समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २१ वा
बळी बंधनात पडतो -
श्री शुकदेवजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
त्या सत्यलोकी हरिपादपद्म
पोहोचता तै नखतेज दिव्य ।
पाहोनि ब्रह्मा बुडला प्रकाशी
सर्वेचि केले हरि स्वागतो तै ॥ १ ॥
वेदोपवेदो नियमो यमो नी
वेदांग तर्को इतिहास सर्व ।
योगाग्नि वायू मधुनी जयांनी
जाळोनि कर्मे ययि लोकि आले ।
ते मूर्तिमान् होवुनिया पदासी
येवोनि केली मग वंदना की ॥ २ ॥
ब्रह्माजिचीही बहु कीर्ति थोर
ते जन्मले श्रीहरिनाभिस्थानी ।
त्या विश्वरूपा पुजिले तयांनी
नी गायिली ही स्तुति श्रीहरीची ॥ ३ ॥
(वसंततिलका)
पाणी कमंडलु मधील धुवोनि पाया
झाले पवित्र गगनी निघुनी तिथोनी ।
आले धरेसि पुढती नृप ! तीच गंगा
आली पवित्र करिता, हरिचीच कीर्ती ॥ ४ ॥
(अनुष्टुप्)
कांही विभूति सारोनी भगवान् सान जाहले ।
तदा इंद्रदिके त्यांना अनेक भेटि अर्पिल्या ॥ ५ ॥
तयांनी जल माला नी गंध नी अंगराग तो ।
सुगंधी धूप दीपो नी अक्षता फळ अंकुरो ॥ ६ ॥
अर्पिली हरिसी आणि स्तोत्र जय् घोष नृत्य नी ।
वाद्ये गान तसे शंख भेरी शब्द नि नादले ॥ ७ ॥
जांबवान् ऋक्षराजाने पळते जाउनी दहा ।
दिशांना मंगलो वाद्ये भेरीही वाजवीयल्या ॥ ८ ॥
दैत्यांनी पाहिले येणे वहवा करुनी अशी ।
हिराविली धरा सर्व स्वामी यज्ञात दीक्षित ॥
बोलू न शकतो कांही तेंव्हा हे क्रोधि बोलले ॥ ९ ॥
अरे हा तो नव्हे विप्र मायावी विष्णु ते असे ।
द्विजाचे सोंग घेवोनी देवांचे कार्य साधितो ॥ १० ॥
यज्ञ दीक्षित स्वामी ना दंड याला करु शके ।
बटुवेश धरोनीया याचके सर्व घेतले ॥ ११
सत्यनिष्ठ असा स्वामी सदैव यज्ञिही तसा ।
द्विजभक्त दयाळू तो खोटे ना बोलु ते शके ॥ १२ ॥
या वेळी आमुचा धर्म विष्णुला ठार मारिणे ।
स्वामीची खरि ही सेवा मानिली दैत्यसैनिके ॥
घेतले शस्त्रही हाती लढाया सज्ज जाहले ॥ १३ ॥
नसोनी बळिची आज्ञा सर्व ते क्रोधि होउनी ।
पट्टीश शुळ घेवोनी वधाया धावले तसे ॥ १४ ॥
परीक्षिता तये वेळी पार्षदे पाहिले तदा ।
रोधिले शस्त्र घेवोनी दैत्यांना हासुनी पहा ॥ १५ ॥
नंद सुनंद विजयो जयो प्रबल नी बलो ।
कुमुदो कुमुदाक्षो नी विष्वक्सेनो गरुड ही ॥ १६ ॥
जयंत श्रुतदेवोनी पुष्पदंतो नि सात्वतो ।
दहाहजार हत्तींच्या सह ते लढु लागले ॥ १७ ॥
बळीने पाहता सर्व क्रोधाने भरला तदा ।
शुक्राने रोधिले त्याला शापाची स्मृति त्या दिली ॥ १८ ॥
वदला विप्रचित्ती रे राहू नेम्यादि राक्षस ।
न लढा वापसी या रे काळ ना अनुकूल हा ॥ १९ ॥
दैत्यांनो काळ तो आहे सुख दुःखा समर्थची ।
दाबण्या पाहता त्याला सर्वांच्याहून दूर तो ॥ २० ॥
आधी ती आपुली जत्ती देवांची आज पातली ।
काल शक्तीच ती होय उन्नती नी अधोगती ॥ २१ ॥
मंत्री दुर्गो बळ बुद्धी मंत्र नी औषधी तशा ।
उपाये काळ ना थांबे मनुष्या कडुनी कधी ॥ २२ ॥
अनुकूल तुम्हा दैव तेंव्हा यांनाचि जिंकिले ।
परी आज नसे तैसे विजये गर्ज ती पहा ॥ २३ ॥
दैवाच्या अनुकुल्याने त्यांना जिंकूत आपण ।
काळाची पाहणे वाट तेंव्हा सिद्धी मिळेल ती ॥ २४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
बळीचे बोल ऐकोनी दैत्यसेनापती तसे ।
दानवो सर्वही गेले निघोनी त्या रसातळी ॥ २५ ॥
जाताचि सर्व ते दैत्य गरूडे भगवन्मना ।
जाणोनी वरुणोपाशी बांधिले बळिला तदा ॥
दिनी त्या अश्वमेधात सोमपान न जाहले ॥ २६ ॥
शक्तिमान् विष्णुने जेंव्हा बळीला बांधिले तदा ।
हाय हाय दिशा दाही वदले स्वर्ग मृत्युही ॥ २७ ॥
बळी तो पडता पाशीं संपत्ती नष्ट जाहली ।
तरीही बळिचे येश लोक ते गाउ लागले ॥
परीक्षिता तये वेळी बळीला बोलला हरी ॥ २८ ॥
असुरा पाउले तीन दिली तू भूमि ती मला ।
सांग आता कुठे ठेवू तिसर्या पावला अता ॥ २९ ॥
सूर्याचे पोचते तेज शशीची किरणे जिथे ।
ढग पृथ्वी असे सर्व होते राज्य तुझे तसे ॥ ३० ॥
तू तो हे पाहिले की मी एक पायात भू अशी ।
दुज्याने व्यापिला स्वर्ग न कांही राहिले तुझे ॥ ३१ ॥
प्रतिज्ञा न पुरी होता जाशील नरकीं पहा ।
शुक्राची संमती आहे आता नर्कात जाय तू ॥ ३२ ॥
याचका दान बोलोनी खोटे वागेल त्याजचे ।
व्यर्थ मनोरथे सर्व स्वर्ग ना मिळतो तुला ॥ ३३ ॥
धनाचा गर्व तो होता महान तुजला तसा ।
खोट्याचे फळ ते भोगी कांही वर्षास नर्क तो ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकविसावा अध्याय हा ॥ ८ ॥ २१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|