समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १५ वा
ऋचिक, जमदग्नी परशुरामाचे चरित्र -
श्रीशुकदेव सांगतात - (अनुष्टुप्)
उर्वशी गर्भिचे पुत्र राजाला लाभले सहा ।
आयु श्रुतायु सत्यायु रय नी विजयो जय ॥१॥
वसुमान श्रुतायूचा सत्यायूचा श्रुतंजय ।
रयाचा एक तो पुत्र अमीत जयचा असे ॥२॥
विजया भीम नी त्याच्या कांचना होत्रच्या पुढे ।
जन्हू जो ते पियी पूर्ण गंगापाणिहि अंजुळे ॥
जन्हुला पुरु हा झाला बलाक पुढती अजक् ॥३॥
अजका कुश नी त्याचे कुशांबू तनयो वसु ।
कुशनाभ असे चारी गाधि हा तो कुशांबुचा ॥४॥
त्याची सत्यवती कन्या ऋचिके याचिली असे ।
अयोग्य गाधिशी वाटे तदा तो वदला ऋषी ! ॥५॥
कुशीक वंशिये आम्ही आमुची पुत्रि दुर्लभ ।
कृष्ण एक जया कर्ण श्वेत अश्व हजार ते ॥
आणुनी मजला द्यावे शुल्करूपे तुम्ही पहा ॥६॥
गाधीचे ऐकता बोल गेला तो वरुणाकडे ।
आणिले अश्व ते तैसे वरिली सुंदरी तदा ॥७॥
ऋचिकां एकदाची त्या सासू पत्नींनि पुत्र ते ।
याचिले तेधवा याने चरु पाक विभक्त ते ॥
करुनी स्वय तो गेला स्नानासाठी नदीकडे ॥८॥
चरु तो एकमेकींचा माय लेकी पिल्या तदा ।
ऋषि त्या ऋचिको याच्या परस्पर असे पहा ॥९॥
ऋचिका कळता बोले अनर्थ जाहला बहू ।
सखे पुत्र तुला होय घोर दंडाधिकारि तो ॥
ब्रह्मवेता तुझा बंधू जन्मेल बघ वेगळा ॥१०॥
सरस्वती ऋचीकाला वदली स्वामि तो मला ।
नको घोर तसा पुत्र तदा ते वदले तिला ॥
ठीक तो हो प्रपुत्रो नी जन्मला जमदग्नि तो ॥११॥
सरस्वती पुढे झाली कौशिकी नदि पावन ।
रेणुका रेणुची पुत्री जमदग्ने वरीयली ॥१२॥
तयांच्या उदरी झाले वसुमानादि पुत्र ते ।
सान तो परशूराम यश ज्याचे जगी असे ॥१३॥
असे ते ऐकतो मी की हैहयी वंश खंडिण्या ।
भगवान् परशूराम घेवोनी अवतार तो ॥
केली एकेविसी वेळा क्षत्रीयहीन ही मही ॥१४॥
अपराध जरी थोडा तरी ते द्विज द्वेषि नी ।
तमोगुणी विशेषत्वे हरिला भार विष्णुने ॥१५॥
राजा परीक्षिताने विचारिले -
क्षत्रीय संपले तेंव्हा खरी गोष्ट असे तरी ।
कोणती चूक ती तैशी जाहली क्षत्रियांकरे ॥
वारंवार असा झाला संहार हरिच्या करें ॥१६॥
श्रीशुकदेव सांगू लागले -
हैहयी वंशि अर्जून क्षत्रीय नृप श्रेष्ठ तो ।
दत्त नारायणो अंश नृपे केला प्रसन्न तो ॥१७॥
अजेय अर्जुनो बाहू घेतसे वर मागुनी ।
तेज शौर्य धनो कीर्ती अतूल लाभली तया ॥१८॥
योगेश्वर असा झाला सूक्ष्म नी अति थोर ही ।
धारी रुप अशा सिद्धी वायूच्या परि तो फिरे ॥१९॥
वैजयंती गळ्यामध्ये सहस्त्रार्जुन पोहण्या ।
सुंदर्या सोबती घेता नर्मदा नदिं पातला ॥
सहस्त्रबाहुच्या योगे नर्मदाजल रोधले ॥२०॥
त्या वेळी रावणाचेही वरी होते शिबीर ते ।
तुंबल्या त्या जळामध्ये शिबीर बुडु लागले ॥
न साही रावणो वीर अर्जुनेय पराक्रम ॥२१॥
बोलला अर्जुना खूप अर्जुने त्यां स्त्रियांपुढे ।
बांधिले माकडा ऐसे पुलत्स्ये सोडिले तया ॥२२॥
एकदा अर्जुनो गेला वनी घोर शिकारिला ।
दैवाने जमदाग्नीच्या आश्रमी पातला असे ॥२३॥
आश्रमी जमदाग्नीच्या कामधेनू वसे तदा ।
ऋषिने धेनू प्रार्थोनी ससैन्य नृप मंत्रि हे ॥२४॥
सन्मानिले यथा योग्य हेवा राजास वाटला ।
धन्यवाद न तो देता कामधेनूस इच्छिले ॥२५॥
न पुसे ऋषिसी गाय-वासरू सेवकां करे ।
ओढीत स्वपुरा नेली गाय ती ओरडे तरी ॥२६॥
गेले सर्व तदा आला परशूराम आश्रमी ।
दुष्टवृत्तांत ऐकोनी क्रोधाने पेटला बहू ॥२७॥
घेतला परशू मोठा भाता ढाल धनू पुढे ।
हत्तीला झडपी सिंह तसे वेगेचि धावला ॥२८॥
(इंद्रवज्रा)
सहस्त्र बाहू नगरात जाण्या
वेळीच गाठी ऋषिवेगवान ।
सूर्यापरी केशहि शोभले नी
सशस्त्र मृगाजिन अंबरो ते ॥२९॥
अक्षौणि सत्रा नृप धाडि सेना
सुसज्ज शस्त्रे रथ हत्ति घोडे ।
त्या पर्शुरामे भगवंत अंशे
मारीयले सर्वचि एकट्याने ॥३०॥
वायूपरी तो ऋषिवेग होता
कापीत गेला परशूशि शत्रू ।
रणात अश्वो गज नि रथांचे
नी वीरप्रेते ढिग थोर झाला ॥३१॥
तो हैहयाधीपति पाहि नेत्रे
सेना धनुष्ये रथ हत्ति घोडे ।
रक्तात न्हाता पडले भुमीसी
नी क्रोधेवेगे लढण्यास आला ॥३२॥
नी पाचशे तो तिर सोडि वेगे
एकाचि वेळी बहुबाहु तेंव्हा ।
तो वीरश्रेष्ठोमणि पर्शुरामे
एकाचि बाणे तिर तोडियेले ॥३३॥
पहाड वृक्षो मग तोडुनिया
सहस्त्रबाहू हरिअंगि धावे ।
नी पर्शुरामे अति स्फूर्ति घेता
भुजांसि तोडी जणु सर्पखंड ॥३४॥
(अनुष्टुप्)
कापिल्या बाहु त्याच्या तै गिरीशिखर भासला ।
कापिले शिर तै त्याचे पळाली भिउनी मुले ॥३५॥
शत्रुघ्न परशूरामे सवत्स धेनु आणुनी ।
दुःखीत कामधेनू ती पित्या पायाशि अर्पिली ॥३६॥
महिष्मती पुरामध्ये घडले युद्ध जे असे ।
सर्व ते बंधु पित्रांना सांगता वदले पिता ॥३७॥
राम राम अरे पुत्रा वीर तू परि पाप हे ।
वधिता थोर हे केले सर्व देवमयो नृपा ॥३८॥
आम्ही द्विजक्षमेनेची जगाला पूजनीय की ।
सर्वांचा प्रपिता ब्रह्मा क्षमेने थोर पावला ॥३९॥
क्षमेने द्विज तेजो ते सूर्याच्या परि फाकते ।
शक्तिमान् भगवान् विष्णु क्षमेने शीघ्र पावतो ॥४०॥
वध तो सार्वभौमाचा त्याज्य विप्रवधाहुनी ।
जा जा घे भगवन्नाम तीर्थीं पापास धू पहा ॥४१॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥ ९ ॥ १५ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|