समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सातवा - अध्याय ४ था

हिरण्यकशिपूचे अत्याचार व प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन -

श्रीनारद सांगतात -
(अनुष्टुप्‌)
हिरण्यकश्यपू याने मागता वर दुर्लभ ।
तपे प्रसन्न होवोनी ब्रह्माजीने दिले तया ॥१॥
ब्रह्मदेव म्हणाले -
मुला जे मागसी ते तो जीवासी अति दुर्लभ ।
दुर्लभो असुनी सर्व देतो मी तुजला परी ॥२॥
श्रीनारद सांगतात -
ब्रह्म्याचे वर ना खोटे समर्थ भगवद्रुप ।
वर हे मिळता सर्व दानवे पूजिले तया ॥
पुन्हा ते स्तुति ऐकोनी सत्य लोकास पातले ॥३॥
वर हे मिळता सर्व दैत्याची तनु कांतिमान्‌ ।
धष्ट-पुष्ट तशी झाली भगद्‌द्वेषि जाहला ॥४॥
महादैत्ये दिशा सर्व त्रिलोक देवता तसे ।
असूर नृपती सर्प गरूड सिद्ध चारण ॥५॥
विद्दाधर ऋषी पित्रे मनू यक्ष नि राक्षसा ।
भूत प्रेत समस्तांचे राजे सर्वचि जिंकिले ॥६॥
नागविले असे सर्वां सर्वांचे स्थान घेतले ॥७॥
स्वयं ज्या विश्वकर्माने निर्मिले इंद्रभूवना ।
नंदनवन या स्थानी स्वर्गी तो राहु लागला ॥
त्रिलोकीचेहि प्रत्यक्ष जेथ सौंदर्य साठले ।
सर्व संपत्तिती तेथे एकत्र जाहली असे ॥८॥
सोपान ते प्रवाळाचे फरशा पाचु्च्याहि त्या ।
स्फटीकाच्या अशा भिंती वैडूर्यीखांब शोभले ॥९॥
आसने माणकांची ती छत ते चांदल्या परी ।
दुग्धफेसापरी शय्या मोत्यांच्या झालरी पहा ॥१०॥
सर्वांगसुंदरी ऐशा अप्सरा रत्‍नभूवरी ।
नूपुरांचा झणत्‌कार दर्पणी मुख पाहती ॥११॥
(इंद्रवज्रा)
इंद्राचिये त्या भुवनात दैत्य
    जिंकोनि राही सकळास तेथे ।
तो दंड त्याचा अतिची कठोर
    देवो नि दैत्यो पदस्पर्शिती ते ॥१२॥
गंधीत दारू पिउनीच राही
    सदाचि डोळेहि वटारलेले ।
शरीर तेजे निधि तो तपाचा
    तिघां विना सर्वचि देव भिती ॥१३॥
इंद्रासनी तो बसता तिथे तै
    विश्वावसू तुंबर मीहि गायी ।
गंधर्व विद्दाधर सिद्ध आदी
    त्या अप्सरा तो नित त्यास गाती ॥१४॥
(अनुष्टुप्‌)
असा तेजस्वि तो सर्व वर्ण आश्रम धर्मिने ।
यज्ञाच्या आहुत्या देता बळेचि घेई सर्व तो ॥१५॥
पृथ्वीच्या सातही द्वीपी अखंड राज्य त्याजला ।
उगवे सर्वही धान्य पृथ्वीत ते न पेरिता ॥
इच्छी सर्व तशा वस्तू मिळती अंतराळि त्यां ।
आकाश रंजवी त्याला सौंदर्य वस्तु दावुनी ॥१६॥
क्षार सूरा घृत मधू दही दूध जळाचिये ।
नद्दापत्‍न्यांकरे देई रत्‍न फेसात सागर ॥१७॥
खेळण्या पर्वते घाट वृक्ष ते फुलती सदा ।
एकटा लोकपालांचे गुण सर्वचि धारि तो ॥१८॥
असा सम्राट तो थोर प्रीय ते भोगु लागला ।
अतृप्त सर्व भोगात इंद्रियांचाच दास तो ॥१९॥
या रूपी राहिला पार्षद्‌ शापिता सनकादिके ।
माजला माज ऐश्वर्ये गेले ते कैक वर्षही ॥२०॥
कठोर शासने त्याच्या भिले ते लोकपालही ।
न आश्रय कुठे तेंव्हा भगवत्‌पदि पातले ॥२१॥
(मनातल्या मनात म्हणाले)
सर्वात्मा श्रीहरी जेथे निवसे जगदीश्वर ।
जे धाम मिळता संता पुन्हा ना जन्म मृत्यु तो ॥
अशा वैकुंठधामाला आमुचा प्रणिपात हा ॥२२॥
इंद्रीय मन रोधोनी तयांनी जल वर्जिले ।
झोपणे सोडले आणि हृदयीं हरि प्रार्थिला ॥२३॥
एकदा मेघनादैसी झाली आकाशवाणि ती ।
दिशाही घुमल्या सर्व साधुंच्या अभयार्थची ॥२४॥
नभ्यावे देवतांनो हो कल्याण तुमचे असो ।
परंकल्याण प्राण्यासी माझ्या या दर्शनात की ॥२५॥
दुष्टता नीच दैत्याची मला पूर्वीच ज्ञात ती ।
संपवील तया मीच वेळेची वाट ती पहा ॥२६॥
देवता देव नी गायी द्विज साधू नि धर्म यां ।
माझाही करिता द्वेष शीघ्र नाश तया असे ॥२७॥
निर्वेर शांत जो पुत्र प्रल्हादा द्रोह हा करी ।
तदा वधील मी यासी वराने जरि माजला ॥२८॥
श्रीनारद म्हणाले -
ऐकोनी वाणि ही ऐसी फिरले वंदुनी तया ।
उद्वेग मिटला सर्व दैत्य मेला जणू तदा ॥२९॥
दैत्यासी चार ते पुत्र गुणांनी जे निचक्षण ।
प्रल्हाद सान तो सर्वां परी सर्वात तो गुणी ॥३०॥
द्विजभक्त सम शांत जितेंद्रिय हि सत्य नी ।
सर्वांचा प्रीय नी तैसा हितैषी सत्यवादि जो ॥३१॥
नत थोरांपुढे होई गरिबांचा पिता जसा ।
समाना बंधु तो जैसा गुरूला ईशची बघे ॥
सौंदर्य धन विद्दा नी कुळाचा गर्व ना शिवी ॥३२॥
(इंद्रवज्रा)
तो धैर्यशाली जरि ऐकिले त्या
    भोगास त्याने नच इच्छिले की ।
जितेंद्र ऐसा नच कामना त्यां
    असूर द्रव्या नच स्पर्शिले की ॥३३॥
(अनुष्टुप्‌)
अनंत भगवान्‌ जैसा तैसा प्रल्हाद श्रेष्ठ ही ।
महात्मे गाति त्या सर्व जैसे तैसाचि तो पहा ॥३४॥
कुळासी देव ते शत्रू तरी संत सभेत ते ।
अन्य भक्तास प्रल्हाद नामे सन्मान साधिती ॥
राजा तुझ्या परी भक्त मानिती नवलाव ना ॥३५॥
महिमा वर्णिण्या त्यांची अनंत गुण त्याचिये ।
आवश्यक नसे कांही, वासुदेव उपासना ॥
जन्मजात असे त्यासी हा एक गुण तो पुरे ॥३६॥
राजा प्रल्हाद तो बाळ खेळ सोडोनि तन्मय ।
साठवी हरिसी पोटी न राही शुद्ध त्याजला ॥३७॥
वाटे सदा तया ईश आलिंगी धरूनी पहा ।
उठता बसता खाता झोपता जलही पिता ॥
फिरता बोलता नित्य न देई लक्ष तो कुठे ॥३८॥
भगवान्‌ सोडुनी गेला असे त्यां वाटता मनीं ।
जोराने रडुही लागे हासे भेटीत तो कधी ॥३९॥
ओरडोनी कधी बाही नाचे मोदे कधी तसा ।
कधी तल्लीन होवोनी त्याची मुद्रा करी स्वयें ॥४०॥
हृदयीं कधि स्पर्शाने सुखावे शांत हो मनीं ।
कधी रोमांच हो अंगी आनंदाश्रूच ते कधी ॥४१॥
(इंद्रवज्रा)
लाभे हरीच्या चरणास भक्ती
    अकिंचनी त्या नित संत संगे ।
म्हणोनी राही हरिच्यात मग्न
    जो शांत भक्ता नित देत राही ॥४२॥
(अनुष्टुप्‌)
राजा ! प्रल्हाद तो भक्त हरीचा प्रिय भाग्यवान्‌ ।
उच्चकोटी असा थोर तरी दैत्ये तया तसे ॥
अपराधी करोनीया त्रासिण्या कष्ट घेतले ॥४३॥
राजा युधिष्ठिराने विचारिले -
देवर्षि सुव्रती तुम्ही सांगा आम्हा असे कि त्या ।
हिरण्यकश्यपू याने सुपुत्रा द्रोहिले कसे ? ॥४४॥
पुत्रासी प्रेम ते होते स्वाभाविक पित्यां मनीं ।
दाटिती चुकता कांही शत्रुवत्‌ ना बघे कधी ॥४५॥
विमलो हृदयी ऐसा गुरूभक्त अशा मुला ।
कोण द्वेषी कसा हे हो यतिंद्रा सांगणे अम्हा ॥
आश्चर्य वाटते सर्व शंका शांत करा तुम्ही ॥४६॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥ ५ ॥ ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP