी ।
सासर्या घरिही आला परी ती मानिना तया ॥३५॥
क्रोधोनी बोलले शुक्र मूर्ख खोट्या नि लंपटा ।
शरिरे सत्वरी होई वृद्ध नी तै कुरूपही ॥३६॥
ययाति म्हणाला -
अतृप्त तुमची पुत्री भोगिता राहिलो असे ।
पुत्रीचे इष्ट ना यात या वरी शुक्र बोलले ॥
वृद्धत्व देइ पुत्राला पुन्हा तरूण हो पहा ॥३७॥
व्यवस्था ती अशी होता ययाती यदुला म्हणे ।
पुत्रा दे तव तारूण्य माझे वृद्धत्व घेइ तू ॥३८॥
न मी भोगात त्या तृप्त दिल्याने आयु ती अशी ।
आनंदे भोग भोगील कांही वर्ष पुढे पहा ॥३९॥
यदु म्हणाला -
अकाली ती जरा येता न मी इच्छी जगू पुढे ।
भोगिल्या विषयी भोगा वैराग्य लाभते पुन्हा ॥४०॥
परीक्षिता असे चारी पुत्रांनी मानिले नसे ।
अज्ञान धर्मतत्वाचे शरीरा नित्य मानिती ॥४१॥
धाकट्या गुणि पुत्राला ययाती शेवटी म्हणे ।
श्रेष्ठ बंधू परी तू तो नको मोडूस शब्द हा ॥४२॥
पुरु म्हणाला -
पितृकृपे परंशांती देह हा दिधला तुम्ही ।
पितृऋण जगी कोण शकतो फेडु तो तसा ॥४३॥
उत्तमो सुत तो होय पितृहेतूस जाणुनी ।
वागणे अन्यथा जाणा पित्याचा मल-मूत्र तो ॥४४॥
आनंदे वदुनी ऐसे वृद्धत्व घेतले पहा ।
तारूण्य घेवुनी राये भोगिले रति सौख्य ते ॥४५॥
सम्राट सात द्वीपांचा प्रजेला पुत्रवत् बघे ।
सशक्त इंद्रिये सारी, रमे भोगात युक्त तो ॥४६॥
देवयानी प्रिया त्याची शरीर मन अर्पुनी ।
वरचे वर ते देई एकांता सुख राजिया ॥४७॥
वेदांचा प्रतिपाद्यो जो भगवान् सर्व देव तो ।
मोठे यज्ञ करोनीया नृपाने तो उपासिला ॥४८॥
आकाशी दिसती मेघ कधी ते मुळि ना तिथे ।
तसेचि नाम-रूपाने दिसे नी ना दिसे हरी ॥४९॥
भगवान् वासुदेवो तो सर्वांच्या हृदयी वसे ।
निष्काम राहुनी राये श्रीनारायण पूजिला ॥५०॥
हजार वर्ष ते त्याने चंचल इंद्रिये मने ।
भोगिले विषयी भोग परी सम्राट तृप्त ना ॥५१॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हा ॥ ९ ॥ १८ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|