समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय २३ वा

बळीची सुटका हो‌ऊन बळी सुतलात जातो -

श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
पुराण ऐशा पुरुषोत्तमाच्या
    ऐकोनि बोला द्रवला बळीतो ।
तो संतप्रीयो अन दैत्यराजा
    जोडोनि हाता मग बोलला हे ॥ १ ॥
बळी म्हणाला -
प्रणामिले ना तुज पूर्ण देवा
    तशा प्रयत्‍ने मज लाभ झाला ।
ना लोकपाला अन देवतांना
    अशी कृपा ही मजला मिळाली ॥ २ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
बळी हे बोलता ऐसे तुटले बद्ध-पाश ते ।
त्याने प्रणामिला विष्णू ब्रह्म देव तसा शिवो ॥
पुन्हा प्रसन्न चित्ताने निघाला सुतला कडे ॥ ३ ॥
या परी भगवंताने स्वर्गीचे राज्य घेउनी ।
इंद्राला दिधले आणि उपेंद्र जाहला स्वयें ॥
दितीची कामना पूर्ण केली नी जग शासि तो ॥ ४ ॥
प्रल्हादे पाहिले पौत्रा कृपालाभ असा मिळे ।
भक्तीने भरले चित्त श्रीहरी स्तविला तये ॥ ५ ॥
प्रल्हादजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
ब्रह्मा नि लक्ष्मी शिवजीस तैसे
    कोणा न झाला असला प्रसाद ।
ब्रह्मादि सारे तुज वंदितात
    तो दुर्गपालो असुरासि झाला ॥ ६ ॥
या पादपद्मी बसुनी विधी तो
    विभूति मोठ्या अन शक्ति मेळी ।
आम्ही कुळाने खळ नी कुमार्गी
    झाले तुम्ही द्वारपालो प्रसन्ने ॥ ७ ॥
तू योगामाये रचिलीस सृष्टी
    सर्वज्ञ आत्मा समदर्शि तू तो ।
लीला तुझ्या त्या अघटीत सर्व
    त्या कल्पवृक्षा परि तू स्वभावे ।
तू पक्षघेसी निजभक्त त्यांचा
    अभक्त त्यांना अति निर्दयो ही ॥ ८ ॥
श्री भगवान म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
सुखी हो वत्स प्रल्हादा ! तूही जा सुतळात त्या ।
आनंदपूर्णची राही बळीपौत्रा सवे तिथे ॥ ९ ॥
सगदा तू तिथे नित्य मजला पाहशील की ।
सदैव दर्शने माझ्या तुटेल कर्म बंध ते ॥ १० ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
दैत्येंद्र शुद्धबुद्धी तो आज्ञा घेवोनिया शिरी ।
बळीच्या सहही त्याने करोनी त्या परीक्रमा ॥ ११ ॥
घेतली भगवद्‌आज्ञा जोडोनी कर दोन्हि ते ।
नमिले भगवंताला चालला यात्रि सूतला ॥ १२ ॥
परीक्षिता ! तये वेळी ब्रह्मवादी सभेत त्या ।
शुक्राचार्या हरी बोले जे होते समिपी तयां ॥ १३ ॥
आचार्य आपुला शिष्य यज्ञ होता करीत तो ।
त्रुटी पूर्ण कराव्या त्या द्विजा सामर्थ्य ते असे ॥ १४ ॥
शुक्राचार्य म्हणाले -
अर्पिता सर्व ते कर्म श्रीयज्ञेश्वर पूजिता ।
त्रुटी कर्मात त्याच्या ती राहील कशि सांग पा ॥ १५ ॥
मंत्र काल तपो देश पात्र वस्तू त्रुटी अशा ।
नामसंकीर्तने पूर्ण होती रे श्री हरी तुझ्या ॥ १६ ॥
अनंता ! तरि ही आज्ञा मानोनी पाळितो पहा ।
कल्याण साधत तेणे आज्ञा ती पाळणे तुझी ॥ १७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
हरिआज्ञा स्विकारोनी भगवान्‌ शुक्र यांनि ही ।
अन्य द्विजांसवे तेंव्हा यज्ञपूर्तीहि साधिली ॥ १८ ॥
बळीच्या कडुनी ऐसा वामने स्वर्ग घेतला ।
दिधला बंधुइंद्राला पराजित असोनिया ॥ १९ ॥
प्रजापती पतीब्रह्मा देवर्षी पितरे मनू ।
दक्ष भृगु कुमारो नी अंगिरे कश्यपे शिवे ॥ २० ॥
अदितीच्या प्रसन्नार्थे आणि अभ्यूदया जगा ।
लोकपालपदी केले स्थापीत वामना तदा ॥ २१ ॥
वेदो देव यशो धर्म लक्षुमी मंगलो व्रत ।
स्वर्गादी रक्षिण्या साठी उपेंद्र वामना तदा ॥ २२ ॥
स्थापिले सर्व कल्याण सर्वशक्ति हरीसि नी ।
आनंद बहुही झाला प्राणिमात्रासि तो तदा ॥ २३ ॥
आज्ञा घेवोनि ब्रह्म्याची इंद्राने वामना तदा ।
विमानी घेतले तैसे स्वर्गी घेवोनि पातला ॥ २४ ॥
इंद्राला लाभला स्वर्ग मिळाले हरिछत्र ही ।
ऐश्वर्य पातले पायी आनंदोत्सव जाहला ॥ २५ ॥
कुमारो शंकरो ब्रह्मा भृगू सिद्ध मुनी भुते ।
सिद्ध नी पितरे देव विमानी बैसले तदा ॥ २६ ॥
अद्‌भूत भगवद्‌लीला मुखांनी गाउ लागले ।
निघाले आपुल्या लोका अदितीला प्रशंसुनी ॥ २७ ॥
परीक्षिता तुला मी ही भगवत्‌कीर्ति बोललो ।
ऐकता सर्व ती पापे सुटोनी पळती पुढे ॥ २८ ॥
(वसंततिलका)
लीला अनंत हरिच्या महिमा अपार
    ना मोजमाप जणु हे भुमिचे कणो की ।
ना जन्मला नच पुढे गुण वर्णि ऐसा
    वेदात ते मुनिवसिष्ठ वदोनि गेले ॥ २९ ॥
(अनुष्टुप्‌)
वामनो देव देवांचा त्याची अद्‌भूत ही लिला ।
ऐकता या चरित्राला गति उत्तम लाभते ॥ ३० ॥
यज्ञात देव पित्रांच्या कर्मी त्या कोणत्याहि ही ।
कीर्तनी गायिली जाता कर्माचे फळ लाभते ॥
अनुभवो महात्म्यांचा थोर श्रेष्ठासही तसा ॥ ३१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेविसावा अध्याय हा ॥ ८ ॥ २३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP