समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २० वा
भगवान् वामन विराट रुप धारण करतात, दोनच पावलात स्वर्ग व पृथ्वी व्यापतात -
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
राजन् ! कुलगुरु शुक्रे वदता क्षण शांत तो ।
राहिला बळि आदर्श गुरूसी नम्र बोलला ॥ १ ॥
राजा बळी म्हणाला -
भगवन् बोलले सत्य धर्म तो आमुचा तसा ।
धर्म अर्थ यशो आणि निर्वाहा बाध तो नको ॥ २ ॥
गुरुजी ! परि मी आहे प्रल्हादपौत्र नी तसा ।
प्रतिज्ञा नच ती मोडी द्विजाला ठकवू कसा ॥ ३ ॥
पृथिवी वदते ऐसे असत्यचि अधर्म तो ।
न साही सगळा भार अर्धा भारचि साहिते ॥ ४ ॥
दारिद्र्या नरका दुःखा राज्यनाशा नि मृत्युला ।
न भीतो मी परी विप्रा वंचिण्या भीतसे बहू ॥ ५ ॥
मरता सगळ्या वस्तू येथेचि सोडणे असे ।
न तुष्टति द्विज धने तदा अर्थ धनात ना ॥ ६ ॥
दधिची शिबि आदींनी दुस्त्यज्य प्राण देउनी ।
रक्षिले हित प्राण्यांचे येरांचा हेतु काय तो ॥ ७ ॥
द्विजा ! दैत्यांनि या पूर्व युगात पृथ्वि भोगिली ।
काळाने ग्रासिले सर्वा मागे कीर्ती पहा कशी ॥ ८ ॥
गुरुदेव ! जगी कैक युद्धात प्राण अर्पिती ।
सत्पात्रा धन दे श्रद्धे ऐसे दुर्लभ या जगी ॥ ९ ॥
(इंद्रवज्रा)
उदारभावे हिन नी अपात्रा
देताहि भिक्षा गति हीन लोभे ।
ती दुर्गतीही तयि भूषणो की
जो ब्रह्मवेत्ता तुमच्या परीच ।
लाभेल हानी मग काय बोलो
तै मी यया दानचि देउ इच्छी ॥ १० ॥
या यज्ञयागे भजता तुम्ही ज्या
तो रुप घेता जरि येथ आला ।
आला असोवा दुसराहि कोणी
इच्छील तैशी पृथिवीहि देतो ॥ ११ ॥
(अनुष्टुप्)
अपराधा विना याने अधर्मे बांधिले तरी ।
अनिष्ट न करी याचे जरी शत्रू असेल हा ॥
जरी तो द्विजवेषाने पातला भिउनी इथे ॥ १२ ॥
यशपवित्र हा विष्णु असता येश घेइ हा ।
युद्धे घेईल हा भूमी अन्या मृत्यू शरे मम ॥ १३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
आचार्ये पाहिला शिष्य अश्रद्ध आपुल्या वरी ।
दैवाच्या प्रेरणे त्यांनी शापिला सत्यही बळी ॥ १४ ॥
(शुक्राचार्य म्हणाले)
मूर्खा ! अज्ञचि तू होसी परि पंडित मानिसी ।
मलाही तू उपेक्षोनी गर्व हा धरिसी असा ॥
आज्ञा तू मोडिसी तेंव्हा हरेल लक्षुमी तुझी ॥ १५ ॥
महात्मा बळि तो राजा शापे ना ढळला मुळी ।
भगवान् वामना त्याने पूजिले विधिपूर्वक ॥
पाणी सोडोनि त्रिपदे भूमि संकल्पिली तये ॥ १६ ॥
विंध्यावली बळीपत्नी मोत्यांचे हार लेवुनी ।
पातली घट घेवोनी सोन्याचा पद ते धुण्या ॥ १७ ॥
अतीव सुंदरो पाय बळीने धुतले तसे ।
विश्वपावन त्या तीर्था बळीने शिरि घेतले ॥ १८ ॥
(इंद्रवज्रा)
आकाशि तेंव्हा स्थित देवता नी
गंधर्व सिद्धे अन चारणांनी ।
प्रशंसिले दान बघून दैत्या
वरूनि केली मग पुष्पवृष्टी ॥ १९ ॥
नी दुदुंभी त्या झडल्या हजारो
गंधर्व किंपूरूष गायले नी ।
उदार धन्यो बळिने पहा की
शत्रूस केलेहि त्रिलोक दान ॥ २० ॥
अद्भूत झाली घटना तदा की
तो वामनो वाढुचि लागला नी ।
आकाश भूमी पशु पक्षि देव
मनुष्य सारे लपले तयात ॥ २१ ॥
ऋत्वीज आचार्य सदस्य आणि
राजा बळीने हरि पाहिला तो ।
समस्त ऐश्वर्यचि स्वामि एक
समस्त जीवांसह तो अनंत ॥ २२ ॥
रसातलो त्या चरणाहि खाली
पायासि पृथ्वी गिरि पिंढर्यांसी ।
पक्षी तयाच्या गुडघ्यावरी नी
मरुद्गणो मांडिसि सर्व होती ॥ २३ ॥
वस्त्रासि संध्या अन गुह्य स्थानी
प्रजापती दैत्यहि जांघस्थानी ।
नाभीत आकाश समुद्र काखीं
नक्षत्र सारेचि वक्षस्थलासी ॥ २४ ॥
नी पाहिले की हृदयात धर्म
ऋत स्तनी नी वचनात सत्य ।
वक्षस्थलासी घटलक्षुमी नी
मनात चंद्रो अन कंठि साम ॥ २५ ॥
बाहूत इंद्रो अन देवता त्या
कानीं दिशा नी शिरि स्वर्ग त्याच्या ।
केसात मेघो अन वायु नाकीं
नेत्रात सूर्यो मुखि अग्नि त्याच्या ॥ २६ ॥
वाणीत वेदो रसनी वरुणो
विधी निषेधो भुवईत तैसे ।
नी पापण्यांशी दिनरात्र त्याच्या
ललाटि क्रोधो अधरोष्टि लोभ ॥ २७ ॥
स्पर्शात कामो जल वीर्यस्थानी
चालीत यज्ञो नि अधर्म पृष्ठी ।
छायेत मृत्यू हरिच्या पहा तो
हास्यात माया नि लवेत वल्ली ॥ २८ ॥
नाडीं सरीता नखि त्या शिळा नी
बुद्धीत ब्रह्मादि ऋषी गणो ते ।
वीरो बळीने भगवंत ऐसा
चराचरी इंद्रियि पाहिला तो ॥ २९ ॥
सर्वात्म ऐसा हरि वामनो तो
पाहोनि झाले भयभीत दैत्य ।
तेंव्हाचि आले हरिच्या करासी
सुदर्शनो ते अति तेज दिव्य ॥ ३० ॥
शारंग्धनू जै गरजे ढगोची
शंखो तसाची करि पांचजन्य ।
गदा तशी वेगवान् कौमुदी ती
चंद्रापरी ती शत चिन्ह ढाल ॥ ३१ ॥
विद्याधरो नामक खड्ग हाती
अक्षेय भातीं द्वय तीर ज्यात ।
येता तदा पार्षद शोभला तो
किरीट डोई अन कुंडले ही ।
ते बाजुबंदो भुजि शोभले नी
श्रीवत्सचिन्हो हृदयास त्याच्या ।
गळ्यात शोभे तयि कौस्तुभो नी
ते वस्त्र शोभे अन मेखळाही ॥ ३२ ॥
पाची प्रकारे फुलमाळ कंठी
गुंजारती तेथचि भृंग नित्य ।
एका पदाने जग व्यापिले नी
आकाश देहे नि दिशा करांनी ॥ ३३ ॥
दुज्या पदे झाकियालाहि स्वर्ग
न वस्तु राही बळिपाशि कांही ।
ठेवावयाला तिसरा पदो तो
ब्रह्मांड झाके द्वय पावलात ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर विसावा अध्याय हा ॥ ८ ॥ २० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|