समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ७ वा

समुद्रमंथनाला आरंभ भगवान्‌ शंकराचे विषपान -

श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या ।
अमृत भाग देण्याचे करोनी मान्य आणिले ॥
नेती वासुकिची केली पर्वता वेढिले तये ॥ १ ॥
अमृता इच्छुनी सर्व घुसळायासि लागले ।
अजीत वासुकीच्या त्या मुखाकडुनि राहता ॥
देवता राहिल्या त्याच बाजूने नेति ओढिण्या ॥ २ ॥
भगवत्‌कार्य दैत्यांना रुचले नच तेधवा ।
अशूभ शेपटी त्याची वदले आम्हि ना धरू ॥ ३ ॥
आम्ही तो वेद शास्त्रांचा केला अभ्यास जै विधी ।
आम्ही तो उच्चवर्णीय शौर्याने कार्य साधितो ॥
देवतांहुनि ते काय आम्हा मध्ये उणे असे ।
असे वदुनि ते सर्व तेंव्हा निष्क्रीय राहिले ॥
अजिते मुख सर्पाचे सोडिता पुच्छ घेतले ॥ ४ ॥
या परी निश्चयो केला अमृतप्राप्ति हेतुने ।
लागले मंथना कार्यी देवदानव सर्वही ॥ ५ ॥
परीक्षिता तये वेळी धरोनी देव दानवे ।
निराधार गिरी तेंव्हा समुद्रीं बुडु लागला ॥ ६ ॥
अत्यंत बलवान्‌ दैत्य खचले मनि तेधवा ।
मातीत कार्य ते जाता सगळे खिन्न जाहले ॥ ७ ॥
(इंद्रवज्रा)
विघ्नास पाहोनि तदा हरी तो
    विशाल ते कासव रुप घेई ।
जळीं घुसोनि गिरी पाठिशी तैं
    घेई तदा तो नच त्या कठीण ॥ ८ ॥
असूर देवे गिरि पाहिली नी
    मंथावयाते सरसावले की ।
जंबुद्विपाच्या परि पाठ मोठी
    त्या कासवाची गिरिखाली होती ॥ ९ ॥
परीक्षिता श्रेष्ठचि दैत्य देवे
    बाहूबलाने मंथिला गिरी तै ।
पाठीस कोणी जणु खाजवी त्या ।
    असाचि कूर्मा तयि मोद झाला ॥ १० ॥
असूरशक्ती करण्या विशेष
    दुज्या रुपाने हरि दैत्य झाला ।
निद्रीत त्या वासुकिसी करोनी
    दैत्याचिया बाजुस ओढि विष्णू ॥ ११ ॥
सहस्त्रबाहू तिसर्‍या रुपाने
    त्या पर्वता दाबियले कराने ।
ब्रह्मादिदेवे स्तविले तयाला
    नी पुष्पवृष्टी मग केलि त्यांनी ॥ १२ ॥
वरी नि खाली असुरो सुरांच्या
    शक्तीत आला हरि संचरोनी ।
उन्मत्त होता मथु लागले तै
    ते क्षुब्ध झाले जलजीवहिंस्त्र ॥ १३ ॥
हजार तोंडींअन नेत्र भागी
    विषाग्नि आला तयि वासुकीच्या ।
पौलोम कालेय बळि इल्वलादी
    निस्तेज झाले धुर दाटताची ॥ १४ ॥
त्या देवताच्या हततेज झाल्या
    धुराडले ते कवचो नि माला ।
वस्त्रे तसे ते मुखम्लान झाले
    हे पाहिले त्या जगदीश्वराने ।
त्या देवतांच्या वरि वृष्टि केली
    वायू जले स्पर्शित गंध झाला ॥ १५ ॥
(अनुष्टुप्‌)
या परी मंथुनी कष्टे अमृत नच लाभता ।
स्वयं अजीत भगवान्‌ मंथना कार्यि लागले ॥ १६ ॥
(मंदाक्रांता)
मेघःश्यामो कनकवसनो तेज ते कुंडलांचे ।
लालीमा ती कमलनयनी केश तैसे कुरूळे ॥
कंठी माळा अभयजगता वासुकी तो भुजांशी ।
धारोनीया मथन करितो मंदरापर्वताशी ॥ १७ ॥
(इंद्रवज्रा)
समुद्र ऐसा मथिता अजीते
    ते नक्र मासे भयभीत झाले ।
समुद्रहत्ती पळु लागले नी
    आधी हलाहालविषो निघाले ॥ १८ ॥
दिशा विदीशी विष पांगले ते
    उपाय कांही नच वाचण्याचा ।
प्रजा भयाने गतप्राण झाली
    प्रजापतीने स्तविले शिवा ते ॥ १९ ॥
कैलासि होता शिव तो विराज
    सेवेत होते मुनि श्रेष्ठ तेंव्हा ।
भद्रार्थ होते तप चालले तै
    प्रजापतीने स्तविले नमोनी ॥ २० ॥
प्रजापतींनी भगवान्‌ शिवास स्तविले -
(अनुष्टुप्‌)
देवदेवा महादेवा भूतात्मा भूत भावना ।
त्रिलोका विष ते जाळी प्रार्थितो रक्ष तू अम्हा ॥ २१ ॥
समर्थ जगती तूची सगळे बंध मोचना ।
विवेकी पूजिती तूं ते तारिसी तू जगद्‌गुरू ॥ २२ ॥
जन्म स्थिति लयासाठी होसी प्रगट त्रैगुणे ।
ब्रह्मा विष्णु शिवो नाम धारिसी एक तू परी ॥ २३ ॥
तू स्वयं ब्रह्मतत्वो नी स्वयंतेज असाचि तू ।
सर्वांचा जीवदाता तू सर्वात्मीं तूच एकटा ॥
अनेक शक्तिच्या द्वारा होशी तू तो जगद्‌गुरु ।
जगदीश्वर असा तूंची तुझे सामर्थ्य श्रेष्ठ ते ॥ २४ ॥
(इंद्रवज्रा)
तू शब्द योनी जगतासि आत्मा
    तू कालकर्ता अन धर्म सत्य ।
ॐकार त्रैगुण्य असाचि तू हे
    ते वेदगाती वदती सदाची ॥ २५ ॥
देवस्वरूपाग्नि मुखो तुझेची
    त्रिलोक कल्याण करी हरा हे ।
ही भूमि आहे तव पादपद्म
    आहेस तू सर्वचिदेवरूप ।
हा काळ आहे गति ती तुझीच
    जिव्हा वरूणो नि दिशाहि कर्ण ॥ २६ ॥
आकाश नाभी अन श्वास वायू
    पाणी असे वीर्य नि सूर्य नेत्र ।
तू आश्रयो त्या सगळ्या जिवांचा
    ते चित्त चंद्रो अन स्वर्ग डोके ॥ २७ ॥
हे वेदरूपा जठरो तुझे तो
    समुद्र आहे गिरि अस्थि तैशा ।
वनस्पती नी तृण केश रोम
    छंदोचि धातू हृदयोचि धर्म ॥ २८ ॥
मुखोचि पंचोनिषदे तुझे ती
    छत्तीस मंत्रे तयि जन्मले की ।
वैराग्य त्याचे शिव हेचि नाम
    खरे असे ते परमात्म तत्व ॥ २९ ॥
अधर्म दंभो अन लोभ यासी
    छाया तुझी त्याचचि सृष्टि होई ।
तिन्ही गुणांचे तव नेत्र तीन
    ते छंद नी वेद तुझा विचार ।
समस्त शास्त्रा शिव ! तूचि कर्ता
    नी सत्यरूपो तव तेचि आहे ॥ ३० ॥
ज्योतिर्मयो ब्रह्म तुझे स्वरूप
    तयात ना तो गुण भेदभाव ।
तुझ्या रुपाते नच कोणि जाणी
    विष्णू नि ब्रह्मा मग अन्य कोण ॥ ३१ ॥
(वसंततिलका)
कामो नि दैत्य त्रिपुरी असुरादि शत्रू
    ते जीवद्रोहि रिपुते वधिले स्वताची ।
ना ही स्तुती तव शिवा प्रलयात तू तो
    जै क्रोधसी जगत तै जळतेचि खाक ।
त्याचा तुला न कसला मुळि कांहि पत्ता
    तै तू स्वताच असशी तपध्यानमग्न ॥ ३२ ॥
चित्ती द्वयो पद तुझे धरिती सुमुक्त
    तैही तुची सतत ज्ञान तपात लीन ।
पाहूनिया सतिसवेहि तुला तरी ते
    संबोधिती तुजसि उग्र स्मशानवासी ।
आसक्त निष्ठुरहि ते म्हणतात मूढ
    अज्ञान ते खचितची अति लाजहीन ॥ ३३ ॥
या कार्यकारण जगाहुनि पैल माया
    मायेहुनीहि अति पैल तुझे स्वरूप ।
ज्ञानी न कोणि शंकतो नच तो विधीही
    गाऊ शके स्तुति तुझी अम्हि कोण तेथे ।
पुत्रपौत्र असमर्थचि बोलण्यास
    शक्तीनुसार तरिही गुणगान केले ॥ ३४ ॥
(अनुष्टुप्‌)
लीलाविहारि हे रूप फक्त आम्हीच जाणतो ।
श्रेष्ठरूप न जाणो की कल्याणा व्यक्त होसि तू ॥ ३५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
परीक्षिता प्रजेचे हे शिवे संकट पाहुनी ।
व्यथीत जाहला चित्ती सतीला बोलला असा ॥ ३६ ॥
श्री शिवजी म्हणाले -
खेदाची गोष्ट की देवी पहा सागर मंथनी
हलाहल निघे वीष झाली दुःखी प्रजा तये ॥ ३७ ॥
बिचारे इच्छिती प्राणा कर्तव्य मम हेच की
निर्भयी करणे त्यांना शक्ति सामर्थ्य ते मला ।
दीनांची करणे रक्षा त्यात साफल्य जीवना ॥ ३८ ॥
प्राणाचा बळिही देती पररक्षार्थ सज्जन ।
कल्याणी मोहि गुंतोनी प्राण्यांनी वैर बांधिले ॥ ३९ ॥
तयांना लाविता प्रेम पावे श्रीकृष्ण तो हरी ।
कृपा ज्यासी तयाची त्यां प्रसन्न मीहि होतसे ॥
तदा मी प्राशिता वीष प्रजा होय सुखी पहा ॥ ४० ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
सतीला सांगुनी ऐसे शिव तो सिद्ध जाहला ।
प्यावया काळकूटाते सतीने अनुमोदिले ॥ ४१ ॥
कृपाळू शिव तो मोठा वीष ते ओंजळीत तै ।
घेतले प्राशिले सर्व जीवांचा तोचि रक्षक ॥ ४२ ॥
वीष ते मळ पाण्याचा शंकरा व्यापिले तये ।
जाहला कंठ तो निल भूषणो जाहले हरा ॥ ४३ ॥
परोपकारि ते संत परार्थ दुःख झेलिती ।
परंतु नच ते दुःख पूजा ही हरिची असे ॥ ४४ ॥
देवाधिदेव तो सांब सर्वांचे हित साधितो ।
सती ब्रह्मा प्रजा विष्णू प्रशंसू लागले हरा ॥ ४५ ॥
वीष ते प्राशिता शंभू ठिबके अल्प तेधवा ।
पडता विंचु सर्पादी वीषवल्ली पिल्या तया ॥ ४६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ ८ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP