समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ५ वा
देवता ब्रह्मदेवाकडे जातात, ब्रह्मदेव भगवंताची प्रार्थना करतात -
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
राजा ! गजेंद्र मोक्षाची लीला ही पापनाशक ।
रैवत् मन्वंतरा ऐक आता मी सांगतो पुढे ॥ १ ॥
तामसो मनु तो चौथा त्याचा बंधुचि रैवत ।
पाचवा मनु हा त्याला बली विंध्यार्जुनो सुत ॥ २ ॥
विभू इंद्र तदा होता भूतरयादि देवता ।
हिरण्यरोमा वेदशिरा सप्तर्षी ऊर्ध्वबाहु ते ॥ ३ ॥
पत्नी विकुंठा शुभ्राची वैकुंठ श्रेष्ठ देवता ।
नावाने उदरी जन्म भगवंतेच घेतला ॥ ४ ॥
लक्ष्मी प्रसन्न करण्या तेणे धामासि निर्मिले ।
वैकुंठभुवनो श्रेष्ठ सर्व लोकात ते पहा ॥ ५ ॥
वैकुंठपतिचे गूण संक्षेपे पूर्वि बोललो ।
जेवढे पृथ्विचे रेणू तेवढे गुण विष्णुचे ॥
गुणास वर्णिण्या पात्र जगात कोण तो असे ॥ ६ ॥
चक्षूचा चाक्षुसो पुत्र सहावा मनु जाहला ।
पुरू पुरुष सुद्युम्न आणीक पुत्र त्याजला ॥ ७ ॥
मंत्रद्रुम तदा इंद्र आप्यादी देवता गण ।
हविष्मान् वीरको आदी होते सप्तर्षि तेधवा ॥ ८ ॥
वैराजपत्नि संभूतीपोटी अजित जाहला ।
प्रगटले तदा ईश अंशावतार घेउनी ॥ ९ ॥
समुद्र मंथिला त्यांनी देवांना ती दिली सुधा ।
कच्छरुप धरोनीया मंदराचल पेलिला ॥ १० ॥
राजा परीक्षिताने विचारले -
भगवन् ! भगवंताने समुद्र मंथिला कसा ।
कोणत्या कारणे त्याने गिरी पाठीसि घेतला ॥ ११ ॥
देवतांना कसे त्याने अमृत पाजिले असे ।
आणीक कोणत्या वस्तू निघाल्या मंथनी तदा ॥
अद्भूत खेळ हा त्याचा कृपया सांगणे मला ॥ १२ ॥
भक्तवत्सल तो देव तयाचे गुण वर्णिता ।
उत्सूक हृदयो होते ऐकण्यासी पुनःपुन्हा ॥
जेवण्या हृदयो नेच्छी जाळितो भवअग्नि त्यां ॥ १३ ॥
सूतजी सांगतात-
ऋषिंनो ! ऐकता प्रश्न शुकांनी अभिनंदिले ।
आणीक मंथनी लीला पुढती वर्णु लागले ॥ १४ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले-
राजा ही गोष्ट तेंव्हाची असुरे शस्त्र योजुनी ।
जिंकिले देवतांना त्या मेले कित्येक त्या रणीं ॥ १५ ॥
दुर्वासे शापिता तीन लोक इंद्रादि सर्व ते ।
श्रीहीन जाहले तेंव्हा यज्ञ धर्मादि लोपले ॥ १६ ॥
दुर्दशा पाहुनी इंद्र वरुणे आदि देवता ।
बोलले आपसामाजी परी मार्ग निघेचिना ॥ १७ ॥
सुमेरू पर्वती तेंव्हा सर्व ब्रह्माजिच्या कडे ।
पातले नम्र होवोनी बोलले सर्व विस्तृत ॥ १८ ॥
ब्रह्म्याने पाहिले इंद्र वायू आदीहि देवता ।
श्रीहीन जाहले सर्व वाईट स्थिति जाहली ॥ १९ ॥
एकाग्र करुनी चित्त ब्रह्म्याने स्मरला हरी ।
प्रफुल्लित मुखे तेंव्हा सर्वांना बोलले विधी ॥ २० ॥
(इंद्रवज्रा)
मी नी शिवो नी तुम्हि सर्व देव
मनुष्य दैत्यो असुरो नि पक्षी ।
वृक्षादि सारे अतिस्वल्प अंशे
विराटरूपा मधुनीच झालो ।
आम्ही तुम्ही सर्वचि अव्ययो त्या
पदासि जाऊ प्रभुच्या इथोनी ॥ २१ ॥
न कोणि त्याला जरि शत्रु मित्र
न त्या कुणीही जवळी नि दूर ।
सृष्टी स्थिती नी लय या प्रसंगी
स्वीकारतो तो त्रिगुणा क्रमाने ॥ २२ ॥
या वेळि त्याने धरिलेय सत्वा
रक्षावया ही स्थिती या जगाची ।
जगद्गुरुच्या शरणात जाऊ
तो प्रीयलोकार्थचि धाव घेई ॥ २३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
घेउनी देवता सार्या वैकुंठी चतुरानन ।
पातले अजितापासी परातप अशा भुमी ॥ २४ ॥
भुवना विषयी खूप होते सर्वेचि ऐकिले ।
परी ना दिसता कांही ब्रह्म्याने स्तविले असे ॥ २५ ॥
श्री ब्रह्मदेव म्हणाले -
(इंद्रवज्रा)
तू निर्विकारो अन सत्यरूप
अनंत आदी हृदयीनिवासी ।
आद्यो नि व्याप्तो नि अतर्क्य एक
वाणी पुरेना तव कीर्ति गाया ।
स्वतेजसा दैवत देव तूची
आम्ही नमितो तव पूज्य पाद ॥ २६ ॥
तू जाणिसी प्राण मनो नि बुद्धी
तू चेतवीसी विषयेंद्रियाला ।
तू अक्षरो नी सुखरुप ऐसा
आम्ही नमीतो तव पूज्य पाद ॥ २७ ॥
जीवास देहो रथ बैसण्याला
तयास चाके दश इंद्रियांची ।
सारथ्य माया अति वेग देई
रथास धूरी हरि त्या नमस्ते ॥ २८ ॥
जो ज्ञानरुपी प्रकृती पराय
अव्यक्त तो सर्व वस्तूत राही ।
आम्हात तोची वसुनी सदैव
ते संत भक्त्ये पुजिती तयाला ॥ २९ ॥
माया पटाने जिव जाणितो ना
तिच्यातुनी पार न होय कोणी ।
वसे जिवासी समभाव देव
माया गुणांना वश ठेवुनीया ।
न पावतो तो पुरुषार्थ योगे
कृपेचि लाभे नमितो तया मी ॥ ३० ॥
सत्वे तयाच्या ऋषि ते नि आम्ही
उत्पन्न झालो नच त्यास जाणो ।
असूर कैसे तमि त्यास जाणो
प्रभू असा त्या चरणा नमस्ते ॥ ३१ ॥
पृथ्वी तयाचे पद तोचि निर्मी
जरायुजो अंडज स्वेदजो नी ।
उद्भिज्ज जेथे वसती सदाचे
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ३२ ॥
हे शक्तिशाली जल वीर्य त्याचे
लोकत्रयो जन्मति वाढती तै ।
तेणेचि जीवीत सदा असे ते
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ३३ ॥
ती चंद्रमा तै श्रुति चित्त सांगे
आयू बलो अन्न नि वृक्ष राजा ।
तसाच निर्माण करी प्रजेला
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ३४ ॥
अग्नी प्रभूचे मुख शोभिवंत
यज्ञादि कर्मे तयि पूर्ण होती ।
तो आत राही जठराग्निरूपे
समुद्रि राही वडवानलो तो ।
तो अन्न निर्मी पचवीहि तोची
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ३५ ॥
ज्याच्या मुळे लाभत ब्रह्मलोक
जे धाम वेदां नित युक्त गाण्या ।
पवित्र सूर्यो नयने तयाची
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ३६ ॥
चराचराचा जिव वायु वाहे
त्याच्याचि प्राणा मधुनी असा हा ।
तो चक्रवर्ती अम्हि दास त्याचे
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ३७ ॥
श्रोत्रे दिशा नी हृदयो नि खाणी
आकाश नाभीतुनि जन्मले त्यां ।
जो पंचप्राणासहि आश्रयो तो
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ३८ ॥
ज्याच्या प्रसन्नेचि समस्त देव
क्रोधीशिवो बुद्धिमधोनि ब्रह्मा ।
वेदीं ऋषी इंद्रिय या मधोनी
प्रजापती शिश्न ययात झाला ।
बळात इंद्रो निपजोनि आला
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ३९ ॥
श्री वक्षस्थानी पितरेहि छायीं
स्तनात धर्मोनि अधर्म पृष्टी ।
शिरी नभो अप्सरा त्या विहारी
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ४० ॥
मुखात ज्याच्या द्विज वेद झाले
भुजातुनी क्षत्रिय नी बलो ते ।
मांड्यात वैश्यो पदिं शूद्र झाले
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ४१ ॥
ओठात प्रीती अन लोभ झाले
घ्राणात कांती पशु त्या त्वचेत ।
यमो भ्रुमध्ये क्षण पापण्यात
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ४२ ॥
ती पंचभूते अन कालकर्म
संते जया त्यागुनि त्या गुणांना ।
माया हरीची वदतात शास्त्रे
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ४३ ॥
माया गुणाला नच वश्य होतो
वायू परी नित्य असंग राही ।
जो शांत मोदे परिपूर्ण आत्मा
प्रसन्न होवो हरि तो अम्हाला ॥ ४४ ॥
(अनुष्टुप्)
शरणी पातलो येथे प्रसन्न मुख दाव ते ।
प्रसन्न होउनी आम्हा कृपया देइ दर्शन ॥ ४५ ॥
प्रसंगी घेशि तू रुपे आम्हा आम्हासी जे कठीणची ।
तुला ते सहजी शक्य तुला काय कठीण ते ॥ ४६ ॥
पडता विषयां लोभी गर्वी दुःखेचि भोगिती ।
कर्मात पडती कष्ट तेणे क्लेशचि वाढती ॥ ४७ ॥
अल्पसे वाहता तू ते तेही विफल ना कधी ।
हितैषी पुरुषो आहे प्रियात्मा भगवान् तुची ॥ ४८ ॥
मुळासी घालता पाणी शाखा पानासही मिळे ।
सर्वात्मा पूजिता तैशी आपुली प्रार्थनाहि हो ॥ ४९ ॥
तिन्ही काळाहुनी भिन्न तयात एक जीव जो ।
तर्काच्या पार तो आहे गुणातीत गुणी स्वयं ॥
तर्काच्या सत्वात जो स्थीर असा तू तुजला नमो ॥ ५० ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ ८ ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|