समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सातवा - अध्याय १३ वा

यतिधर्माचे निरूपण आणि अवधूत प्रल्हाद संवाद -

नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
ब्रह्मविचार सामर्थ्य वानप्रस्थात बाणता ।
घ्यावा संन्यास तेंव्हाची त्यागोनी सर्व वस्तु त्या ॥
धारिता देह तो एक स्थान व्यक्तिहि त्यागिणे ।
एकरात्रीच एका त्या ग्रामाते राहुनी त्यजो ॥१॥
जर वस्त्र असे अंगी तर कौपीन एकची ।
गुप्तांग झाकता यावे दंड आश्रमचिन्ह ते ॥
विपत्ती नसता घ्यावे त्यागाव्या अन्य वस्तु त्या ॥२॥
हितैषी सर्व प्राण्यांना शांत भक्ति परायण ।
नको आश्रित ते कोणी एकटे फिरणे सदा ॥३॥
विश्वाला पाहणे ईशी अतीत जरि तो असे ।
ब्रह्मस्वरूप आत्म्यात पाहणे परिपूर्ण ते ॥४॥
संन्याशी आत्मदर्शी तो सूप्त-बोधांतरीहि तो ।
जापण स्वरूपाला नी बंध-मोक्ष द्वयो भ्रम ॥५॥
नेच्छावा मृत्यु नी देह उदास द्वयि पाहणे ।
स्थितींचा कारणी काळ तयांची वाट पाहणे ॥६॥
असत्य शास्त्रि ना प्रीती जीविका साधने नको ।
टाळावा वाद तो नित्य पक्ष एक नको जगीं ॥७॥
न जोडो चमु शिष्यांचा न ग्रंथ वाचणे बहु ।
व्याख्याने टाळणे सर्व कार्यारंभी नकोचि ते ॥८॥
शांत नी समचित्ती त्या महात्म्या यतिशी नसे ।
मठाची बंधने कांही घ्यावे आश्रमचिन्ह ते ॥९॥
मग्न आत्मानुसंधानी न चिन्ह घेतले जये ।
प्रतिभाशील तो जणा परी मूर्खची भासतो ॥१०॥
राजा एका इतिहासा वर्णितो, थोर संत ते ।
दतात्रय मुनी-भक्त प्रल्हादी वाद हा असा ॥११॥
एकदा भक्त प्रल्हादे मंत्र्याना घेउनी सवे ।
लोकांची जाणण्या इच्छा फिरला जनतेत तै ॥१२॥
तयांनी पाहिले की त्या कावरीतटि तो कुणी ।
पडला मुनि जो एक मातीने अंग माखले ॥१३॥
तयांचे कर्म नी वाणी आकार वर्ण आश्रम ।
आदि चिन्ह्ये तया कोणी सिद्ध हा जाणिले नसे ॥१४॥
भगवत्‌प्रेमि प्रल्हादे तयांना शिर टेकुनी ।
वंदिले पूजिले आणि पुसला प्रश्न जाणण्या ॥१५॥
भगवन्‌ ! आपुला देह उद्योगी भोगिच्या परी ।
धष्ट - पुष्ट असा आहे उद्योग्या मिळते धन ॥
धनात मिळती भोग भोगाने पुष्टते तनू ।
आणखी अन्य ते कांही दुसरी कारणे नसो ॥१६॥
(इंद्रवज्रा)
उद्योग ना तो पडुनीच तेथ
    न द्रव्य तेंव्हा मग भोग कैचे ।
भोगाविना हृष्ट कसाचि देह
    सांगा द्विजा ते अम्हि एकु इच्छो ॥१७॥
(अनुष्टुप्‌)
विद्वान्‌ समर्थ चतुरो तुमचे बोल प्रीयची ।
कर्मात गुंतले विश्व तुम्ही कां शांत पाहता ॥१८॥
नारदजी सांगतात -
प्रल्हादे पुसता प्रश्न दतात्रेय महामुनी ।
करोनी स्मित ते ऐसे बोलले शब्द अमृत ॥१९॥
दत्तात्रेय म्हणाले -
दैत्येंद्रा सर्वची साधू तुम्हा सन्मानिती सदा ।
कर्माचे फळ नी वृत्ती ज्ञानाने जाणता तुम्ही ॥२०॥
अनन्य भक्तिने ईश तुमच्या हृदयीं वसे ।
सूर्याच्या परि तो नाशी तमांधकार सर्व तो ॥२१॥
तरी राजा जसे कांही मजला कळले तसे ।
आत्मशुद्ध्यर्थ हे देतो उत्तरा मान राखुनी ॥२२॥
तृष्णा एक अशी वस्तू भोगल्या नच ती सरे ।
भवचक्री तये जाणे कर्माने योनि त्या किती ॥
लाभल्या मजला तैसे किती कर्मात गुंतलो ।
माझा थांग नसे माते कर्माचा खेळ आगळा ॥२३॥
मनुष्य देह हा येथ इच्छिता मोक्षही मिळे ।
पापाने क्षुद्रयोनी नी द्वये जन्म मनुष्य हा ॥२४॥
दांपत्य इच्छिते सौख्य दुःखाचा नाश इच्छिते ।
उलटे घडते सर्व म्हणोनी कर्म सांडले ॥२५॥
आत्म्याचे रूप ते सौख्य निवृत्ती तनु ही असे ।
मनोराज्यापरी भोग मानोनी दैव भोगितो ॥२६॥
मानावा स्वार्थ तो सत्य आत्मरूपास पाहणे ।
परी तो द्वैत मानोनी भवात भटके पुन्हा ॥२७॥
शेवाळा पाहुनी पाणी त्यजोनी झळयाझळ ।
धुंडावा तैचि हे होते भिन्नत्वे पळणे पुढे ॥२८॥
प्रारब्धाधीन हा देह न पुरे सौख्य मेळिण्या ।
प्रयत्‍न करिता सर्व कार्यासिद्धी न होतसे ॥२९॥
जीव हा देह नी चित्ते आक्रंदे दुःख भोगिता ।
नाशवंत असा देह धनाचा लाभ काय तो ॥३०॥
लोभी नी विषयासक्त यांचे दुःख बघेच मी ।
भयाने नच त्या झोप सर्वांशी संशयो मनीं ॥३१॥
धनाचा लोभि त्या चोर शत्रू स्वजन याचक ।
काळाचे भय ही नित्य स्वता शंकीत होतसे ॥
चुकोनी खोटना यावी भिती तो आपुलीहि की ॥३२॥
म्हणोनी शोक नी मोह क्रोध द्वेष नि ते भय ।
श्रमाची मृगया ना हो धन-देहासि लोभ ना ॥३३॥
अजगरो मधमाशी माझे श्रेष्ठ गुरूद्वय ।
तयांच्या अनुसाराने वैराग्य तोष लाभला ॥३४॥
मधुमक्षी परी लोक कष्टाने धन संचिती ।
परी स्वामीस मारोनी लुटिती धन अन्यची ॥
म्हणोनी शिकलो त्यांचे विरक्त राहणे सदा ॥३५॥
अजगरा परी मीही पडोनी नित्य राहतो ।
दैवे जे मिळते त्यात संतुष्ट राहतो तसे ॥
न मिळे दिनि कित्येक तरी धैर्येचि राह्तो ॥३६॥
कधी थोडे कधी जास्त स्वादिष्ट चवहीन ही ।
कधी चोथा कधी सार भक्षोनी राहतो असा ॥३७॥
श्रद्धेने मिळता खातो अपमानेहि ते तसे ।
आपोआप मिळे तेंव्हा केंव्हाही एकदाचि ते ॥३८॥
प्रारब्धी मानितो तोष सुती रेशमी वस्त्र नी ।
वल्कले मृगचर्मादी मिळते तेचि धारितो ॥३९॥
तृणी पृथ्वी तसे पर्णीं राखेत पडतो कधी ।
दुजांची असता इच्छा महाली झोपतो कधी ॥४०॥
स्नानादी करूनी केंव्हा शरीरा गंध लेपुनी ।
पुष्पमाळा गळ्यामध्ये लेवोनी रथि बैसतो ॥
हत्ती घोडे कधी नेती कधी नग्नचि हिंडतो ॥४१॥
स्वभावे भिन्न त्या व्यक्ती न मी निंदी न वंदितो ।
कल्याण इच्छितो त्यांचे आत्म्याशी एकसंधता ॥४२॥
सत्याच्या अनुसंधानी तेणे वृत्तीत भेद ते ।
वृत्तीचे भ्रम चित्तात अहंकारात चित्त ते ॥४३॥
मायेमध्ये अहंकारा माया ज्ञानात हव्य हो ।
साक्षात्कारे तदा रूपी निष्क्रिय स्थित नित्य हो ॥४४॥
माझी आत्मकथा गुह्य परा शास्त्राहुनी अशी ।
प्रीय तू भगवंताशी म्हणोनी बोललो तुला ॥४५॥
नारदजी सांगतात -
परमहंस असा धर्म प्रल्हादे ऐकिला पुन्हा ।
दत्तासी पूजिले आणि प्रसन्न लोटला घरा ॥४६॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ ५ ॥ १३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP