समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १४ वा

मनु आदीच्या कार्याचे पृथक्‌ पृथक्‌ वर्णन -

राजा परीक्षिताने विचारिले -
(अनुष्टुप्‌)
मन्वंतरात भगवान्‌ मनू सप्तर्षि आदि ते ।
कोणते साधिती कार्य कृपया सांगणे मला ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
मनुपुत्र मनू आणि सप्तर्षी आदि देवता ।
इंद्रादी सगळ्यांना तो नियुक्त करितो हरि ॥ २ ॥
यज्ञादीपुरुषो यांच्या शरिरा वर्णिले असे ।
मनू तो प्रेरणेने त्यां विश्वसंचालना करी ॥ ३ ॥
अंती चतुर्युगाच्या ते उलट्या समयास त्या ।
नष्टती श्रुति त्या सर्व सप्तर्षी तप योजुनी ॥
साक्षात्‌कार तयां होतो श्रुति धर्मास रक्षिते ॥ ४ ॥
चारीही समया मध्ये मनू सावध राहुनी ।
भगवत्‌ प्रेरणेने तै धर्मानुष्ठान जागवी ॥ ५ ॥
पृथ्विचे करुनी भाग व्यवस्थे राज्य पाहती ।
पंचयज्ञ अशा कर्मे यज्ञाने भाग देतिही ॥ ६ ॥
संपत्ती अतुलो भोगी रक्षितो इंद्र तो प्रजा ।
यथेष्ट पावसाचाही तयास अधिकार तो ॥ ७ ॥
सनकादिक सिद्धांच्या रूपाने ज्ञान दे हरी ।
याज्ञवल्क्यादि ऋषिच्या रूपाने कर्म बोधितो ॥
दत्तात्रयादि योग्यांच्या रुपाने योग सांगतो ।
युगी युग अशा रूपे भगवान्‌ नित्य बोधितो ॥ ८ ॥
मरिच्यादि प्रजापतीरूपानें सृष्टि निर्मितो ।
सम्राट हो‌उनी रक्षी कालरूपेचि मारितो ॥ ९ ॥
नाम रुपादि मायेने प्राण्यांची बुद्धि ती भ्रमे ।
दार्शनीक गुणा गाती परी ते जाणती न त्यां ॥ १० ॥
असे कल्प विकल्पाचे प्रमाण वदलो नृपा ।
असे मन्वंतरे चौदा कल्पी ज्ञातेच सांगती ॥ ११ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चवदावा अध्याय हा ॥ ८ ॥ १४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP