समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १५ वा

राजाबळीचा स्वर्गावर विजय -

राजा परीक्षिताने विचारिले -
(अनुष्टुप्‌)
श्रीहरी स्वामि विश्वाचा दीनाच्या परि भिक्षु तो ।
होवोनी भूमि कां मागे इच्छीत मिळले जरी ॥
तरीही बळिसी बद्ध करितो काय कारणे ? ॥ १ ॥
यज्ञेश्वर हरी पूर्ण याचको आणि तो तसा ।
निरापराधिसी बांधी आश्चर्य घडले कसे ॥ २ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
इंद्रे पराजीत बळी करोनी
    मारीयला नी धन घेतले तै ।
शुक्रे तयासी जिवदान केले
    सर्वस्व तेंव्हा बळि अर्पि त्याला ॥ ३ ॥
सेवेत आला भृगुवंशि यांच्या
    प्रसन्न झाले द्विज ही तयाला ।
केला बळीला अभिषेक आणि
    विश्वाजितो हा मग यज्ञ केला ॥ ४ ॥
तो अग्नि झाला हविता प्रसन्न
    मोठ्याचि वस्त्रीं रथ एक आला ।
नी अश्व त्याला हिरवे असे नी
    सचिन्ह सिंहध्वज ही निघाला ॥ ५ ॥
सुवर्णपत्रांकित ते धनू नी
    अक्षेय भाता कवचो निघाले ।
पितामहाने नवपुष्पामाला
    नी शंख शुक्रे दिधला तयाला ॥ ६ ॥
साहित्य लाभोनि द्विजकृपेने
    तैसेचि स्वस्त्यायनमंत्र झाले ।
विप्रासि वंदी बळि तो प्रतापी
    वदोनि कांही प्रपित्या नमी तो ॥ ७ ॥
(अनुष्टुप्‌)
आरुढला रथी दिव्य भृगुवंशे दिल्या अशा ।
घेतले सर्वही शस्त्र कवचो यशमाळही ॥ ८ ॥
सुवर्णबाजुबंदो नी मकराकार कुंडले ।
रथात शोभला जैसा अग्निकुंडात दीप तो ॥ ९ ॥
तया समान ते वीर निघाले दैत्यही सवे ।
वाटे पीतील आकाश दिशा आताच जाळिती ॥ १० ॥
प्रचंड सैन्य घेवोनी संचालनचि चालले ।
आकाश अंतरिक्षाते कापोनी निघती पुढे ॥
ऐश्वर्यपूर्ण ती इंद्र मरावति गाठिली ॥ ११ ॥
देवांची राजधानी ती मोठे उद्यान छान ते ।
गाती पक्षांचिया जोड्या गुंजती भृंगमत्त ते ॥ १२ ॥
लाल ती नवती पानीं फळांनी वृक्ष डौरले ।
हंस सारस नी चक्‌वे अंगना जलि क्रीडती ॥ १३ ॥
त्या ज्योतिर्मय गंगेने वेढिली अमरावती ।
सोन्याचा कोट बाहेरी बुरुजे ठायि ठायिही ॥ १४ ॥
कवाडे सोनियाचे नी गोपुरे स्फटिकाचिही ।
मोठाले मार्ग त्यातूनी विश्वकर्मेचि निर्मिले ॥ १५ ॥
क्रीडांगणे सभास्थान रथांचे मार्ग दिव्य ते ।
दहाकोटी विमाने तै सदैव सज्ज राहती ॥
हिरे नी पोवळे यांचे ओटेही शोभले तिथे ॥ १६ ॥
स्थिर सौंदर्य तारुण्य सोळा वर्षीय त्या स्त्रिया ।
विमला वस्त्र रूपाने ज्वाळा दैदीप्य त्या जशा ॥ १७ ॥
वेणीच्या मधुनी त्यांच्या गळती पुष्प सुंदर ।
तयांच्या वरुनी वारा वाहता गंध दाटतो ॥ १८ ॥
सोनेरी खिडक्यातून उदाचा शूभ्र धूर ये ।
अंगना जात ज्या मार्गे भरे धूम्र सदैव तो ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
ते चांदवे मौक्तिकि ताणलेले
    झेंडे सुवर्णी मणि लावलेले ।
नी मोर भुंगे क्रिडती सदाचे
    देवांग मंगलगीत गाती ॥ २० ॥
मृदंग शंखोऽनक दुदुंभी नी
    वीणा नुपूरे तशि वाजतात ।
वाद्यांवरी गाति गंधर्व तैसे
    त्या अप्सरा नाचति त्याच नादे ।
वाटे सुरम्यो अमरावती ती
    प्रभा जगाची जितिली तियेने ॥ २१ ॥
(अनुष्टुप्‌)
अधर्मी दुष्ट नी द्रोही ठक गर्वी नि कामि ते ।
लोभी ऐसे तिथे ना ते प्रवेश शकती करु ॥ २२ ॥
(इंद्रवज्रा)
ती देवधानी बळि सैन्य घेरी
    भितीत न्हाल्या तयि इंद्रपत्‍न्या ।
शुक्रे दिलेला बळि शंख फुंकी
    तो नाद गेला सकलास कानीं ॥ २३ ॥
(अनुष्टुप्‌)
इंद्राने पाहिली सर्व बळीची सिद्धता अशी ।
गुरुबृहस्पतीपाशी जावोनी बोलला असे ॥ २४ ॥
भगवन्‌ ! पूर्वशत्रूने तयारी पूर्ण योजिली ।
पातला बळि तो येथ न होय सामना तया ॥
कोठुनी एवढी शक्ती मिळाली कोण जाणितो ॥ २५ ॥
आता त्या बळिसी कोणी न रोधू शकते पहा ।
मुखाने पीयि तो विश्व जिव्हे चाटीलही दिशा ॥
जाळील वाटते आता नेत्रज्वाळेचि या दिशा ॥ २६ ॥
कशाने वाढला शत्रू कृपया सांगणे मला ।
शरीर बळ नी तेज तयाला मिळले कसे ? ॥ २७ ॥
देवगुरुबृहस्पती म्हणाले -
इंद्र मी जाणितो शत्रू उन्मत्त जाहला कसा ।
भृगुवंशी यये तेज शक्ती सर्वचि त्या दिल्या ॥ २८ ॥
काळापुढे जसा जीव तसा त्याच्या पुढे कुणी ।
न वाचू शकतो आता श्रीहरी वाचुनी दुजा ॥ २९ ॥
म्हणोनी स्वर्ग सोडोनी अन्यत्र लपजा पळा ।
शत्रूचे भाग्यचक्राते फिरण्या काळ तो पहा ॥ ३० ॥
ब्रह्मतेजे बळी हा तो वाढतो सारखा असा ।
जेंव्हा द्विजासि हा द्वेषी तेंव्हा होईल नष्ट तो ॥ ३१ ॥
स्वार्थ नी परमार्था ते जाणती ते बृहस्पती ।
इष्ट ते रूप घेवोनी गेले तो स्वर्ग सोडुनी ॥ ३२ ॥
देवता लपल्या तेंव्हा विरोचनसुतो बळी ।
स्वर्गाचा नृप तो झाला जिंकिले तिन्हि लोकही ॥ ३३ ॥
विजयी बळि तो होता भृगुवंशीय त्या द्विजे ।
शताश्वमेध ते केले बळीच्या करवी तदा ॥ ३४ ॥
यज्ञप्रभाव वाढोनी कीर्ति सर्वत्र जाहली ।
चंद्रमा परि तो राजा बळीही शोभला जगी ॥ ३५ ॥
द्विज देवकृपेने तो समृद्धी राजलक्षुमी ।
उदार भोगिता झाला कृतकृत्यस्व मानि तो ॥ ३६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥ ८ ॥ १५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP