समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १ ला
मन्वंतराचे वर्णन -
राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्)
स्वायंभूवमनूचा मी गुरो विस्तार ऐकिला ।
कन्यांचा वंशविस्तार सांगणे अन्य ते मनु ॥ १ ॥
द्विजा ! ज्ञानी महात्म्यांनी ज्या ज्या मन्वंतरातल्या ।
गायिल्या भगवद्लीला कृपया मजला वदा ॥ २ ॥
भगवन् ! भगवंताच्या भूत भावी नि आजच्या ।
मन्वंतरातल्या लीला सांगणे सर्व त्या मला ॥ ३ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले -
स्वायंभूवादि या कल्पी सहा मन्वंतरे अशी ।
जाहली पहिल्या मध्ये देवता जन्मला तदा ॥ ४ ॥
स्वायंभूवमनुपुत्री आकुती पासुनी हरी ।
यज्ञपुरूष रूपाने जन्मले धर्म सांगण्या ॥
कपिलो देवहूतीच्या पोटीही तेच जन्मले ।
ज्ञानाच्या उपदेशार्थ भगवान् जन्मले पुढे ॥ ५ ॥
कपील महिमा पूर्वी तिसर्या स्कंधि बोलिलो ।
आता आकूति गर्भाच्या लीला त्या सांगतो तुम्हा ॥ ६ ॥
विरक्त कामभोगासी झाले स्वायंभुवो मुनी ।
त्यागुनी राज्य ते गेले तपा सपत्न ते वनी ॥ ७ ॥
सुनंदा नदिच्या काठी एकपायावरी उभे ।
शतवर्ष तपो केले तपीं श्रीहरि ध्यायिला ॥ ८ ॥
मनुजी म्हणत होते -
जयाच्या चेतना स्पर्शे विश्व चेतन होय हे ।
परी विश्वाचिये स्पर्शे न लाभे चेतना जया ॥
जागा जो प्रलयामध्ये तया विश्व न जाणते ।
परी हे तत्व जो जाणी जाणावा तोचि ईश्वर ॥ ९ ॥
चराचर समस्तात भरला ओतप्रोत तो ।
म्हणोनी त्यागिता मोह निर्वाहा भोग भोगिणे ॥
हव्यास सोडणे सर्व कोणाचे सर्व हे धन ? ॥ १० ॥
भगवान् सर्वसाक्षी तो न दिसे बुद्धि इंद्रिया ।
ज्ञानशक्ति प्रभावे तो स्वतेजा स्मरणे सदा ॥ ११ ॥
आदि अंत नसे त्याला मग त्या मध्य कोठला ।
न आप-पर त्या कोणी सर्वत्र तोचि दाटला ॥
चालते जग ज्या सत्ते अनंत सत्य ब्रह्म तो ॥ १२ ॥
(इंद्रवज्रा)
तो विश्वरूपी परमात्म देव
अनंत नामे अन शक्ति तैशी ।
स्वयंप्रकाशी नच जन्म त्याला
जेठी असा तो अन निष्क्रियो ही ॥ १३ ॥
(अनुष्टुप्)
म्हणोनी कर्मयोगाते ऋषी प्रथम ध्यायिती ।
तेणे कर्मीहि निष्क्रिय होवोनी सुटती पुन्हा ॥ १४ ॥
श्रीहरी करितो कर्म परी आसक्त तो नसे ।
त्यानुसार अनासक्त राहता बंधमुक्ति हो ॥ १५ ॥
(इंद्रवज्रा)
तो ज्ञानरूपी अन पूर्ण कामी
म्हणोनि गर्वो नच कामना त्यां ।
स्वच्छंदरूपे करि सर्व कर्म
निवांत राही शिकवी जगाला ।
तो धर्मकर्ता अन जीवदाता
मी त्या प्रभूच्या शरणात आलो ॥ १६ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
अशा मंत्रोपनिषदा एकाग्र मनु ध्यायिता ।
झोपेत बरळे कोणी राक्षसा वाटले तदा ॥
भक्षिण्या पातले तेथे तुटोनी पडले पहा ॥ १७ ॥
पाहुनी यज्ञपुरुषे यामदेवांसि घेउनी ।
मारिले सर्व ते दैत्य इंद्राच्या पदि बैसले ॥ १८ ॥
स्वारोचिष पुन्हा झाला अग्निपुत्र मनू दुजा ।
रोचिष्मान् द्युमान् तैसे सुषेण पुत्र आदि त्या ॥ १९ ॥
तया मन्वंतरा मध्ये इंद्राचे नाम रोचन ।
तुषितादी प्रधान् देव सप्तर्षी ऊर्जस्तंभ ते ॥ २० ॥
वेदशिराऋषी यांच्या तुषिता उदरी तदा ।
भगवान् विभु या नामे जन्मले प्रभू ते पहा ॥ २१ ॥
ब्रह्मचारी व्रती झाले आजीवन विभूमुनी ।
ऋषी अनुचरे त्यांचे अठठयाऐंशी हजार ते ॥ २२ ॥
उत्तमो प्रियव्रत्पुत्र तिसरा मनु जाहला ।
पवनो सृंजयो तैसे यज्ञहोत्रादि पुत्र त्यां ॥ २३ ॥
सप्तर्षी प्रमदादी तै होते वासिष्ठय पुत्र ते ।
सत्य वेदश्रुतो भद्र प्रधान देवता गणो ॥
सत्यजित् नावचा होता स्वर्गीचा इंद्र तेधवा ॥ २४ ॥
सुनृता धर्मपत्नीच्या गर्भात पुरुषोत्तम ।
सत्यसेन अशा नामे जन्मले अंशरुप ते ॥
सत्यव्रत अशा नामे देवतागण सोबती ॥ २५ ॥
सखा इंद्रासि होवोनी असत् दुःशील राक्षसा ।
जीवद्रोही अशा भूतां तये संहार साधिला ॥ २६ ॥
तामसो मनु तो चौथा उत्तमाचाचि बंधु जो ।
नर केतू पृथू ख्याती इत्यादी दश पुत्र त्यां ॥ २७ ॥
सत्यको हरि नी वीर प्रधान देवता गण ।
त्रिशिखो नाम तै इंद्रा सप्तर्षी ज्योतिधाम तै ॥ २८ ॥
मन्वंतरात त्या झाले विधृती वैधृती द्वयो ।
नष्ट प्राय तदा वेदा तयांनी रक्षिले असे ॥ २९ ॥
हरिमेधा ऋषीपत्नी हरिणी पोटि तो हरी ।
नावाने अवतारो हा गजेंद्रा सोडिले जये ॥ ३० ॥
राजा परीक्षिताने विचारले -
मुनी ते ऐकण्या आम्ही सर्व उत्सुक तो असो ।
गजेंद्रा मगराचीया मिठीची सुटका कशी ? ॥ ३१ ॥
कथा सर्वोत्तमा ऐसी प्रशंसनीय पुण्यदा ।
मंगला शुभ जी आहे तीत कीर्तीहि गायिली ॥
हरिची संत थोरांनी पवित्र यशही तसे ॥ ३२ ॥
सूतजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
आजीव होता उपावासि राजा
ही ऐकण्याला हरिकीर्तने नी ।
शुकास राये वदता असे हे
हर्षोनिया तै मुनि बोलले ते ॥ ३३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ ८ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|