समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ६ वा

देवता व दैत्यांचा समुद्रमंथनाचा प्रयत्‍न -

श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
सुरांनी स्तविता ऐसे भगवान्‌ हरीरीश्वरो ।
हजारो सूर्यशा तेजे सर्वांमध्येचि ठाकला ॥ १ ॥
दीपले नेत्र सर्वांचे नच तो दिसला कुणा ।
पृथिवी देह आकाश सर्व तेजात लोपले ॥ २ ॥
भगवान्‌ शंकरो ब्रह्मा यांनी केवळ पाहिला ।
सौंदर्य दिसले श्रेष्ठ दोघांनी नमिले तया ॥
नीलमण्यापरी देह विमलो श्यामसुंदर ।
आरक्त नयनो जैसे रक्तकमलवर्ण तो ॥ ३ ॥
पीतवस्त्रास त्या छान दशालालहि शोभल्या ।
सर्वांगसुंदरो देह रोम रोमात मोद तो ॥
भुवया धनुच्या ऐशा अतीव सुंदरो मुख ।
महामणी किरीटात हातास बाजुबंद ते ॥ ४ ॥
कपोल शोभले छान कुंडलीतेज फाकता ।
कर्धनी कमरेला छाती हाती कंकण वाजती ॥ ५ ॥
गळ्यात हार नी पायीं नूपुरे शोभली तशी ।
श्रीवत्सचिन्ह वक्षास गळा कौस्तुभ, माळही ॥ ६ ॥
सुदर्शनादि अस्त्रे ती मूर्तिमान्‌ सेनिं राहिले ।
सर्वही देवतांनी त्या साष्टांग नमिले तयां ॥
सर्वांच्या सह त्या ब्रह्मे शंकरे स्तविला हरी ॥ ७ ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
(इंद्रवज्रा)
जन्म स्थिती नी लयि जो न गुंते
    जो सागरो मोक्षस्वरुप मोद ।
सूक्ष्माति सूक्ष्मो गगनापरीही
    महानुभावासि नमो नमो त्या ॥ ८ ॥
भद्रार्थ विप्रो पुरुषोत्तमारे
    वेदोक्त गाती रुप पंचरात्री ।
तुझ्यात सारे दिसतेचि विश्व
    माझाहि तू तो जनिताच होय ॥ ९ ॥
तुझ्यात हे विश्व सुलीन होते
    मधे नि अंती तुज‌आत राही ।
तू कारणी कार्य ययीं स्वतंत्र
    घटात माती जसि आदि अंती ॥ १० ॥
मायेकडोनी रचितोस विश्व
    नी सूप्त त्यांच्या मधि तू विराजे ।
विवेकि ज्ञानी अति सावधाने
    निर्गूणरूपा अनुभावतात ॥ ११ ॥
गायी कडोनी दुध अग्नि काष्ठी
    जलान्न भूमीत नि द्रव्य कष्टे ।
जै सर्व वस्तु मिळतात युक्त्ये
    विवेकि बुद्धी तसि योजितात ।
त्या भक्ती ज्ञाने तुज जाणितात
    नी जाणिवे वर्णिति गूण सारे ॥ १२ ॥
हे पद्म्‌नाभा वनव्यात हत्ती
    जै भाजता हो सुखि आम्हि तैसे ।
या दर्शनाने सुखि आम्हि तैसे
    आसूसलो कैक दिनात ज्याते ॥ १३ ॥
बाहेर तू तै अन आत आत्मा
    धरूनि हेतू तव पायि आलो ।
तू साक्षि तेंव्हा तुज काय बोलो
    कृपा करोनी करि पूर्ण हेतू ॥ १४ ॥
मी शंकरो अन्यहि देवता नी
    प्रजापती नी ऋषि सर्वदेव ।
अग्नीचिया त्या ठिणग्या विभक्त
    तैसे तुझे अंशस्वरुप आम्ही ।
कल्याण व्हाया द्विज देवतांचे
    आदेश द्यावा अन ते घडावे ॥ १५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
ब्रह्मादि देवे स्तवुनी असे तै
    जिंकोनि चित्ता उठले हळूच ।
जोडोनि हाता मग स्तब्ध झाले
    गंभीर शब्दे हरी बोलला त्यां ॥ १६ ॥
(अनुष्टुप्‌)
सर्वांचा स्वामि तो राजा ! एकटा तो समर्थची ।
परी समुद्र मंथाया बोलला देवतांसि तो ॥ १७ ॥
श्री भगवान म्हणाले-
ब्रह्मा शंकर नी सारे ऐका सावध हो‌उनी ।
ऐकता होय ते सर्व कल्याणमयची तसे ॥ १८ ॥
असुरांवरती आता आहे काळकृपा पहा ।
तुमचा काल येईतो तयांशी संधि साधणे ॥ १९ ॥
कार्य साधावया थोर शत्रुशी संधि साधणे ।
कार्य होता पुन्हा सर्प उंदिरा परि राहणे ॥ २० ॥
विलंब न करा कांही अमृत शोधणे त्वरे ।
पिताच मरणारेही अमरो होत सर्वथा ॥ २१ ॥
तृण काड्या नि त्या वेली टाकाव्या क्षीरसागरी ।
मंदराचल तो न्यावा वासुकीसर्प दोर तो ॥
माझे सहाय्य घेवोनीं समुद्र मंथनो करा ॥ २२ ॥
न वेळ आळसाची ही प्रमाद नच तो घडो ।
विश्वास ठेवणे शब्दी श्रम ते दानवास नी ॥
तुम्हास फळ ते सर्व अनायासे मिळेल की ॥ २३ ॥
तुमच्या कडुनी जे जे असुर मागतील ते ।
सर्वची करणे मान्य शांतीने कार्य साधते ॥ २४ ॥
निघेल विष ते आधी काळकूट भयंकर ।
न भ्यावे त्याजला तैसे अन्य लोभ नको मनीं ॥
नको इच्छाच वस्तूची न क्रोधा न मिळे तदा ॥ २५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
सांगोनी गुप्त ते झाले भगवान्‌ पुरुषोत्तम ।
स्वतंत्र शक्तिमान्‌ त्याचे रहस्य कोण जाणती ? ॥ २६ ॥
जाताचि शिव ब्रह्माने नमिले त्याजला पुन्हा ।
दोघे स्वधामा गेले नी इंद्रादी बळिच्या कडे ॥ २७ ॥
शस्त्रास्त्राविणची गेले बघता दैत्य कोपले ।
इच्छिले बांधण्या त्यांना बळीने रोधिले तदा ॥
कीर्तिमान्‌ बळि तो राजा संधी आदीस जाणता ॥ २८ ॥
त्रिलोक जिंकुनी सर्व संपत्ती मिळवोनिया ।
राजसिंहासनी राजा बसला बळि निर्भय ॥ २९ ॥
बुद्धिमंत असा इंद्र गोड शब्दात बोलला ।
हरिने बोधिले तैशी साधिली संधि तेधवा ॥ ३० ॥
बळीला रुचले सर्व शंबरारिष्ट नेमि नी ।
त्रिपूरनिवसी दैत्या रुचली गोष्ट ही तशी ॥ ३१ ॥
समजावुनि ती संधी मित्रता साधिली अशी ।
मेळिण्या अमृता सर्व मंथोनोद्योगि लागले ॥ ३२ ॥
मंदराचल सर्वांनी कोरिला सर्व बाजुनी ।
जय्‌ घोषे उचलोनीया निघाले सागराकडे ॥
शक्तिचा गर्व तो होता बलदंड शरीर ही ॥ ३३ ॥
मोठा पर्वत तो होता खूप अंतर ही तसे ।
बळी इंद्र तसे सर्व अर्ध्यात थकले पहा ॥
रस्त्यात टाकिला त्यांनी विवश हो‌उनी गिरी ॥ ३४ ॥
सोन्याचा गिरि तो मोठा पर्वतो मंदराचलु ।
कितेक देवता दैत्य तया खालीच चेपले ॥ ३५ ॥
हात कंबर नी खांदे तुटले मन ही तसे ।
उत्साह संपता सर्व गरुडी हरि पातला ॥ ३६ ॥
पाहिले पर्वताखाली देव दैत्य चुरा असे ।
कृपेने पाहता त्यांना पहिल्यापरि जाहले ॥ ३७ ॥
घेतला एक हातेची गिरि तो खेळणी परी ।
गरूडी ठेविला आणि स्वयेही बैसले वरी ॥
असूर देवता यांच्या सवे सागरि पातले ॥ ३८ ॥
पक्षिराज गरूडाने तटी तो गिरि ठेविला ।
निरोप हरिने देता गरूड निघला पुढे ॥ ३९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥ ८ ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP