समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १८ वा

भगवान्‌ वामन प्रगटतात, बळीच्या यज्ञशाळेत प्रवेश -

श्री शुकदेवजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
ब्रह्म्ये स्तवीले हरिकीर्ति वीर्या
    ना जन्म ऐसा हरि त्याऽदितीच्या ।
तो चक्रधारी प्रगटे समोर
    पद्माक्ष पीतांबर शोभला तो ॥ १ ॥
तो श्यामवर्णी, मुख शोभले ते
    ती कुंडलेही विभवीत गाला ।
श्रीवत्सचिन्हांकित कंकणे ती
    किरीट डोई नुपुरे पदास ॥ २ ॥
गळ्यात होता वनमाला ल्याला
    नी गुंजती भृंग तिथे सदाच ।
कंठात ल्याला मणि कौस्तुभो तो
    तेथील अंधार मिटोनि गेला ॥ ३ ॥
दिशा तदा त्या उजळोनि गेल्या
    नद्या तळ्यांचे जळ स्वच्छ झाले ।
प्रजापतीच्या मनि हर्ष झाला
    गो विप्र सृष्टी सहि मोद झाला ॥ ४ ॥
(अनुष्टुप्‌)
द्वादशी भाद्रपद्‌ शुद्ध नक्षत्र श्रवणो तसे ।
मुहूर्त अभिजित्‌ वेळी जन्मले वामनो हरी ॥ ५ ॥
विजया द्वादशी ऐसी तेंव्हा पासूनि जाहली ।
माध्यान्ही सूर्य तो होता आकाशी स्थितची तदा ॥ ६ ॥
तदा मृदंग नी शंख डफ भेरीहि वाजल्या ।
विवीध वाजली वाद्ये तुतारिध्वनि जाहला ॥ ७ ॥
नाचल्या अप्सरा हर्षे गंधर्वे गीत गायिले ।
देवता मुनि नी अग्नी स्तुति ते करु लागले ॥ ८ ॥
सिद्ध विद्याधरो तैसे किंपुरुष नि किन्नरो ।
चारणो राक्षसो यक्ष पक्षी नी नागदेवता ॥ ९ ॥
नाचुनी गाउनी सारे प्रशंसा करु लागले ।
अदिती आश्रमा त्यांनी फुलांनी झाकिले तदा ॥ १० ॥
(इंद्रवज्रा)
आश्चर्य झाले अदितीस तेंव्हा
    पाही जधी पुत्र पुरूष विष्णू ।
नी कश्यपाही मनि हर्ष तैसा
    होताचि जय्‌जय्‌ ध्वनि बोलले ते ॥ ११ ॥
अव्यक्त चिद्‌रूप असोनि देवो
    आभूषणांच्या सह जन्मला नी ।
त्या पाहता पाहता त्याच वेळी
    झाला हरी वामन ब्रह्मचारी ॥ १२ ॥
(अनुष्टुप्‌)
मुनीही हर्षले सर्व पाहता वामनो बटु ।
पित्याच्या पुढती त्यांनी केले जातक कर्मही ॥ १३ ॥
तयाच्या व्रतबंधात स्वयें श्रीसविता यये ।
बोधिला मंत्र गायत्री बृहस्पत्येचि जानवे ॥ १४ ॥
पृथिव्ये मृगचर्मोनी चंद्राने दंड तो दिला ।
मातेने कौपिनो वस्त्र आकाशे छत्र ते दिले ॥ १५ ॥
कमंडलू वेदगर्भे कुश सप्तर्षिनी दिले ।
अक्षमाला महाराजा ! सरस्वति हिने दिली ॥ १६ ॥
भिक्षापात्र कुबेराने भिक्षावळ उमे स्वयें ।
यापरी वामनो यांचा जाहला व्रतबंध तो ॥ १७ ॥
लोकांनी बटुचा ऐसा केला सन्मान तेधवा ।
ब्रह्मतेजा मुळे देव अत्यंत शोभले तदा ॥ १८ ॥
कुशाने अग्निसी त्यांनी केले परिसमूहन ।
पूजिले परिस्तरणे समिधा अर्पिल्या तशा ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
ऐश्वर्य संपन्न असा बळी तो
    करीत आहे शत अश्वमेध ।
ऐकोनि यात्रेस बटू निघाला
    पदा पदाला झुकली धरा ही ॥ २० ॥
त्या नर्मदेशी भृगुकच्छस्थानी
    आरंभिला जो भृगुवंशियांनी ।
त्यांनी पहाता बटु वामनाला
    भासे जसा सूर्यचि तो उदेला ॥ २१ ॥
सदस्य विप्रो यजमान सर्व
    निस्तेज झाले बटु पाहता हा ।
हा यज्ञ पाह्या जणु सूर्य आला
    कां पातला हाचि सनत्कुमार ॥ २२ ॥
शुक्रे नि शिष्ये मनि कल्पना या
    करोनि ते आपसि बोलले नी ।
कमंडलू दंड नि छत्रधारी
    त्या वामने तेथ प्रवेश केला ॥ २३ ॥
(अनुष्टुप्‌)
कटीसी मेळखा मुंजी यज्ञोपवित ते गळा ।
बगली मृगचर्मोनी शिखा तैशी शिरावरी ॥ २४ ॥
येता तो मंडपामाजी शिष्य-अग्नी सहीत ते ।
जाहले निष्प्रभो आणि केले स्वागत वामना ॥ २५ ॥
गुट गुटीत ते अंग पाहता सर्व हर्षले ।
बळीही हर्षला तेंव्हा उच्चासन दिले तये ॥ २६ ॥
स्वागते अभिनंदोनी सपाद्य पूजिला हरी ।
विरक्त योगियालाही पडावा मोह तै असा ॥ २७ ॥
(इंद्रवज्रा)
धुता तयाचे पद पापनाशे
    स्वचंद्र मौळी धरि तीर्थ डोई ।
ते पाय आले बळिच्या इथे की
    धारीयले त्या बळिने शिरासी ॥ २८ ॥
राजा बळी म्हणाला -
(अनुष्टुप्‌)
सुस्वागतम्‌ द्विजपुत्रा आज्ञापा काय इच्छिता ।
वाटते ऋषिचे सर्व तपमूर्ति तुम्ही असा ॥ २९ ॥
पितरे तृप्त ते झाले वंश पावन जाहला ।
तुमच्या येथ येण्याने सफल यज्ञ जाहला ॥ ३० ॥
(इंद्रवज्रा)
द्विजात्मजा पाय येताचि येथे
    धुवोनि गेले मम पाप सारे ।
आम्हास यज्ञोफळ लाभले नी
    पवित्र झाली भुमि या पदांनी ॥ ३१ ॥
इच्छोनि कांहि जणु पातला तू
    वाटे अम्हाला तरि मागणे की ।
सोने गायि नि राजवाडे
    कन्या द्विजाची वरण्या हवी का ?
संपत्ति गावे रथ अश्व हत्ती
    हवे तसे ते मज माग सर्व ॥ ३२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हा ॥ ८ ॥ १८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP