समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २४ वा
भगवंताच्या मत्स्यावताराची कथा -
राजा परीक्षिताने विचारिले -
(अनुष्टुप्)
अद्भूत भगवत् कार्य लीला छान तयांचि ती ।
मत्स्यावतार पहिली कथा मी ऐकु इच्छितो ॥ १ ॥
मत्स्ययोनी तशी निंद्य तमी नी परतंत्रही ।
शक्तिमान् असुनी ईश तेणे हे का स्विकारिले ॥ २ ॥
महात्मे कीर्तनी गाती चरित्र सुखदायको ।
कृपया सांगणे लीला सर्व ती आमुच्या पुढे ॥ ३ ॥
श्री सूतजी सांगतात -
राजा परीक्षिते ऐसा शुकांना प्रश्न टाकिला ।
तदा ते भगवद्लीला मत्स्यावतारि बोलले ॥ ४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
सर्वांचा प्रभू तो एक तरी गो ब्राह्मणा तसे ।
देवता वेद ती धर्म यांच्या रक्षार्थ जन्मतो ॥ ५ ॥
वसतो करितो लीला परी निर्गुण तो तसा ।६ ॥
मागील कल्पअंतासी ब्रह्मा तो झोपल्यावरी ।
ब्राह्म प्रलय नावाचा झाला नैमित्तिको लय ॥
भूर्लोक आदि ते सारे समुद्री बुडले तदा ॥ ७ ॥
ते काळी ब्रह्मजी झोपू इच्छिती त्याच वेळि ते ।
वेद त्यांच्या मुखातून पडले शब्द रूपि ते ॥
दैत्ये नाम हयग्रीवे योगाने चोरिले तदा ॥ ८ ॥
शक्तिमान् भगवंताने जाणिली गोष्ट ही अशी ।
म्हणोनी घेतला त्यांनी मत्स्यावतार तो तसा ॥ ९ ॥
परीक्षिता तये वेळी सत्यव्रत उदार तो ।
राजर्षी जल पीवोनी तपाला बसला असे ॥ १० ॥
वर्तमान महाकल्पी विवस्वान् सूर्यपुत्र तो ।
श्राद्धदेव यया नाम वैवस्वत् मनु जाहला ॥ ११ ॥
कृतमाला नदी मध्ये एकदा जल तर्पिता ।
राजर्षी अंजुलीमध्ये सान मासोळि पातली ॥ १२ ॥
परीक्षिता ! द्रविडी राये सत्यव्रत तपी तये ।
आलेली मासळी तेंव्हा नदीत सोडिली पुन्हा ॥ १३ ॥
मासळी करुणापूर्ण शब्दात बोलली तया ।
दयाळू नृप तू होसी भाउकी भक्षिते अम्हा ॥
व्याकूळ मी तये भेणे मला कां सोडिले जळीं ॥ १४ ॥
राजा ते नच जाणी की भगवान् मासळी रुपे ।
पातले रक्षिण्या तैसे कृपाही करण्या तदा ॥ १५ ॥
मत्स्याची दीनवाणी ती राजाने ऐकिली असे ।
दयेने जलपात्रात ठेवोनी आणिले घरा ॥ १६ ॥
आश्रमी एक रात्रीत मासळी वाढली बहू ।
कमंडलूत ना जागा राजासी वदली तदा ॥ १७ ॥
कष्टानेही इथे माझे जगणे शक्य ते नसे ।
द्यावे स्थान मला मोठे सुखाने मी जगेल जै ॥ १८ ॥
राजाने मासळी तेंव्हा माठात सोडिली असे ।
तिथे दो घटिकामध्ये तीन हातहि वाढली ॥ १९ ॥
पुन्हा ती वदली राजा माठ हा तो पुरेचिना ।
तुझ्या मी शरणी आहे कृपया योग्य स्थान दे ॥ २० ॥
परीक्षिता ! तये वेळी मासळी त्या सरोवरी ।
टाकिता सत्यव्रताने थोड्याचि समयात तो ॥
जाहला मत्स्य तो मोठा न मावे त्या सरोवरी ॥ २१ ॥
आणि तो वदला राजा ! मी तो जलचरु असे ।
याही सरोवरा मध्ये न मी राहू शके सुखे ॥
कृपया मज रक्षावे न्यावे मोठ्या सरोवरी ॥ २२ ॥
नेता मोठ्या तळ्यामध्ये वाढता तो त्वरे त्वरे ।
तदा लीलामयी मत्स्या सोडिले सागरी पुन्हा ॥ २३ ॥
समुद्रीं टाकता मत्स्य वदला थोर नक्र ते ।
खातील मजला येथे न सोडी तू मला इथे ॥ २४ ॥
भगवद्मत्स्यवाणी ती ऐकता मुग्ध होउनी ।
राजाने पुसले त्याला मत्स्य रूपात कोण तू ? ॥ २५ ॥
चारशे कोस विस्तार वाढला दिनि एक तू ।
एवढा शक्तिमान् प्राणी न मी पाही न ऐकिले ॥ २६ ॥
तू नक्की शक्तिमान् विष्णु प्रत्यक्ष अविनाशि तू ।
जीवांना उपदेशाया मत्स्य रूपात पातला ॥ २७ ॥
नमस्ते पुरुष श्रेष्ठ स्वामी तू स्थिति आदिचा ।
शरणागत भक्तांचा आत्मा तू आश्रयो तसा ॥ २८ ॥
अभ्यूदयार्थ प्राण्यांच्या लीला तू करिसी बहू ।
तरी मी जाणु इच्छी की हे रूप काय कारणे ? ॥ २९ ॥
(इंद्रवज्रा)
प्रभोऽरविंदाक्ष ! जसे हि व्यर्थ
आश्रीत होणे जयि गर्व त्याचे ।
भक्ती तुझी व्यर्थ न होय तैशी
तू प्रीय आत्मा तुज हेतु नाही ।
जे रूप हे धारण तूचि केले
अद्भूत आहे तव दर्शनो की ॥ ३० ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
अनन्य भक्ता प्रभु प्रेम देतो
सत्यव्रताची हरि प्रार्थना ती ।
ऐकोनि कल्पांत तळी समुद्री
विहारता तो मग बोलला हे ॥ ३१ ॥
श्री भगवान म्हणाले -
(अनुष्टुप्)
सातव्या दिनि भूर्लोक आदी ते तिन्हि लोकही ।
बुडतील समुद्रात ऐक राजा प्रियोत्तमा ॥ ३२ ॥
प्रलयोकाळि हे सर्व जळात बुडता तदा ।
माझ्याचि प्रेरणेने ती एक नाव मिळे तुला ॥ ३३ ॥
त्या वेळी सर्व जीवांचे सूक्ष्म देह नि सप्त ते ।
ऋषी नावेत घेवोनी धान्यादी बीज घे सवे ॥ ३४ ॥
सर्वत्र सागरी लाटा उठतील महान त्या ।
न प्रकाश कुठे राही ऋषींचे तेज घेउनी ॥
नावेत चढणे आणि सर्वत्र फिरणे पहा ॥ ३५ ॥
प्रचंड वादळे तेंव्हा नाव ती डोलु लागता ।
वासुकी सर्पदोराने बांधील नाव मी तदा ॥ ३६ ॥
ब्रह्म्याची रात्र ती तेंव्हा तो पर्यंत तुझ्या सवे ।
सप्तर्षींची अशी नाव ओढिता मी फिरेल की ॥ ३७ ॥
तेंव्हा तू पुसता प्रश्न देईन उत्तरेहि मी ।
परब्रह्म तदा सर्व हृदयी जाणशील तू ॥ ३८ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चोविसावा अध्याय हा ॥ ८ ॥ २४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|