समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १६ वा

कश्यपजी कडून अदितीला पयोव्रताचा उपदेश -

श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता ! असे दैत्ये स्वर्ग तो घेतला बळे ।
देवमाता अदीती ती पोरकी दुःखि जाहली ॥ १ ॥
एकदा कैक वर्षांनी कश्यपो तप संपता ।
अदितीआश्रमा जाता न शांति सुख ही तिथे ॥ २ ॥
आसनी बसता विप्र पूजी ती अदिती तयां ।
कश्यपो पाहिली पत्‍नी म्लानता चेहर्‍यावरी ॥ ३ ॥
कल्याणी ! सुखि ना ? विप्र धर्म तो सुखरूप ना ?
काळाच्या मुख्यिच्या लोका न ना कांही अमंगल ॥ ४ ॥
गृहस्थाश्रम हा थोर योगाचे फळ लाभते ।
पुरुषार्थात त्यांच्या त्या न ना विघ्न मुळी जिवां ॥ ५ ॥
व्यग्र कां तू कुटुंबात विन्मूख अतिथीस त्या ।
सत्कार नच का शक्य म्हणोनी दीन तू अशी ॥ ६ ॥
ज्या घरी आतिथी येता सत्कार नच त्या जले ।
गृध्राचे घरटे जाणा पाणी द्यावे अवश्यची ॥ ७ ॥
प्रिये ! शक्य असेही ही की मी जाता कष्टि जाहली ।
वेळेला हवने ना का जाहली तुज हातुनी ॥ ८ ॥
द्विजाग्नी हरिचे तोंड गृहस्थपुरुषो पहा ।
करिती तृप्त दोघांना कामना सिद्ध पावती ॥ ९ ॥
प्रिये ! प्रसन्न तू नित्य लक्षणे परि आज ते ।
अस्वस्थ दिससी चित्ती मुले ते सुखरुप ना ? ॥ १० ॥
अदिती म्हणाली -
ब्रह्मणा ! द्विज गो धर्म दासी मी सुखरूप की ।
धर्मार्थ काम साधाया स्वामी हा गृह‌आश्रमो ॥ ११ ॥
प्रभो नित्य तुम्हा ध्याता कल्याण इच्छुनी मनीं ।
अतिथी भिक्षु नी अग्नी याचका ना दुखाविले ॥ १२ ॥
भगवन्‌ ! आपुल्या ऐसे बोधितात प्रजापती ।
मग त्या कामना कैशा पुर्‍यां हो न कधी बरे ? ॥ १३ ॥
(इंद्रवज्रा)
समस्त आहे तवची प्रजा ही
    गुणी कुणी ती अन मानसी ही ।
देवासुरो हा नच भेद तुम्हा
    तो लाडितोही हरि भक्त त्यांना ॥ १४ ॥
(अनुष्टुप्‌)
आपुली दासि मी स्वामी विचारे हित साधणे ।
शत्रूने स्थान संपत्ती हरिली रक्षिता तिला ॥ १५ ॥
दैत्य ऐश्वर्य संपत्ती पद येश हिराविले ।
काढिलेही घरातून दुःखसागरि मी बुडे ॥ १६ ॥
हितैषी स्वामि तो तुम्ही हित कोण दुजा करी ।
संकल्पे करणे भद्र पुत्रां वैभव देईजे ॥ १७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
अदिती प्रार्थिता ऐसे कश्यपो बोलले तिला ।
आश्चर्य प्रबला माया स्नेहाने विश्व बांधिले ॥ १८ ॥
कुठे देह कुठे आत्मा कोणाचा पति कोणि ना ।
न पुत्र नच संबंधी मोह हा नाचवी असे ॥ १९ ॥
प्रिये संपूर्ण प्राण्यात विराजे भक्तवत्सल ।
भक्तांचे दुःख तो नष्टी तया तू पूजि भक्तिने ॥ २० ॥
दीनांचा वत्सलो तोची करी हेतूहि पूर्ण तो ।
निश्चये व्यर्थ ना भक्ती उपाय नच अन्य तो ॥ २१ ॥
अदितीने विचारिले -
भगवन्‌ ! पूजु मी कैशी भगवान्‌ जगदीश्वरा ।
करील पूर्ण जै हेतू सत्यसंकल्प तो प्रभू ॥ २२ ॥
पुत्रांच्या सह मी थोर भोगिते दुःख हे असे ।
प्रसन्न शीघ्र तो होय श्रीविष्णुविधि सांगणे ॥ २३ ॥
कश्यपजी म्हणाले -
देवी संतान इच्छोनी ब्रह्म्यासी हे विचारिता ।
तेणे प्रसन्न होवोनी बोलले व्रत बोलतो ॥ २४ ॥
फाल्गून शुक्ल पक्षात दूध पीवूनि राहणे ।
बारादिनी पुजावा तो भगवान्‌ कमलाक्ष की ॥ २५ ॥
सूकरे खोदिली माती शरीरा उटि लावुनी ।
नदीत करणे स्नान आमावस्याचिये दिनी ॥
स्नानाच्या वेळि हा मंत्र मुखाने म्हणणे असे ॥ २६ ॥
हे देवी जीवस्थानार्थ वराहे तुज तारिले ।
प्रणाम तुजला घे हा नष्टि तू मम पाप गे ॥ २७ ॥
नित्य नैमित्तिकी पूजा करावी तदनंतर ।
एकाग्रे मूर्ति वेदी नी सूर्यो जल गुरु पुजी ॥ २८ ॥
(आणि या प्रकारे स्तुति करावी)
नमस्ते श्री भगवते पुरुषास महीयसे ।
सर्वभूत निवासास वासुदेवास साक्षिला ॥ २९ ॥
नमो अव्यक्त सूक्ष्मा तू प्रधान पुरुषो तुची ।
चोवीस गुण संख्येचा सांख्यायन प्रवर्तकु ॥ ३० ॥
द्वीशीर्षा त्रिपदा चार श्रृंगा तुज नमो नमः ।
सप्त हस्तास यज्ञास त्रयिविद्या नमो नमः ॥ ३१ ॥
नमो शिवास रुद्रास नमो शक्तिधरा तुला ।
सर्वविद्याधिपतिला भूतस्वामी तुला नमो ॥ ३२ ॥
नमो हिरण्यगर्भास प्राणास जगदात्मया ।
योगेश्वर्यशरीरास नमस्ते योग हेतु तू ॥ ३३ ॥
नमस्ते आदिदेवाला साक्षिभूता नमो नमो ।
नारायणास ऋषये नरास हरिसी नमो ॥ ३४ ॥
नमस्ते सावळ्यारुपा संपत्तीरुप देवता ।
पीतवस्त्रा हरी लक्ष्मी सेविते तुज केशवा ॥ ३५ ॥
तू सर्ववरदो ऐसा जीवांना एकटा तुची ।
विवेकी संत ते सारे तुझ्या पायास पूजिती ॥ ३६ ॥
पायाचा गंध तो घेण्या देवता लक्षुमी जयां ।
राहती नित्य सेवेत पावो तो भगवान्‌ मला ॥ ३७ ॥
आवाहुनी प्रिये ऐसे पाद्य आचमने असे ।
श्रद्धेने मन लावोनी पूजावा ह्रषिकेश तो ॥ ३८ ॥
गंध मालादि पूजेने दुधाचे स्नान घालणे ।
वस्त्र यज्ञोपवीतो नी भूषणे पाद्य गंध नी ॥
आचम्य आदिने मंत्रे हविणे द्वादशाक्षरें ॥ ३९ ॥
सामर्थ्य असता क्षीर पायसो गूळ तूप ते ।
नैवेद्य ठेविणे तैसा त्या मंत्रे हवने करी ॥ ४० ॥
नैवेद्य वाटणे भक्तां अथवा भक्षिणे स्वयें ।
तांबूल अर्पिणे तेंव्हा पूजा आचम्य सारिता ॥ ४१ ॥
एकशे आठ वेळेला जापी मंत्र पुन्हाहि तो ।
स्तुतीने स्तविणे ईशा दंडवत्‌ नमिणे तया ॥ ४२ ॥
निर्माल्य शिरि घेवोनी देवता वाटि लाविणे ।
किमान दोन ते विप्र खिरीने जेववी पुन्हा ॥ ४३ ॥
सन्माने दक्षिणा अर्पी आज्ञेने इष्ट मित्र ते ।
सवे घेवोनि जेवावे ब्रह्मचर्यचि त्या दिनी ॥ ४४ ॥
सकाळी उठुनी व्हावे स्नानानेच पवित्र की ।
पूर्वोक्त व्रत हे ऐसे करावे दिन द्वादश ॥ ४५ ॥
पयोव्रती असोनीया भक्तीने हरि पूजिणे ।
हविणे रोज पूर्वोक्त द्विजभोजन ही तसे ॥ ४६ ॥
बारादिन पुढे व्हावे पयोव्रत करोनिया ।
हरी तो पूजिणे होम द्विजांची भोजने तशी ॥ ४७ ॥
फाल्गून शुद्ध एकास धरोनी ती त्रयोदयी ।
रहावे ब्रह्मचर्यात पृथिवीवरि झोपणे ॥
त्रिकाल करणे स्नान व्रत हे करणे असे ॥ ४८ ॥
खोटे पापी न बोलावे पाप्यासी नच बोलणे ।
भोग ते सर्वची त्यागी प्राण्यांना त्रास तो नको ।
सदैव भगवंताच्या ध्यानात मन लाविणे ॥ ४९ ॥
त्रयोदशीदिनी व्हावा शास्त्रवत्‌ अभिषेक तो ।
पंच‌अमृत स्नानाने विष्णुला मंत्रपूर्वक ॥ ५० ॥
धन संकोच त्यागोनी त्या दिनी खीर ती करा ।
तांदूळ दूध घालोनी करावे विष्णुअर्पण ॥ ५१ ॥
एकाग्रचित्ति ती सिद्धी तसेचि भगवान्‌ भजा ।
नैवेद्य त्यास स्वादिष्ट प्रसन्नार्थचि अर्पिणे ॥ ५२ ॥
ज्ञान संपन्न आचार्या ब्राह्मणा वस्त्र अर्पिणे ।
गायी आभूषणे द्यावी ही खरी भगवत्‌पुजा ॥ ५३ ॥
शुद्ध सात्विक नी युक्त भोजने त्याजलाहि दे ।
दुसर्‍या अतिथी विप्रा जेववी शक्ति ज्या परी ॥ ५४ ॥
द्विजासी दक्षिणा द्यावी चांडाळ दीन अंध ते ।
येता अन्नेचि तृप्तावे यथाशक्ति तसे करी ॥ ५५ ॥
सत्कारीं सगळ्यांच्या त्या भगवान्‌ तोष मानतो ।
भावुकीच्या सवे तेंव्हा भोजना स्वय बैसणे ॥ ५६ ॥
तेरादिनी तदा व्हावे नृत्य गायन वादनो ।
स्तुती नी स्वस्तिवाक्य नी पूजने कीर्तने तशी ॥ ५७ ॥
प्रिये ! ही भगवंताची श्रेष्ठ आराधना असे ।
पयोव्रत असे ब्रह्म्ये वदले बोलिलो तुला ॥ ५८ ॥
देवी भाग्यवती हो तू इंद्रिया वश तू करी ।
शुद्ध भाव करोनीया अनुष्ठान करी असे ॥
भगवान्‌ अविनाशी तो आराधावा यये परी ॥ ५९ ॥
भद्रे व्रते हरी तुष्टे नाम या सर्व यज्ञ ही ।
सर्वव्रत असे सार दान नी तप याचिये ॥ ६० ॥
पावतो भगवान्‌ येणे नियमो यम हे खरे ।
तपस्या धन नी यज्ञ व्रत हे वास्तवी असे ॥ ६१ ॥
म्हणोनी संयमो भावे देवी हे व्रत आचरी ।
पावेल शीघ्र तो ईश पूर्ण होतील कामना ॥ ६२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥ ८ ॥ १६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP