समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १४ वा
चंद्रवंशाचे वर्णन -
श्रीशुकदेव सांगतात - (अनुष्टुप्)
राजा मी वर्णितो आता पवित्र चंद्रवंश तो ।
जयी पुरुरवा ऐसे कीर्तिमान् नृप जाहले ॥१॥
सहस्त्रशीर्ष पुरुषा ब्रह्मा नाभीत जन्मले ।
ब्रह्म्याचा पुत्र तो अत्री पित्याच्या सम तो गुणी ॥२॥
अत्रीच्या नेत्रि तो चंद्र अमृतमय जन्मला ।
ब्रह्म्याने नेमिले याला द्विजौषधि अधीपती ॥३॥
विजयी तिन्हि लोकी हा यज्ञराजसुयो करी ।
गर्वे बृहस्पतीपत्नी तारा ती हरिली यये ॥४॥
विनवी गुरु तो त्याला परी तो पत्नि देइना ।
तेणे त्या दानवी दैत्यीं घोर संग्राम जाहला ॥५॥
चंद्राचा घेतला पक्ष शुक्राचार्ये हि द्वेषुनी ।
शिवाने घेतला पक्ष अंगिरागुरुपुत्रचा ॥६॥
देवेंद्रे देवतामेळे गुरूचा पक्ष घेतला ।
तारा निमित्त काढोनी घोर संग्राम जाहला ॥७॥
अंगिरे प्रार्थिले ब्रह्म्या युद्ध हे थांबवावया ।
ब्रह्मा क्रोधावले चंद्रा तारा ती दिधली पुन्हा ॥८॥
गर्भार पाहुनी पत्नी वदला तो बृहस्पती ।
दुष्टे त्यागी त्वरे गर्भ न जाळी सति मानुनी ॥९॥
तारा ती लाजली खूप गर्भीचे बाळ काढिले ।
सोनेरी बाळ पाहोनी इच्छी चंद्र-बृहस्पती ॥१०॥
भांडता वदले दोघे माझा-माझाचि बाळ हा ।
तारेला पुसता विप्र लज्जेने नच बोलली ॥११॥
बोलले बाळ क्रोधाने दुष्टे तू सांगशी न कां ? ।
तुझे कुकर्म ते सारे सांग शीघ्रचि तू मला ॥१२॥
एकांती बोलले ब्रह्मा तदा ती चंद्र बोलली ।
तदा चंद्रासि तो पुत्र ब्रह्म्याने दिधला असे ॥१३॥
ब्रह्म्याने बुध हे नाम बाळाचे ठेविले असे ।
गंभीर बुद्धि ती त्याची चंद्राला हर्ष जाहला ॥१४॥
परीक्षिता बुधाद्वारा इला गर्भे पुरूरवा ।
जन्मला वर्णिला मागे गुणी संपन्न शीलवान् ॥१५॥
इंद्राच्या दरबारात नारदे गुण गायिले ।
ऐकता पीडिली कामे उर्वशी त्या पुरुरवे ॥१६॥
मित्रावरुण शापाने पडली पृथीवीस ही ।
कामदेव असा मूर्त गाठिला तो पुरूरवा ॥१७॥
पाहता हर्षला राजा रुपवान् देवस्त्री अशी ।
रोमांच उठले अंगी गोड शब्दात बोलला ॥१८॥
राजा पुरुरवा म्हणला -
स्वागतम् सुंदरी यावे काय सेवा करू तुझी ।
विहार करु गे दोघे अनंत काळ तो पुढे ॥१९॥
उर्वशी म्हणली -
राजा तू रुपवान् मूर्त कोण आसक्त ना तुला ।
तुझ्या समीप येताची रमण्या गुंतले मन ॥२०॥
प्रशंसनीय जो होतो स्त्रियांना आवडे तसा ।
अवश्य रमु हो दोघे परी एकचि शर्थ की ॥
ठेव माझी असे दोन सांभाळी मेषपुत्र हे ॥२१॥
वीरा तूपचि मी खाते मैथूना व्यतिरिक्त ते ।
न पाही वस्त्रहीनो मी तुला ही शर्थ एवढी ॥२२॥
(राजा शर्थ मानून म्हणतो)
अहो अद्भूत हे रूप भाव तो मोहवी जगा ।
स्वयं देवी इथे आली भोगण्या कोण ना म्हणे ॥२३॥
कामशास्त्रोक्त रितिने रमे ती राजियासह ।
स्वच्छंद रमले तैसे नंदनोवनि तेधवा ॥२४॥
रमता देविअंगाशी पद्मगंध सुटे पहा ।
रमले कैक ते वर्षे विसरे शुद्ध तो नृप ॥२५॥
उर्वशी न दिसे इंद्रा गंधर्वा बोलला तदा ।
सत्वरी उर्वशी आणा स्वर्ग हा पडला फिका ॥२६॥
गंधर्व घोर अंधारी अर्ध्या रात्रीस जाउनी ।
चोरिली ठेव ती पिल्ले मेषाची की द्वयो पहा ॥२७॥
नेता गंधर्व ते बें बें ध्वनी उर्वशि ऐकता ।
अविश्वासू असा षंढ नृप हा पिल्ल रक्षिना ॥
मानिले स्वामि मी यासी वदली उर्वशी अशी ॥२८॥
विश्वासे याजला मी नी चोरांनी पिल्ल चोरिली ।
मेले मी हा बघा झोपे शूर षंढापरी असा ॥
दिवसा शूरता दावी रात्री स्त्रीच्या परी लपे ॥२९॥
अंकूश हत्तिला टोचे तसे राजास बोलली ।
वस्त्रहीन असा राजा शस्त्र घेवून धावला ॥३०॥
गंधर्वे सोडिले मेष विजेच्या परि चमकले ।
तेजीं त्या नग्न तो पाही गेली तेंव्हाच उर्वशी ॥३१॥
न दिसे उर्वशी तेंव्हा राजा खिन्नचि जाहला ।
शोकाने व्यापला चित्ती सर्वत्र फिरु लागला ॥३२॥
सरस्वती नदी काठी कुरुक्षेत्रात एकदा ।
प्रसन्न सखिच्या पाच सह उर्वशि पाहि तो ॥
उर्वशी पाहता राजा गोड शब्दात बोलला ॥३३॥
प्रिये गे थोडिशी थांब मानी एकचि गोष्ट ही ।
निष्ठुरे आज सौख्याते न देता जावु तू नको ॥
क्षण थांब अशी येई बोलू आपण कांहि ते ॥३४॥
देवी या शरिराशि ती कृपा ना राहिली तदा ।
फेकिसी देह हा माझा खातील गृध लांडगे ॥३५॥
उर्वशी म्हणली -
राजा तू न मरो ऐसा न भक्षो पशु ते तुला ।
स्त्रियांची मैत्रि ना व्हावी लांडग्या परि त्या पहा ॥३६॥
निर्दयी क्रूरही होती चिडती काम साहसी ।
स्वार्थार्थ वचने देती पती बंधूसि मारिती ॥३७॥
हृदयी प्रेम ना होते भोळ्यांना फास देति त्या ।
अनेका कुलटा चाखी स्वच्छंदाचारिणी बने ॥३८॥
राजराजेश्वरो तुम्ही न भ्यावे धैर्यवान् तुम्ही ।
प्रतिवर्षी एकरात्री शय्या देईन मी तुम्हा ॥
तेणेही ते तुम्हा होय संतान वेगळे पुढे ॥३९॥
गर्भार पाहता तीस राजा हा पातला पुरा ।
एक वर्षे तिथे जाता वीरमाता बघे उभी ॥४०॥
पाहता सुखि तो झाला एकरात्र तिथे तसा ।
उर्वशी निघता झाला बहू दुःखित, ती वदे ॥४१॥
गंधर्वा प्रार्थिणे तुम्ही अर्पितील मला तुम्हा ।
स्तविता अग्निपात्रोची गंधर्वे दिधले तया ॥
उर्वशी मानुनी त्याते हिंडला रान-रान तो ॥४२॥
शुद्ध येता त्यजी पात्र महाली चिंति स्त्री पुन्हा ।
आरंभ त्रेतयूगाचा त्रैवेद चित्ति जाहले ॥४३॥
जिथे पात्र त्यजी तेथे पातला नृप तो पुन्हा ।
पिंपळो शमिगर्भात त्या जागी वृक्ष पाहिले ॥४४॥
तयाने पाहता दोन अरणी काष्ठ योजिले ।
उर्वशी खालची काष्ठ वरची ती पुरोरवा ॥
अग्नी तो पुत्ररूपात पाहता मंत्रि मंथिले ॥४५॥
मंथनी जातवेदो हा अग्नी प्रगट जाहला ।
त्रैविद्यी तिन्हिरूपी तो राजाने त्या स्विकारिले ॥४६॥
उर्वशीलोक प्राप्त्यर्थ सर्वदेव स्वरूप तो ।
श्रीहरी भगवान् विष्णु राजाने यजिला असे ॥४७॥
सत्ययूगात ओंकारीं अंतर्भूतचि वेद ते ।
हंसवर्ण तदा एक नारायणचि देवता ॥४८॥
पुरुरवे तीन अग्नी तीन वेदहि निर्मिले ।
अग्निला पुत्र मानोनी गंधर्व लोक मेळिला ॥४९॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चवदावा अध्याय हा ॥ ९ ॥ १४ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|