समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ४ था
नभाग आणि अंबरीषाची कथा -
श्रीशुकदेव सांगतात-
(अनुष्टुप्)
मनुपुत्र नभागाचा नाभाग पुत्र जेधवा ।
तपस्या ब्रह्मचर्याची करोनी परते तदा ॥१॥
वदला बंधुसी माझ्या वाट्याला राज्य कोणते ।
’पिताश्री’ दिधले तूते वदले सर्व बंधु ते ।
गेला तो पितयापाशी वदला वाटणीत तो ।
तुम्हीच मजला आहा, न खेद वदले पिता ॥२॥
श्रेष्ठ अंगिरसीगोत्री श्रेष्ठ यज्ञास बैसले ।
सहाव्या दिनिच्या कर्मा विसरो पडला तयां ॥३॥
तू जा त्या महात्म्यांना दोन सूक्ते वैश्वदेवि ते ।
सांग नी स्वर्गि ते जाता यज्ञधन तुझेचि तै ॥४॥
पिता जे वदले तैसे नाभाग वागला असे ।
यज्ञाचे उरले द्रव्य द्विजांनीही दिले तया ॥५॥
धन घेवोनि हा येता तदा त्या उत्तरादिशी ।
काळापुरुष आला नी वदला मम हे धन ॥६॥
नाभाग म्हणाला-
"ऋषिंनी दिधले माते म्हणोनी मम द्रव्य हे" ।
पुरूष वदला प्रश्न विचार तुझिया पित्या ॥७॥
पुसता सांगती तात भाग तो रूद्र घेतसे ।
जाणोनी भेटणे त्याला विनंती करणे तशी ॥८॥
नाभाग पातला आणि रूद्रासी नमिले तये ।
वदला चूकही झाली क्षमा ती करणे मला ॥९॥
वदले भगवान् रुद्र पित्याचा निर्णयो खरा ।
सत्यवान तसा तू ही सांगतो ’ब्रह्मतत्व’ मी ॥१०॥
यज्ञाचे शेष हे द्रव्य तुला मी देतसे पहा ।
वदले एवढे आणि गुप्त तेंव्हाचि जाहले ॥११॥
आख्यान एकचित्ताने सायंकालासि ऐकता ।
प्रतिभावंत तो होतो स्वरूपज्ञानही मिळे ॥१२॥
नाभागाऽम्बरिषो पुत्र धर्मज्ञ भक्त जाहला ।
द्विजाचा शाप ना खोटा परी तो स्पर्शि ना यया ॥१३॥
राजा परीक्षिताने विचारिले-
भगवन् ! इच्छितो ऐकू ज्ञानी अंबरिषी कथा ।
देता क्रोध द्विज शाप कसा तो टाळला तये ॥१४॥
श्रीशुकदेव सांगतात-
अंबरिष महाभागा सप्त द्वीपात राज्य नी ।
अतूल द्रव्य नी तैसे ऐश्वर्य लाभले असे ॥१५॥
मिळे हे एवढे सर्व परी तो स्वप्नवत् म्हणे ।
क्षणाच्या चांदण्या सर्व नरकी धनलोभ तो ॥१६॥
भगवान् कृष्ण नी भक्त यांच्यात प्रेम लावि जो ।
त्या प्रेमे तुच्छ तो मानी विश्वाचे धन सर्व ते ॥१७॥
(इंद्रवज्रा)
श्रीकृष्णचंद्रो पदपद्मि चित्त
गुणास वाणी पुजनास हात ।
नी अच्युती मंगल त्या कथेशी ।
कानास लावी नित वेळ सारा ॥१८॥
मुकुंदमूर्ती बघण्यास नेत्र
स्पर्शास लावी नित संत सेवी ।
नाकासि गंधो नित मंजिरीचा
प्रसाद खाण्या रसना रमे ती ॥१९॥
पदास लावी नित तीर्थयात्री
नी चंदनादी हरिशीच अर्पी ।
न भोग जाणी हरि तो मुळी पैं
तेणेचि नांदे हरि आपणात ॥२०॥
सर्वात्म जो इंद्रियदूर ऐशा
हरीस कर्मे मुळि अर्पि सारे ।
नी विप्रआज्ञा शिरसा स्मरोनी
साम्राज्य तैसे नित चालवी तो ॥२१॥
सरस्वती या नदिच्या किनारी
वसिष्ठ आदी ऋषिच्या कराने ।
ती अश्वमेधो करूनी तयाने
त्या यज्ञदेवा प्रिय पूजिले ही ॥२२॥
(अनुष्टुप्)
बैसती देवता यज्ञी सदस्य ऋत्विजांसह ।
न लवे पापणी त्यांची विष्णुरूप अशाचि त्या ॥२३॥
प्रजा ती संतवाणीते ऐके नी गायिही स्वये ।
तदा ते लोकही सर्व स्वर्गाला नच इच्छिती ॥२४॥
हृदयी चिंतनी ध्याने हरिची दर्शने तशी ।
भोगात नच हो हर्ष आत्मानंदात तुष्टता ॥२५॥
तपस्यायुक्त भक्तीने धर्मे पाळीहि तो प्रजा ।
हरि तो पावण्या त्याने आसक्ती सर्व सोडिल्या ॥२६॥
(इंद्रवज्रा)
दारा घरे पुत्र नि बंधु हत्ती
सेना चतूरंगि नि रत्न शस्त्रे ।
समस्त वस्तू तयि कोश मोठा
असत्य सारे मनि जाणितो तो ॥२७॥
(अनुष्टुप्)
अनन्य प्रेम पाहोनी रक्षार्थ हरिने स्वये ।
योजिले चक्र ते श्रेष्ठ भक्तांना रक्षिण्या सदा ॥२८॥
राजाची पत्निही तैसी विरक्त धर्मशीलची ।
एकवर्ष तये दोघे केली साधन द्वादशी ॥
श्रीकृष्ण पूजण्यासाठी एकादशिसह व्रत ॥२९॥
कार्तीक महिन्या माजी समाप्ती योजुनी व्रता ।
उपवास तिन्ही रात्री यमुनाजल स्नान ते ॥
करोनी पूजिला कृष्ण श्रीवृदांवन या स्थळी ॥३०॥
सामग्री योजिली सर्व संपत्ती खर्चुनी बहू ।
एकचित्त करोनिया हृदये अभिषेकिले ॥
वस्त्र आभूषणे माला चंदने अर्पिली पुजा ॥३१॥
आवश्यक न तै विप्र कामना पूर्ण जाहल्या ।
तरीही पूजिले विप्रा राजा अंबरिषे तदा ॥
अत्यंत गुणदायीही प्रथमी भोजने दिली ॥३२॥
सुसज्ज साठ कोटी त्या गायीही दानची दिल्या ।
सार्यांचे श्रृंग सोन्याने चांदीने मढिली खुरे ॥३३॥
सवत्स गुणि त्या गायी श्रेष्ठ वस्त्रेंहि झाकिल्या ।
दुधाळ, धारपात्रच्या सहही धाडिल्या घरा ॥३४॥
करोनी द्विज ते तुष्ट आज्ञेने पारणे तदा ।
योजिता अतिथी वेषे दुर्वास पातले तिथे ॥३५॥
राजाने पाहिले तेंव्हा उठोनी अतिथीस त्या ।
पूजिले नमिले आणि भोजना प्रार्थिले असे ॥३६॥
दुर्वासे मानिले आणि स्नाना गेले नदीस ते ।
ब्रह्माचे ध्यान योजोनी यमुनीं स्नान चालले ॥३७॥
इकडे घटिका एक द्वादशी उरली असे ।
धर्मज्ञ अंबरीषाने धर्मसंकट जाणुनी ॥
द्विजांच्या सहही त्याने विचार चर्चिला तदा ॥३८॥
वदला द्विजदेवांनो न सोडी - सोडिता व्रता ।
दोहोत दोष तो आहे सांगा पाप न होय ते ॥३९॥
चर्चेत वदला की तो वदते श्रुतिही असे ।
जळाने भोजनो आणि उपास साधतो पहा ॥
म्हणोनी पारणे व्हाया पितो मी जल या क्षणी ॥४०॥
निश्चेय करूनी ऐसा राजाने भगवान् मनी ।
स्मरोनी प्राशिले पाणी दुर्वासासी प्रतिक्षिले ॥४१॥
सर्व कर्म करोनिया दुर्वास पातले पुन्हा ।
स्वागता पातला राजा दुर्वासे अनुमानिले ॥४२॥
भुकेला ऋषि तो जाणी तरी पारण जाहले ।
दुर्वास क्रोधले चित्ती नम्रराजास बोलले ॥४३॥
असे हा केवढा क्रूर धनाने माजला असे ।
न शिवे याजला भक्ती अन्याये धर्म त्यागि हा ॥४४॥
पहा मी अतिथी आलो निमंत्रण मला दिले ।
उपासी मज ठेवोनी खातो तू फळ भोगि ते ॥४५॥
वदता पेटले क्रोधे जटेचा केस तोडुनी ।
राजाला जाळण्या त्याने कृत्या ती निर्मिली असे ॥
प्रलयंकारि अग्नी पै भडकू लागला पहा ॥४६॥
अग्नीच्या परि ती शस्त्र घेता अंबरिषावरी ।
धावली कंपली पृथ्वी परी स्थिरचि तो नृप ॥४७॥
भगवान् परमेशाने पूर्वीच चक्र धाडिले ।
रक्षिण्या निज भक्ताते तेणे कृत्याचि जाळिली ॥
राखेचा ढीग तो झाला अग्नीत साप जैं जळे ॥४८॥
दुर्वासे पाहिली कृत्त्या चक्राने भस्म केलि नी ।
आपणाकडे ते येते तदा ते धावले पुढे ॥४९॥
(इंद्रवज्रा)
ज्वाला जशी गाठिति सर्पराजा
तसाचि चक्रे द्विज गाठिला तै ।
येताचि धावे मग मेरुच्या त्या
गुंफेत गेला तरि तेथ आले ॥५०॥
आकाश पृथ्वी तल वीतलो नी
स्वर्गात गेला निजरक्षणार्थ ।
असह्य तेजोमय चक्र तेथे
पाठीसि आले नच सोडि पिच्छा ॥५१॥
न कोणि रक्षि मग तो भिला नी
ब्रह्माजिपाशी शरणार्थ गेला ।
तो ब्रह्मदेवा वदला स्वयंभू !
रक्षी मला चक्रचि मारिते हे ॥५२॥
हे स्थान माझे अन आयु सारी
काळात संपे मग द्विपरार्धी ।
संकेत होता भुवईतुनी त्यां
संसार सारा लिन होय त्यात ॥५३॥
मी दक्ष भृगू नि प्रजापती नी
भूतेश्वरो शंकर आदि सर्व ।
आहोत बद्धो नियमी तयाच्या
वंदोत आज्ञा नच रक्षितो मी ॥५४॥
(अनुष्टुप्)
ब्रह्मयाचे ऐकता बोल निराश द्विज जाहला ।
चक्राने तप्त होवोनी शिवाच्या पायि पातला ॥५५॥
श्रीमहादेव म्हणाले -
(इंद्रवज्रा)
अनंत ऐशा परमेश्वरात
ब्रह्मांड ते कैक होती नि जाती ।
त्याचा तयाला नच कांहि ठाव
सामर्थ्य त्याच्या पुढती न आम्हा ॥५६॥
(अनुष्टुप्)
मी नी सनत्कुमारो नी ब्रह्मा नारद देवलो ।
आसुरी मरिची धर्म सिद्धेश्वरादि ज्ञानि ते ॥५७॥
माया ना जाणितो त्याची आम्ही मायेत गुंतलो ॥५८॥
चक्र विश्वेश्वराचे त्या आम्हासीही असह्य हे ।
जावे तू शरणी त्याच्या करील हरि मंगल ॥५९॥
निराश होउनी चित्ती वैकुंठी पातला द्विज ।
जिथे लक्ष्मी सवे विष्णु राहती नित्य त्या स्थळी ॥६०॥
(इंद्रवज्रा)
दुर्वास चक्रे जळता थरारे
पडोनि पायी वदला हरीते ।
अनंत अच्यूत भक्तास वांछी
रक्षी मला मी अपराधि आहे ॥६१॥
न थोरवी जाणुनि चूक झाली
तुझ्या प्रियाचा अपराध केला ।
नामासि घेता चुकतो भवो ही
हे तू प्रभो रे मज वाचवी की ॥६२॥
श्रीभगवान म्हणाले -
(अनुष्टुप्)
भक्ताधीन द्विज मी हो न स्वातंत्र मला मुळी ।
साध्या सरळ भक्तांनी हातात ठेविले मला ॥
अर्पिती मज ते प्रेम मीही त्यांना तयास की ॥६३॥
आश्रयो मज भक्तांचा न सोडी मी तयास नी ।
न इच्छी मी मला तैसा पत्नी अक्षेय लक्षुमी ॥६४॥
दारा पुत्र घरा प्राणा गुरु द्रव्या नि लोकिच्या ।
सुखा त्यागोनि भक्तीत येती ते त्यजि मी कसा ॥६५॥
पातिव्रत्ये सती जैसी पतीला वश ठेवि तैं ।
प्रेमबंधन बांधोनी हृदयी भक्त बांधिती ॥६६॥
अनन्य प्रेमि ते भक्त मानिती पायि धन्यता ।
मुक्तीही मानिती तुच्छ भोगाची नच गोष्ट ती ॥६७॥
आणीक काय तै बोलू दुर्वासा हृदयो तया ।
असे मी नच त्या ठावे मलाही भक्त सोडुनी ॥६८॥
उपाय वदतो विप्रा घडले ज्या मुळे असे ।
जावे त्याच्याचि पायी ज्या घडे भक्तासि त्रासिता ॥६९॥
तप विद्याहि विप्रांची कल्याणा नच संशयो ।
अन्यायी द्विज हो तेंव्हा उलटे फळ त्या मिळे ॥७०॥
तुझे कल्याण हो विप्रा जावे तू त्याचिया पदी ।
अंबरिष नृपापाशी क्षमा मागोनि शांति घे ॥७१॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चवथा अध्याय हा ॥ ९ ॥ ४ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|