समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सातवा - अध्याय ७ वा
प्रल्हादाकडून मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदी उपदेश वर्णन -
नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्)
युधिष्ठिरा ! असा प्रश्न दैत्य पुत्रे विचारिता ।
माझे स्मरण त्यां आले हासुनी बोलला तया ॥१॥
प्रल्हाद म्हणाला -
पिताश्री आमुचे जेंव्हा तपार्थ मंदराचली ।
गेले इंद्रादि देवे तै दानवा युद्ध छेडिले ॥२॥
तदा ते बोलले ऐसे मुंग्याही साप मारिती ।
तसाचि पापि हा दैत्य पापाने गिळले तया ॥३॥
दैत्य सेनापतीला हा कळता सर्व उद्दम ।
गळाले बळ ते सारे गेले नाही समोरही ॥४॥
घेतला मार तो खूप स्त्री पुत्र मित्र नी गुरू ।
पशू समान सर्वांना पळाले टाकुनी दुरी ॥५॥
विजयी देवतांनी तै महाल लुटले तसे ।
माता कयाधुराणीला इंद्रे कैदेत टाकिले ॥६॥
माझी मॉं टिटवी ऐसी रडता ओढिले तिला ।
सुदैवे नारदे तेंव्हा माझी आई बघीतली ॥७॥
इंद्रा निरपराधीही हिला नेणे उचीत ना ।
सती साध्वी परनारी निरस्कारू नको हिला ॥
त्वरीत सोडणे हीस वदले नारदो असे ॥८॥
इंद्र म्हणाला -
देवद्रोही असा दैत्य वीर्य त्याचे प्रभावित ।
वाढते गर्भरूपाने जन्मता मारितो तया ॥९॥
श्रीनारद म्हणाले -
हिच्या गर्भी परं भक्त सेवको हरिचा असे ।
निष्पापचि वसे साधू तुझी ना शक्ति मारण्या ॥१०॥
देवर्षी नारदांची ती इंद्राने गोष्ट मानिली ।
प्रदक्षिणा तिला केली सोडुनी स्वर्गि पातला ॥११॥
मातेसी समजावोनी नारदे आश्रमी स्वयें ।
नेले नी वदले बाळे पतीचे तप पूर्ण ते ॥
होईपर्यंत येथेची सुखाने राहि तूं कशी ॥१२॥
’जशी आज्ञा’ म्हणोनीया पतीचे तप थोर ते ।
संपेपर्यंत ती तेथे निर्भये राहिली असे ॥१३॥
माझी गर्भवती माता गर्भीच्या शिशुमंगला ।
चिंतोनी प्रेमभावाने संतसेवेत राहिली ॥१४॥
समर्थ ऋषिकारण्यी ज्ञानोपदेश हा तिला ।
दिला तेंव्हा तयांची ती दृष्टी माझ्यावरी असे ॥१५॥
अनंत काळ तो गेला तशी स्त्री बुद्धिच्या मुळे ।
माता विसरली सर्व परी ऋषि कृपे मुळे ॥
स्मृती ती राहीली सर्व जशीच्या तशि की मला ॥१६॥
विश्वास धरिता माझा तुम्हा हे ज्ञान हो शके ।
श्रद्धेने बाल स्त्रीयांची बुद्धी माझ्या परी घडे ॥१७॥
जसे काळकृपेने त्या फळे वृक्षांस लागती ।
थांबती वाढती पक्व पडती क्षीण होवुनी ॥
सहा हे भाव या देहा आत्मा त्याला शिवेहिना ॥१८॥
अविनाशी नित्य शुद्ध एक क्षेत्रज्ञ आश्रय ।
निर्विकार स्वयं तेज कारणी व्यापको असा ॥१९॥
असंग नि अनावृत्त आत्मा द्वादश लक्षणी ।
ज्ञात्यांनी जाणणे त्याला अहंता सर्व सोडणे ॥२०॥
(इंद्रवज्रा)
सोने जसे माति मधोनि काढी
सोनारे तैसा हरि मेळवावा ।
क्षेत्रज्ञ तेणे तनुक्षेत्र यात
ब्रह्मपदाची अनुभूति घ्यावी ॥२१॥
(अनुष्टुप्)
आचार्ये आठ तत्वांची प्रकृती मानिली असे ।
तयांचे गुण ते तीन विकार षोडशी तयां ॥
सर्वात्मा जो पुरूष तो कथिला बंधुनो असा ॥२२॥
सर्वाचा संघ तो देह स्थावरो जंगमो द्वय ।
निराळा इंद्रियादींसी आत्मा हा धुंडिणे असा ॥२३॥
सर्वात वसतो आत्मा परी तो वेगळा असे ।
निवांत बोध हा घ्यावा नको घाई मुळीच ती ॥२४॥
बुद्धीच्या वृत्ति त्या तीन जागृत स्वप्न नि निद्रित ।
वृत्तींना चेतना ज्याची आत्मा तो साक्षिभूतची ॥२५॥
वार्यांच्या आश्रये गंध कळतो त्याचिये परी ।
बुद्धीच्या या अवस्थांनी आत्म्याला जाणने असे ॥२६॥
भवचक्री गुणकर्मी आत्मा नी तनु वेगळी ।
न देखता भ्रमे भास मिथ्या अज्ञानमूळ जे ॥२७॥
म्हणोनी गुणकर्माचे जाळावे बीज ते तुम्ही ।
तेणे निवृत्त हो चित्त हेवि परमात्म दर्शन ॥२८॥
कर्माचे मूळ खंडाया अनेक साधने जरी ।
परी श्रीहरिची भक्ती स्वल्प ती वदला हरी ॥२९॥
गुरूसी सेविता लाभे ती कृष्णार्पण बुद्धि की ।
नामसंकीर्तनी भक्ती संतांचा संग तो सदा ॥३०॥
ध्यान त्या पादपद्माचे मंदिरी पूजिणे तया ।
अशा या साधनांनी हो हरीची प्रीति अंतरी ॥३१॥
शक्तिमान् भगवान् कृष्ण समस्तीं तो विराजितो ।
यथा शक्ती अशा भावे हृदयी आदरे धरा ॥३२॥
सहा शत्रूंसि जिंकोनी साधी जो भक्ति ही अशी ।
त्याला श्रीकृष्ण पायाची अनन्य भक्ति लाभते ॥३३॥
(इंद्रवज्रा)
अद्भूत लीला नि पराक्रमाच्या
कथा अशा श्रीहरिच्याच गाता ।
रोमांच अंगी उठती जिवाच्या
प्रेमाश्रु नी कंठ भरून येतो ॥३४॥
तो भक्त सोडी मग लाज सारी
नाचे नि गायी मग कीर्तनात ।
हासे कधी नी रडतो तसाची
वेड्यापरी नी कधि ध्यान घेतो ॥३५॥
मानोनि विष्णू कधि जीव वंदी
उच्छ्वास होतो मग दीर्घ तेंव्हा ।
सुटोनि जाते मग लाज सारी
वाचेसि नारायण कृष्ण बोले ॥
तद्रुप होता तुटतात बंध
तयासि लाभे हरिकृष्ण देव ॥३६॥
अशूभ ऐशा भवकर्दमात
फसे तयाला हरिनाम तारी ।
यालाचि कोणी वदतात ब्रह्म
निर्वाण सौख्यो वदती कुणी ते ।
हो ! मित्र बंधो तुम्हि आपुल्या त्या
म्हणोनि चित्ती हरिसी भजावे ॥३७॥
आकाश ऐसा हरि अंतरात
ध्यानात नाही मुळि कष्ट कांही ।
सुहृद असा तो सम प्राणिमित्र
त्याला त्यजावे किति मूर्खताही॥३८॥
स्त्री पुत्र पुत्री धन नी महाल
पशू नि हत्ती अन तो खजीना ।
स्वयेचि सारे क्षणभंगुरी ते
ते काय कोणा मग सौख्य देती ॥३९॥
संपत्ति सारी जशि नाशवंत
स्वर्गादि लोको तशि सान थोर ।
निर्दोष ना ते हरि तोचि शुद्ध
म्हणोनि गावी हरिकीर्तने ती ॥४०॥
(अनुष्टुप्)
स्वताला मानुनी मोठा उद्देश धरूनी मनीं ।
विद्वान करिती कर्म फळ त्यां उलटे मिळे ॥४१॥
कर्माचे हेतु ते दोन सुख प्राप्ती नि दुःख ते ।
सुटणे परि नी पूर्ती म्हणोनी दुःख भोगितो ॥४२॥
जगी सकाम वृत्तीने जगे ती तनु नाशवान् ।
कोल्हे कुत्रे हि त्या खाती भोग लाभे नि तो सुटे ॥४३॥
देहाची गति ही ऐसी मग ते धन पुत्र नी ।
स्त्रिया संपत्ति आदींची गोष्ट ती नच सांगणे ॥४४॥
तुच्छ हे विषयो सारे तनूच्यासह नष्टती ।
पुरूषार्थ गमे चित्ता परी सर्व अनर्थची ॥
आनंदसागरा ऐसा स्वयं आत्मा अनंत तो ।
मग या वस्तुची सर्व गरज नच भासते ॥४५॥
गर्भाच्या पासुनी मृत्यू पर्यन्त क्लेश होत ते ।
कर्माधीन जगी सर्व त्यात स्वार्थ न तो मुळी ॥४६॥
जीव हा सूक्ष्म देहाला आत्मा मानून वर्तता ।
पुन्हा भोगार्थ कर्मांना शरीरा धारितो पहा ॥
अविवेके असे नित्य घडते ही परंपरा ॥४७॥
तरी निष्काम भावाने निष्क्रीय आत्मरूप त्या ।
हरिसी भजणे नित्य लाभते सर्व त्या मुळे ॥
न इच्छी त्याजला कैसी हरिची प्राप्ति ती कधी ॥४८॥
सर्वांभूत असा आत्मा हरी हा परमप्रिय ।
पंचभूत अशा देहा, जीवाला नाम ते मिळे ॥४९॥
मनुष्य देवता दैत्य गंधर्व कोणिही असो ।
मुकुंदचरणा ध्याता आमुच्या सम संत हो ॥५०॥
देवता ऋषि नी विप्रा सदाचारी नि ज्ञानियां ।
दान तप तसे यज्ञ व्रते शौच न ते पुरे ॥५१॥
निष्काम भजता प्रेम पावतो भगवान् हरी ।
विडंबन असे सर्व अन्य यत्न तयासि ते ॥५२॥
दानवांनो तरी भक्ती करावी हरिची सदा ।
समान ठेविणे दृष्टी सर्वात्मा शक्तिमान तो ॥५३॥
भक्तीच्या त्या प्रभावाने दैत्य यक्ष नि राक्षस ।
गोपाळ नी स्त्रिया शूद्र पशू पक्षी असे जिवो ॥
पापीही असता कोणी मिळाले भक्तिने पदां ॥५४॥
मनुष्य जीवना मध्ये स्वार्थ नी परमार्थ तो ।
कृष्णाची भक्ति ती एक अनन्य साधिणे अशी ॥
सर्वत्र दिसणे कृष्ण भक्तीचे रूप ते असे ॥५५॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ ५ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|