समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ३ रा
गजेंद्राकडून श्रीहरीची स्तुति आणि गजेंद्राची संकटातून मुक्ती -
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
बुद्धी दृढ करोनीया हृदयीं स्थापिता मनीं ।
स्मरता पूर्वजन्माते, गजेंद्रे स्तोत्र गायिले ॥ १ ॥
गजेंद्र म्हणाले -
“ॐ नमो भगवते वासुदेवाय ! ”
जगाचा कारणी ऐसा सर्व जीवास स्वामि जो ।
ज्या तेजे जग विस्तारे ईशा त्या हृदि मी नमी ॥ २ ॥
जग हे स्थिरले त्यात त्याच्याने दिसते असे ।
भासे तो याच रूपात स्वयं सिद्धास मी नमी ॥ ३ ॥
(इंद्रवज्रा)
वसोनि त्याच्या मधि विश्व सारे
दिसे कधी तो न दिसेहि ऐसा ।
साक्षी जगाचा मुळ तो स्वताचा
अतीत सर्वा नमितो तया मी ॥ ४ ॥
काळात लोको अन लोकपाल
लयासि जाता तम घोर दाटे ।
अनंत ऐसा परमात्म तेंव्हा
अलिप्त तोची मज ईश रक्षो ॥ ५ ॥
लीला तयाच्या नच गम्य कोणा
नटापरी तो बदलीहि वेश ।
न रूप त्याचे जगि कोणि जाणी
अवर्णनीयो मज ईश रक्षो ॥ ६ ॥
ज्या मंगला पाहण्याते सदैव
आसक्ति त्यागे व्रत घेति योगी ।
जे पाहती त्यां जगती विराज
योगेश्वरो हो मज साह्यभूत ।
गाती जयाची मुनि नित्य कीर्ती
माझी गती तो हरि नित्य आहे ॥ ७ ॥
न जन्म कर्मो नच नाम रुप
तो काय स्पर्शी गुणदोष त्याला ।
उभारण्या सृष्टि नि संहराया
माया स्विकारी तयि आपुली तो ॥ ८ ॥
(अनुष्टुप्)
परब्रह्म परेशाते परमात्म्या नमो नमः ।
अरूप बहुरूपी तो नमो आश्चर्य कर्मिका ॥ ९ ॥
नमो आत्मप्रदीपाला जीवसाक्ष्या नमो नमः ।
जो दूर वाणि चित्ताला परेशा त्या नमो नमः ॥ १० ॥
कर्म संन्यास योगाने वा कृष्णार्पण भावने ।
विवेकी शुद्ध जे होती मेळिती तेच त्याजला ॥
ज्ञानरूप स्वयें मुक्त कैवल्यदानि एकटा ॥ ११ ॥
तिन्ही गुणासि धारी जो शांत घोर नि मूढ या ।
क्रमाने धारि तो रूपे निर्भेळ समभाव जो ॥
ज्ञानघन प्रभू त्याला नमस्कार पुनःपुन्हा ॥ १२ ॥
सर्वांचा स्वामि तू ज्ञाता सर्वसाक्षी तुला नमो ।
स्वयं कारण नी मूळ तुजला नमितो पुन्हा ॥ १३ ॥
इंद्रिया विषया द्रष्टा जीवां आधार एकटा ।
असच्छायेतुनी होते प्रतीत तव रुप ते ॥
सर्वत्र भाससी तूची नमस्कार तुला असो ॥ १४ ॥
(इंद्रवज्रा)
तू कारणांचा मुळ एकला नी
तुला न त्याचा मुळि स्पर्श कांही ।
ओढे नद्यांना जयि सागराचा
तसाचि वेदा तव आश्रयोही ।
मोक्षस्वरूपा तुज संत सर्व
ध्याती म्हणोनी नमितो तुला मी ॥ १५ ॥
काष्ठात अग्नी जयि गुप्त राही
मायेत तैसा हरि गुप्त राही ।
क्षोभे गुणांनी रचितोस सृष्टी
अर्पोनि कर्मा भजती तुला जे ।
स्वयेंचि त्यांच्या हृदयात तूची
प्रकाशसी की नमितो तुला मी ॥ १६ ॥
(वसंततिलका)
मायाळु मुक्त करिती फसता पशूला
तूही तसाचि करिशी भवमुक्त जीवा ।
भक्तार्थ ना तुज मुळी मनि आळसो की
ऐश्वर्यपूर्ण तुजला नमितो हरी मी ॥ १७ ॥
देहादि पुत्र गुरु द्रव्य ययात गुंते
त्यांना मुळीच नच तू हरि पावशी की ।
जे मुक्त राहुनि तुला भजतात चित्ती
तू ज्ञानपूर्ण तुजला नमितो पहा मी ॥ १८ ॥
(इंद्रवज्रा)
धर्मार्थ कामो अन मोक्ष हेते
भजेल त्याला करिशी कृपा ती ।
नी पार्षदोही करिशी कधी तू
प्रभो दयाळू मज तारि वेगे ॥ १९ ॥
अनन्य प्रेमे भजती तुला जे
त्यां मोक्ष तुच्छो नच अन्य मोह ।
आनंद डोही रमतात ते नी
लीला तुझ्या मंगल गान गाती ॥ २० ॥
जो अक्षरो ब्रह्म परं परेश
अव्यक्त आध्यात्मिक योगगम्य ।
अनंत आदी अन ब्रह्मरूप
त्या आत्मरूपा स्तवितो असा मी ॥ २१ ॥
(अनुष्टुप्)
ज्याचा तेजांश घेवोनी ब्रह्माही सृष्टि निर्मितो ।
गुणांनी प्रगटे ईश न तो देव न आसुर ॥ २२ ॥
(इंद्रवज्रा)
पक्षी पशू ना नर स्त्री नि षंढ
मनुष्य नी अन्य न प्राणि कोणी ।
कर्मो नसे नी गुण कर्मकर्ता
न कारणी तो प्रभू त्या अलिप्त ॥ २३ ॥
गाळूनि चोथा मग शेष राही
तै रूप त्याचे उरते तळाशी ।
असा गुणातीत प्रभूच यावा
उद्धार माझा करण्या त्वरेने ॥ २४ ॥
ना मी जगूं इच्छितो हत्तियोनी
अज्ञानरुपी उपयोग काय ।
तेजार्थ मी हा तम त्यागु इच्छी
काळात मुक्ती प्रभू ना करी तो ॥ २५ ॥
(अनुष्टुप्)
विश्वाचा रचिता तोची विश्वरूप तयास मी ।
नमो ब्रह्म परेशाला अंतरात्म्या नमो नमः ॥ २६ ॥
जाळुनी वासना कर्म योगी योगास साधिती ।
जाणिती भगवंता ज्या तो प्रभू नमितो पुन्हा ॥ २७ ॥
(इंद्रवज्रा)
असह्य झाले गुणवेग माते
नमो तुला तू मन रूप तूची ।
न संयमी त्या तव प्राप्ति नाही
अनंत शक्ती तुजला नमस्ते ॥ २८ ॥
(अनुष्टुप्)
तुझी माया अहंकार आत्मरूपासि झाकिते ।
तेणे मी तुजसी नेणो अपार महिमा तुझी ॥
माधुर्यनिधि तू शक्त भगवान् तुजला नमो ॥ २९ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(वसंततिलका)
ऐशी गजेंद्र करिता स्तुति ती विशेष
ब्रह्मादि ते विविध देव न धावले तै ।
देवाधिदेव भगवान् परि सर्व आत्मा
तो श्रीहरी मग स्वयें प्रगटोनि आला ॥ ३० ॥
ते ऐकुनी त्वरित येहि जगन्निवास
शंखादि अस्त्र करि घेउनि त्या गरुडीं ।
त्या देवताहि गज जैं पिडला तिथे तैं
आल्या स्तवीत हरिला स्तुतिगीत सर्व ॥ ३१ ॥
व्याकूळ तो गज बघे हरि पातला तो
शुंडेचि कंज खुडुनी तइ फेकले ते ।
त्या श्रीहरीवरि नि कष्ट करुन बोले
नारायणाखिलगुरो तुजला नमस्ते ॥ ३२ ॥
नारायणे बघितला गज संकटी नी
सोडोनिया गरुड तो बहु धावले तै ।
नक्रासहीतचि गजा वर काढिले नी
चक्रेचि नक्र वधिला गज मुक्त केला ।
त्या देवता बघुनिया तयि मुग्ध झाल्या
सर्वां समक्ष हरिने चिरलाचि नक्र ॥ ३३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ ८ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|