समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १३ वा
आगामी सात मन्वंतराचे वर्णन -
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! विवस्वान्चा श्राद्धदेवचि पुत्र तो ।
वैवस्वत् सातवा आहे मनू सध्या विराजमान् ॥ १ ॥
संतान सांगतो त्याचे ऐकणे लक्षपूर्वक ।
वैवस्वता दहा पुत्र इक्ष्वाकू नभगो तसे ॥ २ ॥
धृष्ट-शर्याति करुषो नाभागो नरिष्यन्त नी ।
पृषध्र दिष्ट वसुमान् दहा नावे अशी तयां ॥ ३ ॥
आदित्य नि वसू रुद्रो विश्वेदेव मरुद्गणो ।
आश्विनीकुमरो ऋभू प्रमूख देवता अशा ॥
ययांचा इंद्र तो आहे पुरंदरचि नाम त्या ॥ ४ ॥
वसिष्ठ कश्यपो अत्री विश्वामित्र नि गौतमो ।
भरद्वाज जमदाग्नी नामे सप्तर्षि शोभती ॥ ५ ॥
याही मन्वंतरामध्ये अदिती पोटि कश्यपी ।
वीर्यात अंशरुपाने भगवान् जन्मले हरी ॥
आदित्त्या धाकटा बंधू वामनो नाम त्याजला ॥ ६ ॥
संक्षेपे मी असे राजा बोललो सातही मनू ।
भगवत्शक्तिने सात होतील मनवंतरे ॥
भविष्यातील ते सात वर्णितो सर्व ते असे ॥ ७ ॥
संक्षेपे वदलो मी तो संज्ञा छाया अशा द्वय ।
विवस्वान्पत्नि त्या दोघी कोणी वदति तीन त्या ॥ ८ ॥
परी ते मजला वाटे तिसरी वडवा नसे ।
संज्ञेचे नाम वडवा असावे रवि पासुनी ॥
श्राद्धदेव यम यामी तिला संतान जाहले ।
शनी सावर्णि तपती छायासंतान हे तिन्ही ॥ ९ ॥
संवरणास पत्नी ती जाहली तपती पुढे ।
संज्ञा ती वडवा रूपे सूर्यासी भाळली असे ॥
अश्विनीकुमरो दोघे पुत्र हे जाहले तिला ॥ १० ॥
होईल मनु सावर्णी आठव्या मनवंतरी ।
विरजस्क नि निर्मोक इत्यादी पुत्र त्याजला ॥ ११ ॥
परीक्षिता तये वेळी सुतपा विरजा तसे ।
अमृत प्रभ नावाचे होतील देवता गण ॥
बळी विरोचनोपुत्र इंद्र होईल तेधवा ॥ १२ ॥
विष्णूने वामनो होता त्रिपाद भूमि मागता ।
त्रिलोक वामना सर्व बळीने दिधला तदा ॥
वामने बळि तो केला बद्ध त्या सुतला मधे ।
परी स्वर्गाहुनी श्रेष्ठ सुतलो लोक तो असे ॥ १३ ॥
विराजे बळि तो तेथे इंद्राहुनि विशेष की ।
पुढे तो इंद्र होवोनी तेही त्यागील की पद ॥
सिद्धी परम तो घेई भोग ते तुच्छ मानुनी ॥ १४ ॥
दीप्तिमान् गालवो आणि अश्वत्थामा तसेच ते ।
कृपा परशुरामो नी ऋष्यशृंग नि व्यासजी ॥ १५ ॥
सप्तर्षी आठव्या होती मन्वंतरि तदा असे ।
आश्रमीं स्थित ते सर्व योगाचे बळ योजुनी ॥ १६ ॥
देव गुह्यास ती पत्नी विष्णुगर्भ सरस्वती ।
सार्वभौम अशा नामे तदा जन्मास येउनी ॥
इंद्र पुरंदरो याचा स्वर्ग तो बळिशीच दे ॥ १७ ॥
नववा दशसावर्णी मनू वरुणपुत्र तो ।
होतील पुत्र ते त्याला भूतकेतू नि दीप्त हे ॥ १८ ॥
पार नी मरिची गर्भ आदी ते देवता गण ।
अद्भूत नावचा इंद्र द्युतिमानादि ते ऋषी ॥ १९ ॥
अंबुधारा आयुष्मान्ची हिच्या गर्भात तो हरि ।
ऋषभो अवतारेल कलावतार तो असे ॥
अद्भूत नावच्या इंद्रा देईल सर्व भोग हा ॥ २० ॥
ब्रह्म सावर्णि तो पुत्र उपश्लोकासि होइल ।
दहावा मनु तो होय संपन्न सद्गुणी असा ॥ २१ ॥
भूरिषेणादि त्या पुत्र हविष्मान् सत्य सुकृती ।
जय मूर्त्यादि सप्तर्षी विरुद्ध नि सुवासनो ॥
इत्यादी देवता होती शंभू नामक इंद्र तो ॥ २२ ॥
विश्वसृजपत्नि विषुची हिच्या गर्भात तो हरी ।
विष्वक्सेन अशा नामे अंशावतार घेइल ॥
शंभूइंद्राशि तो मैत्री साधेल हितकारणी ॥ २३ ॥
पुढती धर्मसावर्णी संयमी मनु होइल ।
दहा ते सत्यधर्मादी पुत्र होतील त्यास की ॥ २४ ॥
विहंगमो कामगमो निर्वाणरुचि आदि ते ।
देवतागण होती तै सप्तर्षी अरुणादिको ॥
वैधृत नावचा इंद्र होईल पुढती असा ॥ २५ ॥
वैधृता आर्यका पत्नी गर्भात धर्म सेतु हा ।
जन्मता अंशरूपाने हरि रक्षील विश्व हे ॥ २६ ॥
बारावा रुद्रसावर्णी मनू होईल पुत्र त्यां ।
देववान् उपदेवो नी देव श्रेष्ठादि ते असे ॥ २७ ॥
ऋतधामा तदा इंद्र हरितादीहि देवता ।
आग्नीध्रक तपोमूर्ती तपस्वादि असे ऋषी ॥ २८ ॥
सत्यसहास पत्नी जी सूनृता गर्भि तो हरी ।
स्वधाम नाम घेवोनी रक्षील मनवंतरा ॥ २९ ॥
देवसावर्णि तेरावा जितेंद्रिय पुढे मनू ।
चित्र सेन विचित्रादी पुत्र होतील त्याजला ॥ ३० ॥
सुत्रामो नी सुकर्मादी देवतागण तेधवा ।
दिवस्पति तदा इंद्र सप्तर्षी तत्व दर्श ते ॥ ३१ ॥
देवहोत्रासिजी पत्नी बृहती गर्भि तो हरी ।
योगेश्वर अशा नामे इंद्रासी साह्य तो करी ॥ ३२ ॥
चौदावा मनु तो होय इंद्र सावर्णि नावचा ।
उरु बुध्यादि ते पुत्र होतील त्याजला तसे ॥ ३३ ॥
पवित्रो चाक्षुषो देव शुचि हा इंद्र तेधवा ।
अग्नि बाहू शुची शुद्ध मागधो सात ते ऋषी ॥ ३४ ॥
सत्रायणास पत्नी जी विताना गर्भि तो हरी ।
बृहद्भानू अशा नामे घेईल अवतार तो ।
विस्तार कर्मकांडाचा करील हरि तेधवा ॥ ३५ ॥
मन्वंतर असे चौदा घडती तिन्हि काळिही ।
चतुर्युग सहस्त्रे ती कल्पाची मानिली अशी ॥ ३६ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ ८ ॥ १३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|