समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ५ वा
दुर्वासाची दुःख निवृत्ती -
श्रीशुकदेवा सांगतात -
(अनुष्टुप्)
भगवंते अशी आज्ञा करिता चक्र अग्निने ।
जळता द्विज तो आला राजाच्या पायि लागला ॥१॥
दुर्वास लागता पाया राजा लज्जीत होउनी ।
दुःखीत अति तो झाला चक्राची स्तुति गायिली ॥२॥
अंबरिष म्हणाला-
तू अग्नि सूर्य नक्षत्रो चंद्रमा तव रूपची ।
पंचभूते नि तन्मात्रा इंद्रीय रूप हे तुझे ॥३॥
सुदर्शना नमो तू ते सहस्त्राराच्युतप्रिय ।
समस्तशस्त्रहंता तू तूचि रक्षी द्विजास या ॥४॥
तू धर्म सत्यवाणी तू स्वयं यज्ञ नि स्वामि तू ।
तू लोकपाल सर्वात्मा तू तेज पुरुषोत्तमा ॥५॥
(इंद्रवज्रा)
तू धर्मासीमा नि सुनाभ रक्षो
तू अग्नि साक्षात् असुरांस जाळी ।
त्रिलोकपाला तव तेज शुद्ध
गती तुझी अद्भुत कर्म आहे ॥
स्तुती तुझी मी करितो अशी नी
आणीक मी रे नमितो तुला हे ॥६॥
वाणीश्वरा या तव तेज योगे
सूर्यादिलाही मिळतो प्रकाश ।
तू धर्मतेजो तम नष्टितोसी
तुझेचि सारे जग रूप आहे ॥७॥
सुदर्शना तूचि अजेय एक
युद्धी तुला प्रेरि निरंजनो तो ।
तै दैत्य डोकी जधि कापिशी तू
अत्यंत शोभामय भाससी तू ॥८॥
युद्धात कोणी तुज रोधितो ना
हे विश्वप्राणा खलप्राणहंता ।
गदाधराने तुज नेमिले तै
हितार्थ आम्हा द्विजभद्र व्हावे ॥९॥
(अनुष्टुप्)
जर मी पाळिला धर्म केले दान नि यज्ञ ते ।
द्विजा देवा जर मानी तर संकट हे टळो ॥१०॥
सर्वगुणाश्रयो विष्णु पाहिला जर मी जिवीं ।
जर तो मजला पावे तरी विप्रास रक्षिणे ॥११॥
श्रीशुकदेव सांगतात -
राजा अंबरिषे जेंव्हा स्तविले त्या सुदर्शना ।
तदा ते भगवच्चक्र प्रार्थिता शांत जाहले ॥१२॥
दुर्वासा अंगिची आग मिटता स्वस्थ जाहला ।
आशिर्वाद दिले त्याने राजाला त्या प्रशंसिले ॥१३॥
दुर्वास म्हणाले-
अहो अनंतदासाचा महिमा जाणिला असे ।
केला मी अपराधोनी तू मला शुभ इच्छिसी ॥१४॥
जयांनी दृढभावाने हरीचे पद सेविले ।
तया अशक्य ते काय महात्मे काय ना त्यजो ॥१५॥
जयाचे मंगलो नाम ऐकता जीव शुद्ध हो ।
तीर्थपाद हरीदासा कोणते कर्म ते उरे ॥१६॥
करूणापूर्ण हृदयो राजा अंबरिषा तुझे ।
अनुग्रह मला केला क्षमोनी रक्षिले मला ॥१७॥
राजा उपासि तो होता दुर्वास पळला तदा ।
येण्याची वाट तो पाही आता तो द्विजपाय ते ॥
सेवोनी तोषिले विप्रा विधिपूर्वक जेविले ॥१८॥
आदरे अतिथी योग्य राये सामग्रि आणिली ।
जेवोनी आदरे विप्र वदले जेवणे तुम्ही ॥१९॥
अंबरीषा तुम्ही भक्त प्रीय त्या हरीचे असा ।
तुमच्या दर्शने स्पर्शे आतिथ्ये मोद जाहला ॥२०॥
देवांगनाहि स्वर्गात कीर्ति गातील नित्य त्या ।
पुण्यमयि अशी किर्ती कीर्तनी संत सांगती ॥२१॥
श्रीशुकदेव सांगतात-
संतुष्ट द्विज होवोनी अंबरीषा प्रशंसिले ।
घेता अनुमनी गेले सत्यलोकास यात्रि ते ॥२२॥
सुदर्शनभयापोटी दुर्वास पळुनी तदा ।
आले जे परतोनिया तया वर्षचि लागले ॥
एवढ्या दिनि तो राजा राहिला जल पीउनी ॥२३॥
(इंद्रवज्रा)
दुर्वास जाता उरले पवित्र
ते जेविले अन्नचि अंबरिषे ।
विप्रास दुःखो अन मुक्ति तैसी
ही मानि राजा हरिचीच लीला ॥२४॥
अनेक ऐसे गुण अंबरीषा
जयात वाढे हरिभक्ति सर्व ।
भक्तिप्रभावे मनि तोहि मानी
त्या तुच्छ स्वर्गा अन ब्रह्मलोका ॥२५॥
जो आपुल्याचीसम भक्तपुत्रा
देवोनि राज्या वनि तो तपाला ।
गेला नि तेथे हरिध्यान ठेला
नी मुक्त झाला भवसागरी या ॥२६॥
(अनुष्टुप्)
अंबरीषकथा ऐशी पवित्र कीर्तनीयची ।
गाता नी स्मरता लाभे हरिची भक्ति पावन ॥२७॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ ९ ॥ ५ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|