समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २२ वा
बळी भगवंताची स्तुती करतो भगवान् प्रसन्न होतात -
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! असे देवे तिरस्कार करोनिया ।
दैत्याचे धैर्य सांडाया वदले परि ना तसे ॥
घडता धैर्य देवोनी वदला बळि तेधवा ॥ १ ॥
दैत्यराज बळी म्हणाला -
(इंद्रवज्रा)
देवाधिदेवा तव कीर्ति थोर
तू मानिसी का मम बोल खोटे ।
न ते घडे मीहि करील सत्य
ठेवी तिजा पाय शिरावरी या ॥ २ ॥
नाही मला भीति नर्कात जाणे
राज्यादिकांचा नच मोह तैसा ।
न मी भितो बंधन दुःख यासी
मी भीतसे त्या अपकीर्ति बोला ॥ ३ ॥
(अनुष्टुप्)
गुरूच्या माध्यमे देसी दंड तो युक्तची असे ।
माता पिता सुहृद कोणी तसा दंड न देत की ॥ ४ ॥
जरी तू लपुनी आम्हा असुरा दंड देसि हा ।
अमुचा गुरुची तू तो मदाने माजता अम्ही ॥
हरिसी मद तो सर्व दिव्य दृष्टिहि देसि तू ॥ ५ ॥
उपकार तुझे थोर वर्णावे काय वाणिने ।
योग्यांना नच जे लाभे अशी सिद्धि अम्हास तू ॥
वैरात राहुनी देसी उपकार तुझा असा ॥ ६ ॥
अनंत तुझिया लीला स्वयें तू दंड देसि हा ।
लज्जा व्यथा मला नाही जरी तू बांधिसी असा ॥ ७ ॥
(इंद्रवज्रा)
पितामहाची बहुकीर्ति थोर
तया पित्याने बहु दुःखिले त्यां ।
तरी तयांची ढळली न भक्ती
तुलाचि त्यांनी तनु अर्पिली की ॥ ८ ॥
हा देह सोडी जयि काळ येता
धनार्थ येती स्वजनो अपार ।
पत्नीहि टाकी भवचक्र यात
यांच्यात आयू नच संपवीणे ॥ ९ ॥
निश्चेय ऐसा करुनी मनाचा
या पद्मपाया शरणार्थ आलो ।
प्रल्हाद ते संत विरक्त थोर
उदार ज्ञानी अन संतमेरु ॥ १० ॥
त्या दृष्टिने तो तुम्हि शत्रु आम्हा
दैवेचि नेली मम लक्षुमी नी ।
तुझ्या पदा आणिले याच वेळी
अनित्य मी हा पडलो भवात ॥ ११ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! बळी ऐसे बोलतो त्याच या क्षणी ।
उदये चंद्रमा जैसी तसे प्रल्हाद पातले ॥ १२ ॥
(इंद्रवज्रा)
पितामहे श्रीहरि पाहिला नी
पद्माक्ष बाहू बहुरुंद तैशा ।
तो सुंदरो श्यामला देह उंच
तनूवरी लेवूनि पीतवस्त्र ॥ १३ ॥
वरुणपाशीं बळि तैहि होता
बळी न तेणे शकला पुजू त्यां ।
नेत्रात अश्रू उसळोनि आले
नी फक्त माथेचि तया नमीले ॥ १४ ॥
प्रल्हादजीने हरि पाहिला तै
सेवेत होते तयि पार्षदेही ।
प्रेमे तनू ती पुलकीत झाली
साष्टांग त्यांनी नमिला हरी तो ॥ १५ ॥
प्रल्हादजी म्हणाले -
प्रभो ! तुम्ही जे दिधले ययाला
हिराविलेही तुम्हि तेचि सर्व ।
देणे नि नेणे तव ठीक आहे
ही ही कृपाची तव थोर आहे ॥ १६ ॥
ज्ञात्यांहि होतो मद संपत्तीचा
ती राहिल्यानेच न तू कळे त्या ।
तुला नमस्ते जगदीश्वरा रे
नारायणारे तुचि लोक साक्षी ॥ १७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! तये वेळी अंजुली जोडुनी उभे ।
होते प्रल्हाद तेथे नी ब्रह्म्याने बोलु इच्छिले ॥ १८ ॥
परंतू त्याच वेळेला पातली बळिपत्नि ती ।
साध्वी विंध्यावली तेंव्हा भये नमुनि बोलली ॥ १९ ॥
विंध्यावली म्हणाली -
(वसंततिलका)
क्रीडार्थ तू रचियली ययि सृष्टि सर्व
मानी कुबुद्धि तिज त्यापरि स्वामि मीच
कर्ता तसाचि भरता तुचि मारणारा
माझे म्हणोत कुणि ते तुज काय अर्पो ॥ २० ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
(अनुष्टुप्)
प्रभो ! देवाधिदेवो तू जीवांचे स्वामि हो तुम्ही ।
सर्वस्व घेतले याचे न हा दंडासि पात्र की ॥ २१ ॥
येणे सर्व भुमी तैसा पुण्यअर्जित स्वर्ग तो ।
आत्माही अर्पिला तेंव्हा न धैर्य ढळले मुळी ॥ २२ ॥
(वसंततिलका)
या पायि सत्यहृदये जल अर्पिल्याने
दुर्वांकुरेहि पुजिता गति श्रेष्ठ लाभे ।
धैर्ये प्रसन्न बळिने दिधले त्रिलोक
तेंव्हा तयास कसले मग दुःख लाभे ॥ २३ ॥
श्री भगवान् म्हणाले -
(अनुष्टुप्)
ब्रह्माजी ! मी जया पावे त्याचे धन हिरावितो ।
धनाने माजतो प्राणी तेंव्हा तो मज ना भजे ॥ २४ ॥
आपुल्या कर्मि गुंतोनी भवात जीव तो फिरे ।
माझी कृपा घडे तेंव्हा मनुष्यदेह लाभतो ॥ २५ ॥
कूळ कर्म अवस्था नी रूप विद्या नि ते धनो ।
ऐश्वर्य आदिचा गर्व न ज्याला ती कृपा मम ॥ २६ ॥
कुळादिंच्याचि गर्वाने कल्याण त्यजितो जिव ।
माझे भक्त परी ऐशा मोही ना गुंतती कधी ॥ २७ ॥
दैत्य दानव वंशाचा बळी मेरूचि कीर्तिमान् ।
माया ती जिंकिली येणे दुःखातहि न लोभ या ॥ २८ ॥
धन ते मी हिरावोनी घेतले राज्य सर्वही ।
आक्षेप घेतले कैक शत्रुत्वे बांधिले असे ॥ २९ ॥
गुरुंनी दिधला शाप परी हा तो दृढव्रती ।
छळोनी बोललो यासी तरी ना धर्म त्यागि हा ॥ ३० ॥
असे मी स्थान या देई दुर्लभो देवतांस जे ।
मन्वंतरात सावर्णी इंद्र हाचि असेल की ॥ ३१ ॥
सुतला विश्वकर्माने निर्मिले तेथ राहि हा ।
जेथील लोक ते सर्व कृपा माझीच सेविती ॥
तिथे व्याधी न थकवा शत्रु विघ्ने न आणिती ॥ ३२ ॥
(बळीला संबोधून म्हणतात)
इंद्रसेना महाराजा सर्व कल्याण हो तुझे ।
तेथ जा गोतवाळ्याने स्वर्गीचे सुख भोग तू ॥ ३३ ॥
कधी न शकती जिंकू लोकपालही ते तुला ।
न दैत्य मानिती त्यांचे चक्रे मी तुकडे करी ॥ ३४ ॥
तुझी नी तव भक्तांची तशी सामग्रि जी तुझी ।
रक्षील स्वयेची मी नी राही नित्य तुझ्या सवे ॥ ३५ ॥
दैत्य दानव यांचा जो तुला संसर्गदोष तो ।
तात्काळ नष्ट हा झाला प्रभाव ममची पहा ॥ ३६ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाविसावा अध्याय हा ॥ ८ ॥ २२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|