| 
 
समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण   
 
स्कंध सातवा - अध्याय ८ वा   
 
भगवान् नृसिंहाचा अवतार, हिरण्यकश्यपुचा वध व देवतांकडून भगवंताची स्तुती -  
 
श्रीनारद सांगतात - (अनुष्टुप्)
 असे दैत्य सुते सर्वे मानिला बोध सर्व तो ।
 दूषीत गुरूच्या बोला तयांनी ध्यान ना दिले ॥१॥
 गुरूंनी पाहिले सर्व विद्दार्थी एकमात्र त्या ।
 हरीचे चिंतनी झाले तेंव्हा घाबरूनी पुढे ॥
 दैत्याच्यापासि येवोनी सर्व ते सांगु लागले ॥२॥
 पुत्राची अनिती ऐसी ऐकता दैत्य कोपला ।
 मारण्या आपुल्या हाते तयाने ठरवियले ॥३॥
 इंद्रिया जिंकुनी बाळ हात जोडोनि ठाकला ।
 परी क्रूर स्वभावाचा हिरण्यकशिपू जसा ॥४॥
 सापासी लागता पाय तसा क्रोधेचि पेटला ।
 पापाची दृष्टि टाकोनी बोलला तो दटावुनी ॥५॥
 मूर्खा उदंड झाला तू मुलांना बिघडीतसे ।
 धैर्याने मोडिसी आज्ञा यमाचा पाहुणाच हो ॥६॥
 थोडाही कोपलो मी तो त्रिलोक्य कांपुनी उठे ।
 कोणाचे बळ घोवोनी आज्ञा तू मोडिसी मम ॥७॥
 प्रल्हाद म्हणाला -
 (इंद्रवज्रा)
 राजा नसे एकची अंकितो त्या
 ब्रह्मादि सारे हरिसीच वश्य ।
 तुम्हा मला केवळ शक्ति त्याची
 सार्या जगाचे बळ तोचि आहे ॥८॥
 पराक्रमी तो प्रभू काळ रूप
 समस्त प्राण्या बल इंद्रियांचा ।
 तो शक्तिने निर्मि नि मारतो ही
 स्वामी असे तो तिन्हिही गुणांचा ॥९॥
 असूरभावा कृपया त्यजावे
 भवास मोही मन तेच शत्रू ।
 समान ठेवा मन सर्व प्राण्या
 ती श्रेष्ठ आहे हरिचीच पूजा ॥१०॥
 षट् शत्रुला त्या नच जिंकिता जो
 सम्राट मानी मग तोच मूर्ख ।
 जितेंद्रियाला समता मिळे ती
 न शत्रु त्याला जगतात राही ॥११॥
 हिरण्यकश्यपू म्हणाला -
 (अनुष्टुप्)
 मंदबुद्ध्या तुझी झाली सीमा ही बकवास की ।
 इच्छिले मरणा तू तो तेणेचि बोलसी असा ॥१२॥
 अभाग्या कोण तो स्वामी विश्वी माझ्याहुनी दुजा ।
 सर्वत्र दिसतो तेंव्हा या खांबी का न तो दिसे ॥१३॥
 दिसतो जर या स्तंभी टाहो का मग फोडिसी ।
 कापितो तव हे डोके बघू रक्षी कसा हरी ॥१४॥
 (इंद्रवज्रा)
 महाबळी दैत्य दुरूक्त वाक्ये
 टाकोनि बोले तयि बाळासंता ।
 सिंहासनीचा उठताचि क्रोधे
 खड्गासि खांबा मधि भोकसीले ॥१५॥
 खांबातुनी शब्द भयान आले
 ब्रह्मांड वाटे जणु फाटले हे ।
 त्या लोकपाले ध्वनि ऐकिता हा
 आला गमे तो प्रलयोचि त्यांना ॥१६॥
 पुत्रा बघाया जरि धावला तो
 अद्भूत ऐसा ध्वनि ऐकिला नी ।
 मनात गेला मग घाबरोनी
 सभेतले अन्य पळोनि गेले ॥१७॥
 स्वभक्त प्रल्हाद नि ब्रह्मयाची
 करावया सत्यचि वाणि तैसे ।
 दावावया व्यापकता स्वताची
 नृसिंह देहा धरिले प्रभूने ॥१८॥
 तो दैत्य धुंडी सभिं अन्य लोका
 अद्भूत प्राणी दिसला तदा हा ।
 खांबातुनी हा प्रगटोनि आला
 ना ओळखी तो नव प्राणि कोण ॥१९॥
 विचार चित्ती करि दैत्य तेंव्हा
 समोर त्याच्या रूपडे उभे हे ।
 सुवर्ण तप्तो तयि नेत्र तप्त
 आयाळ हाले बहु जांभईने ॥२०॥
 विक्राळ दाढा जणु खड्ग जिव्हा
 दारूण रूपा भुवयाहि वक्र ।
 फुत्कार नाकीं अन कान स्थीर
 गूहेपरी त्या मुख भीतिदायी ॥२१॥
 स्वर्गासि टेके बहु थोर देह
 नी मान मोठी अतिरूंद छाती ।
 परी नितंबी बहुसान ऐसा
 चंद्रप्रकाशापरि रोम अंगी ।
 कितेक बाहू नख थोर त्यांना
 शस्त्रापरी जे अतिही कठीण ॥२२॥
 न कोणि जाण्या धजला समीप
 चक्रादि अस्त्रा बघता पळाले ।
 दैत्यादि सारे भिउनी दिशांना
 मनात शोधी मग दैत्य ऐसे ।
 हे सोंग सारे रचि विष्णु ऐसे
 परी अशाने नच वाकडे हो ॥२३॥
 दैत्ये करी घेतली ती गदा नी
 मारावयासी मग धावला त्या ।
 पतंग अग्नीत मिळोनि जातो
 तेजीं तसा दैत्यहि लुप्त झाला ॥२४॥
 समस्त शक्ती अन तेज स्त्रोता
 नाही मुळी त्या नवलाव कांही ।
 प्रलयांधकारा गिळले ययाने
 प्रहार दैत्ये भगवंति केला ॥२५॥
 क्षणात सर्पा पकडी गरूड
 तसा नृसिंहे धरिलाचि दैत्य ।
 तो सर्प जैसा क्रिडता गरूड
 सुटे तसाची सुटलाहि दैत्य ॥२६॥
 तदा ढगामाजि लपोनि देव
 युद्धासि पाह्या जमले विमानीं ।
 दैत्यास भीती मनि देवता तै
 दैत्यासि वाटे मज शत्रु भीतो ।
 ताजा पुन्हा तो मग होउनीया
 खड्गासि घेता मग धाव घेई ॥२७॥
 पक्ष्यावरी झेप घेई ससाना
 सशस्त्र घेई तयि झेप दैत्य ।
 सर्पे जसा मूषक तो धरावा
 तसेचि दैत्या धरिले नृसिंहे ॥२८॥
 ज्याच्या त्वचेला नच ओरखाडा
 आता पळाया करि दैत्य यत्न ।
 परी हरीने पकडोनि नेला
 द्वारी नि अंकी निज घेतले त्या ।
 महाविषारी जरि सर्प झाला
 गरूड त्याला जयि फाडतो तै ।
 दैत्यासि देवो खुपसी नखें नी
 फाडीयले त्या लिलया तसेची ॥२९॥
 विक्राळ नेत्रा नच पाहवे की
 लपापती जीभ मिश्यास चाटी ।
 आयाळ रक्ते तयि लाल झाले
 गळ्यात आंत्राचिहि माळ शोभे ॥३०॥
 दैत्याचिये काळिज फाडुनीया
 भूमीसि त्याला मग आपटीले ।
 युद्धास आले असुरो हजारो
 परी नृसिंहे वधिले कराने ॥३१॥
 पिंजार केसे ढग पांगले नी
 त्या नेत्रज्वाळे ग्रह सूर्य मंद ।
 झाले नि श्वासे भरती समुद्रा
 चित्कार केला तयि दिग्गजांनी ॥३२॥
 झट्कारता केश तदा विमाने
 देवादिकांची पडली भुमिसी ।
 डळाळला स्वर्ग तसे भुकंपे
 ठिक्र्याचि झाले तयि पर्वतोही ।
 ती धूळ दाटे जधि चौ दिशांना
 दिसे न कांही मग काय कोठे ॥३३॥
 न कोणि तेथे जरि तो लढाया
 वाढे तरी क्रोध तसा हरीचा ।
 त्या दैत्यसिंहासनि बैसले तै
 सेवार्थ कोणी धजले नसेची ॥३४॥
 डोकेदुखी जी जगतास सार्या
 तो दैत्य या श्रीहरिने वधीला ।
 या वर्तमाने मग स्वर्गि देवे
 उल्हासुनी पुष्पवृष्टीहि केली ॥३५॥
 स्वर्गी विमाने तयि दाटली त्या
 नृसिंहरूपा बघण्या वरून ।
 भेर्या नगारे बहु वाजले नी
 त्या अप्सरा नाचुनि गान झाले ॥३६॥
 (अनुष्टुप्)
 राजा या समयी तेंव्हा ब्रह्मा इंद्र नि शंकर ।
 अन्यही देवता सर्व ऋषी सिद्ध मनू तसे ॥३७॥
 सिद्ध विद्दाधरो पित्रे महानाग प्रजापती ।
 गंधर्व अप्सरा आदी किंपुरूष नि चारण ॥३८॥
 वेताळ किन्नरे तैसे सुनंद कुमुदादि ते ।
 पार्षदे हरिची आली जोडुनी कर तेधवा ॥
 पृथक्सर्वांनि ती केली प्रार्थना स्तोत्र गावुनी ॥३९॥
 श्री ब्रह्मदेव म्हणाले -
 (इंद्रवज्रा)
 प्रभो अनंता तव पार नाही
 विचित्र शक्ती नि पवित्र कार्य ।
 लीला करीसी परि स्पर्शि ना तू
 तू निर्विकारो तुजला नमस्ते ॥४०॥
 श्रीरूद्र म्हणाले -
 (अनुष्टुप्)
 युगांती क्रोधता तुम्ही दैत्यार्थ कोपले तरी ।
 दैत्याचा वध तो झाला शरणी पुत्र पातला ॥
 त्याची रक्षा करावी की भक्तवत्सल तू प्रभो ॥४१॥
 इंद्र म्हणाला -
 (मंदाक्रांता)
 केली रक्षा अमुचि हरि तू आम्हि जे भाग देतो ।
 तेही सारे तवचि असती दैत्य हे मीष झाले ॥
 नी तू केले मुदित हृदया हे तुझेची निवास ।
 स्वर्गादी हे परत मिळले त्यांहि तो काळ ग्रासी ॥
 स्वामी जे जे करिति भजनो ते न इच्छा करीती ।
 मोक्षाचीही मुळि न धरिती कामना ते मनात ॥४२॥
 ऋषि म्हणाले -
 (वसंततिलका)
 केले तपेचि जग तू पुरूषोत्तमारे
 आम्हासि तेज तप हे तुचि बोधियेले ।
 दैत्ये तपेचि असला अतिरेक केला
 रक्षार्थ ते तप असा अवतारलासी ॥४३॥
 पितरे म्हणाली -
 पिंडास देत सुत ते हिसकीच दैत्य
 तीलांजलीहि पियि तो शुभवेळ तीर्थी ।
 फाडोनि पोट दिधली तुम्हि ती अम्हाला
 तू धर्मरक्षक असा तुजला नमस्ते ॥४४॥
 सिद्ध म्हणाले -
 (इंद्रवज्रा)
 नृसिंह देवा ! तप योग तेणे
 सिद्धी अमूच्या हरिल्या तयाने ।
 युद्धात तुम्ही पशुच्या परी तो
 दिला बळी हो नमितो अम्हीही ॥४५॥
 विद्दाधर म्हणाले -
 गर्वीष्ठ होता बहु मूर्ख दैत्य
 समस्त विद्दा तयि नष्ट केल्या ।
 फाडोनि पोटा हरिला तयाचा
 तो गर्व तुम्ही नमितो अम्हीही ॥४६॥
 नाग म्हणाले -
 (अनुष्टुप्)
 पाप्याने ते मणी आणि सुंदर्या पळवीयल्या ।
 वधाने हर्षल्या पत्न्या तुजला प्रणिपात हा ॥४७॥
 मनू म्हणाले -
 (उद्गता)
 मनु आम्हि तो तवचि अंकितो असो
 दिति पुत्रने त्याजियली सीमा विधी ।
 वधुनि तयास बहुही उपकृतिले
 करणे कसेचि तव सेवनार्थ तो ॥४८॥
 प्रजापती म्हणाले -
 (भुजंगप्रयात)
 प्रजेचे पती आसुनी या प्रजेला
 तयाच्याचि धाके न केली हि रक्षा ।
 नी झोपल्याच्या परि हा वधीला
 जगाचेहि कल्याण तुझ्याऽवतारी ॥४९॥
 गंधर्व म्हणाले -
 (इंद्रवज्रा)
 गावोनि नाचोनि अभीनयाने
 सेवा तुझी आम्हि करोत भक्त ।
 धाकेचि केले परि दास दैत्ये
 त्याची दशा ही बरि योग्य केली ।
 चाले कुमार्गी मग त्यास कैसे
 कल्याण लाभे जगतात कोठे ॥५०॥
 चारण म्हणाले -
 (अनुष्टुप्)
 सज्जना पीडिले ऐशा दुष्टां तू ठार मारिले ।
 तुझ्या या चरणी आलो लाभ तो मोक्ष ज्या मुळे ॥५१॥
 यक्ष म्हणाले -
 (मालिनी)
 करितसु तव सेवा श्रेष्ठ ऐशाचि कर्मे
 परि बघ दिति सूते पालखीं जुपियेले ।
 हरि तुचि असशी या सृष्टिलागी नियंता
 निजजनकनवाळू, मारिसी दैत्य कष्टे ॥५२॥
 किंपुरूष म्हणाले -
 (अनुष्टुप्)
 किंपुरूष परी आम्ही महापुरूष तू असा ।
 दैत्ये धिक्कारिले संता म्हणोनि वधिलेस त्या ॥५३॥
 वेताळिया म्हणाल्या -
 (इंद्रवज्रा)
 मोठ्या सभे माजि नि ज्ञान यज्ञीं
 गाता तुला लाभलि ही प्रतिष्ठा ।
 आजीविका तो हिसकावि दैत्य
 रोगापरी तू तयि नष्ट केला ॥५४॥
 किन्नर म्हणाले -
 (उद्गता)
 भजको तुझेचि असुनी तरीहि दैत्ये
 करण्यासि काम बळ दाउनीच नेले ।
 अजि तूं वधुनि तयि तू कृपाचि केली
 हरि रे ! अशीच करि तू अम्हा कृपा ॥५५॥
 (प्रहर्षिणी)
 नृसिंहा तव रूप हे जगासि शांती
 देणारे बघितलिये अजी तुझे रे ।
 ते दैत्यो तव पदा सेवकोचि होते
 तारावया करूनि कृपा वधोनि नेले ॥५६॥
 
 ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ ५ ॥ ८ ॥
 हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
 
 GO TOP 
 
 |