समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सातवा - अध्याय १५ वा

गृहस्थांकरिता मोक्षधर्माचे वर्णन -

नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
नृपा रे ! द्विज ते कोणी कर्मनिष्ठ कुणी तपी ।
स्वाध्यायी नी कुणी वक्ते अध्यात्मी योगि ते कुणी ॥१॥
गृहस्थे श्राद्ध-पूजेत ज्ञाननिष्ठासि दान दे ।
न मिळे ज्ञान निष्ठो तै वक्त्यासी बहु दान दे ॥२॥
देवकार्यात ते दोन पितृकार्यात तीन त्या ।
द्विजांना भोजने द्यावी पितृकर्मी न वाढवो ॥३॥
सोयरे स्वजनो यांची देहकालानुरूप ती ।
श्रद्धा पात्र पुजावस्तू न होय शुद्ध युक्त ते ॥४॥
ईशास भोग लावोनी श्रद्धेने दान देइजे ।
कामना पूर्ण तै होती अक्षयो लाभते फळ ॥५॥
देवता पितरे प्राणी स्वजनीं अन्न घे पुन्हा ।
स्वतात इतरामध्ये श्रीहरीरूप पहा ॥६॥
धर्मज्ञ पुरूषे श्राद्धीं मांस ते नच भक्षिणे ।
हविष्यान्ने तया शांती लाभे हिंसे न लाभते ॥७॥
सद्धर्म इच्छिती त्यांनी प्राण्यांना मन वाणिने ।
शरीरे कष्ट ना द्यावे श्रेष्ठ धर्म न तो दुजा ॥८॥
आत्मसंयमनो अग्नीमध्ये कर्मास हव्य दे ।
बाह्य कर्मासि त्यागावे संतसंगात हे घडो ॥९॥
द्रव्ययज्ञा यजो जाता भिती सर्वचि प्राणि ते ।
पोसोनी मारितो मूर्ख निर्दयी वदती मनीं ॥१०॥
धर्मज्ञे करणे हेची हविष्यान्नेचि हव्य हो ।
नित्य नैमित्तिको कार्यीं सदा संतुष्ट राहणे ॥११॥
विधर्म परधर्मो नी आभास उपमा छळ ।
शाखा पाच अधर्माच्या त्यागाव्या पाचही तशा ॥१२॥
धर्मबुद्धीस बाधा जै विधर्म म्हणणे तया ।
तिसर्‍या करिता बोध परधर्म असाचि तो ॥
दंभ पाखंड या नाम उपमा उपधर्म तो ।
शास्त्रवाक्या दुजा अर्थ तयासी नाम ते छळ ॥१३॥
आश्रमावेगळा धर्म आभास नाम त्या असे ।
वर्णाश्रमोचितो धर्म श्रेष्ठ तो जरि शांति ना ॥१४॥
असता निर्धनी संत धर्म वा जगण्यासही ।
धनार्थ नच कष्टावे ईश निर्वाह चालवी ॥१५॥
रमता आत्मरूपात संतोष सुख लाभते ।
धनासाठी फिरे नित्य तया ते न मिळे कधी ॥१६॥
काट्यांचे भय ना राही जोडे पायात घालता ।
संतोष असता चित्ती त्याला दुःख नसे तसे ॥१७॥
जळे निर्वाह तो होई गुंततो विषयी परी ।
घरासी राखितो कुत्रा तसा लाचार होतसे ॥१८॥
असंतुष्ट असा विप्र इंद्रियी लुब्ध त्याचिये ।
यश विद्या तपो तेज विवेक क्षीण होतसे ॥१९॥
खाता पिता मिटे इच्छा क्रोध इच्छेत शांत हो ।
परी पृथ्वीवरी राज्य होताही लोभ ना सरे ॥२०॥
शास्त्राचा अर्थ लावोनी मिटवी कुणि पंडित ।
ज्ञाता तो असता लोभी तरीही घसरे पुढे ॥२१॥
संकल्प त्यजुनी काम इच्छा त्यागोनि काम तो ।
धना त्यागोनि लोभाला विचारे भय जिंकिणे ॥२२॥
विद्येने शोक नी मोह संतसेवेचि दंभ तो ।
मौनेचि विघ्न योगाने जिंकोनी प्राण नी तनू ॥
निचेष्ट करणे तेंव्हा विजयासन ते मिळे ॥२३॥
दयेने भौतिकी दुःख दैवदुःख समाधिने ।
अध्यात्मदुःख योगाने विहारे झोप जिंकिणे ॥२४॥
सत्वे तम रजा जिंको सत्वा उपरते पुन्हा ।
गुरूकृपा असे तेंव्हा साधका सहजी जमे ॥२५॥
ज्ञानदीप गुरू लावी प्रत्यक्ष भगवान्‌ गुरू ।
माणूस बघता त्याला ज्ञान कुंजरस्नानवत्‌ ॥२६॥
श्रेष्ठ योगेश्वरो ध्याती पदांबुत गुरूचिये ।
गुरू प्रत्यक्ष तो विष्णु भ्रमाने जीव भासतो ॥२७॥
शास्त्राचे सार ते एक षड्रिपू जिंकणे असे ।
त्याविना ध्यान ते व्यर्थ उरती कष्ट केवळ ॥२८॥
शेती व्यापार आदीत भक्ती वा मुक्ति ना मिळे ।
दुष्टांचे कर्म ते तैसे कल्याण मुळि त्यात ना ॥२९॥
मनाला जिंकिणे त्याने आसक्ती नी परीग्रहा ।
त्यागिता घेइ संन्यास एकांती राहणे सदा ॥
भिक्षावृत्ती धरोनीया मिताहारचि भक्षिणे ॥३०॥
राजा ! आसन मेळावे समान पाहुनी भुमी ।
स्वल्प नी स्थिर भावाने ॐकारा जपणे तये ॥३१॥
संकल्प नि विकल्पांना जर ना सोडिते मन ।
पूरके कुंभके प्राण अपानी गति रोधणे ॥३२॥
कामघायाळ ते चित्त भटके दूर दूर ते ।
तेथुनी परती आणा हळू रोधा तया हृदीं ॥३३॥
इंधने सरती तेंव्हा अग्नि तो शांत होतसे ।
थोड्या त्या समयामाजी चित्त तै शांत होतसे ॥३४॥
कामाच्या जखमा आणि वृत्तीही शांत होत त्या ।
ब्रह्मानंदास ते चित्त स्पर्शिता मागुती न ये ॥३५॥
गृहस्थीधर्म सोडोनी पुन्हा इच्छी यती असा ।
उलटे श्वान नी खाय निर्लज्ज यति तो तसा ॥३६॥
अनात्मा मर्त्य हा देह राख विष्ठा कृमी जसा ।
मानिता मागुती मानी आत्मा देहास तो पुन्हा ॥३७॥
गृहस्थ कर्मत्यागी नी व्रतत्यागी बटू असा ।
ग्रामी राही तपस्वी नी लोभी संन्यासि चार हे ॥३८॥
आश्रमा डाग तो आहे व्यर्थ ढोंग असे पहा ।
मोहीत भगवत्‌माये उपेक्षा नित्य त्याजला ॥३९॥
ज्ञानाने जाळिता इच्छा आत्मरूपासि जाणिले ।
कसा पोषिल तो देहा वासना भोगण्या पुन्हा ॥४०॥
(इंद्रवज्रा)
इंद्रीय घोडे रथ हे शरीर
    लगाम चित्तो मति सारथी ती ।
आरे दहा त्या रथचक्रि जाणा
    अधर्म धर्मो तयि चक्र दोन ॥४१॥
रथात गर्वी जीव बैसलेला
    ॐकार हाती धनु-बाण आत्मा ।
रथी तयाचे असु लक्ष ईश
    तयात त्याला करणे विलीन ॥४२॥
(अनुष्टुप्‌)
राग द्वेष भयो शोक लोभ मोह मदो तसे ।
मानापमान नी निंदा हिंसा तृष्णा प्रमाद तो ॥४३॥
भूक मत्सर हे शत्रू रजो नी तम वृत्ति ह्या ।
सत्वगुण प्रधानीही वृत्ती त्यां दिसती कधी ॥४४॥
(वसंततिलका)
अंकीत हा रथ असे अन ठाकठीक
    तेणे गुरूपद भजो अन ज्ञानशस्त्रे ।
शत्रू समस्त करणे मग नष्ट तेंव्हा
    सिंहासनास बसणे मग देहत्याग ॥४५॥
थोडा प्रमाद घडता मग दुष्ट घोडे
    नी सारथी उलट नि लुट-मार जेथे ।
ते चोरटे धरिती अश्व नि सारथ्याला
    मृत्यूसमान तमकूपिच टाकति की ॥४६॥
(अनुष्टुप्‌)
प्रवृत्ती नी निवृत्ती हे दो मार्ग वेदकर्मिचे ।
प्रवृत्तीने पुन्हा जन्म नी निवृत्तीत मोक्ष तो ॥४७॥
हिंसाद्रव्यमयी याग अग्निहोत्र नि दर्श ते ।
चातुर्मास्य पूर्णमास्य पशू सोमादि यागहि ॥४८॥
मंदिरे बगिचे प्याऊ पूर्तकर्मचि मानणे ।
सकामयुक्त ते सर्व अशांती मिळते तये ॥४९॥
प्रवृत्तीपर तो जीव धूमाभिमानि देवता- ।
पासानि फिरूनी जातो चंद्रलोकात राहण्या ॥५०॥
संपता भोग ते सर्व क्षीण होवोनि वृष्टित ।
औषधी अन्नरूपाने वीर्यमार्गेचि जन्मतो ॥५१॥
ज्यांचे सोळाहि संस्कार होती ते द्विज जाणणे ।
इष्टपूर्तक्रियायज्ञां हविती इंद्रियात ते ॥५२॥
इंद्रियांना मनामध्ये मनाला वाणिच्या मधे ।
वर्णात वाणिला तैसे वर्णाला त्या अउम्‌ मध्ये ॥
ॐकारा स्थिरबिंदूत बिंदुनादात नाद तो ।
प्राणात सूत्र रूपाने प्राण ब्रह्मात लीन हो ॥५३॥
अग्नी सूर्या दिने सायं शुक्ले नी उत्तरायणी ।
देवता अभिमानीच्या कडोनी ब्रह्मलोक नी ॥
पुढे विश्वीं पुढे तेजी निवृत्तीनिष्ठ जातसे ।
प्राज्ञ होतो पुढे तैसा साक्षीचा सर्वव्यापकू ।
दृश्य लोप असा आत्मा तुरीया मोक्ष मेळवी ॥५४॥
देवयान असा मार्गी आत्मोपासक यामुळे ।
ब्रह्मलोका मधे जातो येतो मृत्युसि तो पुन्हा ॥५५॥
पितृ-देवो द्वयो यान वेदोक्त मार्ग हे असे ।
तत्वाला जाळिले ज्याने तो ना मोहात गुंततो ॥५६॥
जन्मता कारणीरूपे मरता अवधीरूपे ।
भोगरूपेचि बाहेर भोक्तारूपात आत तो ॥
विषयां विषयो तोची तत्ववेत्ता स्वयंहि तो ।
तमांधकारही तोची मोहाचा स्पर्श ना तया ॥५७॥
अस्तित्व नसता त्याला तरी वस्तूत तो दिसे ।
असंभव असोनीया सत्याच्या परि भासतो ॥५८॥
नसे तो पंचभूतांचा विकार त्याजला नसे ।
असे नसे असा होय मिथ्या तो म्हणुनी असे ॥५९॥
पंचभूतांतुनी भिन्न नव्हेत त्यास इंद्रिये ।
असत्‌ सिद्ध असा होतो स्वयंसिद्धचि होतसे ॥६०॥
अज्ञाने एकची वस्तू विविधा भासते परी ।
सरता भ्रम तो एक मूळ वस्तुचि ती दिसे ॥
मोहे भिन्नत्व ते भासे तोवरी शास्त्र हे असे ॥६१॥
भावद्वैत क्रियाद्वैत द्रव्यद्वैत अशा तिन्ही ।
विचारे पाहतो आत्मा साक्षात्कारी तिन्ही रूपी ॥६२॥
दोर्‍याने वस्त्र ते होते कार्यमात्रचि कारण ।
न भेद मुळि दोघात भाव द्वैत तसाचि तो ॥६३॥
मन वाणी शरीराने घडते कर्म सर्व ते ।
घडते ईश इच्छेने मानणे कृष्ण अर्पण ॥
क्रियाद्वैत यया नाम जाणणे रे युधिष्ठिरा ॥६४॥
स्त्रिया पुत्र सखे स्नेही समस्त प्राणियांचिये ।
स्वार्थ नी भोग ते एक द्रव्य द्वैत असा असे ॥६५॥
सन्मार्गे अर्जिणे द्रव्य सत्कार्यी सर्व वेचिणे ।
संकटाविण न व्हावा तयाचा संग्रहो मुळी ॥६६॥
महाराजा ! हरिभक्त वेदोक्त कर्म आचरे ।
अथवा अन्य कार्याने घरी ही गति पावतो ॥६७॥
(इंद्रवज्रा)
युधिष्ठिरा ! तू तव स्वामि कृष्ण
    कृपेमुळे संकट पार होसी ।
जिंकीयले तू पृथिवीस सार्‍या
    मोठेहि यज्ञे करिशी कृपेने ॥६८॥
(अनुष्टुप्‌)
पूर्वकल्पामधे माझा जन्म गंधर्व तो असे ।
उपबर्हण हे नाम सन्मानित असे बहू ॥६९॥
माझे रूप नि कौमार्य माधुर्यहि अपूर्व ते ।
सुगंध शरिरा ये नी दिसेही चांगला तसा ॥
स्त्रिया त्या लुब्धती नित्य प्रमादी रत मी असे ॥७०॥
एकदा देवतांमध्ये ज्ञानसत्रचि जाहले ।
थोर प्रजापती आले भगवान्‌ कीर्ति ऐकण्या ॥
गंधर्व अप्सरा यांना गायनास निमंत्रिले ॥७१॥
संतांच्या समुहामध्ये गावी ती हरिकीर्तिची ।
जाणी मी परि त्या तेथे स्त्रियांच्यासह पातली ॥
उन्मत्त होवुनी चित्ती लौकिक गीत गायिलो ।
देवता अवमानाते नच, साहून बोलल्या ।
सौंदर्य नष्ट हे होवो शुद्रयोनीत जन्म घे ॥७२॥
शापाने दासिचा पुत्र जाहलो परि जन्मि त्या ।
घडली संतसेवा नी ब्रह्मपुत्रचि जन्मलो ॥७३॥
संतांचा अवमानो नी संतसेवीं अशी फळे ।
प्रत्यक्ष भोगिले मी त्या सत्संगी भगवान्‌ मिळे ॥
पापनाशक हा धर्म गृहस्थांचा कथीयला ।
संन्याशासी मिळे ऐसे श्रेष्ठची की परंपद ॥७४॥
(इंद्रवज्रा)
जगात सार्‍या तुम्हि भाग्यवंत
    कैवल्यलेणे घरि नांदते की ।
ऋषी जगा जे करिती पवित्र
    ते दर्शना त्या नित येथ येती ॥७५॥
ध्याती सदा संत बघावयाते
    ते शांत ब्रह्मो परमात्म कृष्ण ।
तुम्हा गुरू मित्र नि पूज्य दास
    हितैषि आहे अन मातुळाचा ॥७६॥
ब्रह्मादिदेवा नच शक्य झाले
    रूपास गाणे हरि तोचि कृष्ण ।
मौनेचि आम्ही पुजितो तयाला
    पावो अम्हा श्रीहरि कृष्णदेव ॥७७॥
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता ! अशा बोला ऐकता नृप तोषला ।
झाला विव्हळही प्रेमे पूजिले कृष्णनारदा ॥७८॥
सत्कार घेउनी तेंव्हा निरोप घेउनी पुढे ।
गेले ब्रह्मर्षि तेथोनी राजहर्षास ना सिमा ॥७९॥
परीक्षिता ! असा मी हा दक्ष विस्तार वंशिचा ।
स्वतंत्र बोललो सर्व जयीं देव मनुष्य नी ॥
पशूपक्ष्यादि नी सर्प चराचराचि सृष्टि ही ॥८०॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥ ५ ॥ १५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP