समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ११ वा

देवासुरसंग्रामाची समाप्ती -

श्री शुकदेवजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
कृपे हरीच्या भय दूर झाले
    चैतन्य आले नव देवतांत ।
पुनश्च बाहूनिही दैत्य शत्रू
    नी पूर्ण शक्त्ये लढु लागलेही ॥ १ ॥
(अनुष्टुप्‌)
ऐश्वर्यशालि इंद्राने बळीसी लढता तदा ।
क्रोधाने घेतले वज्र हाहाक्कारचि जाहला ॥ २ ॥
बळी शस्त्रास्त्र योजोनी फिरता युद्धभूमिशी ।
सवज्र पातता इंद्र तेंव्हा तुच्छोनि बोलला ॥ ३ ॥
मूर्खा ! नेत्रास बांधोनी मुलांना जादुगार तो ।
फसवी, विजया तैसा इच्छिशी मनि काय तू ? ॥ ४ ॥
मायेने भोगिता स्वर्ग धाक त्या वरचा असे ।
उच्च मूर्खासि आधीच खाली ओढोनि काढितो ॥ ५ ॥
मूढा ! ही योजिसी माया आज मी धारदार या ।
सहस्त्रधार वज्राने तुझे शीरचि छेदितो ॥
भाई बंधू सवे जे जे करणे शक्य ते करी ॥ ६ ॥
बळी म्हणाला -
करिती कर्म जे शुद्ध कालाच्या प्रेरणे मुळे ।
यशापयश वा मृत्यू या पैकी मिळते तया ॥ ७ ॥
ज्ञानी काळास जाणोनी हर्ष शोका न मानिती ।
अशा या तत्वज्ञानाते अनभिज्ञ तुम्ही असा ॥ ८ ॥
कर्ता कारण ते तुम्ही मानिता, संत निंदिती ।
मर्मभेदी तुझे बोल न आम्हा स्पर्शिती मुळी ॥ ९ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
या परी बोलता बोल ऐकोनी इंद्र थांबता ।
बळीने शेकडो बाण तयाच्या वरि सोडिले ॥ १० ॥
सत्यवादी असे शत्रू बोलता मर्म भेदुनी ।
अंकूश लागता हत्ती तसा तो चिडला असे ॥ ११ ॥
वज्रप्रहार इंद्राने जोराने घातला असे ।
विमाना मधुनी तेंव्हा पृथ्विशी पडला बळी ॥ १२ ॥
सुहृद्‌मित्र बळीचा तो जंभ हा पातला तिथे ।
बळी तो पडला खाली इंद्रासी जंभ तो लढे ॥ १३ ॥
सिंहावरी बसोनीया वेगाने पातला तिथे ।
गदा ती मारिली तेणे इंद्राच्या त्या खुब्यावरी ॥
ऐरावतासही तेणे प्रहार मारिला असे ॥ १४ ॥
गदेचा लागता घाव पीडला गज तो बहू ।
गुडघे टेकिले आणि मूर्च्छीत जाहला पुन्हा ॥ १५ ॥
मातली सारथी तेंव्हा हजार अश्व जोडुनी ।
पातला रथ घेवोनी इंद्र तैं स्वार जाहला ॥ १६ ॥
जंभा न त्या प्रशंसोनी हासला आणि तो करी ।
त्रिशूळ घेउनी वेगे फेकिला मातली वरी ॥ १७ ॥
मातल्ये धैर्य जोडोनी असह्य घाव सोसला ।
क्रोधात इंद्र तो येता जंभाचे शिर कापिले ॥ १८ ॥
जंभाचा नमुची बंधू देवर्षि त्यास बोलले ।
ऐकता बंधुची वार्ता रणात तोहि पातला ॥ १९ ॥
मर्मभेदी अशा शब्दे इंद्राला बहु बोलला ।
शरांची वृष्टि ती केली इंद्रासी नमुच्ये तदा ॥ २० ॥
बळाने हस्तकौशल्ये हजार तिर सोडुनी ।
घायाळ हय ते केले सर्वच्या सर्व जे रथा ॥ २१ ॥
मातलीसी शत बाण रथाला शतही तसे ।
असे हे दोनशे बाण पाकाने वर्षिले तदा ॥ २२ ॥
गर्जला नमुचि जैसे पाण्याचे ढग गर्जती ।
पंधरा सोडिले बाण तेणे इंद्रावरी तसे ॥ २३ ॥
झाकतो पावसाळ्यात ढगांनी सूर्य जै नभीं ।
तसेच इंद्र नी त्याचा सारथी शरि झाकिला ॥ २४ ॥
(इंद्रवज्रा)
दिसे न इंद्रो तयि देवतांना
    अतिव झाले विव्हलो मनात ।
ते हारले युद्धिनि ना तयांचा
    सेनापती तो पुढती कुठेही ।
जहाज जैसे सुटता समुद्रीं
    व्यापारि होती बहु दुःखि चित्ती ॥ २५ ॥
परंतु जाता क्षण कांहि तेंव्हा
    ध्वजाश्व तैसे रथ सारथ्याच्या ।
सवेचि आला वर इंद्र जैसा
    तो पिंजरा शत्रुतिरा मधोनी ॥ २६ ॥
(अनुष्टुप्‌)
इंद्राने पाहिले की त्या शत्रूने दळ चेंदिले ।
क्रोधाने वज्र घेवोनी शत्रूच्यावरि धावला ॥ २७ ॥
अष्टधारा अशा वज्रे सर्वांना धाक देउनी ।
पाक बल ययांचे तो इंद्राने शीर कापिले ॥ २८ ॥
बंधुमृत्यु बघोनीया मनुची दुःखि जाहला ।
क्रोधाने जीव तोडोनी इंद्राच्या वधि पातला ॥ २९ ॥
न वाचसी पहा इंद्रा वदता त्रिशुळास तो ।
इंद्राशी फेकिता झाला नादले भूषणे तदा ॥ ३० ॥
(गति)
नि पाहि इंद्र त्रिशूळ ये वधावयाला
    करात वज्र धरुनी इंद्र त्याजचे ।
करोनि खंड त्रिशूळ तो वधावया
    नमूचिच्याहि वरि वज्र घातले ॥ ३१ ॥
न वज्रे कातडि मुळिच कापली
    समस्तचि नविनचि हे बघोत की ।
वृत्रासुरा सहजवधी नमूचिते
    न ते शिवी मुळिचहि हे घडे कसे ॥ ३२ ॥
(अनुष्टुप्‌)
वज्र ना स्पर्शिते त्याला बघोनी इंद्रही भिला ।
आश्चर्य जगता होय दैवयोग असा कसा ॥ ३३ ॥
पूर्वयूगी गिरी पंखे उडती फिरती सदा ।
याचि वज्रे तयांची मी पंख ते कापिली पहा ॥ ३४ ॥
त्वष्टाच्या त्या तपानेच तो वृत्रासुर जन्मला ।
वज्रे या मारिला तोही असे श्रेष्ठचि शस्त्र हे ॥ ३५ ॥
न मारी तुच्छ दैत्याला ब्रह्मतेज जरी यया ।
आता मी नच स्पर्शी या निकामी जाहले असे ॥ ३६ ॥
विषादे वदता इंद्र आकाशवाणि जाहली ।
ओल्या नी वाळल्या शस्त्रे न हा दैत्य मरे कधी ॥ ३७ ॥
दिधला वर मी तैसा म्हणोनी नच हा मरे ।
इंद्रा तू मारण्या यासी उपाय अन्य शोधणे ॥ ३८ ॥
ऐकता वाणि ही ऐशी विचार करु लागला ।
न ओला शुष्क ना ऐसा समुद्रफेस तो असे ॥ ३९ ॥
समुद्रफेस फेकोनी इंद्राने नमुची शिरां ।
कापिता ऋषि देवांनी स्तुती-सुमन वाहिले ॥ ४० ॥
गायले मुख्य गंधर्व विश्वावसु परावसू ।
दुंदुभी वाजल्या आणि मोदे नर्तकि नाचल्या ॥ ४१ ॥
वरुण अग्नि नी वायू भिडू गाठोनि युक्तिने ।
वधिले सिंह तो जैसा हरिणा मारितो तसे ॥ ४२ ॥
परीक्षिता ! तये वेळी ब्रह्म्याने पाहिले असे ।
दैत्य ते संपती सर्व नारदा बोलले तसे ॥
तयांचा टाकुनी शब्द देवता रोधिल्या तदा ॥ ४३ ॥
नारदजी म्हणाले -
हरिच्या आश्रयाने तो तुम्ही अमृत प्राशिले ।
लक्ष्मीजीच्या कृपेने ती वृद्धी सर्वचि मेळिली ।
म्हणोनी लढणे थांबा देवतांनो अता तुम्ही ॥ ४४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
नारदी बोध हा सर्व देवांनी मानिला असे ।
स्वर्गी निघोनि ते गेले यशोगानहि जाहले ॥ ४५ ॥
वज्राचा घाव लागोनी मेलेला बळि घेउनी ।
वाचले दैत्य ते सारे नारदांना विचारुनी ॥
अस्तांचल गिरीच्या त्या यात्रेसी निघले तदा ॥ ४६ ॥
शुक्राचार्ये तिथे विद्या संजीवनिच योजुनी ।
न शीर कापता मेले त्या सर्वां जीव तो दिला ॥ ४७ ॥
स्पर्शिता शुक्र-आचार्ये झाला चेतन तो बळी ।
स्मरले सर्व ते त्याला न खेद ज्ञानि तो असे ॥ ४८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥ ८ ॥ ११ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP