समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सातवा - अध्याय २ रा

हिरण्याक्षाचा वध झाल्यावर तो मातेला व कुटुंबाला हिरण्यकश्यपु समजावितो -

नारद म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
राजा ! श्रीहरिने जेंव्हा हिरण्याक्षासि मारिले ।
तेंव्हा तो पेटला बंधूप्रेमाने अग्निची असा ॥१॥
कर्करा ओठ चावोनी कंपला क्रोधाग्निने ।
क्रोधनेत्रेचि आकाशा कडे तो पाहु लागला ॥२॥
दाढा विक्राळ त्या ऐशा केल्याने मुख ना दिसे ।
उचलोनि त्रिशूळाला वदला दानवो असा ॥३॥
शंबरा त्र्यक्ष द्वीमूर्धा शतबाहू हयग्रिवा ।
विप्रचित्ती पुलोमा रे नमुची पाक इल्वला ॥४॥
शकुना ऐकणे सर्व दैत्य नी दानवो तुम्ही ।
जसे मी सांगतो तैसे करावे पूर्ण ते तुम्ही ॥५॥
तुम्ही हे जाणता सर्व शत्रूंनी विष्णुच्या करें ।
मारिला प्रिय तो बंधू देवतांनी विनंतिने ॥६॥
विष्णु हा मूळचा शुद्ध आता रूपे धरी असा ।
स्थीर ना चित्ति तो आता भक्तांची बाजु घेतसे ॥७॥
त्रिशुळे छेदितो कंठ तर्पितो रक्त बंधुला ।
तेंव्हाचि शांत मी होई चैन ती ना तया विना ॥८॥
तोडिता मूळ जै वाळे वृक्ष तो त्याचिया परी ।
मायावी शत्रु हा विष्णु देवतांचा तसाच की ॥९॥
म्हणोनी पृथ्वीसी जावे वाढले द्विज क्षत्रिय ।
तेथील लोक स्वाध्याय दान यज्ञ तपे व्रते ॥
करिती शुभ इत्यादी त्या सर्वां ठार मारणे ॥१०॥
विष्णुचे मूळ ते विप्रकर्म धर्म रूपीच तो ।
देवता सर्व प्राणी नी धर्माचा तोचि आश्रय ॥११॥
जेथे गायी नि ते वेद वर्णाश्रमचि धर्म हो ।
त्या त्या देशी तुम्ही जा नी जाळोनी सर्व नागवा ॥१२॥
जीवांना दुःख ते होता दैत्यांना सुख लाभते ।
स्वीकार करूनी आज्ञा लोकांना मारू लागले ॥१३॥
तयांनी नगरे गावे गोठे बाग क्रिडांगणे ।
रत्‍नागरे नि वाड्या नी व्यापारी केंद्र जाळिले ॥१४॥
कोणी कुदळ घेवोनी मोठे पूल नि कोट नी ।
फाटके तोडिले तैसे फलवृक्षहि तोडिले ॥
जळते काष्ठ घेवोनी घरे ती जाळु लागले ॥१५॥
निष्पाप ती प्रजा सर्व दैत्यांनी पीडिली बहू ।
स्वर्ग सोडोनि त्या वेळी लपोनी पृथिवीस या ॥
देवता राहिल्या होत्या गुप्तवेष धरोनिया ॥१६॥
हिरण्यकश्यपू झाला दुःखीत बंधु मृत्युने ।
अंत्येष्टी करूनी येता सांत्विले पुतण्यास त्या ॥१७॥
शकुनी शंबरा धृष्टा कालनाभ हरिश्मश्रू ।
वृक नी भूतसंपन्नो उत्कलो सगळ्यास या ॥१८॥
रूषाभानू तयीं माता आपुली दिति मातृही ।
देशकालानुसारेण मधूर समजाविले ॥१९॥
हिरण्यकश्यपू म्हणाला -
प्रियंबे ! वहिनी ऐका न करा शोक तो मुळी ।
वीर हा इच्छितो मृत्यू रणात शत्रु झोडिता ॥२०॥
अड्ड्यासी जमती कैक येती जाती क्षणातची ।
कर्माने जीव हा तैसा भेटतो सोडितो दुजा ॥२१॥
आत्मा तो अविनाशी नी नित्य शुद्ध नि सर्वगत्‌ ।
सर्वज्ञ सवता ऐसा अविद्दे देह धारितो ॥२२॥
तरंग हलता वृक्षप्रतिबिंबहि हालते ।
हालत्या बुबुळा सर्व पृथिवी हालता दिसे ॥२३॥
कल्याणी ! भटके चित्त मूळ आत्मा तया तदा ।
स्थूळ सूक्ष्मा न संबंधी परी संबंधि भासती ॥२४॥
आत्म्याला जड तो मानी खरा अज्ञानि तो पहा ।
तेणे भास असा होतो प्रपंची भ्रमणे पडे ॥२५॥
जन्म मृत्यु नि तो शोक चिंता नी अविवेक तो ।
विस्मृती ती विवेकाची अज्ञाने सगळे घडे ॥२६॥
संत ते बोलती ऐसा इतिहास पुरातन ।
वदे संबंधिया येम चित्त देवोनि ऐकणे ॥२७॥
उशीनर यया देशी सुयज्ञ नृप कीर्तिमान्‌ ।
युद्धात मारला जाता आप्तेष्टे प्रेत घेरिले ॥२८॥
तुटले रत्‍नकवचो मालाही तुटल्या तशा ।
हृदयो तुटले बाणे रक्ताने भिजली तनू ॥२९॥
तसे विखुरले केश डोळेही फुटले पहा ।
दातांनी दबले ओठ मातीने भरले मुख ॥
युद्धात तुटले शस्त्र बाहूही तुटल्या तशा ॥३०॥
(इंद्रवज्रा)
बघोनि ऐसी पतिची अवस्था
    राण्यासि झाले बहु दुःख तेंव्हा ।
मेलोत आम्ही जित आसुनीया
    छाती पिटोनी वदल्या अशा त्या ॥३१॥
शोकेचि अश्रू कुच-कुंकुमाते
    मिळोनि गेले प्रियच्या पदास ।
नी दागिने केशहि पांगले की
    आक्रंदता अन्यहि शोकि न्हाले ॥३२॥
देवा बहूक्रूरं असा कसा तू
    स्वामी तुम्हा दूरचि दृष्टि आड ।
तेणेचि नेले, तुम्ही लोकपाल
    दशा पहाता नच शोक थांबे ॥३३॥
तुम्हा विना आम्हि कसे जगावे
    तुम्हापदीच्या अम्हि सर्व दास्या ।
स्वामी तुम्ही जाल तिथेहि येण्या
    आज्ञा असावी मग आम्हि येऊ ॥३४॥
(अनुष्टुप्‌)
धरोनी पतिप्रेताला त्यांनी केला विलाप हा ।
नेच्छिती जाळण्या प्रेता सूर्यास्त जाहला तदा ॥३५॥
तदा संबंधि यांनीही विलाप मांडला बहू ।
यमाने ऐकता शोक बालवेषात पातला ॥३६॥
यमराज (बालवेषात) म्हणाले -
(इंद्रवज्रा)
माझ्याहुनी वृद्धचि लोक तुम्ही
    मृत्यु नि जन्मा बघुनी ही मूढ ।
आला तयाला घडतेचि जाणे
    खोटाचि कां हा करितात शोक ॥३७॥
आम्ही तुम्हाहून कितीक चांग
    त्या माय-बापे त्यजिले अम्हाला ।
न शक्ति अंगी तरि नाहि चिंता
    केसा न धक्का कुणि लावितात ।
गर्भात जेणे मज रक्षियेले
    रक्षी जगामाजिहि तोच आम्हा ॥३८॥
हे देवियांनो हरि इच्छुनीया
    रची जगाला अन तोच मोडी ।
हे विश्व त्याचे नित खेळणे की
    जगास दंडी अन बक्षिसी दे ॥३९॥
वाटते वस्तू पडुनी रहाते
    न भाग्य तेंव्हा फुटते तिजोरी ।
ते वन्यप्राणी जगती वनात
    दैवे घरी कोणि मरोनि जातो ॥४०॥
ज्या पूर्वजन्मी मनि वासना त्या
    तसाचि मृत्यू अन जन्म होता ।
आत्मा शरीराहुनि वेगळा तो
    त्यां जन्म मृत्यू नच स्पर्शिती की ॥४१॥
माती घरा जाणिती लोक भिन्न
    तशी तनू मृत्तिका भिन्न आहे ।
बुद्‌बूद होती जल ते जलात
    देहा तसे मातित होय जाणे ॥४२॥
काष्ठात अग्नी असुनीहि भिन्न
    तसाचि वायू तनुसीहि भिन्न ।
सर्वत्र आकाश तरी अलिप्त
    निर्लेप आत्मा मग तो तसाचि ॥४३॥
(अनुष्टुप्‌)
मूर्खांनो तुम्हि ज्या साठी शोकी तो तुमच्या पुढे ।
बोलवी जो तया आत्मा तुम्ही तो नच पाहिला ॥४४॥
महाप्राण शरीरासी चेतवी बोलवी तसे ।
द्रष्टा तो शरिरा माजी पृथक्‌ प्राण तनू असे ॥४५॥
अविच्छिन्न असा तोची देह घेतो परो परी ।
विवेके मुक्त तो होतो सर्वां पासुनि वेगळा ॥४६॥
सतरा तत्व मेळोनी धारिती देह साजिरा ।
कर्माच्या बंधने जाती क्लेश मोह तया सवे ॥४७॥
सृष्टिसी मानणे सत्य दुराग्रह असाचि तो ।
मनोरथापरी सर्व असत्य समजा मनीं ॥४८॥
म्हणोनी जाणते त्यांनी शोक न करणे कधी ।
अज्ञान दृढ त्या लोकां कळणे नच स्वल्प हे ॥४९॥
अशाच जंगला मध्ये एक तो पारधी वसे ।
जणू तो काळ पक्षांचा जाळ्याने पक्षि तो धरी ॥५०॥
एकदा जोडपे पक्षी चरता पाहिले तये ।
मादीला शीघ्रची तेणे जाळे टाकोनि घेरिले ॥५१॥
विपरीत अशी मादी पडता पाहिली नरे ।
न सोडू शकतो तो नी विलाप करू लागला ॥५२॥
वदला ईश हा मोठा शक्तिमान्‌ परि निर्दय ।
एकची पत्‍नि ही माझी नेवोनी काय तो करी ॥५३॥
मौज त्याला तशी वाटे तरी नेवो तिला बरे ।
एकटा जगुनी दुःखी जगीं मी काय ते करू ॥५४॥
पिलांना पंख ना आले सांभाळू मी कसा तयां ।
पाहतील तिची वाट खोप्यात बसुनी तशी ॥५५॥
(इंद्रवज्रा)
पक्ष्ये असा खूप विलाप केला
    आतूर झाला बहु तो वियोगे ।
आसू गळाले अन कंठ दाटे
    व्याधे तयाही वधिले तिराने ॥५६॥
(अनुष्टुप्‌)
राण्यांनो गति ती तैसी होईल तुमचीहि की ।
वर्षही पिटता छाती नये हा परतोनिया ॥५७॥
हिरण्यकशिपु म्हणाला -
बाळाचे ज्ञानि हे बोल ऐकता दंग जाहले ।
राजाचे बंधुनी स्त्रीया यांनी मिथ्यत्व जाणिले ॥५८॥
ऐकवोनि कथा ऐसी यमही गुप्त जाहला ।
सुयज्ञाची पुन्हा केली अंत्येष्टी बंधुने तदा ॥५९॥
म्हणोनी तुम्हि सर्वांनी कुणाचा शोक ना करा ।
जगात कोण तो आत्मा कोण भिन्न स्वताहुनी ॥
आपुले परके काय अज्ञानाचा दुराग्रह ।
न कारण तया अन्य भेद बुद्धीस तो असे ॥६०॥
श्रीनारद सांगतात -
राजा हे दितिने सर्व पुत्राचे शब्द ऐकिले ।
सुनेच्या सह तो त्यांनी पुत्राचा शोक त्यागिला ॥
परं तत्व स्वरूपात दितिने चित्त लाविले ॥६१॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ ५ ॥ २ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP