समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १७ वा

भगवान्‌ प्रगट होवून अदितिला वर देतात -

श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता ! पति देवाचा घेवोनी उपदेश हा ।
मोठ्या सावध चित्ताने अदिती व्रत साधिते ॥ १ ॥
बुद्धी ही सारथी केली मनाचा तो लगाम नी ।
थोपिले इंद्रिये अश्व निष्ठेने चिंतिला हरी ॥ २ ॥
तिने एकाग्र बुद्धिने सर्वात्मा वासुदेवि त्या ।
लाविले आपुले चित्त पयोव्रत करोनिया ॥ ३ ॥
तदा प्रगटतो झाला भगवान्‌ पुरुषोत्तम ।
शंख चक्र गदा हाती चतुर्भुज पितांबर ॥ ४ ॥
नेत्राने पाहिला विष्णु अदिती आदरे उभी ।
राहता प्रेम विव्हले दंडवत्‌ विष्णू वंदिला ॥ ५ ॥
(इंद्रवज्रा)
उठोनि जोडी कर नी स्तुती ही
    करावया यत्‍न केला परी ती ।
हर्षाश्रुने ना शकली वदाया
    हर्षेचि अंगा सुटलाहि कंप ॥ ६ ॥
ती प्रेमनेत्रे कमलापतीला
    यज्ञेश्वराला बघता अशी की ।
पीयील वाटे बघता अदीती
    सद्‌गदे धीर धरोनि बोले ॥ ७ ॥
अदिति म्हणाली -
(वसंततिलका)
यज्ञेश यज्ञपुरुषाच्युत तीर्थपादा
    घेता पदाश्रय तुझा तरतात लोक ।
संकीर्तने तुझिहि तारिति ती जनांना
    नष्टोनि जाय विपदा शरणार्थियांच्या ।
दीनासि स्वामि भगवान्‌ तुचि एकला रे
    कल्याण तेचि करणे अमुचे हरी रे ॥ ८ ॥
विश्वास तू उबविसी अन पोषिसीही
    तू कारणीहि प्रलया तव रूप सर्व ।
छंदेचि तू गुण नि शक्ति रूपात येशी
    अज्ञान ते मिटविसी तुजला नमस्ते ॥ ९ ॥
ब्रह्म्या समान तनु आयु नि दिव्य तेज
    सारेचि इष्ट धन नी पृथिवी नि स्वर्ग ।
सिद्धीही सर्व मिळली तुझिया कृपेने
    शत्रूशि तो विजय हे किरकोळ कर्म ॥ १० ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
अदितिने स्तुती गाता भगवान्‌ कमलाक्ष तो ।
जाणिता जाहला सर्व वासुदेव प्रभू तदा ॥ ११ ॥
श्री भगवान्‌ म्हणाले -
देवमाता ! तुझी इच्छा जाणिले मी तुझ्या मुलां ।
संपत्ती ती हिरावोनी दैत्ये नागविले असे ॥ १२ ॥
इच्छिसी तरि ते पुत्र बळीला जिंकितील नी ।
घेतील वैभवे सारी तरी तू मज पूजिणे ॥ १३ ॥
इच्छिसी तरि तो इंद्र शत्रु मारील सर्व ते ।
दुःखि पत्‍न्या रडताना त्यांच्या तू बघशी की ॥ १४ ॥
अदिती धनसंपन्न इच्छिसी पुत्र सर्व ते ।
कीर्ति ऐश्वर्य लाभेले स्वर्गारूढहि होति ते ॥ १५ ॥
(इंद्रवज्रा)
परंतु देवी असुरो अताची
    न हारती त्यां द्विज ईश साह्य ।
केली तयांशी जरि ती लढाई
    न त्यात लाभे सुख ते मुळिही ॥ १६ ॥
देवी व्रताने तुज मी प्रसन्न
    म्हणोनि कांही करितो उपाय ।
पूजा न जाते कधि व्यर्थ माझी
    श्रद्धानुसारे फळ लाभते की ॥ १७ ॥
रक्षार्थ पुत्रां विधि जाणुनी तू
    पयोव्रताने मज पूजिले तू ।
मी अंश रूपे उदरी तुझ्याच
    जन्मोनि रक्षा करितो तयांची ॥ १८ ॥
(अनुष्टुप्‌)
कल्याणी ! ममरूपात पतीला स्थित पाहणे ।
निष्पाप पतिची सेवा करावी पाहुनी तसे ॥ १९ ॥
पहा देवी असो गुप्त पुसले तरि ना वदो ।
रहस्य देवतांचे हे फळ ते सिद्ध होतसे ॥ २० ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
एवढे बोलता विष्णू तिथेच गुप्त जाहले ।
येईल गर्भि भगवान्‌ अदिती धन्य जाहली ॥ २१ ॥
लागली पतिच्या सेवीं कश्यपे जाणिले तसे ।
आपुल्या शरिरामाजी अंशाने हरि पातला ॥ २२ ॥
वायू काष्ठासि अग्नीला स्थापितो तैचि कश्यपे ।
चिरसंचित वीर्याला दिती पोटात स्थापिले ॥ २३ ॥
ब्रह्म्यासी कळले सर्व अदितीगर्भि विष्णु तो ।
म्हणोनी पातला तेथे गुह्यनामे स्तवीयले ॥ २४ ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
कीर्ति आश्रय तू देवा जय्‌ जय्‌कार तुझा प्रभो ।
नमो ब्रह्मण्य देवाला त्रिगुणासी नमो नमो ॥ २५ ॥
पृश्निच्या पोटि जन्मोनी वेदांना तूच रक्षिसी ।
प्रभो तू ईश सर्वांचा तुझ्या नाभीत लोक हे ॥
तिन्ही लोकांहुनी श्रेष्ठ वैकुंठधामि नांदसी ॥ २६ ॥
(इंद्रवज्रा)
तू आदि अंती अन मध्य विश्वी
    तेणेचि वेदो तव रूप गाती ।
प्रवाह नेई तृणपर्ण जैसे
    कालो तसा तू जग वाहवीसी ॥ २७ ॥
तू कारणी त्या जिवनी प्रजेच्या
    प्रजापतींच्या जननास तैसा ।
देवाधिदेवा जळि नाव तारी
    तैसाच तू आश्रय देवतांचा ॥ २८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥ ८ ॥ १७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP