समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ७ वा
राजा त्रिशंकु आणि हरिश्चंद्रची कथा -
राजा त्रिशंकु आणि हरिश्चंद्रची कथा -
श्रीशुकदेव सांगतात-
(अनुष्टुप्)
मांधात पुत्र प्रवरो अंबरीष कथीयला ।
प्रपिता यवनाश्वाने पुत्रवत् प्रतिपाळिले ॥
यौवनाश्व तया पुत्र हारीत पुत्र त्याजला ।
मांधातावंशि हे तीन अन्य गोत्रा प्रवर्तको ॥१॥
नर्मदा भगिनी नागे पुरूकुत्सास ती दिली ।
नागेंद्र वासुकी आज्ञे पती घेवोनि नर्मदा ॥
रसातळामधे गेली लागता लग्न तेधवा ॥२॥
हरिशक्त्ये पुरूकुत्स्ये योग्य गंधर्व मारिले ।
प्रसन्ने नागराजाने दिधला वर तो असा ॥
स्मरे प्रसंग हा त्याला सर्पाचे भय ना कधी ॥३॥
राजा रे ! पुरुकुत्साचा पुत्र त्रसद्दस्यू पुढे ।
अनरण्यासि हर्यश्व त्या अरूणा त्रिबंधनो ॥४॥
त्रिबंधना सत्यव्रतो विख्यात तो त्रिशंकु त्या ।
गुरुशापेचि चांडालो सदेह स्वर्गि पातला ॥
विश्वामित्रे कृपा केली देवांनी नच घेतले ॥५॥
पडता अवकाशात विश्वामित्रेचि ठेविले ।
दिसता आजही तैसा खाली डोके वरी पद ॥६॥
हरिश्चंद्र तयाचा तो जयासाठी वसिष्ठ नी ।
विश्वामित्रे एकमेका शापोनी पक्षि जाहले ॥७॥
हरिश्चंद्रा न संतान तेणे दुःखी सदा असे ।
नारदी उपदेशाने वरुणा प्रार्थिले तये ॥८॥
महाराजा ! मला वीर पुत्र तो जाहल्या वरी ।
यजी मी तो तयानेची वरुणे वर ही दिला ॥
रोहित नावचा पुत्र हरिश्चंद्रासि जाहला ॥९॥
वरुण पुत्र होताची वदला यज्ञ तो करी ।
राजा तो वदला त्यासी होवू दे दिन ते दहा ॥
होईल पशु हा तेंव्हा यज्ञा योग्य असा पहा ॥१०॥
दहाव्या दिनिही तैसे वरूण वदला पुन्हा ।
तदा राजा वदे त्याला पशूला दात येउ दे ॥
होईल पशु हा तेंव्हा यज्ञा योग्य असा पहा ॥११॥
वरूण दात येता ते वदला यज्ञ तो करी ।
तदा राजा वदे त्याला दुधाचे पडुदे द्विज ॥
होईल पशु हा तेंव्हा यज्ञा योग्य असा पहा ॥१२॥
पडता दात तो आला वरूण वदला पुन्हा ।
दुसरे दात येऊ दे राजा तो वदला पुन्हा ॥
होईल पशु हा तेंव्हा यज्ञा योग्य असा पहा ॥१३॥
दुसरे दात त्या येता वरूण वदला तया ।
तदा राजा वदे त्याला कवचोधारि क्षत्रियो ॥
यज्ञाचा पशु तो योग्य अन्यथा नच योग्य की ॥१४॥
परीक्षिता ! असे राये टोलवा टोलवोनिया ।
पुत्रप्रेमी फसोनीया वरुणा बोलला असे ॥१५॥
रोहिता कळले जेंव्हा पिता हा बळि इच्छितो ।
स्वरक्षणी धनू घेता गेला तो घोर जंगली ॥१६॥
कांही दिनी कळे त्याला वरूण रूष्ट होवुनी ।
पित्याला पीडिले रोगे निघाला तो पुराकडे ॥
परी त्या नगरामाजी जाण्या इंद्रेचि रोधिले ॥१७॥
पुत्रा रे ! रोहिता ! यज्ञीं पशू होण्या परीस ते ।
उचीत तीर्थयात्राची इंद्र तो वदला असे ॥
इंद्राची गोष्ट मानोनी फिरला एकवर्ष तो ॥१८॥
दुसर्या तिसर्या चौथ्या पाचव्या वर्षिही तसे ।
रोहिते योजिले जाण्या परी वृद्धद्विजो असा ॥
होवोनी इंद्र तो बोले रोधिता रोहिता तदा ॥१९॥
सहावे वर्ष संपोनी सातवे लागले जधी ।
अझिगर्ता कडोनिया मधवा पुत्र घेतला ॥२०॥
तयाला द्रव्य देवोनी शुनःशेप दिला पित्यां ।
पित्याशी नमिले तेंव्हा पित्याचा रोग संपला ॥२१॥
विश्वामित्र नरोयज्ञी होता तैं जाहले तसे ।
अध्वर्यू जमदग्नी नी उद्गाता तो अयास्यची ॥२२॥
ब्रह्मा वसिष्ठ ते झाले प्रसन्न इंद्र जाहला ।
सुवर्ण रथ तो त्याने हरिश्चंद्रा दिला असे ॥२३॥
माहात्म्य ते शुनःशेपी वर्णीन पुढती कधी ।
दांपत्य स्नेह पाहोनी हरिश्चंद्रास त्या ऋषे ॥
विश्वामित्रे दिले ज्ञान अक्षयो नष्ट हो न जे ॥२४॥
पृथ्वीत मन राजाने पृथ्वी पाण्यात पाणि ते ।
तेजात तेज वायूशी आकाशि मेळिला ॥२५॥
आकाशाला अहंकारी महत्तत्वी अहंपणा ।
ध्यानात तत्व मेळोनी ध्यानाने तम जाळिला ॥२६॥
निर्वाणसौख्य मेळोनी ज्ञानाने ध्यान त्यागिले ।
बंधमुक्त असा झाला स्वरूपी स्थिर राहिला ॥
न येते वदता ऐसे अंदाजे ना मिळे अशा ॥२७॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ ९ ॥ ७ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|