समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १२ वा

मोहिनीरुपाला पाहून महादेव मोहित होतात -

श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
मोहिनी रुप घेवोनी हरिने दैत्य मोहिले ।
अमृतो पाजिले देवां शंकरे ऐकिले तदा ॥ १ ॥
सतीच्या सह ते नंदीवरती बैसले तसे ।
घेतले गण ते सर्व पातले क्षीरसागरी ॥ २ ॥
हरिने प्रेमभावाने पूजिले गौरि-शंकरा ।
सन्माने शिव बैसोनी हासोनी बोलले तदा ॥ ३ ॥
महादेवजी म्हणाले -
देवदेवा जगद्‌व्यापा जगदीशा जगन्‌मया ।
सर्वेशा आत्मरुपा तू मूळ कारण तूचि की ॥ ४ ॥
आदी मध्ये नि अंती तू तुला आदी न अंत ही ।
सत्य चिन्मय तू ब्रह्म भेद तो तुजला नसे ॥ ५ ॥
आसक्ती त्यागुनी सर्व इह नी परलोकिची ।
महात्मे चरणा ध्याती कल्याणहेतु साधिण्या ॥ ६ ॥
(वसंततिलका)
तू ब्रह्मपूर्णचि सुधा विगुणी विशोक
    आनंदरूप नच ते तुजवीण कांही ।
नाही तुलाचि मुळि स्पर्श गुणातितो तू
    हेतू जगासि अससी फलस्वामि तूची ।
ही गोष्ट जड जिवां समजावयाला
    ना ती मुळीच तुजला कसली अपेक्षा ॥ ७ ॥
अद्वैत द्वैतरुप तू तुचि एकमात्र
    आभूषणे नि कनको नच भिन्न जैसे ।
ना जाणिताच तुजला करितात भेद
    नाही उपाधि तुजला गुणरूप तूची ॥ ८ ॥
ते ब्रह्म कोणि वदती अन कोणि धर्म
    कोणी पुरूष म्हणती प्रकृती कुणी ते ।
योगादि शक्ति वदती कुणि ते तुला रे
    ते पूर्वजोचि वदती अविनाश तू तो ॥ ९ ॥
ब्रह्मा नि मीनि मरिची इतरे मुनींना
    सृष्टी तुझी न कळते मग काय रूप ।
मायेत जे वशि असे असुरो नि अन्य
    रुपा तुझ्या मग कसे समजोनि घेती ॥ १० ॥
तू सर्व व्यापि अन ज्ञानस्वरूप तूची
    वायू परीच वससी सगळ्यात तू तो ।
जन्मस्थिती नि लय कर्म नि बंध मोक्ष
    सर्वास तू समजसी प्रभु एकटा तू ॥ ११ ॥
(अनुष्टुप्‌)
प्रभो तू गुण घेवोनी लीला तैशा करावया ।
अनेक रूप तू घेशी मी त्या रूपासि वंदितो ॥
आता ते मोहिनी रूप देवा मी पाहु इच्छितो ॥ १२ ॥
जेणे तू मोहिले दैत्या देवांना अमृतो दिले ।
आम्ही सर्व तशा रूपा पाहण्या पातलो इथे ॥
औत्सुक्य मनि ते थोर मोहिनी रूप पाहण्या ॥ १३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
शंकरे भगवंताला करिता प्रार्थना अशी ।
गंभीर हरि होवोनी हासोनी बोलले हरा ॥ १४ ॥
श्री विष्णुभगवान्‌ म्हणाले -
अमृत कलशो दैत्या हाताला लागला तदा ।
कराया देवताकार्य मी ते स्त्रीरूप घेतले ॥ १५ ॥
इच्छिता पाहणे रूपा अवश्य दाखवीन मी ।
परी ते कामपुरुषा आवडे कामचेतिण्या ॥ १६ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
भगवंत असे शब्द बोलोनी गुप्त जाहले ।
सतीच्या सह ते सांब चौफेर पाहु लागले ॥ १७ ॥
(इंद्रवज्रा)
उद्यान तेथे दिसले द्वयांना
    रंगीत पुष्पे नवतीहि वृक्षा ।
कोणी तरूणी त‌इ चेंडु झेली
    सुरेख वस्त्रो अन कर्धनी ही ॥ १८ ॥
झेलुन घेता त‌इ कंदुकाला
    तो हार तैसे स्तनही हलून ।
वाटे नितंबो लचकेल काय
    ती चालताना ठुमके तशीच ॥ १९ ॥
पडे जधी चेंडु हि सावरी तो
    बघे तदा चंचल पापण्यांनी ।
ती कुंडले नी कुरुळेहि केस
    मुखा नि गाला विभवीत तैसे ॥ २० ॥
वस्त्रो कधी ते ढळता तशीच
    वेणी सुटे तै तशि सावरी ती ।
ती सव्य हाता उचली जधी तै
    माये जगाते जणु मोहवी की ॥ २१ ॥
ती खेळता चेंडुहि पाहिले यां
    लाजोनि थोडे तिरक्याच नेत्रे ।
नी श्रीहराचा सुटलाच ताबा
    न भान त्यांना सति नी गणांचा ॥ २२ ॥
नी एकदा चेंडु सुटोनि जाता
    ती मोहिनी पाठिशि ही पळाली ।
आलाहि वायू अन वस्त्र तैसे
    तै कर्धनीच्या सहची उडाले ॥ २३ ॥
(अनुष्टुप्‌)
अंग प्रत्यंग रुचिरा मोहिनी ती मनोरमा ।
खिळता दृष्टि प्रत्यांगी रमे मन तिथेच की ॥
आकृष्ट हर ते झाले त्यांना ती भासली तशी ॥ २४ ॥
हिराविले विवेकाते हराच्या मोहिनी हिने ।
कामातुरचि होवोनी लज्जाही सोडिली हरे ॥
समक्ष सतिच्या गेले तिच्या मागे तदा शिवो ॥ २५ ॥
मोहिनी वस्त्रहीना ती लाजली शिव पाहता ।
एकेक वृक्ष सोडोनी लपता पळली पुढे ॥ २६ ॥
शिवाचा सुटता ताबा झाले कामवशो तसे ।
हत्तिणी पाठि जै हत्ती धावले शिवही तसे ॥ २७ ॥
वेगाने धावले मागे वेणी ती धरिली तिची ।
नसे इच्छातिची तैही धरिली हृदयास ती ॥ २८ ॥
हत्तीण धरि जै हत्ती शिव आलिंगि तै तिला ।
धड्‌पडे सुटण्यासी ती तदा केशीहि पांगले ॥ २९ ॥
सुंदरी भगवंताने मायेने निर्मिली असे ।
सुटली मिठि सोडोनी पळाली गतिने पुढे ॥ ३० ॥
मोहिनी वेशधारी त्या विष्णुच्या पाठिशी हरो ।
धावता वाटले ऐसे विजयी कामदेव तो ॥ ३१ ॥
कामूक हत्तिणी मागे धावे हत्ती मदे जसा ।
धावला शिव तो तैसा अमोघ वीर्य ही तरी ॥
सांडले जाग जागीच मोहात मोहिनीचिया ॥ ३२ ॥
भगवान्‌ शंकराचे ते ज्या ज्या जागेसि वीर्य ते ।
सांडले तेथ तेथे त्या सुवर्णखाणि जाहल्या ॥ ३३ ॥
परीक्षिता ! नद्या बागा वन पर्वत आश्रमो ।
जिथे ऋषी निवासी तै मोहिनी-हर धावले ॥ ३४ ॥
वीर्यपात तसा होता शंकरा स्मृति जाहली ।
ठकलो भगवन्‌माये स्मरोनी दुःखि जाहले ॥ ३५ ॥
सर्वात्मा भगवन्माया आश्चर्य शंकरास ना ।
अमोघ हरिची शक्ती जाणिली पार ना तिला ॥ ३६ ॥
पाहिले भगवंताने हरा लज्जा न खेदही ।
पुरुषी देह धारोनी प्रसन्न बोलले हरी ॥ ३७ ॥
श्री भगवान्‌ म्हणाले -
महादेवा तुम्ही माझे माया स्त्री रूप पाहुनी ।
स्वयं निष्ठ असे झाले हर्षाची गोष्ट ही असे ॥ ३८ ॥
माझी ही बघता माया विषयी नच तो सुटे ।
मायेत फसता कोण स्वयं मुक्तहि जाहला ? ॥ ३९ ॥
सर्वांना मोहवी माया तुम्हासी परि ती नच ।
काळाचा स्वामि तो मीच माझ्या इच्छेत ते गुण ॥ ४० ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
भगवंते असे राजा शिवां सत्कारिले तदा ।
परीक्रमा करोनीया शिव कैलासि पातले ॥ ४१ ॥
भक्तशिरोमणी राजा प्रेमाने त्या शिवे तिथे ।
सती समक्ष ऋषिच्या सभेत सर्व वर्णिले ॥ ४२ ॥
महादेवजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
माया हरीची कशि गे सती ती
    विद्या कलेचा जरि स्वामि मी तो ।
झालो तया पाहुनि मी वशीत
    तो अन्य जीवा पुसणेचि नाही ॥ ४३ ॥
हजार वर्षे करिता तपाला
    विचारिले तू भजता कुणाला ।
साक्षात्‌ हरी तो श्रुति गाति त्यासी
    अनंत रुपो गुण त्या भजे मी ॥ ४४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
ऐश्वर्यपूर्ण या लीला हरिच्या रे परीक्षिता ।
वदलो तुजला पूर्ण कूर्मावतारि ही कथा ॥ ४५ ॥
(इंद्रवज्रा)
या कीर्तनाला नित ऐकिल्याने
    उद्योग ना तो कधि निष्फळो हो ।
पवित्र कीर्ती हरिच्या लिला या
    श्रमा नि कष्टा मिटवीति नित्य ॥ ४६ ॥
(मालिनी)
असद्‌ विषयभोगी त्याज ना श्रीहरी तो
    युत चित भजता तो पावतो भक्तप्रीया ।
म्हणवुनि धरि माया वेष नी देवतांना
    भजति पद तयांना पाजिले अमृताते ।
शरण चरणि जाता कामना पूर्ण होती
    चरणकमल त्याचे वंदितो मी प्रभूचे ॥ ४७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ ८ ॥ १२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP