समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १३ वा

राजा निमिच्या वंशाचे वर्णन -

श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्‌)

ईक्ष्वाकूच्या निमी पुत्रे वसिष्ठा यज्ञि वर्णिले ।
वसिष्ठ वदले त्याला इंद्रे पूर्वीच वर्णिले ॥१॥
तयाचा करूनी यज्ञ येईन वाट पाहणे ।
निमी हा थांबला आणि इंद्राचा यज्ञ चालला ॥२॥
क्षणाचा जाणुनी देह यज्ञ आरंभिला निमे ।
वसिष्ठ येइ पर्यंत इतरा वर्णिले तये ॥३॥
आले वसिष्ठजी जेंव्हा इंद्रयज्ञ करोनिया ।
न मानी शिष्य हा यज्ञ करितो म्हणुनी तया ॥
शापिले टाक हा देह गर्वी तू निमि रे पहा ॥४॥
धर्माविरुद्ध हा शाप निमिने जाणुनी तदा ।
वसिष्ठा शापिले येणे टाका देह तुम्हीहि हा ॥५॥
आत्मविद्य निमी याने देह तात्काल त्यागिला ।
प्रपिते आमुच्या वृद्ध वसिष्ठे देह त्यागुनी ॥
उर्वशी गर्भि तो जन्मे वरुणा कडुनी पहा ॥६॥
सुगंधी द्रव्य लावोनी राजाचे प्रेत त्या द्विजे ।
यज्ञात ठेविले तैसे सत्री देवासि प्रार्थिले ॥७॥
समर्थ तुम्हि हो सर्व प्रसन्न असले तर ।
द्यावे राजासि ते प्राण तथास्तु देव बोलले ॥
उठोनी बोलला राजा तनूचे बंध हे नको ॥८॥
विचारी मुनि ते सर्व हरिसी बुद्धि अर्पिती ।
नाशिवंत असा देह तेंव्हा मुक्त करा मला ॥९॥
दुःख शोक भयो मूळ देह हा नच इच्छि मी ।
मृत्युचे भय जै नित्य जळात मासळीस त्या ॥१०॥

देवता म्हणाले -

मुनिंनो विण त्या देहे राहील प्राणिनेत्रि हा ।
सूक्ष्मदेहातुनी तेथे चिंतील नित्य श्रीहरी ॥
पापणी लवता त्याचे अस्तित्व जाणवेल की ॥११॥
मुनिंनी चिंतिले चित्ती नसता नृप या जगी ।
गोंधळेल प्रजा सारी तेंव्हा प्रेता मथोनिया ॥
तयाच्या शरिरामध्ये कुमार निर्मिला असे ॥१२॥
जन्मला म्हणुनी याते जनको नाम ठेविले ।
विदेह जन्मला तेणे वैदेह म्हणती कुणी ॥
मंथिता जन्मला तेंव्हा मिथिल नामही असे ।
नगरी मिथिला याने निर्मिली पुढती तशी ॥१३॥
उदावसु यया पुत्र तयाच्या नंदिवर्धना ।
सुकेतूसी देवरातो बृहद्रथ तया पुढे ॥१४॥
बृहद्रथा महावीर्य तयाच्या सुधृतीस तो ।
धृष्टकेतूसि हर्यश्व तयाचा पुत्र तो मरु ॥१५॥
प्रतीपक मरूचा नी कृतिरथ तयास तो ।
देवमीढास विश्रूत विश्रुताचा महाधृति ॥१६॥
तयाचा कृतिरातो नी महारोमा तयास तो ।
स्वर्णरोमा असे पुत्र ह्रस्वरोमा तया पुढे ॥१७॥
सीरध्वज यया पुत्र नांगरी हा धरा तदा ।
सीता उत्पन्न ती झाली हल-फाल सिरध्वजो ॥१८॥
कुशध्वज यया पुत्रा पुत्रधर्मध्वजास दो ।
मितध्वज कृतध्वजो नावे दोघास ही अशी ॥१९॥
कृतध्वजा केशिध्वजो खांडिक्य तो मितध्वजा ।
आत्मविद्येत तो श्रेष्ठ केशीध्वज नृपो पहा ॥२०॥
खांडिक्यो कर्ममर्मज्ञ पळाला चुलत्या भये ।
केशीध्वजास भानूमान्‌ शतद्युम्न तया पुढे ॥२१॥
शतद्युम्ना शुची आणि शुचीचा सनद्वाज तो ।
तयाचा ऊर्ध्वकेतू नी पुढे अज पुरोजिता ॥२२॥
अरिष्टनेमिच्या पुत्रा श्रुतायूच्या सुपार्श्वका ।
चित्ररथा सितो पुत्र मिथिलापति क्षेमधी ॥२३॥
क्षेमाधीचा समरथो सत्यरथ तयास नी ।
उपगुरु यया पुत्रा उपगुप्तचि अग्नि जो ॥२४॥
तयाच्या वस्वनंता तो युयुधो त्याजला पुढे ।
सुभाषणा पुढे झाला श्रुताला जय पुत्र तो ॥
जयाच्या विजया झाला ऋत नामक पुत्र ही ॥२५॥
ऋताच्या शुनका झाला वीतहव्यास तो धृती ।
बहुलाश्वा कृती झाला कृतीपुत्र महावशी ॥२६॥
मिथील वंशिचे सर्व गृहस्थी आत्मज्ञानिही ।
द्वंद्वमुक्त असे सर्व याज्ञवल्क्यादि त्यां गुरू ॥२७॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ ९ ॥ १३ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP