समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सातवा - अध्याय ३ रा

हिरण्यकशिपूची तपस्या आणि वर प्राप्ती -

श्रीनारद सांगतात -
(अनुष्टुप्‌)
हिरण्यकश्यपू याने आता चित्तात घेतले ।
अजरामर मी होतो सम्राट पृथिवीस या ॥१॥
मंदराचलि त्या साठी गेला नी लागता तपा ।
तिथे हात उभारोनी एकांगुष्ठीच राहिला ॥२॥
जटा तळपल्या जैशा प्रलयंकर तेज ते ।
तपासी लागला तेंव्हा गेल्या स्वस्थानि देवता ॥३॥
तप ते जाहले थोर निघाला अग्नि मस्तकें ।
चौदिशां दाटल्या ज्वाळा लोकांना जाळु लागल्या ॥४॥
खवळले नद्दा धी नी द्वीप पर्वत कंपले ।
तुटले ग्रह नी तारे धगल्या दाहिही दिशा ॥५॥
तपाची लागली आग स्वर्गीचे देव पेटले ।
भितीने ब्रह्मजीपासी गेले नी प्रार्थु लागले ॥६॥
दैत्याच्या त्या तपज्वाळे जळतो आम्हि सर्वही ।
न राहूं शकतो स्वर्गी अनंता आग थांबवा ॥७॥
सर्वज्ञ तुम्ही तो आहा तरी प्रस्ताव मांडितो ।
कोणता धरूनी हेतू दैत्याने तप मांडले ॥८॥
वाटते तुम्हि या लोकी जसे नित्य विराजता ।
तसेचि नित्य या स्थाना इच्छोनी करि तो तप ॥९॥
असीम काळ तो आहे नित्य आत्मा तसाचि तो ।
नसे एकाचि जन्मासि एक युगासि तो नसे ॥१०॥
न जाणो तप शक्तीने उलटे पारडे करी ।
वैष्णवादी पदांनाही अंती विलिन हो पडे ॥११॥
हटयोग करोनीया जुळवी तप थोर हा ।
तुम्ही स्वामी त्रिलोकाचे सर्व जे योग्य ते करा ॥१२॥
ब्रह्माजी ! हे परमेष्ठी ! सर्वश्रेष्ठ तुम्हा पद ।
वर्धना द्विज गायींच्या कल्याण विजयासही ॥१३॥
असे विज्ञापिता देवे ब्रह्म्याने ऐकिले नृपा ।
भृगु दक्ष सवे घेता पातले दैत्य आश्रमी ॥१४॥
तिथे जाता तयांना तो न दिसे दैत्य झाकला ।
वारूळ तृण वेलि नी मुंग्या अंगास लागल्या ॥१५॥
ढगांनी झाकिला सूर्य तसा लोकांसि त्रासि तो ।
ब्रह्मयां विस्मयो झाला हासूनी बोलले तयां ॥१६॥
श्रीब्रह्मदेव म्हणाले -
तुझे कल्याण हो पुत्रा ऊठ कश्यपनंदना ।
इच्छिसी माग ते सर्व तप पूर्णचि जाहले ॥१७॥
पाहिला निश्चयो मोठा डासांनी देह तोडिला ।
हाडांच्या त्या सहाय्याने टिकला देह हा तुझा ॥१८॥
घोर हे तप ते थोर न केले ऋषिंनी कधी ।
न करील पुढे कोणी देवताशतवर्ष ते ॥
न पिता जळ ही थोडे वाचेल कोण तो असा ॥१९॥
पुत्रा रे कार्य हे थोर धीरवंताहि ना जमे ।
प्रसन्न मज तू केले तपनिष्ठे मला अजीं ॥२०॥
मर्त्य तू नित्य मी आहे माग जे इच्छिसी मनीं ।
देईल सर्व ते कांही कृपा ही व्यर्थ जाय ना ॥२१॥
श्रीनारद सांगतात -
युधिष्ठिरा तये वेळी मुग्यांनी तोडिल्या तनीं ।
ब्रह्म्याने सिंचिले पाणी कमंडलु मधील ते ॥२२॥
भडके अग्नी काष्ठात तसा तो वारूळातुनी ।
उठला बलवान्‌ झाला मनी चैतन्य पातले ॥
वज्राच्या परि ते अंग सोन्या परि झळाळले ।
तरूणा परि तो झाला उठला राहिला उभा ॥२३॥
नभात पाहिले दैत्ये ब्रह्मजी हंसआरूढ ।
चित्ती आनंदला तैसे वंदिले शिर टेकुनी ॥२४॥
अंजली जोडुनी नम्र गद्‌गद्‌ शब्देचि बोलला ।
हर्षाने ढळले अश्रू प्रसन्ने स्तुति गायिली ॥२५॥
हिरण्यकश्यपु म्हणाला -
कल्पांत समयी जैसे तमास दाटती घन ।
प्रगटले तुम्ही तैसे स्वयं तेजे पुन्हा इथे ॥२६॥
रचिता मोडिता सृष्टी तुम्ही त्रय गुणाश्रय ।
परेश नी महान्‌ तुम्ही नमस्कार तुम्हा असो ॥२७॥
जगाचे बीज ते तुम्ही ज्ञान विज्ञान मूर्ति ही ।
प्राणेंद्रिय मने बुद्ध्ये स्वताच रूप घेतसा ॥२८॥
(इंद्रवज्रा)
त्या प्राणसूत्रे नियता जगाला
    जगास सार्‍या तयि रक्षितात ।
चैतन्य चित्ता तुम्हि स्वामि आहा
    नी सर्व तत्वीं तव रूप आहे ॥२९॥
तुम्ही प्रतीपाद्द नि वेदअंग
    विस्तारिता सात यजास तुम्ही ।
सर्वात्मरूपा तुचि आदि अंती
    सर्वज्ञ सर्वांतर रूप ऐसे ॥३०॥
तू काळरूपी लव क्षण योगे
    लोकांचि आयू हरिसी सदाची ।
ज्ञानस्वरूपी अन तू अजन्मा
    नी आंतरात्मा अन निर्विकार ॥३१॥
तुझ्या विना भिन्न नसेचि कांही
    चराचरासी अन कार्यभाव ।
कला नि विद्दा तव रूप सारे
    तू ब्रह्म ब्रह्मांडहि ब्रह्मदेवा ॥३२॥
ब्रह्मांड हे तो तव स्थूळ रूप
    त्या इंद्रिये तू विषयास भोक्ता ।
ऐश्वर्यरूपी स्थिर राहसी तू
    सूक्ष्मो स्थुळो ब्रह्मरूपा पुरूषा ॥३३॥
(अनुष्टुप्‌)
अव्यक्तानंत रूपाने व्यापिले जग तू असे ।
सचेताचेतही तूची नमस्कार तुला प्रभो ॥३४॥
जरी तू वरदो श्रेष्ठ नी वरा देऊ इच्छिसी ।
तरी तो वर दे ऐसा मनुष्य देव दानव ॥३५॥
अथवा अन्य ते प्राणी न येवो मृत्यु यां करे ।
आत बाहेर रात्री ना दिनी ना शस्त्र अस्त्रने ॥३६॥
पृथ्वीवरी न आकाशी मजला मृत्यु दे असा ।
न कोणी लढण्या ठाको एक सम्राट मीच हो ॥३७॥
इंद्रादी लोकपालांची आपुली महिमा जसी ।
लाभावी मजला तैसी योगियां तपियां जसे ॥
लाभते नित्य ऐश्वर्य ते द्दावे मजला तुम्ही ॥३८॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ ५ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP