समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १० वा
देवासुरसंग्राम -
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
जरी सावध राहोनी दैत्यांनी कष्ट घेउनी ।
मंथनी घेतला भाग परी त्या श्रीहरीस तै ॥
विन्मूख राहिले तेणे अमृत लाभले नसे ॥ १ ॥
राजा ! श्रीहरीने केले समुद्र मंथनो तसे ।
स्वजनो देवता यांना अमृत पाजुनी स्वये ॥
गरूडी बसता गेले निघुनी निज धामि ते ॥ २ ॥
दैत्यांनी पाहिले जेंव्हा शत्रू सफल जाहले ।
न साहोनि करीं शस्त्र घेता युद्धास पातले ॥ ३ ॥
इकडे देवतांनी तो अमृत प्राशुनी बळा ।
वर्धिले, हरिचा त्यांना आश्रयो लाभला असे ॥
शस्त्रास्त्रें सज्ज होवोनी तेही युद्धार्थ पातले ॥ ४ ॥
तदा देवासुरो नामे संग्राम थोर जाहला ।
क्षीराब्धी तटि तो ऐसा रोमांचकारिही बहू ॥ ५ ॥
दोन्हीही एकमेकांना प्रबळ जाहले बहू ।
समोर खड्ग शस्त्रांनी जखमा करु लागले ॥ ६ ॥
त्या वेळी शंख भेर्या नी मृदंग वाजु लागले ।
हत्ती किंचाळले मोठे रथांचा घर्घराटही ॥
घोडे खिंकाळले सेनीं मोठा कल्लोळ जाहला ॥ ७ ॥
रथ पायदळी घोडे हत्तीदळ परस्परा ।
भिडले एकमेकांना लढाई जाहली सुरू ॥ ८ ॥
गाढवे उंट नी सिंह व्याघ्र गौरमृगावरी ।
बसोनी कुणि ते वीर पातले लढण्यास की ॥ ९ ॥
ससाने बगळे कंक गिधाडा वरती कुणी ।
मासे नी माकडे रेडे गेंड्यांच्या वरती कुणी ॥
बैसोनी वीर ते कोणी लढाया पातले तिथे ॥ १० ॥
सायाळ मुंगुसे आणि उंदरे कृष्णमृगही ।
बकरे माणसे हंस वराह वाहने कुणा ॥ ११ ॥
जल स्थळ नि आकाशी वीर ते देव दानवी ।
भिडले एकमेकांसी घुसोनी मारु लागले ॥ १२ ॥
पताका रंगि बेरंगी श्वेतछत्र कितेक ते ।
पंखे नी चवर्या ज्यांना रत्नांकितचि दंड ते ॥ १३ ॥
दुपट्टे फड्कले तैसे पगडी कलगी तुरे ।
कवचो भूषणे शस्त्रे दिव्य ते शोभले तदा ॥ १४ ॥
वीरांच्या भिडल्या रांगा देव नी दानवी तशा ।
महासागर जै दोन्ही एकमेकास भेटले ॥ १५ ॥
वैहायस विमानात विरोचनसुतो बळी ।
बैसला इच्छिता नेई हवे तेथेहि यान ते ॥ १६ ॥
परीक्षिता ! तया मध्ये युद्ध सामग्रि सज्जची ।
दिसे नी न दिसे केंव्हा अंदाज नच येतसे ॥ १७ ॥
श्रेष्ठ ऐशा विमानात बळीराजा विराजला ।
श्रेष्ठ सेनापती त्याच्या भोवती ठाकले उभे ॥
उदीत चंद्रमा जैशी तसा राजा सुशोभला ॥ १८ ॥
गटांचे स्वामि ते कैक नमुची शंबरादिक ।
विप्रचित्ती नि तो बाण शंबरो नि अयोमुख ॥ १९ ॥
द्वीमूर्धा कालनाभो नी प्रहेती हेति इल्वलो ।
शकुनी भूतसंतापो वज्र दंष्ट्र विरोचन ॥ २० ॥
हयग्रीव शंकुशिरा कपिलो मेघ दुदुंभी ।
चक्राक्षो तारको शुंभ निशुंभो जंभ उत्कलो ॥ २१ ॥
अरिष्टनेमि अरिष्टो त्रिपुराधिपती मय ।
कालेय पौलमो तैसा नि वात-कवचादिक ॥ २२ ॥
मंथनी सगळे होते परी अमृत ना तयां ।
देवता हरवील्या त्या जयांनी युद्धि कैक त्या ॥ २३ ॥
सिंहनाद करोनीया दैत्यांनी शंख फुंकिले ।
उत्साहे पातले सर्व उन्माद क्रोधही तसा ॥ २४ ॥
ऐरावतावरी इंद्र बैसला सूर्याची जसा ।
उदयांचलि तेजाने, मंद तो गालि हासला ॥ २५ ॥
देवता वाहनारुढ ध्वज आयूध घेउनी ।
इंद्राच्या भोवती आले वायू अग्नी वरूणही ॥ २६ ॥
एकासी एक बाजूला गाठोनी लढु लागले ।
नावें ओरडुनी कोणी धिक्कारूनि हि बोलती ॥ २७ ॥
इंद्र तो बळिसी तैसे कार्तिको तारकासुरा ।
वरुणो हेतिसी तैसा प्रहेतीसीच मित्र तो ॥ २८ ॥
यम तो कालनाभासि विश्वकर्मा मयाशि नी ।
त्वष्टा तो शंबरासूरा सविता हा विरोचना ॥ २९ ॥
अपराजितासि नमुची वृषपर्वासि अश्विनो ।
बाणादी बळिचे पुत्र शत त्या भिडला रवी ॥ ३० ॥
राहूशी लढला चंद्र पुलोमायास वायु तो ।
भद्रकाली निशुंबासी-शुंबासी लढु लागली ॥ ३१ ॥
जंभासुरास हर नी अग्नि तो महिषासुरा ।
वातापी-इल्वलो यांना मरिच्ये गाठिले असे ॥ ३२ ॥
दुर्मर्षासी कामदेवे उत्कला मातृदैवते ।
शुक्र-बृहस्पति जोडी शनी नी नरकासुरो ॥ ३३ ॥
निवातकवचाला ते मरुद्गण तसे पहा ।
विश्वदेवो लढाया ते पौलोमा पुढती तसे ॥
क्रोधवशा सवे रुद्र संग्रामा लागले तदा ॥ ३४ ॥
(इंद्रवज्रा)
असे सुरासूर परस्परात
यशास इच्छोनि लढ्यात आले ।
नि बाण खड्गे क्षति पोचवीत
परोपरीने लढु लागले की ॥ ३५ ॥
तोफा गदा पट्टिश प्राश भाले
उल्मूक फर्शा तलवार बाण ।
नी भिंदिपाले परिघे करून
छेदोनि गेले शिर कैक वीर ॥ ३६ ॥
अश्वो गजो नी रथ वाहने ती
विच्छिन्न सेना तइ काळ झाळी ।
जांघा भुजा मान नि पाय कैका
तुटोनि गेले कवच ध्वजो ही ॥ ३७ ॥
हत्ती नि वीरे पद आपटीता
तसे रथाने भुमि छिन्न झाली ।
धुळीत गेला रवि झाकुनी तो
दाही दिशांना धुळ-धूळ झाली ।
कांही क्षणांनी मग रक्तपाते
पृथ्वी भिजोनी धुळ शांत झाली ॥ ३८ ॥
पुन्हा शिरांचा रणि ढीग झाला
ती क्रोधमुद्रा मुकुटे तशीच ।
ते शस्त्र तैसे तुटल्या करात
ऐशी भुमी भीषण ती जहाली ॥ ३९ ॥
(अनुष्टुप्)
कांहीची तुटकी डोकी पाहता धड वेगळे ।
हातात शस्त्र घेवोनी शत्रूंच्या वरि धावले ॥ ४० ॥
बळीराये दहा बाण इंद्राच्या वरि नी त्रय ।
ऐरावता वरी चार रक्षकांवरि सोडिले ॥
महावता वरी एक आठरा सोडिले असे ॥ ४१ ॥
इंद्राने पाहिले हे तो घायाळ करु पाहती ।
भल्लतीरे तये सारे तोडिले वरच्यावरी ॥ ४२ ॥
इंद्राची स्फूर्ति पाहोनी चिडला बळि तो बहू ।
उल्केपरी दुजी शक्ती योजिता नष्टली तशी ॥ ४३ ॥
क्रमाने शूळ नी प्रास तोमरा शक्ति स्थापुनी ।
धरिता करि ते तेही इंद्राने सर्व तोडिले ॥ ४४ ॥
इंद्राचा पाहुनी वेग जाहला गुप्त तो बळी ।
निर्मिली असुरी सृष्टी गिरी देवांचिया वरी ॥ ४५ ॥
दावाग्नी परि ते तप्त वृक्ष पाषाण त्यातुनी ।
पडता देवतांचा तो चेंदाचि करु लागले ॥ ४६ ॥
थोर सर्प तसे विंचू अंगासी दंशु लागले ।
डुकरे सिंह वाघादी हत्तींना फाडु लागले ॥ ४७ ॥
परीक्षिता ! करीं शूळ कापा-मारा असे मुखे ।
बोलता नागडे कैक आले राक्षस राक्षसी ॥ ४८ ॥
आकाशी घन ते आले टकरी गर्जले बहू ।
कडाडल्या विजा तैशा तमात वृष्टि जाहली ॥ ४९ ॥
अग्निची वृष्टि ही केली बळीने ती भयानक ।
क्षणात सुटला वारा पेटले देवसैन्य ते ॥ ५० ॥
वादळी सागरीलाटा चौदिशीं उठल्या पुन्हा ।
जणू समुद्र उल्लंघी सीमा नी वेढितो असा ॥ ५१ ॥
भयानक अशी दैत्ये लपोनी सृष्टि निर्मिली ।
न दिसे शत्रु तो गुप्त देवता दुःखि जाहल्या ॥ ५२ ॥
प्रतिकारा तदा इंद्रे विचारा योजिले परी ।
उपाय खुंटला तेंव्हा स्मरिले हरिला तये ॥
तात्काल हरि तो साक्षात् समोर राहिला असे ॥ ५३ ॥
(इंद्रवज्रा)
ते श्रेष्ठ सौंदर्य असेचि होते
ठेवी गरूडी पदपंकजाते ।
शस्त्रे करी नी कटि पीतवस्त्र
कौस्तूभकंठी शिरि तो किरीट ।
ती कुंडले शोभलि कर्णभागी
देवे असा हा हरि पाहिला की ॥ ५४ ॥
त्याच्या प्रवेशे कपटी अशी ती
लोपूनि गेली मग सर्व माया ।
जै स्वप्न दृश्ये ठरती असत्य
तशा विपत्ती हरि नष्टितो तो ॥ ५५ ॥
(वसंततिलका)
तो काल नेमि बघता हरि युद्ध क्षेत्री
अंबारिसीच बसुनी त्रिशुळास फेकी ।
तो लागणार गरुडा हरिने धरीला
श्री विष्णुने वधियला त्रिशुळेचि दैत्य ॥ ५६ ॥
माली-सुमालि अति ते बळि दैत्य होते
युद्धात चक्रिं वधिले हरिने तयांना ।
तो माल्यवान करि घेवुनि ती गदा नी
मारीयली गरुडजी वरती तयाने ।
तो गर्जुनी करित ना करितो प्रहार
चक्रेचि श्रीहरि तया वधुनीहि ठेला ॥ ५७ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ ८ ॥ १० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|