समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ६ वा
ईक्ष्वाकुच्या वंशाचे वर्णन, मांधाता व सौभरी ऋषिची कथा -
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
विरूप केतुमान् शंभू अंबरीषासि पुत्र हे ।
विरूपाचा पृषदश्व तयाचा तो रथीतर ॥१॥
रथितरा न संतान अंगिराऋषि प्रार्थिता ।
अंगिरे ब्रह्मतेजाने बहू संतान ते दिले ॥२॥
राणीचे जरि हे पुत्र अंगिरस् गोत्र सांगती ।
क्षत्रोपेत द्विजवंशी प्रवरी श्रेष्ठ बोलले ॥३॥
एकदा शिंकता नाकीं मनूच्या पुत्र जाहला ।
इक्ष्वाकू हा शत तया जाहले पुत्र त्यातले ॥
विकुक्षी दंडको नीमी सर्वश्रेष्ठ असे तिघे ॥४॥
सान पंचेविसो पूर्व पाश्चिमीं पंचवीस नी ।
तीन ते मध्यभागी नी अन्य ते दक्षिणापथी ॥
आर्यावर्तात राज्याचे अधीप जाहले पुढे ॥५॥
एकदा अष्टकाश्राद्धी इक्ष्वाकू तो विकुक्षिला ।
वदला पशुचे मास पवित्र कर्मि आणणे ॥६॥
वदता ठीक नी गेला अनेक पशु मारिता ।
लागता भूक ती त्याने सशाचे मांस भक्षिले ॥७॥
उरले मांस ते त्याने दिधले पितयास नी ।
पित्याने प्रोक्षिता तेची गुरूला दिधले असे ॥
दूषीत मांस हे उष्टे गुरूने त्याज्य मानिले ॥८॥
गुरूने त्याजिता मांस पुत्रकर्तुत्व जाणता ।
देशा बाहेर पुत्राला राजाने काढिले असे ॥९॥
वसिष्ठ गुरूच्यापाशी इक्ष्वाकू ज्ञान चर्चुनी ।
योगाने त्यागिता देह गाठले श्रेष्ठ ते पद ॥१०॥
पिता तो मरता आला विकुक्षी राजधानिशी ।
पृथ्वीचे राज्य भोगोनी यज्ञांनी हरि पूजिला ॥
जगी शशाद नावाने प्रसिद्ध जाहला पुढे ॥११॥
त्याच्या पुत्र पुरंजना नामे तो इंद्रवाह नी ।
कर्माने दुसरे नाम कुकुत्स्थ पडले असे ॥१२॥
युगांती देव दैत्यांचा संग्राम घोर जाहला ।
देवता हारिल्या दैत्ये तदा पुरंजनास ते ॥
भेटले जाउनी आणि युद्धार्थ मैत्रि साधिली ॥१३॥
राजा हा वदला देवां देवेंद्र वाहनो मज ।
झाला तर लढे मी, तै विष्णुशब्दासि मानुनी ॥
देवेंद्र जाहला मोठा बैल नी ठाकला पुढे ॥१४॥
शक्तिमान् परमेशाने राजास शक्तिही दिली ।
कवचो धनु घेवोनी तीक्ष्ण ते बाण योजिता ॥१५॥
वशिंडी पाशि तो बैसे युद्ध तत्पर जाहला ।
देवांनी स्तुति गावोनी घेरिले पश्चिमी पुरा ॥१६॥
वीर पुरंजनाचे तैं घोर संग्राम जाहले ।
जे जे दैत्य पुढे आले कापोनी मारिले तये ॥१७॥
बाण वर्षाव तैसाची प्रलंयकारि अग्नि जैं ।
दैत्यांचे खचले धैर्य घरात घुसले पुन्हा ॥१८॥
पुरंजने धनैश्वर्य देवेंद्रा लुटुनी दिले ।
इंद्रवाह कुकुत्स्थो हे असे येणेचि नाम त्यां ॥१९॥
अनेना पुत्र त्याचा तो तयाला पृथु जाहला ।
क्रमाने विश्वरंधी नी चंद्र नी युवनाश्व तो ॥२०॥
शाबस्ती युवनाश्वाचा नामे त्याच्या पुरो असे ।
बृहदश्व तया पुत्र कुलयाश्व तया पुन्हा ॥२१॥
उत्तंक ऋषिच्या साठी एक्केविस सहस्त्र ते ।
सवे घेवोनि पुत्रांना मारिला धुंधु दैत्य तैं ॥२२॥
धुंधुमार असे नाम पडले याजला पुन्हा ॥
धुंधुच्या मुखिच्या अग्नीं जळाले पुत्र सर्व ते ॥
वाचले ते तयातून राजपुत्र तिघेच की ॥२३॥
राजा जे वाचले त्यात दृढाक्ष कपिलाश्व नी ।
भद्राश्व नावचे तीन दृढाश्वा पुत्र तो असा ॥
हर्यश्व नाव हे त्याचे त्याचा निकुंभ पुत्र तो ॥२४॥
वंशात बर्हणाश्वो नी कृताश्व सेनजित् पुढे ।
युवनाश्व न संतान पत्नीच्या सह तो वनी ॥२५॥
दुःखीत होउनी गेला तेथ झाली कृपा तया ।
ऋषींनी योजिला यज्ञ संताना इंद्र प्रार्थिला ॥२६॥
राजा तो एकदा रात्री तहान लागली तदा ।
जलार्थ यज्ञशाळेत गेला तैं ऋषि झोपले ॥
नव्हते जल अन्यत्र अभिमंत्रितची पिला ॥२७॥
प्रातःकाळी ऋषींनी जैं पाहिले जल ना दिसे ।
पुसले सर्व लोकांना पुत्रदा जल कोण पी ॥२८॥
भगवान् प्रेरिता राये पिले जल कळे तदा ।
ईशासी वंदिले त्यांनी बळीचे बळ मानिले ॥२९॥
प्रसवी समयो येता उजवी कूस फाडूनी ।
युवनाश्व उदरी तो जन्मिला श्रेष्ठ पुत्र तैं ॥३०॥
ऋषी तैं वदले चित्ती रडते बाळ हे पिण्या ।
इंद्राने दिधले बोट वदला पाजितो यया ॥३१॥
कृपेने द्विज देवाच्या वाचले बाप-पुत्र ते ।
तपाने मुक्तची झाला राजाही युवनाश्व तो ॥३२॥
त्रसद्दस्यु असे नाम इंद्राने ठेविले तया ।
रावणादि दस्यू त्याला भिती नित्य म्हणोनिया ॥३३॥
मांधाता जो त्रसद्दस्यू चक्रवर्तीहि जाहला ।
भगवत्प्रेरणे त्याने शासिले सप्तद्वीपही ॥३४॥
आत्मज्ञानी असे त्याला कर्माची जरूरी नसे ।
तरीही श्रेष्ठ यज्ञाने सर्वात्मा हरि पूजिला ॥३५॥
न कांही भगवान्वीण सामग्री मंत्र यज्ञ नी ।
ऋत्विजो यजमानोनी धर्म देश नि काल तो ॥
सर्वच्या सर्वही आहे भगवद्रूप साजिरे ॥३६॥
परीक्षिता ! जिथे सूर्य उगवे मावळे जिथे ।
सर्वच्या सर्वही भूमी मांधाते शासिली असे ॥३७॥
बिंदुमती शशिबिंदूची मांधात्या पत्नि लाभली ।
तिच्या गर्भी पुरूकुत्सो दुसरा अंबरीष नी ॥
योगी तो मुचकुंदोनी पन्नास भगिनी तया ।
सौभरी वरिला सार्या पन्नास भगिनीं नि तो ॥३८॥
एकदा जलि डुंबोनी सौभरे तप लाविता ।
पाहिले मत्स्य राजाते मत्स्यीचे सुख भोगिता ॥३९॥
पाहता सौभरे सौख्य विवाहा इच्छिले मनीं ।
मांधातापाशि येवोनी कन्या दे वरण्या म्हणे ॥
ऐकता वदला राजा स्वयंवरचि मांडितो ।
निवडीन तुला जी ती न्यावी पत्नी म्हणोनिया ॥४०॥
ऐकता कोरडे बोल वृद्ध मी केश पांढरे ।
हालते मानही ऐसी वरील कोण ती मला ॥४१॥
ठीक सुंदर मी होतो जेणे देवांगनाहि त्या ।
होतील वशची सर्व वदता जाहला तसा ॥४२॥
रक्षके सौभरी नेला कन्यांच्या अंतरगृहा ।
सर्व पन्नासही राज-कन्यांनी वरिले तया ॥४३॥
आसक्त सौभरा झाल्या भगिनी भाव सोडुनी ।
भांडल्या लाज सोडोनी वदल्या त्या मला हवा ॥४४॥
(इंद्रवज्रा)
सर्वा वरीले द्विज सौभरीने
तपोबळे सज्जहि गेह केले ।
सौगंध पुष्पे बगिचे तळे नी
शय्यासने वस्त्र नि दागिनेही ॥४५॥
स्नानानुलेपो सुख भोजने नी
विहारता दे मग पुष्पमाला ।
सेवेत आले नर नारि कैक
पक्षी नि वंदि गुणगान गाती ॥४६॥
(अनुष्टुप्)
गृहस्थीं रमला सौख्यी निरोगी कैक वर्षही ।
न विझे तूप थेंबाने अग्नी पै तृप्त हा नसे ॥४७॥
एकदा बसता स्वस्थ ऋग्वेदाचार्य सौभरी ।
मीन संग क्षणाचा तो पाहता तप त्यागिले ॥४८॥
(इंद्रवज्रा)
तपस्वि मी तो अतिथोर होतो
मी ब्रह्मतेजा नित राखिले नी ।
तो पाहिला संग जळात तैसा
ससंर्ग योगे तप तेज नाशी ॥४९॥
(वसंततिलका)
भोगी जिवास त्यजिणे जयि मोक्ष इच्छा ।
एके क्षणाहि नच ते मन मोकलावे ॥
एकांतचित्त बसुनी हरि तो भजावा ।
ती इष्ट वेळ असता मग संत सेवा ॥५०॥
एकांति मी बसुनिया तप साधिले ते
पन्नास पत्नि मिळल्या बघताचि संग ।
पाचीसहस्त्र मग हे मज गुंतवीती
नाही ययात सुटणे बहु लालसी मी ॥५१॥
(अनुष्टुप्)
विचारीं राहिला ऐसा घरी कांही दिनी पहा ।
विरक्त जाहला चित्ती संन्यास घेतला पुन्हा ॥
पती सर्वस्व मानोनी पत्न्याही रिघल्या तशा ॥५२॥
तपस्या सौभरे केली घोर नी संयमी अशी ।
आहवनीय अग्नीत परमात्म्यात पावले ॥५३॥
आध्यात्मिक गती ऐसी पतीशी लाभली तदा ।
पत्न्याही सति तै गेल्या ज्वाळा अग्नीसवे जशा ॥५४॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥ ९ ॥ ६ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|