समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ८ वा
समुद्रातून अमृत निघते आणि भगवंत मोहिनी अवतार धारण करतात -
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
प्राशिता वीष शंभूने देव दैत्यहि तोषले ।
उत्साहे लागले कार्या तदा धेनू निघालिसे ॥ १ ॥
अग्निहोत्रादि साहित्य देणारी अशि ती असे ।
पवित्र दूध नी तूप ब्रह्मलोकासि जाय जे ॥
ब्रह्मवादी ऋषी यांनी धेनूला स्विकारिले ॥ २ ॥
उच्चैश्रवा हयो श्वेत निघाला मंथनी पुन्हा ।
बळीने इच्छिले त्याला इंद्रे तो नच इच्छिला ॥ ३ ॥
पुन्हा ऐरावतो हत्ती निघाला मंथनात त्या ।
कैलासा परि जो स्वच्छ चौदंत लांब त्याजला ॥ ४ ॥
कौस्तूभ मणि हे रत्न निघाले सागरी पुन्हा ।
अजिते इच्छिले त्याला सदैव हृदयास तो ॥ ५ ॥
पारिजात पुन्हा आला सुरलोक विभूषणो ।
इच्छिता सर्व जो देई जसे देता तुम्ही जगा ॥ ६ ॥
वस्त्रालंकार लेवोनी निघाल्या अप्सरा पुन्हा ।
पाहता चालता युक्त देवांना सुख देत ज्या ॥ ७ ॥
मूर्तिमंत अशी शोभा निघाली ती रमा पुन्हा ।
भगवत्शक्ति जी नित्य जिचे तेज विजे परी ॥ ८ ॥
तिचे सौंदर्य औदार्य यौवनो रंग रुप ते ।
पाहता दीपले सर्व सर्वांनी इच्छिले तिला ॥ ९ ॥
स्वयं इंद्र तदा मोठे आला घेवोनि आसन ।
पाणीही स्वर्णपात्रात नद्यांनी अभिषेकिण्या ॥ १० ॥
औषधी अभिषेकाते पृथ्वीने सर्व आणिल्या ।
पंचगव्यहि गायींनी वसंते फल पुष्प ते ॥ ११ ॥
योजुनी सर्व सामग्री ऋषिंनी अभिषेकिले ।
गंधर्व गायले सर्व नर्तक्या नाचल्या तदा ॥ १२ ॥
मृदंग डमरू ढोल नगारे शंख शिंग नी ।
वेणू वीणा अशी वाद्ये ढगांनी वाजवीयली ॥ १३ ॥
हातात कमलो घेता शोभली लक्षुमी तदा ।
दिग्गजे घातले स्नान विप्र मंत्रहि बोलले ॥ १४ ॥
रेशमी पिवळी वस्त्रे समुद्रे अर्पिली तिला ।
वैजयंति गळा माळा वरुणे अर्पिली असे ॥
जये गंधात ते भृंग मत्त होती सदैवची ॥ १५ ॥
भूषणे सुंदरो ऐशी विश्वकर्मेचि अर्पिली ।
ब्रह्म्याने कमळो आणि मोतीमाळ सरस्वत्ये ॥
नाग ते कुंडले दोन अर्पिते जाहले तिला ॥ १६ ॥
(इंद्रवज्रा)
पुन्हा द्विजे स्वस्तियनोहि केले
नी पद्ममाला करि घेइ लक्ष्मी ।
सुलक्षणी त्या पुरुषा गळ्यात
घालावया नी वरण्या निघाली ॥ १७ ॥
स्तनद्वयो ते दृढ एकमेका
नी चंदनी केशरि लेप त्यासी ।
कृशोदरी ती चलता ध्वनी तो
मनोहरी पैंजणि ही निघाला ।
ती पाहताना गमले मनासी
सुवर्णवेली फिरते अशी ही ॥ १८ ॥
इच्छी मनी ती गुणउत्तमाला
घालावयाला जलपुष्पमाला ।
गंधर्व यक्षीं असुरात तैसे
ना कोणि देवांतहि युक्त तैसा ॥ १९ ॥
तपस्वि पाही परिक्रोधपूर्ण
आसक्त ज्ञानी गमले मनाला ।
सामर्थ्यशाली तर कामि तैसे
ऐश्वर्यि हे तो नच आश्रयो ते ॥ २० ॥
धर्मज्ञ त्यांना नच जीवप्रेम
त्यागी परी ते नच मुक्त कोणी ।
ते वीर होते परि कालबद्ध
विरक्त अद्वैतचि ध्याति नित्य ॥ २१ ॥
दीर्घायु होते ऋषि कोणि त्यात
अमंगलो योग्य न शील त्यांचे ।
ते शील ज्यांना परि अल्प आयू
दोन्ही जिथे तो अतिहीन राहि ।
सुलक्षणी तो परि एक विष्णु
न इच्छि तो तो मज लक्षुमीला ॥ २२ ॥
लक्ष्मी असे हे स्मरुनी मनात
विष्णू वरीला गुणि लक्षुमीने ।
न प्राकृताचा मुळि स्पर्श त्याला
खरा तिचा जो नित आश्रयो की ॥ २३ ॥
(वसंततिलका)
घालोनि माळनवपंकज वक्ष त्याचे
पाहोनि लाजलि बहू मनि ती रमा तै ।
चारी दिशासी फिरती अति मत्तभृंग
गंधात डुंबुनिच गुंजन जे करीती ॥ २४ ॥
जो या जगास पितरो तयि लक्षुमी ही
माता जगास तिजला हृदयात स्थान ।
देता विराजुनि तिये करुणामनाने
ते लोकपाल जन यां अभिवृद्ध केले ॥ २५ ॥
(अनुष्टुप्)
त्या वेळी शंख भेर्यां नी मृदंग वाजु लागले ।
गंधर्व अप्सरा यांच्या सहाय्ये नाचु लागले ॥ २६ ॥
ब्रह्म्याने अंगिरे रुद्रे केलीसे पुष्पवृष्टि तै ।
गुणरुपादि लीलांची मंत्राने स्तुति गायिली ॥ २७ ॥
कृपादृष्ट्ये श्रियेच्या त्या देवता नि प्रजापती ।
प्रजाही सुखसंपन्न जाहली उत्तमो गुणे ॥ २८ ॥
परीक्षिता ! जधी श्रीने त्यजिले दैत्य दानवा ।
निर्बलो लोभि ते झाले निर्लज्जहि तसेचि ते ॥ २९ ॥
पुन्हा त्या मंथना मध्ये वारुणी देवि जन्मली ।
कन्या रुपवती ऐशी दैत्यांनी घेतले तिला ॥ ३० ॥
महाराजा ! पुन्हा देवे दैत्यांनी इच्छुनी सुधा ।
मथिला सागरू तेंव्हा अलौकिकचि जाहले ॥ ३१ ॥
सावळा पुरुषो आला गळां माळाहि शोभल्या ।
गळा शंखापरी त्याचा लालिमा नेत्रि शोभली ॥
शोभले पीतवस्त्रादी आणि कुंडल भूषणे ॥ ३२ ॥
रुंद छाती युवावस्थ सिंहापरि पराक्रमी ।
अमाप सुंदरो त्याचे केशही कुरुळे तसे ॥ ३३ ॥
हाती कंकण नी एक अमृते भरला घट ।
अंशावतार तो होता साक्षात् जो हरिची असे ॥ ३४ ॥
धन्वंतरी हवीभोक्ता आयुर्वेदप्रवर्तक ।
प्रसिद्ध पुढती तोची जगी या जाहला असे ॥
दैत्यांनी पाहता त्याला बळाने घेतला घटो ॥ ३५ ॥
इच्छा करोनि ते होते पहिल्या पासुनी तशी ।
सर्वची वस्तु लाभाव्या आपणा मंथनातल्या ॥
असुरे अमृता नेता देवता खिन्न जाहल्या ॥ ३६ ॥
तदा ते भगवंताच्या शरणी सर्व पातले ।
भक्तेच्छा कल्पद्रूमो तो दशा पाहून बोलला ॥
न करा खेद तो कांही मायेने काम साधितो ॥ ३७ ॥
अमृत वांछिता दैत्य आपसी भांडु लागले ।
आधी मी आधि मी ऐसे पिईन म्हणु लागले ॥ ३८ ॥
बळाने घेतला ज्याने कुंभ तो अमृती तया ।
दैत्य जे दुबळे त्यांनी पिण्यासी रोधिले असे ॥ ३९ ॥
वदले देवताही त्या मंथना कष्टल्या बहू ।
यज्ञाच्या परि हा भाग देणे कर्तव्य आपुले ॥ ४० ॥
तू तू मी मी अशी दैत्यीं लागता चतुरो हरी ।
अद्भूत रुप ते स्त्रीचे घेवोनी तेथ पातले ॥ ४१ ॥
श्यामला मोहिनी रूप अतीव अंग मोहिता ।
कानात कुंडले तैशी गाल सुंदर शोभले ॥
नासिका उंच ती तैशी रम्य ते मुख साजिरे ॥ ४२ ॥
नव यौवन ते उंच गच्चही स्तन शोभले ।
नितंब भार वाहोनी जणू कृशचि जाहले ॥
मुखगंधात प्रेमाने गुंजनी भृंग गुंतले ।
तयाने बावरी नेत्री चालता दिसली असे ॥ ४३ ॥
आपुल्या लांब केसात फुलांची माळ गुंफिली ।
गळ्यात दागिने तैसे बाजूबंदहि शोभले ॥ ४४ ॥
रुण्झूण चरणाच्या त्या नूपुरीं चालता असे ।
नितंबा स्वच्छ ते वस्त्र अपूर्व कर्धनी तशी ॥ ४५ ॥
लाजरे हास्य नी नेत्र तिरके भुवया जशा ।
उडत्या नाचर्या भास विलासी दृष्टि साजिरी ॥
मोहिनीरूप तो विष्णू दैत्यसेनापतीस त्या ।
कामोद्दीप असे कांही लागला तो करावया ॥ ४६ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ ८ ॥ ८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|