समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सातवा - अध्याय १० वा

प्रल्हादाचा राज्यभिषेक आणि त्रिपुरदहनाची कथा -

नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
वर तो भक्ति मार्गाचे विघ्न जाणोनि अर्भके ।
प्रल्हाद हासुनी चित्ती हरीला वदला असे ॥१॥
प्रल्हाद म्हणाला -
जन्मताचि प्रभो मी तो विषयासक्त हा असे ।
म्हणोनी मजला तुम्ही न दावा ती प्रलोभने ॥
भोगासी भिउनी मी तो सुटण्या पदि लागलो ॥२॥
माझा भाव पहायाते वर कां देतसा तुम्ही ।
भोगाच्या हृदयोग्रंथी भवात टाकिती पुन्हा ॥३॥
जगद्‍गुरो परीक्षाच घेतसा वंचना नको ।
भक्तीची देव-घेवही भक्त केवळ जाणती ॥
मागे अन्य वरा तो त्या भक्ती ना मुळि लाभते ॥४॥
मागे तो नच हो दास इच्छी सेवा न स्वामि तो ।
जो स्वामी राबवू पाहे न स्वामी होय तो कधी ॥५॥
निष्कामी दास मी देवा तुम्ही स्वामी तसेच की ।
राजाच्या सेवकाऐसा न संबंध तसा मुळी ॥६॥
वरदा ! स्वामि माझ्या रे वर देऊच इच्छिसी ।
तर दे ’वासना बीज हृदयी नच अंकुरो’ ॥७॥
हृदयी कामना येता इंद्रीय मन प्राण नी ।
देह धर्म स्मृती तेज धैर्य बुद्धी नि सत्य ते ॥८॥
नष्टोनी जातसे सर्व न राही मुळि कांहिही ।
सोडी जो कामना देवा तेंव्हा तो मिळवी तुज ॥९॥
भगवंता नमो तूते सर्वांच्या हृदयात तू ।
वससी श्री नृसिंहा तू नमितो मी पुनः पुन्हा ॥१०॥
श्रीनृसिंह भगवान्‌ म्हणाले -
(इंद्रवज्रा)
तुझ्या परी ते असतात भक्त
    एकांतप्रेमीच न कांहि इच्छा ।
न जास्त एका मनवंतरास
    या दैत्यराज्या करि भोग मान्य ॥११॥
भोक्ता रूपाने वसतो हृदयीं मी
    पाही मला तू हृदयात नित्य ।
नी कीर्तने नित्यही ऐकणे तू
    प्रारब्ध भोगा करि क्षीण तेणे ॥१२॥
भोगात पुण्योफळ आणि तैसे
    निष्काम कर्मे करि नाश पाप ।
नि मुक्त होता मजपाशि येई
    गातील स्वर्गी तव कीर्ति देव ॥१३॥
(अनुष्टुप्‌)
केली ती स्तुति तू सर्व गाता आठवि जो मनीं ।
तुजला मजला नित्य तो हो मुक्त भवातुनी ॥१४॥
प्रल्हाद म्हणाला -
महेश्वरा वरदानी तुला आणिक मागतो ।
चराचरगुरू ईशा पित्याने निंदिले असे ॥१५॥
वधिले विष्णुने बंधू म्हणोनी क्रोधले बहू ।
भक्त मी म्हणुनी माझा द्रोह केला असे तये ॥१६॥
दीनबंधो ! तुझी दृष्टी होता ते शुद्ध जाहले ।
परी दुस्तर कर्मांना नष्टावे सत्वरी हरी ॥१७॥
श्रीनृसिंह भगवान्‌ म्हणाले -
तुझ्यापरी कुळी पुत्र जन्मता भक्त पावन ।
तरती पितरे पूर्व एक्केविस पिढ्याचिये ॥
पित्याचा नच तो प्रश्न स्वयं पावन जाहले ॥१८॥
माझे भक्त समदर्शी सदाचारी नि शांत ते ।
ज्या वाटे जात तेथीच पवित्र कीट होतही ॥१९॥
दैत्येंद्रा भक्त ते माझे भक्तीने मोह नाशिती ।
आत्मभक्तिकधी ना ते प्राण्यांना कष्ट पोचिती ॥२०॥
अनुयायी जगी जे जे तुझे ते अनुयायि ही ।
होतील भक्तची माझे पुत्रा आदर्श तू तया ॥२१॥
पवित्र जरि तू झाला स्पर्शाने माझिया करे ।
अंत्येष्टी करणे त्यांची गती उत्तम त्यां असे ॥२२॥
वत्सा घेई पदभार त्यांचा नी वेदवादि त्या ।
मुनींची मानुनी आज्ञा चित्त माझ्यात लाव तू ॥२३॥
नारदजी सांगतात -
केली अंत्येष्टि प्रल्हादे ईश आज्ञे युधिष्ठिरा ।
पुन्हा द्विजे तया केला राज्याभिषेक युक्त तो ॥२४॥
या वेळी ऋषि नी ब्रह्म्ये प्रसन्न पाहता हरी ।
नृसिंहस्तुति गावोनी बोलले वाक्य हे असे ॥२५॥
ब्रह्मदेव म्हणाले -
देवाधिदेव सर्वात्म्या जीवदा मम पूर्वजा ।
दैत्याने त्रासिले सर्वां भाग्य की वधलास तो ॥२६॥
तसा वर तया मी तो दिधला कोणि ना वधो ।
म्हणोनी माजला होता तपे वेदां पुढेही तो ॥२७॥
आनंद यातही आहे प्रल्हादा रक्षिलेस तू ।
आनंदी शुभ ही गोष्ट तो आहे भक्त पावन ॥२८॥
भगवान्‌ तुमचे ध्यान करी तो भयमुक्तची ।
मृत्युही मारण्या येता न चाले कांहि त्या पुढे ॥२९॥
श्री नृसिंह भगवान्‌ म्हणाले -
ब्रह्माजी यापुढे ऐसा दैत्यांना नच द्या वर ।
सर्पाला दूध ते वीष तसा वर तयास तो ॥३०॥
नारदजी सांगतात -
नृसिंह भगवान्‌ ऐसे बोलले ब्रह्माजीस नी ।
स्वीकार करूनी पूजा अंतर्धानहि पावले ॥३१॥
पुन्हा भगवद्रुपी जे जे ब्रह्मा शंकर आदिना ।
प्रल्हादे पूजिले आणि माथा टेकुनि वंदिले ॥३२॥
शुक्राचार्यादि साक्षीने दैत्ये-दानवनायक ।
प्रल्हादा स्थापिले ब्रह्म्ये अधीपति म्हणोनिया ॥३३॥
प्रल्हादा परमाशीष ब्रह्म्याने दिधला पुन्हा ।
सत्कारिताचि सर्वांना स्वस्थानी सर्व पातले ॥३४॥
या परी हरिचे दोघे पार्षदे दितिपुत्र हे ।
राहिले वैरभावाने देवे मुक्त्यर्थ मारिले ॥३५॥
पुनश्च विप्रशापाने दोघे राक्षस जाहले ।
श्रीरामाने मारिले जे ते कुंभकर्ण नि रावण ॥३६॥
काळीज फाटता युद्धीं भूमिसी पडल्यावरी ।
पूर्वजन्मापरी त्यांनी मरता हरि ध्यायिला ॥३७॥
वक्त्रदंत शिशूपाल दोघे ते जन्मले पुढे ।
वैरभाव असोनिया हरीसी मिळले पहा ॥३८॥
वैरभाव असोनीया कृष्णाचे ध्यान ते मनीं ।
मरता करिता राजे गेले धामास कैक ते ॥३९॥
अनन्यभक्त भक्तीने भगवद्रूप मेळिती ।
वैरी अनन्यभावाने भगवद्रूपि पावती ॥४०॥
धर्मराजा तुझा प्रश्न होता की द्वेषि हे कसे ।
पावले भगवद्रूपी त्याचे उत्तर मी दिले ॥४१॥
ब्रह्मण्य देव कृष्णाच्या लीला पावन या अशा ।
दैत्यांच्या इतिहासात वधाच्या वर्णनी पहा ॥४२॥
वैराग्य ज्ञान भक्ती नी कथा प्रल्हादि पावन ।
सृष्टिचा भगवद्‌हेतू हरिच्या दिव्यची लिला ॥४३॥
कथेत सर्व हे आले कालचक्र कसे फिरे ।
देवतांच्या पदांमध्ये वर्णिले परिवर्तन ॥४४॥
हिच्याने पावतो विष्णु भागवद्धर्म हा असा ।
अध्यात्म सार ते हेची सर्व याच्यात वर्णिले ॥४५॥
ऐके जो भगवत्‌ कीर्ति पवित्र भाव ठेवुनी ।
लाभते मुक्ति त्यां नित्य तुटती भवग्रंथि त्या ॥४६॥
(वसंततिलका)
जो ऐकतो परम ही नरसिंह कीर्ति
    दैत्येंद्र सैन्य वध वीरलीला अशी ही ।
प्रल्हादभक्ति अशि पावन ऐकिल्याने
    लाभे तया परम धाम हरीपदासी ॥४७॥
(इंद्रवज्रा)
युधिष्ठिरा हो तुम्ही भाग्यवंत
    तुम्हा घरी ते तनु पांघरोनी ।
राही परब्रह्म, म्हणोनी साधू
    नी संत येती नित या घरासी ॥४८॥
कैवल्य निर्वाण सुखानुभूती
    ज्यां शोधिती संत ऋषी मुनी ही ।
सखा हितैषी अन सोयरा तो
    श्रीकृष्ण आत्मा गुरू तोचि आहे ॥४९॥
ब्रह्मादि ध्याती रूप तेहि हेच
    न कोणि रूपा शकतोच वर्णू ।
भावे नि मौने पुजितोत आम्ही
    पावो अशा भक्तित तो अम्हाला ॥५०॥
(अनुष्टुप्‌)
पूज्य हा एकलादेव रूद्रासी जधि दैत्य ते ।
कलंकलाविण्या आले तेंव्हा कृष्णेचि रक्षिले ॥५१॥
राजा युधिष्ठिराने विचारले -
रूद्राचे कोणत्या कार्यी इच्छिले मय दानवे ।
यशाते नाशिण्या आणि कृष्णाने रक्षिले कसे ॥५२॥
नारदजी सांगतात -
एकदा देवतांनी त्या याच श्रीकृष्णशक्तिला ।
मेळिता जिंकिले दैत्य तेंव्हा ते गुरू त्या मया ॥
शरणी पातले सर्व तेंव्हाचे कार्य हे असे ॥५३॥
शक्तिशाली मयासूरे लोह सोने नि चांदिचे ।
विमाने निर्मिली तीन नगरापरि थोर जी ॥
आली गेली कधी कोणा तयाचा माग ना कळे ।
सामग्री बहुही त्यात भरूनी उरल्या पहा ॥५४॥
त्रिलोकी लोकपालांचे वैर पूर्वीच वाढले ।
विमानी त्या लपोनीया दैत्यांनी र्‍हास मांडिला ॥५५॥
प्रजेने लोकपालांनी शंकरा स्तविले तदा ।
त्रिपुरीं राहुनी दैत्ये नाशिले रक्षि तू अता ॥५६॥
प्रार्थना ऐकता देवे वदला हो भिऊ नका ।
धनुष्या जोडिता बाण त्रिपुरीं सोडिला असे ॥५७॥
सूर्यमंडळरश्मींच्या परी बाण कितेक ते ।
निघाले एकबाणीं त्या तेजी ती लोपली पुरे ॥५८॥
स्पर्शाने पडले खाली भूमिसी यान तेधवा ।
महामायावि दैत्याने अमृतकूपि सर्व ते ॥५९॥
टाकता जाहले जीत तेजस्वी देहि सैन्य ते ।
विजेच्या परि ते सर्व उठले अग्निलोळ जै ॥६०॥
कृष्णाने पाहिले सर्व उदास हर जाहले ।
योजिली युक्ति त्याने तो संकल्प पूर्ण साधण्या ॥६१॥
घेतले रूप गायीचे ब्रह्मा वासरू जाहला ।
सिद्धरस कुपीं गेले सर्व अमृत प्राशिले ॥६२॥
दैत्यांनी पाहिले त्यांना परी मोहित होऊनी ।
रोधिले नच ते कोणी जाणता असुरोगुरू ॥६३॥
कृष्णाची जाणिता लीला न दुःखी जाहला मनीं ।
वदला थोर ते दैव होणारे ते टळेचि ना ॥६४॥
बंधूंनो ! शोक ना व्हावा सर्वांना दैव बांधिते ।
कृष्णाचे योजिली शक्ती निर्मिली युद्ध आयुधे ॥६५॥
धर्माचा रथ नी ज्ञान याचा सारथि नी ध्वजा ।
वैराग्यापासुनी तैसे ऐश्वर्याचेचि अश्व ते ॥
तपाचे धनु नी तैसे विद्येचे कवचो नि ते ।
क्रियेचे बाण नी अन्य वस्तू शक्तीत योजिल्या ॥६६॥
शिवाला धनु बाणाच्या सवे स्यंदनि स्थापिले ।
भस्म चर्चोनि रूद्राने बाणे त्रिपुर जाळिले ॥६७॥
आकाशी दाटली याने दुंदुभी वाजल्या तशा ॥६८॥
देवता पितरे यांनी जयोकार करोनिया ।
फुलांची वृष्टिही केली अप्सरा नाचल्या तदा ॥६९॥
त्रिपुरा जाळिले तेणे शंकरा त्रिपुरारि ही ।
पदवी प्राप्त ती झाली ब्रह्म्याने स्तुति गायिली ॥
ऐकोनी सगळे तेंव्हा स्वधामा सर्व पातले ॥७०॥
(इंद्रवज्रा)
जगद्‍गुरू कृष्णा अशाचि लीला
    करीतसे तो जणु मानवोची ।
ऋषी करीती नित गुण गान
    आणीक सांगी तुज काय सांगू ॥७१॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ ५ ॥ १० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP