समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सातवा - अध्याय १४ वा

गृहस्थासंबंधी सदाचार -

राजा युधिष्ठिराने विचारले -
(अनुष्टुप्‌)
माझ्या ऐशा गृहस्थाला सहजी साध्य हे कसे ।
देवर्षी कृपया सांगा प्राप्त्यर्थ काय साधणे ॥१॥
नारदजी म्हणाले -
राजा ! गृहस्थधर्माने गृहस्थे वागणे असे ।
कृष्णार्पण असो बुद्धी संतसेवा घडो सदा ॥२॥
विरक्तसंगमी जावे आकाशापरि मोकळे ।
भगवद्‌लीला -सुधापान श्रद्धेने करणे सदा ॥३॥
भंगता स्वप्न ना होतो मोह वस्तूत स्वप्निच्या ।
तशी शुद्ध मती व्हावी नाशवंतचि सर्व हे ॥४॥
बुद्धिवंते तनू गेहा गरजेपुरते बघो ।
विरक्त राहणे चित्ती बाह्य सामान्य राहणे ॥५॥
पितरे बंधुपुत्रादी तयांच्यापरि वागणे ।
परी आत नको माया सर्वांशी वागणे असो ॥६॥
लाभता अन्न नी सोने ईशाची देण मानणे ।
भोगता नच तो संच साधूसेवा घडो सदा ॥७॥
अधिकार जिवाचा तो पोटाच्या पुरता असे ।
अधीक संचित द्रव्य चोर तो दंडितीच त्यां ॥८॥
मृग उंट गधे चूहे सर्पादि पक्षि कीटही ।
पुत्राच्या परि ते माना न भेद मुळि त्या द्वयीं ॥९॥
धर्मार्थ काम यांच्यात न कष्ट पडती बहू ।
परी दैवे जसे लाभे त्यात संतुष्ट राहणे ॥१०॥
कुत्रे चांडाळ पाप्यांना योग्य तो भाग अर्पुनी ।
लागावे आपुल्या कामा सपत्‍नी अतिथी पुजा ॥११॥
स्त्रियेशी अर्पिती लोक स्वप्राण ! पितरे गुरू ।
यांनाही मारिती ठार ममता सोडि साधु तो ॥१२॥
राखेचा ढीग विष्ठा किडेही तनु भक्षिती ।
तिची आसक्ति सोडावी आत्म्यासी पाहणे सदा ॥१३॥
शेष जो पंच यज्ञाचा गृहस्थे तोचि भक्षिणे ।
राखणे तेवढे स्वत्व मानावा तोचि संत की ॥१४॥
देवता ऋषि नी पित्रे माणसे भूत आणि तो ।
स्वप्राण पूजिणे रोज प्राप्त सामग्रि योजुनी ॥१५॥
सामर्थ्य असता थोर श्रेष्ठ ते यज्ञ योजुनी ।
अथवा अग्निहोत्राने पूजावा भगवान्‌ हरी ॥१६॥
भगवान्‌ सर्व यज्ञाच्या हविष्यान्नेचि तृप्त हो ।
परी द्विजमुखाने तो विशेष तृप्त होतसे ॥१७॥
म्हणोनी योग्य वस्तूंनी देवतादीमधील तो ।
पूजावा श्रीहरी नित्य ब्राह्मणात विशेषची ॥१८॥
भाद्रपद अमास्येला धनीक द्विज ते करो ।
महालय असे श्राद्ध पितरे बंधु यांचिये ॥१९॥
संक्रांत व्यतिपाताला विषुवी नी दिनक्षयी ।
ग्रहणीं चंद्रसूर्याच्या द्वादशीच्या दिनी तसे ॥
अनुराधा धनिष्ठा नी नक्षत्र श्रवणात या ॥२०॥
अक्षयो तृतिया आणि अक्षयो नवमीसही ।
अगहन्‌ पौष माघात फाल्गून कृष्ण अष्टमी ॥
सप्तमी माघ शुक्लाची मघायुक्तचि पोर्णिमा ॥२१॥
मास नक्षत्र चित्रा नी विशाखा ज्येष्ठही युत ।
पूर्ण चंद्र न हो वा हो नक्षत्रे द्वादशीसही ॥२२॥
श्रवणो अनुराधा नी उत्तरा उत्तराषढा ।
उत्तरा भादवी योग तिघांचीच हरीदिनी ॥२३॥
सगळे करण्या श्राद्ध पुण्यकर्मास युक्तची ।
सर्व शक्तीस योजोनी करिता फळ लाभते ॥२४॥
पर्वकाळी अशा जाप्य व्रत होम तशी पुजा ।
देव ब्राह्मण यांची ती करिता फळ लाभते ॥२५॥
यज्ञदीक्षादि संस्कार श्राद्धादी पुंसव्रत ते ।
शुभ वेळी अशा व्हावे सर्व मंगल कर्म ते ॥२६॥
वर्णितो स्थान मी आता धर्मादी श्रेयप्राप्तिचे ।
पवित्र देश तो माना सत्पात्र मिळती जिथे ॥२७॥
चराचर उभे ज्यात हरीची प्रतिमा असो ।
तप विद्या दयायुक्त द्विजाचा परिवार हो ॥२८॥
भगवन्‌पूजने वार्ता गंगा आदी नद्या असो ।
कल्याणकारि ती माना सर्व स्थाने पवित्र ती ॥२९॥
सरोवरे पुष्करादी सिद्धांचे क्षेत्र ते असो ।
कुरूक्षेत्र गया आणि प्रयाग पुलहाश्रम ॥
फाल्गूनक्षेत्र नी तैसे नैमिषारण्य द्वारका ॥३०॥
सेतुबंध प्रभासो वा मथुरा काशि नी तसे ।
बद्रिकाश्रम नी तैसे पंपा बिंदुसरोवर ॥३१॥
अलक्‌नंदा चित्रकूट अयोध्या मलयो तसे ।
कुलपर्वत सगळे जिथे अर्चावतार ते ॥३२॥
पवित्र सगळे देश कल्याणा नित्य सेविणे ।
तेथिल्या नित्य कर्माचे सहस्त्रागुण ते फळ ॥३३॥
निर्णया जाणते ऐसे विवेकी सांगती असे ।
एक तो हरि सत्पात्र चराचर दिसे जये ॥३४॥
तुमच्या यज्ञिची गोष्ट देवता ऋषि सिद्ध नी ।
असोनी सनकादिक श्रीकृष्ण आद्य पूजनी ॥३५॥
ब्रह्मांडरूप वृक्षाचे श्रीकृष्ण एक मूळ ते ।
तयाच्या पूजनी सर्व जीवात्मे तृप्त होत ते ॥३६॥
पुरेही निर्मिले त्याने मनुष्य पशु पक्षि नी ।
ऋषी नी देवता देही झोपतो त्यात श्रीहरी ॥
म्हणोनी पुरूषो नाम तयासी बोलले असे ॥३७॥
एकरस असोनिया अधीक न्यून तो गमे ।
मनुष्य श्रेष्ठ सर्वात तपी सर्वात श्रेष्ठ तो ॥३८॥
त्रेतायूगामधे राजा ! विद्वाने पाहिले असे ।
मत्सरो वाढला लोकीं अन्याला अवमानिती ॥
विद्वाने प्रतिमा केल्या हरिसिद्धार्थ तेधवा ॥३९॥
कितेक भजती श्रद्धे तेव्हापासूनि मूर्ति या ।
जीवांना द्वेषिती त्यांना सिद्धी ना मिळते कधी ॥४०॥
युधिष्ठिरा मनुष्यात सुपात्र द्विज तो असे ।
तपे विद्ये नि संतोषे भगवद्‌ वेद रूप ते ॥४१॥
महाराजा तुम्ही मी नी सर्वात्म कृष्णदेव हा ।
सर्वाचे द्विज ते पूज्य तयांच्या पदधूळिने ॥
पावित्र्य मिळत लोका स्वर्ग पाताळ मृत्यु ते ॥४२॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥ ५ ॥ १४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP