समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सातवा - अध्याय ६ वा
प्रल्हादाचा असुरबालकांना उपदेश -
(अनुष्टुप्)
दुर्लभो माणुसी जन्म येणे श्रीहरी लाभतो ।
क्षणात संपते आयू विसंबा न जरेस त्या ॥
चतुरे कळते तेंव्हा पासूनी हरि पूजिणे ॥१॥
श्रीहरीचरणी भक्ती साफल्य एकची जिवां ।
समस्ता स्वामि तो एक सुहृद् आत्मा सखाहि तो ॥२॥
ज्या योनीसी असे जीव तेथले भोगितो सुख ।
प्रारब्धे ते मिळे दुःख अनायासे न ते चुके ॥३॥
तदा संसार भोगाच्या सुखा यत्न न ते करा ।
आपैसे लाभते त्याला आयू शक्ती न लाविणे ॥
यात गुंते तया नाही श्रीहरी पदलाभ तो ॥४॥
शिरासी भय ते कैक देहाने श्रीहरी मिळे ।
रोगादी ग्रासण्यापूर्वी आपुले हित साधिणे ॥५॥
शतायू सगळी त्यात अर्धी रात्रीत जातसे ।
अज्ञानग्रस्त होवोनी झोपती सर्वतीत की ॥६॥
खेळात वीस ते जाती जरा ती शेवटी विसीं ।
न तदा राहते शक्ती सत्संग नच तो घडे ॥७॥
आयू जी राहते थोडी आकांक्षा तीत श्रेष्ठ त्या ।
वाढती मोहही वाढे कर्तव्यज्ञान राहिना ॥
अशीही उरली थोडी आयुही संपते तदा ॥८॥
कोण तो दैत्यबाळांनो इंद्रिया नच जिंकुनी ।
फसता मोह मायेत आपणा मुक्ति मेळवी ॥९॥
प्राणाची बाजि लावोनि व्यापारी धन मेळिती ।
प्राणाहून अशी प्रीय तृष्णा कोण त्यजील ती ॥१०॥
(इंद्रवज्रा)
एकांति स्त्रीच्या मधु बोलण्याने
ओवाळुनी जो आपणास टाकी ।
जो गुंतला त्या स्वजनात नित्य
पशू शिशूंच्या नित प्रेमपाशी ।
बोलात लुब्धे तयि बोबड्या त्या
अशा नरा ना कुणि सोडवी तो ॥११॥
जो सासुरी पुत्रि नि पुत्र बंधू
बहीण नी दीनच मातृ-पितृ
घरादिकांच्या रचिण्यास चिंती
ये कोण त्याला भवि सोडण्याला ॥१२॥
जो श्रेष्ठ मानी विषयी सुखाला
त्याच्या न इच्छा कधि पूर्ण होती ।
कोषात गुंते जयि कीट तैसा
विरक्त त्या कैं नच मुक्ति लाभे ॥१३॥
कुटुंब माझे स्मरता मनासी
त्या पोषणा आयुहि वेचितो तो ।
प्रमादिया जाळिति ते त्रिताप
वैराग्य ना तो किति वंचना ही ॥१४॥
कुटुंबमोही बुडता धनाची
चिंता तयाच्या हृदया सतावे ।
चोरिस दंडो जरि जाणितो तो
त्या लालसेने करितोच चोरी ॥१५॥
विद्वान तोही भरिता कुटुंबा
न प्राप्ति होते हरिच्या रूपाची ।
येणेचि होतो पर-आप भाव
तमी जिवाची गति त्यास लाभे ॥१६॥
जो कामिनीची मृगयाचि झाला
संतान बेड्या पडता करात ।
कोणी कसाही कुठलाहि होवो
उद्धार त्याचा मग होय कैसा ॥१७॥
म्हणोनि बंधो त्यजिणेच संग
या दैत्यकूळी हरि तो भजावा ।
प्रपंचि आशा जयि सोडियेली
तो संत त्याची गति धन्य होते ॥१८॥
(अनुष्टुप्)
मित्रांनो बहु ना कष्ट हरीच्या प्राप्तिसी तसे ।
सर्वात्मा सर्व रूपात स्वयंसिद्धचि वस्तु तो ॥१९॥
ब्रह्मादी सर्व प्राण्यात तृणीही तोच की वसे ।
वस्तूत पंचभूतात सूक्ष्म तन्मात्र तत्विही ॥२०॥
त्रेगुणी गुणसाम्यात प्रकृतीच्या मधे तसा ।
विराजे हरि तो एक अविनाशी परेश तो ॥२१॥
अंतर्यामी दिसे द्रष्टा दृश्याने जगताचिया ।
अविकल्प असोनीया व्यापाने वर्णिती तया ॥२२॥
आनंदरूप जाणावा असा तो एकटा हरी ।
मायेने निर्मितो सृष्टी त्यात ऐश्वर्य लोपले ॥
निवृत्ती मिळता तीत तयाचे दर्शनो घडे ॥२३॥
असुरी धन त्यागावे जीवांना करणे दया ।
प्रेमाने हित ते साधा भगवान् पावतो तये ॥२४॥
(वसंततिलका)
तो पावता हरितदा न उणे कदापी
ते धर्म अर्थ मिळती नच कष्ट घेता ।
जो सेवितो हरिपदा अन कीर्ति गातो
तो मोक्षही मग तया मुळि तुच्छ वाटे ॥२५॥
धर्मार्थ काम जरि थोर पुराण गाती
ती दंडनीति जगणे प्रतिपाद्द वेदी ।
तो अर्पिता हरिपदा मग सार्थको नी
नाही तसे जर घडे मग ते निरर्थ ॥२६॥
हे शुद्ध ज्ञान वदलो अति दुर्लभो हे
नारायणे नर नि जे वदले कधीचे ।
श्री नारदास, मिळते जयिपाय धूळ
झालेच स्नान समजा निजभक्त प्रीया ॥२७॥
(अनुष्टुप्)
विशुद्ध ज्ञान विज्ञान भागवद्धर्म हा असा ।
ऐकिला पूर्वि मी जेंव्हा घडवी कृष्णदर्शन ॥२८॥
दैत्यपुत्रांनी विचारले -
प्रल्हादा आपुले दोघे हे गुरू शुक्रपुत्रची ।
न कोणी पाहिला अन्य बोधिती सगळ्यासि हे ॥२९॥
प्रल्हादा आणखी तूही सान माताश्रयात तू ।
तुझी नी नारदाची त्या भेट खोटीच वाटते ॥
विश्वासा हे असे सांग मिटवी किंतु आमुचा ॥३०॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥ ५ ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|