समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सातवा - अध्याय ९ वा

प्रल्हादा कडून भगवान्‌ नृसिंहाची स्तुति -

नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
असे ब्रह्मादि देवांनी नृसिंहा स्तविले तरी ।
न शांत भगवान्‌ झाले गेले समिप ना कुणी ॥१॥
स्वयं लक्ष्मीही देवांनी शांत्यर्थ धाडिली तरी ।
भिली ती नच हे ऐसे कधीही रूप पाहिले ॥२॥
प्रल्हादा वदले ब्रह्मा भगवान्‌ कोपले तुझ्या ।
पित्यासी तरि तू जावे तूचि शांत करी तयां ॥३॥
जशी आज्ञा वदोनीया प्रल्हादा जोडिले कर ।
हरिच्यापाशि तो गेला साष्टांग नमिला हरी ॥४॥
(इंद्रवज्रा)
नृसिंहा पाही पदि बाळ सान
    दया तयाच्या मनि दाटली तै ।
जो काळ सर्पी भय मुक्ति देतो
    तो हात बाळाशिरि ठेवियेला ॥५॥
अशूभ सारे झडले तयाचे
    साक्षातकारी मग दृष्टी झाली ।
प्रल्हादा पाया हृदयी धरी तै
    रोमांच होता ढळलेहि अश्रू ॥६॥
(अनुष्टुप्‌)
एकटक असे देवा प्रल्हाद पाहु लागला ।
समाधी लागली त्याला वाणीने स्तुति गायिली ॥७॥
(वसंततिलका)
ब्रह्मादि देव ऋषि नी मुनि सिद्ध यांची
    सत्वात बुद्धि स्थिर राहुनि तुष्ट ना तू ?
मी तो असूर कुळि या परि जन्मलेला
    संतुष्ट तू मजवरी हरि होसि कां तू ॥८॥
जाणीतसे कि धन रूप तपो नि विद्या
    ओजोनि तेज कुल ना बल पौरूषाने ।
बुद्धि नि योग ययि ना तव तुष्टि होते
    भक्ति करी जरि पशू तरि पावसी त्या ॥९॥
ते श्रेष्ठ गूण असुनी तरि हीन विप्र
    जो राहतो विमुख या पदपद्‌मभक्ती ।
कर्मो मनो नि वचनो धन प्राण सर्व
    चांडाळ ही तुजसि अर्पुनि प्रीय होती ।
चांडाळ तो करितसे कुळ शुद्ध सारे
    गर्वात त्या द्विजहि ते नच हो पवित्र ॥१०॥
तू शक्तिमान प्रभुरूप नि पूर्ण ध्यानी
    नाही तुला गरज क्षुल्लक पूजनाची ।
भोळे असोत तरि ते तुज भक्त प्रीय
    चित्तात तू प्रगटसी प्रतिबिंब जैसे ॥११॥
नाही मुळीहि मजला अधिकार तैसा
    बुद्धि जसी करितसे तव वर्णने ही ।
अज्ञानि जे भव तमी अशि कीर्ति गाता
    तत्काळ ते विमल हो अशि कीर्ति आहे ॥१२॥
सत्वासि आश्रय तुझा तव भक्त सारे
    दैत्या परी न करिती मुळि द्वेष तैसा ।
घेसी कितेक अवतार हि चांग चांग
    कल्याण या जगति ते करण्य लिला त्या ॥१३॥
वृश्चीक आदि वधिता सुख सज्जनांना
    दैत्याचिये मरणि सौख्य तसेचि सर्वां ।
ते सर्व वाट बघती करि शांत क्रोध
    भीती मधोनि निघण्या भजतील लोक ॥१४॥
ईशा तुझे वदन हे बहुही भयान
    सूर्यापरी नयन आणि लपाप जिव्हा ।
दाढी प्रचंड वरि ताणियल्या भृकुटी
    रक्तात ते भिजयले अति ते आयाळ ।
हा सिंहनाद करिता भयभीत हत्ती
    पाहूनी तीक्ष्ण नख हे मजला न धास्ती ॥१५॥
मी भीतसे बहु भवीं दळुनी निघाया
    मी कर्म बद्ध असुनी जिवजंतु यात ।
स्वामी कधी मजसि तू पदि घेसि तैसे
    जेथे समस्त जिवही सुख मोक्ष घेती ॥१६॥
योनीत मी जिथ तिथे फिरलो फिरोनी
    प्रीया वियोग अप्रियी घडताच शोक ।
त्या औषधीच तसल्या बहु दुःख देती
    सांगा कृपा करूनिया मज युक्त भक्ती ॥१७॥
देवा हितैषि प्रियपूज्य सखाहि तूची
    ब्रह्मादि गाति तुझिया सगुणी क्रिया त्या ।
गाऊनि क्रोध अन अन्य करीन पार
    लाभेल संत सहवास मलाहि नित्य ॥१८॥
देवा नृसिंह जगती हरण्यास दुःखा
    आहेत कर्म परि ते क्षणिकोचि सारे ।
रक्षू न ते शकति माय नि बाप बाळा
    त्या औषधी न करिती भयमुक्त रोग्या ॥१९॥
ब्रह्मादि श्रेष्ठ अन काल कनिष्ठ कर्ता
    प्रेरितसे तुचि तया मग साधनांना ।
योजूनि ते करिति निर्मिति या जगाची
    ते सर्व रूप तुझिये नच अन्य कांही ॥२०॥
माया तुझ्या अनुमते करि क्षोभ आणि
    मनप्रधान शरिरा मग निर्मिते ती ।
हा लिंगदेह बलवान्‌ रूप नाम गर्वी
    सोळा विकार करूनी युत चक्र मोठे ।
नाही तुझ्या विण कुणी जगती पुरूष
    संसार चक्र भव हे परि पार होतो ॥२१॥
हे शक्तिमान प्रभू रे भवचक्रि माया
    ऊसा परीच पिळते चरकात तैशा ।
चैतन्य बुद्धि सगळे तव अंकितो ते
    आलो पदास तुझिया मज रक्षि देवा ॥२२॥
संसारि लोक जगण्या करितात इच्छा
    स्वर्गादि सौख्य सगळे बहु पाहिले मी ।
माझे पिता बघत वक्रदृष्टी तदा ते
    सोडूनि सर्व मग तै पळले हि सर्व ।
सार्‍यास धाक असल्या पितयास माझ्या
    मारीयलेस हरि तू असला समर्थ ॥२३॥
ब्रह्मादिलोक मय लक्षुमी भोग सारे
    इच्छी न मी तवचि घासहि सर्व आहे ।
ते काळरूप धरूनी गिळिसी हरी रे
    तेंव्हा सदैव मज हो तवभक्तसंग ॥२४॥
भोगार्थ गोष्टि सगळ्या गमतात चांग
    सार्‍याचि त्या मृगजळा परि भास आहे ।
भोगात रोग सगळे बसती लपोनी
    इच्छाग्निसी नचहि भोग कधी शमीती ॥२५॥
मी तो तमोगुणी अशाचि कुळात झालो
    धन्यो कृपा हरि तुझी असली अनंता ।
तू हा तुझ्या सकलतापहरी कराते
    माझ्या शिरावरति ठेविसि काय योग ।
जो हात तूं कधि न ठेविसि त्या शिरासी
    लक्ष्मी नि शंकर तसा जगनिर्मित्यासी ॥२६॥
सर्वात्म तू असुनिया तुजला न भेद
    कल्पतरू परिहि तूं भजताच देसी ।
सेवा करी जिव जसा तयि पावसी तू
    जात्याभिमान तुजला नच उच्च नीच ॥२७॥
अंधारकूप असला भव यात सर्प
    कालो रूपेचि वसतो अन डंख घेण्या ।
भोगी सदैव पडती तयि मीहि तैसा
    त्या नारदे मजसि सोडविले सदाचे ॥२८॥
माझा पिता मजसि तो वधण्यास आला
    कापीन शीर वदला परि रक्षिले तू ।
आणीक तोच वधिला करण्यास सत्य
    साधू ऋषीवचन ते सनकादिकांचे ॥२९॥
ही सर्व सृष्टि तवरूप अनादि तूची
    मध्ये नि अंति सगळी तव रूप आहे ।
माया गुणेचि रचिसी करिसी लिला या
    त्या युक्त गूण करूनी दिससी अनेक ॥३०॥
हे कार्य कारण रूपी दिसते हि जे जे
    ते सर्व तूचि असुनी अससी निराळा ।
माझे - तुझे सगळि मायिक शब्द होती
    ते वृक्षबीज रूप जैं दिसते निराळे ।
त्या गंधमात्र करूनी रूप एक राही
    कार्या नि कारण गमे परि भिन्न सारे ॥३१॥
तू आपुल्यात मिटिसी अशि सृष्टि सारी
    भोगीसि तू स्वयचि सौख्य नि झोप घेसी ।
आत्मेय तेज अशि झोप तुरीय ब्रह्म
    स्वीकार ना करिसि तू विषयी तमाचा ॥३२॥
तू कालशक्ति करूनी गुण प्रेरिसी नी
    ब्रह्मांड हे तव तनू म्हणुनी असे का ।
वैराट होय वट बीज तसेचि रूपा
    ब्रह्मांड पुष्प कमलो तव नाभितून ॥३३॥
ब्रह्मा तयात प्रगटे अति सूक्ष्म त्यात
    नाही तयास दिसले कमळा विना त्या ।
घूसोनियाहि शतवर्ष जळी बघे तो
    कांही न त्यास दिसले मुळि ते दुजे की ।
अंकूर ना बघु शके बिजिं जै वसोनी
    नाही तयास दिसले मुळि अन्य कांही ॥३४॥
साश्चर्य होउनि विधी कमळीं बसोनी
    केले तपा हृदयि तै मग शुद्ध झाला ।
पृथ्वीत गंध असतो जइ पूर्ण तैसा
    झाला स्वयें अनुभवे परिपूर्ण तेंव्हा ॥३५॥
सहस्त्र शीर्ष मुख हात नि नाक कान
    नेत्रे तसे भूषण त्याच विराट रूपा ।
आयूध युक्त भुवने तयि संगि सारे
    रूपा बघोनि विधिला बहु मोद झाला ॥३६॥
रजोगुणी नि तम कैटभ नी मधू हे
    नामेचि दैत्य जधि वेदहि चोरिले नी ।
झालासि तू हयशिरा वधिले तयांना
    ब्रह्म्यासि वेद दिधले ऋषि गाति लीला ॥३७॥
पक्षी पशू नि ऋषि देव मनुष्ययोनी
    मत्स्यादि रूप धरूनी वधितोस दुष्टा ।
घेऊनी रूप युगधर्महि रक्षिसी तू
    ना तू कलीत दिससी तिन्हि यूगि जैसा ॥३८॥
वैकुंठनाथ मन हे अति दुष्ट माझे
    हर्षादि लोभ धरिते अन दुःखि होते ।
लीला कथेत नच ते रस घेइ कांही
    तेणेचि दीन गमतो मग ध्याउ कैसा ॥३९॥
ही ओढिते जिभ रसा नच आवरे की
    स्त्रीयांकडे जनन ईंद्रिय कान गाणीं ।
स्पर्शा त्वचा नि मधुभोजनि पोट ओढी
    सौंदर्य नी परिमळा तयि इंद्रियो ते ।
स्त्रीया अनेक असता शयनगृहासी
    ओढिती ना निज जसी फजिती पुरूषा ॥४०॥
संसार रूप नदिशी बुडातोय जीव
    रहाट कुंभ फिरती तयि ही अवस्था ।
भीतीत हा करितसे पर-आप भाव
    तू मूढजीव बघूनी भवपार नेशी ॥४१॥
सत्ता तुझीच सगळी तूज काय ओझे
    वेड्या-मुड्याहि मिळतो गुरूचा प्रसाद ।
आम्ही सदैव वसतो तवभक्त पायी
    चिंता मुळी मज नसे भवपार व्हाया ॥४२॥
अन्यास हा नद बहू तरण्या कठीण
    लीलाकथा सरिति या अम्हि पोहतो की ।
नाही म्हणूनि मजला मुळि कांहि चिंता
    विन्मूख त्यांचि करितो मनि नित्य चिंता ॥४३॥
मौनी व्रतासि धरूनी बसती गुहेत
    चिंता नसे मनि तया दुसर्‍या जिवांची ।
मी एकटा न कधि मुक्त होण्या बघे की
    मूढास त्या नच कुठे तुजवीण थारा ॥४४॥
ती खाजता खरूज जै मग दुःख लाभे ।
    मैथून आदि सुखिंही मग दुःख लाभे ।
भोगोनि दुःख कुणि तो तरि खाजवीतो
    तैसेचि मूढ विषया नच त्यागिती ते ॥४५॥
स्वाध्याय मौन तप ध्यान समाधि व्याख्या
    एकांत धर्म श्रवणो जप ब्रह्मचर्य ।
मोक्षार्थ साधन दहा पुरूषोत्तमारे
    दांभीक पोट भरण्या वरपांग दावी ॥४६॥
ते कार्य कारण बिजापरि रूप वेद
    सांगे परी तुज नसे रूप रंग कांही ।
ती साधनेचि असती तुज जाणण्याची
    काष्ठाग्नि तुल्य तव तत्व असेच गुप्त ॥४७॥
तन्मात्र पंच नभ नीर वसुंधरादी
    प्राणेंद्रियादि सगळे तव रूप सत्य ।
निर्गूण नी सगूण रूप तुझेचि देवा
    माझीहि वाणि तव रूप नसेचि भिन्न ॥४८॥
तू कीर्तिमंत हरि रे कळशी न कोणा
    त्या देवता नि मनही तव रूप नेणे ।
ते नाशवंत सगळे अविनाशि तू तो
    ज्ञानी विचार करिती अन जाणितात ॥४९॥
सेवा स्तुती नि नमने तुज अर्पिणे नी
    पूजा नि पाय स्मरणे अन कीर्ति ऐको ।
साही अशी न करिता तव प्राप्ति कैशी
    तू भक्त जे परमहंस तयासि प्राण ॥५०॥
नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
प्रल्हादे हे असे रूप परा प्रकृत वेगळे ।
वर्णिले वंदिले देवा तेंव्हा नृसिंह तो हरी ॥
जाहला शांत आणि तो प्रसन्ने बोलला पहा ॥५१॥
श्रीनृसिंह भगवान्‌ म्हणाले -
कल्याणरूप प्रल्हादा तुझे कल्याण हो सदा ।
दैत्येंद्रा तुजशी धालो माग इच्छा असेल ती ॥
जीवांच्या सगळ्या इच्छा पूर्ण मी करितो पहा ॥५२॥
आयुष्मंता न जो भक्त तया मी न दिसे कधी ।
ज्या जीवा भेटतो त्याची आग सर्वस्वी नष्टितो ॥५३॥
मनोरथे करी पूर्ण कल्याणी साधु ते मज ।
इंद्रिया जिंकुनी यत्‍ने माझ्या तोषार्थ कष्टती ॥५४॥
कुलभूषण प्रल्हाद अनन्य भक्त तो असा ।
प्रलोभने वरा त्याने इच्छिले नच त्या मनीं ॥५५॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ ५ ॥ ९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP