समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २ रा
मगराकडून गजेंद्र पकडला जातो -
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
त्रिकूट गिरि तो होता घेरिला क्षीरसागरे ।
श्रीमान योजने उंच सुशोभित परीक्षिता ! ॥ १ ॥
लांब रुंद तसाची तो शिखरे स्वर्ण चांदि नी ।
लोहाची तीन ती दिव्य झळाळी दाहिही दिशा ॥ २ ॥
शिखरे सान ते कैक रत्नांनी तेज फाकले ।
अनंत जातिच्या वल्ली झरे कित्येक गात तै ॥ ३ ॥
धुती त्या सागरी लाटा पाय त्याचे सदैव की ।
हिरवळी परी भासे पाचुंची खडि तेथली ॥ ४ ॥
गुहांमाजी तिथे नित्य सिद्ध चारण अप्सरा ।
गंधर्व किन्नरे नाग विहारा नित्य नांदती ॥ ५ ॥
कड्यांच्या मधुनी त्याच्या गाण्यांचा तो प्रतिध्वनी ।
ऐकता मत्त ते सिंह गर्जती चेपण्यास त्या ॥ ६ ॥
जंगलात तळ्याकाठी झुंडिने प्राणि राहती ।
सुस्वरे गात ते पक्षी सुरोद्यानात नित्यची ॥ ७ ॥
नद्या सरोवरे होती तुडुंब स्वच्छ त्या जळें ।
तेजाळे वाळु रत्नांची न्हाती देवस्त्रिया तिथे ॥
गंधीत जल तै होई वायू गंधास नेइ त्या ॥ ८ ॥
हरीभक्त वरूणाची राईत बाग शोभली ।
ॠतुमान् नाव त्या बागा क्रीडती देविया तिथे ॥ ९ ॥
बहरो फळ पुष्पांचा सदैव वृक्ष शोभले ।
गुलाब पारिजातो नी चंपा आंबे अशोक नी ॥ १० ॥
मंदार कैक जातीचे जांभळी फणसे तशी ।
सुपारी नारळी आणि मोसंबी ताड अर्जुन ॥ ११ ॥
आवळी खजुरा लिंबू रिठा पालाश चंदन ।
बेहडा खैर नी बेल औदुंबर नि पिंपळ ॥ १२ ॥
देवदारो नि रुद्राक्ष लिंबादी वृक्ष कैक ते ॥ १३ ॥
डौरुनी शोभती वृक्ष बारामास वटादिही ।
सोनेरी कमळे तेथे पुष्करीं शोभती बहू ॥ १४ ॥
कुमुदोत्पल कल्हार शतपत्रादि पद्म ही ।
गुंजती मत्त भुंगे तै चक्रवाकादि हंस नी ॥ १५ ॥
थवे त्या सारसाचे नी बदके जल कुक्कुट ।
कोकीळ कूंजती नित्य जळीं मासे नि कासवे ॥ १६ ॥
फिरता हलता पद्म जळ गंधीत होतसे ।
कदंब वृक्ष वेलिंनी वेढिले वन सर्व ते ॥ १७ ॥
अशोक सोनचाफा नी कन्हेरी तुळशी तसे ।
अडुळसा शिसवी तैसे चमेली पारिजात नी ॥ १८ ॥
मोगरा मोतिया आदी शतपत्रादि वृक्ष ते ।
सदैव बहरो त्यांना शोभले ते सरोवर ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
तेथेचि हत्ती अन हत्तिणीत
गजेंद्र होता निवसोनि नित्य ।
तो कुंजरांचाचि अधीप तेथे
झाडीत वेतां तुडवीत राही ॥ २० ॥
गंधे तयाच्या वनराज व्याघ्र
गेंडे नि हत्ती अन वानरे ती ।
ते सर्प दंशी अन रानगाई
भिवोनि सारेचि पळोनि जाती ॥ २१ ॥
त्याच्या कृपे कोल्हि कुत्री नि रेडे
ती माकडे रीस नि सायळादी ।
ससे वराहो अन क्षुद्रजीव
सर्वत्र संचारति निर्भयो की ॥ २२ ॥
मागे तयाच्या पळती पिले नी
हत्ती नि हत्तीणित घेरिला तो ।
धाके तयाच्या गिरि कंपवावे
गंडस्थली गंधि सदैव भृंग ॥ २३ ॥
मदेचि नेत्री विव्हळोनि आला
व्याकूळला तृष्णित होउनीया ।
पराग गंधा मग हुंगिता तो
आला त्वरेनेचि सरोवरी त्या ॥ २४ ॥
सुधेपरी निर्मल तोय ते नी
गंधीत तैसे अतिगोड होते ।
शुंडी भरोनी बहु तो पिला नी
स्नाना करोनी मग शांत झाला ॥ २५ ॥
गजेंद्र चित्ती तयि मोहिला नी
जलें पिलांना मग न्हाउ घाली ।
हरिकृपेने ययि मत्त झाला
न जाणि की संकट पातले ते ॥ २६ ॥
असा गजेंद्रो बहु माजला नी
क्रोधेचि नक्रे धरिले तयाला ।
विपत्ति ऐसी बघताच शक्ती
लावीयली पै नच तो सुटे की ॥ २७ ॥
स्वामी असा तो अति संकटात
पाहूनि सारे गज दुःखि झाले ।
मुक्त्यर्थ सारे झटले बहू ही
तरी न झाला उपयोग कांही ॥ २८ ॥
लावोनि शक्ती गज-नक्र ठेले
गजेंद्र ओढी कधि नक्रराजा ।
नक्रे कधी त्या गजराजियाला
हजार वर्षे लढण्यात गेली ।
जिवंत दोघे तरि तेथ होते
देखोनि देवा नवलाव झाला ॥ २९ ॥
लढ्यात ऐशा गज क्षीण झाला
जळात नक्रा बळ वाढले की ।
उत्साह त्याचा बहु वाढला नी
लावोनि शक्ती अति ओढु लागे ॥ ३० ॥
देहाभिमानी मग तो गजेंद्र
त्या संकटी तै असमर्थ झाला ।
करोनि यत्नो बहु त्या गजेंद्रे
मनात अंती उपयोजिले की ॥ ३१ ॥
हा नक्र आहे हरिचाच फास
बलिष्ट साथी हत शक्त झाले ।
तो हत्तिणी त्या करतील काय ॥ ३२ ॥
तो काळसर्पो गिळण्यास धावे
भयेहि ध्याता हरि नक्कि पावे ।
मृत्यू सुखाने स्मरता तया ये
सर्वाश्रयो त्या प्रभुसी नमी मी ॥ ३३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ ८ ॥ २ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|