समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सातवा - अध्याय ११ वा
मानवधर्म, वर्णाश्रमधर्म आणि स्त्रीधर्माचे वर्णन -
श्री शुकदेव सांगतात -
(इंद्रवज्रा)
सन्मानितो साधु समाजि ऐशा
प्रल्हाद स्तूती जधि ऐकिल्या त्या ।
युधिष्ठिरोतो मग तृप्त झाला
नी नारदांना पुसताहि झाला ॥१॥
राजा युधिष्ठिराने विचारिले -
(अनुष्टुप्)
भगवन् ! ते सदाचार तो सनातन धर्म नी ।
वर्णाश्रम कसे कर्म जेणे श्रीहरि लाभतो ॥२॥
तुम्ही प्रजापतीपुत्र अन्य पुत्रांहुनीहि ते ।
आपणा मानिती श्रेष्ठ बघोनी तप योग तो ॥३॥
तुम्ही नारायणाऐसे परायण दयाळू नी ।
सदाचारी तसे शांत धर्माचे गुह्य जाणता ॥
यथार्थ गुह्य ते थोर दुजे कोणी न जाणती ॥४॥
नारदजी म्हणाले -
सर्व धर्मास तो एक अजन्मा भगवान् असे ।
तो प्रभू जगकल्याण दक्षाच्या पोटि जन्मला ॥५॥
मूर्तिच्या सह तो अंश बद्रिकाश्रमि जो तपी ।
तयाच्या मुखिचा बोध तया वंदोनि बोलतो ॥६॥
धर्मामूळ असा देव सर्ववेदमयो हरी ।
तयाचे जाणते त्यांच्या स्मृतीने ग्लानी होत ना ॥
आत्मकृपा मिळे तोची कर्म धर्मासि मूलक ॥७॥
धर्माची लक्षणे तीस शास्त्रात बोलले अशी ।
सत्य दया तपो शौच तितिक्षा नी विवेक नी ॥८॥
मन इंद्रीय संयेम अहिंसा ब्रह्मचर्य नी ।
त्याग स्वाध्याय संतोष मोकळा समदर्शि नी ॥९॥
सेवा नित्य महात्म्यांची क्रमे निवृत्ति इंद्रियी ।
सर्वाचा त्याग नी मौन आत्मचिंतन नी तसे ॥१०॥
अन्नाचा भाग दे प्राण्या सर्वात्मा एक पाहणे ।
श्रीकृष्णगुण एकावे स्मरावे गुणकीर्तन ॥११॥
पूजावा सेविणे त्याला नमोनी दास्य पावणे ।
समर्पण तसे संख्य या तिसी हरि पावतो ॥१२॥
धर्मा ! अखंड संस्कार ज्या वंशी द्विज तो असे ।
सांगती ब्रह्माजी ऐसे जन्म कर्मेचि शुद्ध जे ॥
असती कर्म हे त्याचे यज्ञाध्ययन दान ते ।
ब्रह्मचर्यादि चारी ते आश्रमी कर्म बोधिले ॥१३॥
शिकणे शिकविणे नी घेणे देणेहि दान ते ।
यजिणे याजिणे नित्य सहा कर्म द्विजांचिये ॥
क्षत्रिये दान ना घ्यावे दंडिणे ब्राह्मणेतरा ।
दंड हा चरितार्थोची क्षात्रांचा मानिला असे ॥१४॥
अनुयायी द्विजवंशा वैश्याने राहुनी तसे ।
गोरक्षा कृषि व्यापारे निर्वाह करणे असा ॥
शूद्रांचा धर्म तो सेवा स्वामींनी पासणे तयां ॥१५॥
वार्ता शालीन नी तैसे यायावर शिलोक्षन ।
द्विजांच्या चरितार्था या चारवृत्तीचि त्या हव्या ॥१६॥
वर्ण ज्यां खालाचा त्याने थोर वृत्ती धरू नये ।
संकटाविण ना दान क्षत्रिये ते स्वीकारणे ॥१७॥
ऋत अमृत नी मृत सत्यामृत नि प्रमृत ।
कोणतीही असो वृत्ती श्वानवृत्ती कधी नको ॥१८॥
बाजारी पडले अन्न उचली तोच उंछ नी ।
शेतीचे पडले धान्य वेचिता तो शिलोंछ हो ॥
ऋत तो मिळले घेई शालीन अमृतो असे ।
ययावरचि वृत्तीला मृत ते मानणे असे ॥
वार्तावृत्तीच प्रमृत कृषी आदीहि साधने ॥१९॥
सत्यानृतचि व्यापार श्वानवृत्ती अशी पहा ।
नीचाची करणे सेवा त्यागिणे क्षत्रिये द्विजे ॥
सर्ववेदमयी विप्र सर्ववेदमयी नृप ॥२०॥
शमो दम तपो शौच क्षमा संतोष मोकळा ।
दया ज्ञान तशी भक्ती द्विजांची लक्षणे अशी ॥२१॥
युद्धी उत्साह शूरत्व धैर्य त्याग नि तेज ते ।
मनोजय द्विजभक्ती अनुग्रह नि रक्षण ॥
लक्षणे क्षत्रियांची ही तेचि क्षत्रीय जाणणे ॥२२॥
देव गुरू हरिभक्ती अर्थ धर्म नि काम या ।
जपणे पुरूषार्था या उद्योगशील अस्तिको ॥
नैपुण्य व्यवहारात वैश्याची लक्षणें अशी ॥२३॥
पावित्र्य नम्रता आणि सेवा निष्कपटी तसे ।
मंत्रहीन असे यज्ञ अस्तेय सत्य नी तसे ॥
गो विप्र रक्षणी नित्य शूद्राची लक्षणे अशी ॥२४॥
पतीची करणे सेवा अनुकूल तया अशी ।
शुश्रुषा पतिआप्तांची पतीनियम तत्परा ॥
पतीला मानणे ईश पातिव्रत्यचि धर्म हा ॥२५॥
सडा संमार्जिणे चौक सजवावे घरास नी ।
वस्त्र आभूषणे लेणे वस्तू स्वच्छचि ठेविणे ॥
साध्वी स्त्री जी तिची कर्मे बोलले शास्त्र हे असे ॥२६॥
वेळोवेळी पतीइच्छेप्रमाणे वागणे तसे ।
संयमो नियमो सत्य सुभ्याष्ये प्रेमपूर्वक ॥
पतीची करणे सेवा साध्वीची लक्षणे अशी ॥२७॥
संतुष्ट राहणे चित्ती वस्तूंची लालसा नको ।
धर्मज्ञां चतुरां दक्षां पावित्र्य प्रेम मानसी ॥
पतीत पति ना हो तो सहवास तया करी ॥२८॥
पती तो विष्णु मानोनी लक्ष्मीच्या परिसेवि जी ।
दोघांही लाभते धाम विष्णु लक्ष्मी सरूपता ॥२९॥
न करी चोरि नी पाप असे चांडाळ संकरी ।
वृत्तीने राहती जैशी कुळाची ती परंपरा ॥३०॥
देवर्षी मुनि या श्रेष्ठे स्वभाव अनुलक्षुनी ।
तयांचे कर्म ते काळी कल्याणी फळदायक ॥३१॥
स्वभाव वृत्ति आश्रये करिता धर्मपालन ।
कर्माच्या वृत्ति संपोनी गुणातीतचि होय तो ॥३२॥
वारंवार जशी शेती पेरिता होय नापिक ।
तुपाने पेटतो अग्नी आधिक्ये विझतो जसा ॥३३॥
तसे भांडार इच्छांचे चित्त हे आपुले असे ।
अतिरेकात उद्वेगे इच्छाही नष्टती तशा ॥३४॥
एक वर्णातुनी अन्य वर्णाच्या आश्रयास जो ।
धारितो तेथिचे कर्म तयाचे तेचि जाणणे ॥३५॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥ ५ ॥ ११ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|