समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ९ वा

मोहिनी रूपाने भगवंत अमृत वाटतात -

श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
त्यागिता बंधुभावाते असूर निंदु लागले ।
डाकूंच्या परि तो कुंभ हिरावू लागले तदा ॥
सुंदरी पाहिली त्यांनी येताना आपुल्याकडे ॥ १ ॥
अद्‌भूत रूप नी ऐसे सुडौल नव यौवन ।
पाहता काम मोहाने भांडणे त्यागुनी तिच्या ॥
पुढती धाव घेवोनी पुसते जाहले तिला ॥ २ ॥
कोण तू पंकजाक्षे नी कोठुनी पातली इथे ।
पाहता चळले चित्त सुंदरी काय इच्छिसी ॥ ३ ॥
वाटते देवता दैत्ये गंधर्वे सिद्ध चारणे ।
न स्पर्श तुजला केला मनुष्य शिवती कसे ॥ ४ ॥
सुंदरी वाटते ईशे समस्त शरिरा सुख ।
देण्यासी धाडिले येथे तृप्त्यर्थ आमुचे मन ॥ ५ ॥
मानिनी एकजातीचे आम्ही सर्वचि तो असू ।
एक वस्तु अम्हा सर्वां हवी म्हणुनि भांडलो ॥
सुंदरी आमुचा वाद मिटवी वैरही तसे ॥ ६ ॥
कश्यपाचे अम्ही पुत्र भाउकी आम्हि सर्व ते ।
अमृत मेळवायासी केला हा पुरुषार्थची ॥
न्यायाने वाट तू आम्हा आम्ही ना भांडु तेधवा ॥ ७ ॥
प्रार्थिता असुरे ऐसे स्त्रीवेशधारि तो हरी ।
हासला तिरक्या नेत्रे पाहुनी वदला असा ॥ ८ ॥
श्री भगवान्‌ म्हणाले -
महर्षीचे तुम्ही पुत्र मी तो ही कुलटा अशी ।
न्यायभार मला कैसा देतसा तुम्हि हा असा ॥
विश्वास नच तो ठेवी विवेकी स्वैरिणी वरी ॥ ९ ॥
दैत्यांनो कुलटा आणि श्वान मैत्री खरी नसे ।
नित्य नव्या शिकारीला दोन्ही ही धुंडिती तसे ॥ १० ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
परीक्षिता ! सुहास्या ती वदता दैत्य भाळले ।
हासता गूढ ती दैत्ये घटो सोपविला तिला ॥ ११ ॥
(इंद्रवज्रा)
घेवोनि हाती कलशा हरीने
    हासोनि शब्दे मधु बोलले की ।
उचीत किंवा अनुचीत तेही
    घडले माझ्या कडुनी तथापी ।
ते मान्य व्हावे तर मी सुधा ही
    तुम्हास वाटील न अन्यथा ती ॥ १२ ॥
(अनुष्टुप्‌)
मोठ मोठ्याहि दैत्यांनी ऐकता मधु बोल हे ।
मानिले मोहिनीचे ते न रूप जाणिता तसे ॥ १३ ॥
उपास करुनी एक स्नान सर्वेचि घेतले ।
हविष्ये हविला अग्नी गो विप्रा दानही दिले ॥
स्वस्त्ययन द्विजांच्या त्या कडोनी करवीयले ॥ १४ ॥
वस्त्र आभूषणे ल्याले सगळे आवडी परी ।
बैसले चटईशी ते पूर्व भागास दैत्य की ॥ १५ ॥
धूप माला दिवे तेंव्हा मंडपा माजि शोभले ।
पूर्वाभिमुखि ते देव बैसले चटई वरी ॥ १६ ॥
(वसंततिलका)
घेवोनि हाति कलशो मग अमृताचा
    ती मोहिनी वसन उच्चचि नेसलेली ।
चाले हळूच जणु भार नितंबि झाला
    नेत्रात ती विव्हलता मद साठलेला ।
कुंभस्तनी अतिव सुंदर त्याहि मांड्या
    पायात स्वर्ण नुपुरीं झणकार होता ॥ १७ ॥
ती स्वर्ण कुंडल नि नाक कपाळ छान
    ती मोहिनी सखिच लक्ष्मिहुनीहि श्रेष्ठ ।
ती हास्य दृष्टि बघता सुर दैत्य सर्व
    ते मोहिले, पदर तो ढळला स्तनीचा ॥ १८ ॥
(अनुष्टुप्‌)
असूर मूळचे क्रूर मोहिनी आठवी मनीं ।
सर्पादूध तसे यांना अमृत पाजता घडे ॥
न भाग इच्छिता त्यांना युक्ति केली अशी तिने ॥ १९ ॥
दैत्य दानव ते केले वेगळे पंक्तिही तशा ।
पाडोनी श्रेणि त्यांची ही वेगळे बैसवीयले ॥ २० ॥
पुन्हा कलश तो हाती घेता दैत्याकडे हरी ।
नेत्रांनी मिचकावोनी देवतांपाशि पातले ॥
अमृत पाजिले देवां जेणे मृत्यू न ती जरा ॥ २१ ॥
परीक्षिता ! तयेवेळी वचना दैत्य जागले ।
स्नेहही मानिती चित्ती स्त्रियेसी भांडणे नको ॥
निंद्य ते मानिती तेंव्हा गप्प बैसोनि राहिले ॥ २२ ॥
प्रेमात गुंतले सारे प्रेमभंग न इच्छिती ।
सन्मान मिळला त्यांना म्हणोनी शांत राहिले ॥ २३ ॥
अमृत पाजता देवां राहू वेष करोनिया ।
बैसला देवतांमाजी चंद्र सूर्येचि जाणिले ॥ २४ ॥
अमृत पाजिता देवे राहूचे शिर छेदिले ।
पडले धड ते खाली अमृत पोचले न त्या ॥ २५ ॥
अमरो शिर ते झाले ब्रह्माने राहु तो पुन्हा ।
केला ग्रह तसा तोची राहू पर्वात चंद्रमा ॥
सूर्याशी वैर ठेवोनी आक्रमायास येतसे ॥ २६ ॥
अमृत पाजता देवां श्रेष्ठ दैत्यांपुढे हरी ।
प्रत्यक्ष सत्यरुपाने राहिला तो पुन्हा उभा ॥ २७ ॥
(वसंततिलका)
दैत्ये नि त्या सुरगणे सम कष्ट केले
    दैत्यासि ना फळ मुळी मिळले कसे ते ।
देवांसि तेचि मिळले हरिच्या कृपेने
    दैत्ये न तो कधि हरी मनि प्रार्थिला की ॥ २८ ॥
प्राणी धना अन तना अन पुत्र यांना
    जे कार्य तो करितसे मुळि व्यर्थ सारे ।
योजोनि ईश पदि ते परि धन्य होते
    वृक्षास जै मिळतसे मुळिं आप देता ॥ २९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ ८ ॥ ९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP