समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १६ वा
परशुरामाकडून क्षत्रीयसंहार व विश्वामित्रवंशकथा -
श्रीशुकदेव सांगतात - (अनुष्टुप्)
जी आज्ञा म्हणुनी रामे पित्याचे शब्द मानुनी ।
तीर्थाटनास गेला नी वर्षाने घरि पातला ॥१॥
एकदा रेणुकामाता गेली गंगातिरा तदा ।
गंधर्व क्रीडतो तेथे सपुष्प अप्सरां सवे ॥२॥
जलार्थ पातली होती रमली पाहता क्रिडा ।
विसरे हवनीवेळ गंधर्वी मन भाळले ॥३॥
सरता हवनीवेळ आली शापास भीउनी ।
ठेविला जलकुंभो नी विनवी पति आपुला ॥४॥
मनाच्या व्यभिचाराने क्रोधले जमदाग्नि ते ।
वदले मम पुत्रांनो मारा ठारचि पापिणी ॥
न कोणी उचली शस्त्र पर्शुरामाविणे तदा ॥५॥
पित्राज्ञा मानुनी येणे माता बंधुहि कापिले ।
पित्याचे योग्य सामर्थ्य जाणी तो पर्शुरामची ॥६॥
प्रसन्न जाहले चित्ती वदले जमदग्नि तै ।
माग तू वरही श्रेष्ठ इच्छा जी ती तुझ्या मनीं ॥
वदला पर्शुरामो तो जिवंत सर्व हे करा ।
आणीक मागतो एक वध ना स्मरणे तयां ॥७॥
वदता उठले सर्व जणू झोपेमधून ते ।
तपाचे बळ ते जाणी तेंव्हाचि वधि राम तो ॥८॥
सहस्त्रार्जुनपुत्रो ते पित्याचा वध नित्य तो ।
मनात आठवोनीया अस्वस्थ राहिले सदा ॥९॥
बंधुच्या सह तो राम एकदा वनि पातता ।
वैर साधावया आले मिळोनी सर्व पुत्र ते ॥१०॥
महर्षि जमदग्नि ते अग्नि शाळेत चिंतनी ।
असता वधिले त्यांना निश्चये पापपूर्ण ते ॥११॥
माता ती रेणुका दीन होवोनी प्रार्थिही परी ।
तिचे ना ऐकिले कोणी बळाने वधिला ऋषी ॥
परीक्षिता ! महाक्रूर नीच क्षत्रीय ते पहा ॥१२॥
शोकमग्न अशी माता छाती बडउनी तदा ।
ये शीघ्र पर्शुरामा रे ! रडोनी ओरडे अशी ॥१३॥
रामा रे क्रंदनी शब्द दुरोनी ऐकिले तये ।
शीघ्रची आश्रमी आला पित्याचा वध पाहिला ॥१४॥
तदा राजा बहू दुःखी जाहला पर्शुराम तो ।
असहिष्णु तसा क्रोधे मनात त्रासला बहू ॥
पिताजी तुम्हि तो थोर महात्मे धर्मपूजक ।
आम्हा सर्वांस सोडोनी गेले स्वर्गात ते कसे ॥१५॥
विलाप करिता ऐसा प्रेत बंधूस सोपवी ।
परशू घेउनी हाती क्षात्रसंहार मांडिला ॥१६॥
महिष्मति पुरामध्ये मधोमध गिरि जसा ।
शीरांचा ढीग तै झाला तेज पूर्वीच नष्टले ॥१७॥
रक्ताची सरिता झाली कंपले ब्रह्मद्वेषि ते ।
अत्याचारीच क्षत्रीय हरिने पाहिले तदा ॥१८॥
पित्याच्याच मिषे त्याने निःक्षत्रिय अशी धरा ।
केली एकेविस वेळी समंत पंचको तळे ॥
कुरुक्षेत्रासि रक्ताने तुडुंब जाहले तदा ॥१९॥
पुन्हा परशुरामाने पित्याचे शीर जोडुनी ।
सर्वदेवमयो विष्णु यज्ञाने पूजिला असे ॥२०॥
होता द्विज नि अध्वर्यू उद्गाता याजला सम ।
दिशा दान क्रमे केल्या चौघांना चार यज्ञि त्या ॥२१॥
ऋत्विजाते दिशाकोन कश्यपा मध्यभूमि ती ।
आर्यावर्त उपद्रष्ट्या सदस्या अन्य भूमि ती ॥२२॥
यज्ञांत स्नान योजोनी पापमुक्तहि जाहला ।
सरस्वती तिरा आली शोभा सूर्यापरी पहा ॥२३॥
महर्षि जमदग्नीला स्मृति संकल्पदेह तो ।
मिळाला पुत्रसंकल्पे पुत्रे सन्मान देउनी ॥
सप्तर्षीमंडली केले सातवे ऋषि त्याजला ॥२४॥
परीक्षित् परशूरामो आगामी मनवंतरी ।
सप्तर्षीमंडली राही वेदविस्तार तो करे ॥२५॥
महेंद्रपर्वती राही शांत नि दंडिना कुणा ।
गंधर्व सिद्धही त्याची गाती कीर्ती सदा तिथे ॥२६॥
भगवान् हरि विश्वात्मा भृगुवंशात जन्मुनी ।
भारभूत असे राजे वधोनी भार हारि हा ॥२७॥
गाधिराज नृपा पुत्र तेजस्वी विश्वमित्रजी ।
तपाने त्यागुनी वर्ण मिळवी ब्रह्मतेज ते ॥२८॥
शतपुत्र तया होते मधवा मधुच्छंद तो ।
म्हणोनी त्याच नावाने विख्यात सर्व पुत्र ते ॥२९॥
शुनःशेप-देवरातो भाचा जो भृगवंशि तो ।
आणोनी वदला पुत्रां श्रेष्ठ बंधूचि हा तुम्हा ॥३०॥
पशूयज्ञी हरिश्चंद्रे यालाचि धन देउनी ।
यज्ञपशू असे केले विश्वामित्रे वरूणला ॥३१॥
प्रार्थिता सुटला तैसा देवांनी दिधला तदा ।
देवरात तपस्वी तो विख्यात गाधिवंशज ॥३२॥
विश्वामित्र मुले त्यात थोरल्या नच हे रुचे ।
विश्वामित्रे दिला शाप दुष्टांनो म्लेंछ व्हा तुम्ही ॥३३॥
एकोण्पन्नास ते बंधू म्लेंछ होताचि त्याजला ।
मधुच्छंद वदे तात आज्ञा ती पाळतो अम्ही ॥३४॥
वदोनी मंत्रद्रष्टा तो मानिला श्रेष्ठ बंधुची ।
आज्ञाधारक पुत्रांना विश्वामित्र वदे तदा ॥
आज्ञा ही मानुनी तुम्ही सन्मान दिधला मला ।
तुम्हा सुपुत्र होवोत धन्य मी आज जाहलो ॥३५॥
देवरात तुम्हा गोत्री आज्ञेत राहणे तयां ।
हारितो अष्टको जेय क्रतुमान् आदि पुत्रही ॥
विश्वामित्र ऋषी यांना होतेचि वेगळे तसे ॥३६॥
कौशिक गोत्रिचे भेद विश्वामित्रापुढे तसे ।
प्रवरो देवरातो हा दुसरा गोत्रि मानिला ॥३७॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥ ९ ॥ १६ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|