समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सातवा - अध्याय १२ वा

ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमाचे नियम -

श्रीनारदजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
ब्रह्मचर्ये गुरूकूली संयमी राहणे तसे ।
आचार दासवत्‌ व्हावा सुहृदो गुरूशी सदा ॥१॥
सकाळ सांजवेळेला अग्नी सूर्य गुरूस नी ।
दैवताते उपासावे मौने गायत्रि जापणे ॥२॥
गुरू आज्ञापिती तेंव्हा नेमाने वेद वाचिणे ।
पाठारंभी तसे अंती डोके टेकून वंदिणे ॥३॥
मेखला मृगचर्मो नी जटा वस्त्र कमंडलू ।
यज्ञोपवित नी दंड करी कुशहि धारिणे ॥४॥
सकाळ सांजवेळेला भिक्षा मागून आणणे ।
गुरूसी अर्पिणे सर्व अनुज्ञे भक्षिणे पुन्हा ॥
अनुज्ञा नसता तेंव्हा करावा उपवास तो ॥५॥
सुशिलो अल्पची खाणे कार्यामाजी निपूणता ।
श्रद्धा जितेंद्रियी व्हावे स्त्रियांशी अल्प बोलणे ॥६॥
स्त्रियांशी गोष्टिपासोनी वेगळे राहणे सदा ।
बलवान्‌ इंद्रिये सर्व मनाला चेतवीत ते ॥७॥
युवती गुरूपत्‍नीच्या हाताने विंचरू नये ।
मालिश उटणे स्नान करें त्यांच्या असू नये ॥८॥
अग्नीच्या परि ज्या स्त्रीया कन्याही असली जरी ।
एकांती तरि ना राहो कार्याकार्यीच बोलणे ॥९॥
साक्षात्काराविना केंव्हा द्वैत ते का मिटे कधी ।
संसर्गी राहतो तेंव्हा भोग्य बुद्धीच जन्मते ॥१०॥
शीलरक्षादि हे तत्व संन्याशासीहि बंधन ।
ऋतूगमन कालात गृहस्थे तेथ ना वसो ॥११॥
न ल्यावे सुरमा तैल ब्रह्मचर्यव्रती तये ।
उटीही नच लावावी न रेखो चित्र स्त्रीचिये ॥
फुलांचे हार नी फूल त्यजिणे चंदनादि ही ।
आभूषणे न ल्यावी नी मांस मद्य नकोच ते ॥१२॥
यथाशक्ती द्विजांनी ते वेद वेदांग कल्प नी ।
वाचोनी ज्ञान मेळावे गरजेपरि ते तसे ॥१३॥
सामर्थ्य असता अंती गुरू मागेल ती तया ।
दक्षिणा देउनी त्यांच्या आज्ञेने पुढिलाश्रमी ॥
प्रवेश करणे आणि ब्रह्मचर्येच जीवनी ।
राहणे असणे त्यांनी आश्रमी नित्य राहणे ॥१४॥
सर्वत्र भरला देव येणे जाणे तया नसे ।
अग्नी गुरू नि आत्म्यात विराजे तो विशेषची ॥
म्हणोनी नित्य ती दृष्टी तयात लावणे असे ॥१५॥
या परी ब्रह्मचारी नी वानप्रस्थी यती गृही ।
विज्ञानपूर्ण होवोनी परब्रह्मात डुंबणे ॥१६॥
वानप्रस्थाश्रमी यांचे आता तत्त्वासि सांगतो ।
ऋषींचे मत ते ऐसे महर्लोक यये मिळे ॥१७॥
पेरता धान्य जे येते तयांनी भक्षु ते नये ।
कच्चे नी भट्टीचे अन्न कदापी नच भक्षिणे ॥
सौरऊर्जेमुळे पक्व फळ मूळचि भक्षिणे ॥१८॥
वनी जे उगवे धान्य त्याचे चरू यजात ।
त्याचाच तो पुरोडाश नित्य नैमित्तिकात हो ॥
पहिला भार तो येता फल धान्यादिकास तो ।
एकत्र करूनी सर्व त्यजावा नच भक्षिणे ॥१९॥
अग्निहोत्रार्थ रक्षाया अग्नी साठीच ते घर ।
आश्रयार्थ असो गुंफा किंवा पर्णकुटी बरी ॥
शीत वायू तशी वर्षा अग्नि घामास साहिने ॥२०॥
दाढी मिशा जटा राखो जटाही नच त्या धुणे ।
कंमडलू मृगचर्म वल्कले आणि वस्त्र नी ॥
सामग्री अग्निहोत्राची संग्रही ठेविणे असे ॥२१॥
विचारी पुरूषे बारा आठ चार द्वि वर्ष वा ।
एक वर्ष व्रती व्हाव न व्हावी क्लेशबुद्धि ती ॥२२॥
वानप्रस्थी व्रती याला जरा व्याधी असेल तै ।
उपवासव्रता घ्यावे सामर्थ्य नसल्या वरी ॥२३॥
त्याने अनशनापूर्वी आहवनीय अग्निला ।
आत्म्याशी करणे लीन मीपणा सर्व त्यागिणे ॥२४॥
छिद्राकाशास आकाशी प्राणाला वायुच्या मधे ।
उष्णता अग्निच्या मध्ये जलीय तत्त्व त्या जलीं ॥
अस्थ्यादी पृथीवीमध्ये जितेंद्रे लीन हे करो ॥२५॥
स्वरादी अग्निच्या मध्ये इंद्राशी कर कौशल ।
विष्णू गति ती सर्व उपस्था त्या प्रजापतीं ॥२६॥
मळाला मृत्युशी लीन करावे व्रतिने तदा ।
दिशात श्रोत्रिचे ज्ञान वायूत स्पर्श नी त्वचा ॥२७॥
रसनादी जळीं मेळो घ्राणेंद्रिय धरेसि ते ।
गंधाच्या सह अर्पावे वानप्रस्थी व्रती तये ॥२८॥
मनोरथा मनिचंद्री बुद्धी ब्रह्मात स्थापिणे ।
अहंकारासह कर्म रूद्री लीन तये करो ॥
या परी चेतना-चित्ता क्षेत्रज्ञे जीव तो पुन्हा ।
परब्रह्मात लावावा विकारी जीवतो असा ॥२९॥
पृथिवीचा जळामध्ये जळाचा अग्निच्या मधे ।
अग्नी वायूत नी वायू आकाशी लीन तो करो ॥
अहंकारात आकाश महत्तत्त्वात सर्व हे ।
अव्यक्तात महतत्त्व अव्यक्त परमात्मि ते ॥३०॥
अवशिष्ट असे रूपो आत्मा चिद्‍वस्तु तोचि मी ।
अद्वितीय अशा रूपीं भार तो स्थिर ठेविणे ॥
जसा काष्ठाश्रितो अग्नी काष्ठा जाळोनि शांत हो ।
स्वरूपी शांत तै व्हावे साक्षात्कार असा असे ॥३१॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ ५ ॥ १२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP